कोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती?

१२ मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


जगात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा तिची तुलना सर्वप्रथम १९३० च्या जागतिक महामंदीशी केली जाते. चार महिन्यानंतरही कोरोना आटोक्यात येत नाही. त्यामुळं अर्थव्यवस्थेचं चक्र मंदीच्या माती रुतलंय. सध्याच्या या परिस्थितीची वर्णन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं १९३० च्या दशकातल्या जागतिक महामंदीनंतरचं सर्वात मोठं आर्थिक संकट अशा शब्दांत केलंय.

जग नुकतंच पहिल्या महायुद्धाच्या खाईतून बाहेर आलं होतं. हे युद्ध अमेरिकेच्या भूमीवर खेळलं गेलं नसल्यानं अमेरिकेचे उद्योगधंदे सुरळीत चालू होते. संपूर्ण युरोपच या युद्धात उतरल्यानं त्या देशांना अमेरिकेनं शस्त्रास्त्रं पुरवली. यातून अमेरिकेला भरमसाठ नफा झाला. अमेरिकेत युद्धकाळातील गरजेच्या वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झालं. कामासाठी लोक ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडं स्थलांतर करू लागली. 

अमेरिकेतील भरभराट

१९२० साल उजाडता अमेरिकेत समृध्दी आली. लोकांच्या हातात पैसा आल्यानं त्यांची खरेदी शक्ती वाढली. त्यामुळं लोकांनी वॉशिंग मशीन, वॅक्यूम क्लिनर, कपडे, कार यासारख्या अनेक चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा झपाटाच लावला.परिणामी अमेरिकेतल्या उद्योगधंद्यांची भरभराट झाली. बॅंकानीही लोकांना भरमसाठ कर्जे द्यायला सुरू केली.

वॉल स्ट्रीट म्हणजे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज हे जगातले सर्वात मोठं शेअर मार्केट. या ठिकाणी अमेरिकेतल्या अती हुशार लोकांचा वावर असायचा. १९२० नंतर हे मार्केट वधारायला सुरवात झाली. लिबर्टी बाँड हे युद्धकाळात पैसा उभारायचं सरकारच एक माध्यम. अमेरिकन सरकारनं युद्धानंतरही हे बाँड विक्रीस काढलं. सामान्य लोकांनी याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करायला सुरवात केली.

लोक सरकारी बाँड खरेदी करतात तर मग खासगी बाँडही खरेदी करतीलच या आशेनं अनेक खासगी कंपन्यांनीही बाँड विक्रीला सुरवात केली. झटपट श्रीमंत व्हायच्या नादात लोकांनीही त्याला मोठा प्रतिसाद दिला. या माध्यमातून युरोपातूनही अमेरिकेत गुंतवणूक व्हायला लागली. एकुणच हा काळ म्हणजे सगळीकडं आनंदी आनंद होता. याचा फायदा घेवून रिपब्लीकन पक्षाच्या हर्बट हूवर यांनी अध्यक्षीय निवडणूकसुध्दा जिंकली. १९२० ते १९२८ या काळातील अमेरिकेतील या भरभराटीच्या परिस्थितीला ‘रोअरिंग ट्वेंटीज्’ असं म्हटलं जातं.

हेही वाचा : विमान कंपन्यांना भवितव्य नाही : वॉरेन बफे

वॉल स्ट्रीट कोसळलं 

१९२८ पर्यंत सर्वकाही सुरळीत चाललं होतं आणि पुढच्याच वर्षी अस्थिरतेला सुरवात झाली. अचानक ४ सप्टेंबर १९२९ रोजी शेअर मार्केट कोसळायला सुरवात झाली. त्यातच पसरलेल्या अफवांमुळं लोकांनी आपले शेअर्स विकायला सुरु केले. २४ ऑक्टोबर या एकाच दिवशी शेअर मार्केटचे त्याकाळी ५ अरब डॉलरचे नुकसान झालं आणि २९ ऑक्टोबरला जवळपास १४ अरब डॉलरचे नुकसान होवून शेअर मार्केट पूर्णपणे आपटले.

या एकाच दिवशी अमेरिकेतील लाखो लोकांनी शेअर विक्रीला काढले. हा दिवस अमेरिकेच्या इतिहासातील ‘ब्लॅक ट्युजडे’ अर्थात काळा मंगळवार म्हणून ओळखला जातो. एका आठवड्याच्या आतच अनेक लोकांच्या बचती नष्ट झाल्या. 

मागणी, पुरवठ्याचं गणित बिघडलं

अमेरिकेत सर्वच क्षेत्रात विशेषत: उद्योग व कृषी क्षेत्रात मागणी व पुरवठा याचा समतोल न राखता केवळ उत्पादनावर भर देण्यात आला. त्यामुळं उत्पादन जास्त झाले आणि तुलनेनं खरेदी कमी झाली. अशातच शेअर मार्केट कोसळताना लोकांनी अचानक चैनीच्या वस्तूंची खरेदी थांबवून आपला खर्च दहापटीनं कमी केला. त्यामुळं अनेक उद्योगांना त्यांचे उत्पादन बंद करावं लागलं. 

अमेरिकेत संपत्तीच्या असमान वाटपामुळं ३-४ टक्के अतिश्रीमंत लोकांकडे जवळपास ५० टक्के संपत्तीचं केंद्रीकरण झालं होतं. या अतिरिक्त उत्पादन आणि संपत्तीच्या केंद्रीकरणाचा थेट परिणाम वित्तीय धोरणांवर होत होता.

हेही वाचा : कोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ?

बँका दिवाळखोर झाल्या

बँकांनी लोकांना भरमसाठ कर्जे दिली होती. त्याचा परतावा आता बंद झाला. त्यातच बँकींग व्यवस्थेवरचा विश्वास उडू लागल्यानं लोकांनी बँकातील आपल्या ठेवी काढायला सुरू केल्या. यामुळं जवळपास पाच हजार बँका दिवाळखोर झाल्या. उरलेल्या बँकांनी आपले आर्थिक व्यवहार बंद केले.अमेरिकन सरकारनं आपल्या उद्योगांच्या संरक्षणासांठी बाहेरून येणाऱ्या मालावर मोठा आयात कर लावला. त्याचा परिणाम जागतिक व्यापारावर झाला आणि मंदीची झळ जगभरात पसरली.

वॉल स्ट्रीट मधे जगभरातील लोकांनी गुंतवणूक केली होती. यात इग्लंडच्या विस्टन चर्चील यांच्यासारख्या अनेक धनाड्य राजकारण्यांचा समावेश होता. शेअर मार्केट कोसळताना अध्यक्ष हर्बट हूवर यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही. त्यांना त्यावेळी परिस्थितीचं गांभिर्य लक्षात आलं नव्हतं आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर त्यांच्या हातात करण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. १९२९ च्या तुलनेत अमेरिकेतील शेअर मार्केट ८९ टक्क्यांनी खाली आला.

महामंदीचा परिणाम

मंदी म्हणजे अशी अवस्था ज्यात लोकांची खरेदी क्षमता नष्ट होते. त्यामुळं उत्पादनं जशीच्या तशी पडून त्यांना मागणी नसल्यानं कारखाने बंद करावे लागतात. परिणामी बेरोजगारी वाढते.

अमेरिकेत आलेल्या या महामंदीनं लाखो लोकांंचं जीवन नरकप्राय केलं. अमेरिकेतल्या बेरोजगारीचा दर २६ टक्क्यांवर वाढून १ करोड ३० लाख अमेरिकन लोकांचा रोजगार गेला. लोकांच्या हातातला पैसा अचानक गायब झाल्यानं गरीबी वाढली. लोक अक्षरश: रस्त्यावर आले. काम मिळवण्यासाठी लोक हजारो मैलांचा प्रवास करू लागली. अनेकांनी आत्महत्या केल्या. यातच १९३० साली अमेरिकेत दृष्काळ पडला आणि परिस्थिती अजून वाईट झाली.

रेशनच्या दुकानासमोर लोकांची भलीमोठी लाईन लागली. बँकांच्या कर्जाचा परतावा बंद झाल्यानं आणि उरला सुरला पैसाही काढला गेल्यानं बँकींग व्यवस्था ढासळली. अमेरिकेनं युरोपियन देशांना भली मोठी कर्जे दिली होती. युरोपलाही मंदीची झळ बसल्यानं ती कर्जे आता बुडण्याचा धोका निर्माण झाला.

कोरोनामुळे बेरोजगारीत विक्रमी वाढ

अमेरिकेतील कृषी क्षेत्राचं उत्पादन घटून ते अर्ध्यावर आलं. १९२९ ते १९३२ या काळात औद्योगिक उत्पादन ४५ टक्कयानं कमी आलं. एकुणच पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली. या महामंदीनं अमेरिकेचं राजकारण बदललं. १९३३ सालच्या अध्यक्षीय निवडणूकीत रिपब्लीकन पक्षाच्या हूवर यांचा पराभव झाला आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे फ्रँकलीन रूझवेल्ट हे अध्यक्ष बनले.

कोरोना संकटामुळं २०२० च्या एप्रिल महिन्यात अमेरिकेचा बेरोजगारीचा दर १४.७ टक्क्यांवर जाऊन पोचलाय. जागतिक महामंदीनंतर पहिल्यांदाच हा दर एवढा वाढलाय. कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद ठेवल्याचा हा परिणाम आहे.

गेल्या १० वर्षांत वाढलेला बेरोजगारीचा दर एका महिन्यात सरकन खाली आलाय. अमेरिकेतल्या लेबर डिमार्टमेंटनं जाहीर केलेल्या माहितीनुसार २०.५ मिलियन लोकांना अचानक आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्यात. थोडक्यात, १९३० सारखीच परिस्थिती आज अमेरिकेत दिसतेय.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

सगळं जगच महामंदीच्या कवेत आलं

बघता बघता जगभर मंदीचा प्रसार झाला. पहिल्या महायुद्धात झालेल्या नुकसानीमुळं जर्मनी कर्जात गेला होता. अमेरिकेच्या मदतीवर जर्मनी कसाबसा सुरू होता. आता अमेरिकाच मंदीच्या विळख्यात सापडल्यानं ही मदत बंद झाली. त्यामुळं जर्मनी आर्थिक संकटात सापडला. १९३२ पर्यंत साठ लाख लोक बेरोजगार झाले. सगळीकडं गोंधळ माजून जर्मनीतील गणतंत्र दुर्बल झालं. याचा फायदा घेवून हिटलर सत्तेत आला.

१९३१ साली महामंदीमुळं ब्रिटननला स्वर्णमान धोरणाचा त्याग करावा लागला, सोन्याची निर्यात बंद करावी लागली, व्यापारात संरक्षण नीती अवलंबवावी लागली. झालेल्या नुकसानीसाठी त्यांनी वसाहतींचं शोषण वाढवलं. फ्रांन्सनं पहिल्या महायुद्धातील पराभूत जर्मनीकडून महाप्रचंड खंडणी वसूल केली होती. त्यामुळं त्यांना या मंदीचा फारसा परिणाम जाणवला नाही पण यामुळं फ्रांन्सच्या राजकारणात समाजवादी विचारसरणीचा उदय झाला. सोविएत रशियात हुकूमशहा स्टॅलीनने पंचवार्षिक योजना सुरू केल्यामुळं रशिया या मंदीपासून लांबच राहिला. 

जागतिक महामंदी आणि भारत

भारत त्या काळी ब्रिटीश साम्राज्याचा एक भाग होता. तो व्यापाराच्या माध्यमातून जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडला गेलेला. त्यामुळं या महामंदीचा फटका भारतालाही बसला. त्या काळात भारतात उद्योगधंद्यांचा म्हणावा तितका विकास झाला नव्हता. भारतातून कृषी उत्पादनं, कच्चा माल इंग्लंडला निर्यात व्हायचा आणि तिकडचा पक्का माल परत भारतात यायचा. महामंदीमुळं भारताची आयात-निर्यात अर्ध्यावर आली. वस्तूंच्या किंमती कमी झाल्या. पण यामुळं शहरी मध्यम वर्ग खूश होता. 

ग्रामीण भागाला मात्र मंदीचा मोठा फटका बसला. इंग्लंडच्या कारखानदारीला भारतातील ग्रामीण भागातून कच्चा मालाचा पुरवठा व्हायचा. आता इंग्लंडमधेच मंदी आल्यानं भारतातील कच्च्या मालाला उठाव मिळत नव्हता. त्यामुळं कृषी उत्पादनाच्या किंमती कोसळल्या. शेतकऱ्याचं उत्पन्न घटलं. अशाही स्थितीत वसाहतवादी सरकारनं कृषीवरचा महसूल कर कमी करण्यास नकार दिला.

हेही वाचा : जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी

शेतकरी कर्जबाजारी झाला

बंगालमधील ज्यूट उत्पादक शेतकऱी इंग्लंडला होणारी निर्यात बंद झाल्यानं हवालदिल झाले. सरकारचा कर भरण्यासाठी त्यांना खासगी सावकारांकडून कर्जे काढावी लागली. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनी आणि घरातील सोनं सावकाराकडं गहान ठेवावं लागलं. हीच परिस्थिती सगळ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची झाली होती. 

असं सगळ्या ग्रामीण भारतभरातलं सोनं शेवटी खासगी सावकारांकडून ब्रिटीशांकडं गोळा झालं होतं. त्याचा वापर ब्रिटीशांनी आपलं आर्थिक नुकसान भरून काढायला केला. प्रसिध्द अर्थतज्ञ जॉन मेनार्ड केन्स असं म्हणतात की, भारतातील सोन्याच्या निर्यातीनं जगाची अर्थव्यवस्था रूळावर यायला मदत झाली पण त्याचा भारतातील शेतकऱ्यांना खूपच कमी फायदा झाला.

इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेत पडलेला खड्डा भरण्यासाठी ब्रिटीशांनी भारतीयांवर नवनविन कर लादायला सुरू केले. मिठावरचा कर हा त्यातलाच एक. यामुळं ग्रामीण भागात असंतोष वाढला. याचे रूपांतर ठिकठिकाणी विद्रोहात होवू लागले. गांधीजींनी १९३० साली सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्याला मिळालेला लोकांचा पाठिंबा पाहून ब्रिटीशांनी भारतीयांच्या काही मागण्या मान्य केल्या. १९३५ सालचा आरबीआय कायदा हा त्यातलाच एक भाग. महामंदीच्या काळात ग्रामीण भागातून राष्ट्रीय काँग्रेसला मोठा पाठिंबा मिळाला आणि स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक वळण मिळालं.

रूझवेल्ट यांची न्यू डिल पॉलिसी

१९३३ साली सत्तेवर येताच अध्यक्ष रूझवेल्ट यांनी अमेरिकेला महामंदीतून बाहेर काढण्यासाठी पहिल्या शंभर दिवसांसाठी एक कार्यक्रम आखला. यात बेरोजगारांना रोजगार, टेनेसी वॅलीचा पुर्नविकास, बँकातील ठेवींचं संरक्षण, कृषीचा विकास अशा विविध धोरणांवर कायदे करण्यात आले आणि त्यादृष्टीनं पावलं उचलण्यात आली. मोठमोठे सार्वजनिक प्रकल्प हाती घेवून रोजगार निर्मीती करण्यात आली. 

लोकांच्या ठेवींचं संरक्षण करण्यासाठी फेडरल डिपॉजीट इंश्यूरंस कॉर्पोरेशन आणि शेअर मार्केटवर नियंत्रणासाठी सिक्युरिटीज् एन्ड एक्सचेंज कमिशन या संस्था सुरू केल्या. त्यांचं हे धोरण न्यू डील पॉलीसी म्हणून ओळखलं जातं. यामुळंच अमेरिका महामंदीतून काही प्रमाणात बाहेर आली. पण दुसऱ्या महायुद्धानेच अमेरिकेला खऱ्या अर्थानं या महामंदीतून बाहेर काढलं. 

हेही वाचा : भारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या?

हिटलरचा उदय आणि साम्यवादाला प्रतिष्ठा

या महामंदीचा जागतिक राजकारणावर मोठा परिणाम झाला. महामंदीमुळं अमेरिकेकडून जर्मनीला मिळणारी मदत बंद झाली. त्यामुळं जर्मनीत प्रचंड बेरोजगारी वाढली. लोकांत असंतोष निर्माण झाला. ठिकठिकाणी त्याचा उद्रेक झाला आणि गणतंत्र दुबळं झालं. याचा फायदा घेवून हिटलरनं लोकांना भावनिक साद घालून जर्मनीला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचं स्वप्न दाखवलं. १९३३ साली त्याची जर्मनीच्या चॅन्सेलरपदी निवड झाली. जपानसह अनेक देशांत अशाच हुकूमशहांनी सत्ता काबीज केल्या. यामुळं जगाची वाटचाल दुसऱ्या महायुद्धाकडं होवू लागली.

सोविएत रशियात स्टॅलीनच्या नेतृत्वाखालील साम्यवादी सत्तेला मंदीची कोणतीच झळ बसली नाही. स्टॅलीननं पंचवार्षिक योजना सुरू केल्यानं याचा फायदा रशियाला झाला. यामुळं भांडवलवादातील फोलपणा जगासमोर आला आणि साम्यवादाबद्दल अनेक देशांच्या मनात कुतूहूल निर्माण झालं. काही देशांत समाजवादी विचार रूजू लागले. हे अमेरिकेसाठी आव्हान होते. भांडवलशाही विचारांची श्रेष्ठता टिकवण्यासाठी आणि साम्यवादाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी अमेरिका झपाटून कामाला लागली. दुसऱ्या महायुद्धानंतरचा अमेरिकेचा मार्शल प्लॅन यासंदर्भातच होता.

दुसरं महायुद्ध आणि महामंदीचा अंत

१९३९ मधं दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि मंदीचा खऱ्या अर्थानं अंत सुरू झाला. युद्धात लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची गरज असल्यानं अमेरिकेतील बंद असलेले कारखाने पुन्हा सुरू झाले. त्यात अनेकांना रोजगार मिळाला. संपूर्ण युरोपला आणि मित्र देशांना शस्त्रास्त्रे पुरवल्यानं अमेरिकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली आणि अमेरिका पुन्हा एकदा सुपरपॉवर बनली. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धाची सांगता होईपर्यंत महामंदी आटोक्यात आली.

दुसरं महायुद्ध सुरू होण्यास जागतिक महामंदी हे एक कारण होतं आणि हीच महामंदी संपायला दुसरं महायुद्ध कारणीभूत ठरलं.

अनेक साहित्यिक आणि चित्रपट निर्मात्यांना या महामंदीच्या विषयानं आकर्षित केलं. साहित्यामधे लेखक जॉन स्टीन बेक यांचं ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ ही सर्वाधिक गाजलेली कादंबरी. १९३९ साली याला साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. हार्पर ली यांनी ‘टू किल अ मकिंगबर्ड’ या कादंबरीच्या माध्यमातून महामंदीच्या चित्राला वेगळ्या रूपात मांडलं. मार्गारेट एटवूड यांच्या ‘द ब्लाईंड असॅसीन’ या कादंबरीला २००० सालचा बुकर प्राईज मिळाला. यावर निघालेले अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले.

हेही वाचा : 

कोरोनाच्या प्रसाराचा वेग मंदावणं हा छळ असेलः अँजेला मर्केल

कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की

रघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

मोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार?

आशियातल्या पहिल्या स्टॉक एक्सचेंजचं ट्रेंडींग चक्क झाडाखाली व्हायचं

इतर भारतीय गुंतवणूकदारांप्रमाणे तुम्हीही हायब्रीड फंडमधेच पैसे गुंतवलेत?

कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी