आता गूगलच्या गुंतवणुकीचे गुणगान गायला हवं!

२१ जुलै २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारतात दहा अब्ज डॉलर म्हणजे साधारण ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा नुकतीच गुगलने केली. खरंतर तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्या गेली अनेक वर्षे भारतात गुंतवणूक करत आल्या आहेत. मात्र आजवर होत असलेली गुंतवणूक आणि आता होत असलेली गुंतवणूक वेगळ्या प्रकारची आहे. या गुंतवूकीचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतील.

गूगलने नुकतीच भारतामधे दहा अब्ज डॉलर म्हणजे साधारण ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केलीय. ही गुंतवणूक नेमकी कोणत्या पद्धतीने केली जाणार आहे आणि त्याचे काय परिणाम व्हायची शक्यता आहे याचा वेध घेण्याचा प्रयत्न या लेखात केलाय.

गूगल ही जगातल्या टॉप तीन सर्वाधिक यशस्वी तंत्रज्ञान कंपन्यांमधील एक आहे. मोबाईल, लॅपटॉपसारख्या डिजिटल उपकरणांचा वापर करून इंटरनेटवर वावर करणारी भारतातली प्रत्येक व्यक्ती गूगलचं कोणतं ना कोणतं प्रॉडक्ट अक्षरशः दररोज वापरत असते. गूगल सर्च, जीमेल, अँड्रॉइडचे फोन, गूगल मॅप्स या गूगलच्या प्रॉडक्ट्सचा भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक वाटा आहेच. या शिवाय गूगलपे हे नवं प्रॉडक्ट अत्यंत कमी वेळात कोट्यावधी लोक वापरायला लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर गूगल भारतात करणार असलेल्या या मोठ्या गुंतवणुकीचं फार मोठं आश्चर्य वाटायचं कारण नाही. 

हेही वाचा : तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

मातृभाषेत हवं इंटरनेट

ही गुंतवणूक ‘गूगल फॉर इंडिया डिजिटायझेशन फंड’ नावाच्या व्यावसायिक गुंतवणूक फंडाद्वारे केली जाणार आहे. या फंडामधून भारतीय कंपन्यांच्या भाग भांडवलामधे पैसे गुंतवणं, भारतीय कंपन्यांशी किंवा स्टार्टअपची भागीदारी करून नवी डिजिटल प्रॉडक्ट्स तयार करणं अथवा डेटा सेंटरसारख्या डिजिटल जगासाठी आवश्यक अशा मूलभुत सुविधा उभारणं यासाठी पैसे दिले जाणार आहेत. हे करताना चार प्रमुख उद्दिष्टं आमच्यासमोर आहेत असं गूगलचे सीइओ सुंदर पिचई यांचानी सांगितलं.

श्री पिचई म्हणाले की ‘प्रत्येकाला जी हवी ती माहिती स्वतःच्या भाषेत सहजपणे उपलब्ध असणं, भारताच्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा गरजांसाठी नवी प्रॉडक्ट्स तयार करणं, डिजिटल माध्यमांमधे येणाऱ्या भारतीय व्यावसायिकांचा डिजिटल प्रवास अधिकाधिक सुकर होईल हे बघणं आणि तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा आरोग्य, शिक्षण आणि शेती या महत्त्वाच्या क्षेत्रांमधे अधिकाधिक सकारात्मक वापर करणं ही चार उद्दिष्टे आमच्या समोर आहेत.’ 

श्री पिचई यांचानी सांगितलेली ही चार उद्दिष्टे बघता गूगलची गुंतवणूक हे डिजिटल इंडियाच्या प्रवासामधे एक महत्वपूर्ण योगदान असेल असं दिसत आहे. तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे समाजातल्या प्रत्येक स्तरापर्यंत पोचवायचे असतील तर ते इंग्रजीत असून उपयोगाचं नाही. भारतासारख्या बहुभाषिक समाजात प्रत्येकापर्यंत तंत्रज्ञान पोहोचण्यासाठी ते त्याच्या स्वतःच्या मातृभाषेत असणं गरजेचं आहे.

मदत नव्हे व्यावसायिक गुंतवणूक

भारताची ही गरज ओळखून भारतीय भाषांमधे माहिती उपलब्ध करून देणं किंवा खास भारतीय समाजाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गरजांसाठी ॲप्स तयार करणं ही गूगलची दोन प्रमुख उद्दिष्टे आहेत. तसंच, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामधे प्रचंड मोठ्या प्रमाणावर जगभर संशोधन होतंय. त्यातून असंख्य प्रकारची नवी प्रॉडक्ट्स तयार होतायत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा भारतातल्या आरोग्य, शिक्षण आणि शेती या तीन क्षेत्रांमधे झालेला वापर हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी सकारात्मक परिणाम देणारा असणार आहे. 

मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गूगलने भारतात व्यावसायिक गुंतवणूक केलीय. भारताला मदत किंवा देणगी दिलेली नाही. व्यवसायिक गुंतवणूक ही व्यवसाय वाढीसाठी आणि भविष्यातल्या नफ्यासाठी केली जाते. भारतातला आपला व्यवसाय आणि नफा वाढवणं हे या गुंतवणुकीचं उद्दिष्ट असणार आहे आणि अर्थातच त्यात काही वावगं नाही. गूगलच्या या गुंतवणुकीमुळे त्यांना फायदा होईलच अन या गुंतवणुकीमुळे काही निश्चितसे फायदे भारतीय अर्थव्यवस्थेला आणि डिजिटल इकोसिस्टिमला होऊ शकतील.

मात्र या गुंतवणुकीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला होऊ शकणाऱ्या फायद्यांसोबतच काही धोकादायक बाबींचा विचारही करणंही गरजेचं आहे. एकाद्या क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीतून आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रॉडक्ट्समधून तयार होऊ शकणारी कंपन्यांची एकाधिकारशाही ही एक धोकादायक गोष्ट आहे. बाजारात एकाधिकार असलेल्या कंपनीने दंडेलशाही करून ग्राहकांची अडवणूक करणं, आपल्या सेवांच्या किंमती अवाजवी पद्धतीने वाढवणं, इतर स्पर्धकांना बाजारपेठेत येऊ न देणं असे अनेक धोके शक्य असतात.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

ही गुंतवणूक वेगळी आहे

तंत्रज्ञान कंपन्यांच्या बाबतीतला दुसरा मोठा धोका म्हणजे त्यांना मिळत असलेल्या ग्राहकांच्या खाजगी आणि गोपनीय माहितीचा दुरुपयोग करण्याची शक्यता. गूगल देत असलेल्या डिजिटल प्रॉडक्ट्सचा वापर करणाऱ्या सर्व ग्राहकांची अत्यंत खाजगी आणि गोपनीय माहिती गूगलला सतत मिळत रहाते. या माहितीचा वापर करून ग्राहकांना टार्गेट करणाऱ्या जाहिरातींचा मारा करण्यापासून ते त्यांच्या ऑनलाईन वावराला आपल्याला हवी ती दिशा देण्यापर्यंत काहीही वापर केला जाऊ शकतो. खाजगी माहितीच्या गोपनीयतेविषयी कठोर कायदे अद्याप नसलेल्या भारतासारख्या देशामधे या धोक्यांची जाणीव असणं आणि त्याविरुद्ध उपाययोजना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

अलिकडच्या काळात भारतात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करणारी गूगल ही एकमेव कंपनी नाही. नुकतीच ॲमेझॉनने त्याच्या भारतीय व्यवसायात अतिरिक्त १ अब्ज डॉलर गुंतवणार असल्याची घोषणा केली तर फेसबुकने रिलायन्सच्या जियो डिजिटल प्लॅटफॉर्ममधे सुमारे पाच अब्ज डॉलर्स गुंतवण्याची घोषणा केली. खरंतर गूगल, फेसबुक, ऍमॅझॉन बरोबरच आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, ऍपल, एचपीसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्या गेली अनेक वर्षे भारतात गुंतवणूक करत आल्या आहेत. मात्र आजवर होत असलेली गुंतवणूक आणि आता होत असलेली गुंतवणूक वेगळ्या प्रकारची आहे.

आजवरची गुंतवणूक ही प्रमुख्याने भारतात ‘ऑफशोअर डेव्हलपमेंट सेंटर’ उभारणं आणि भारतात सॉफ्टवेअर तयार करून घेणं अथवा कॉल सेंटर उभारणं अशासाठी असायची. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या मिळत गेल्या आणि भारत हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातला महत्त्वाचा सेवादाता देश बनला. आता होत असलेली गुंतवणूक भारत ही बाजारपेठ म्हणून विकसित करण्यासाठी केली जात आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारताविषयीच्या दृष्टिकोणात आणि धोरणात झालेला हा बदल विलक्षण लक्षणीय आहे. 

कायदे होणं गरजेचं

आज भारतात सुमारे चाळीस कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. ही संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. १३५ कोटी लोकसंख्या असलेला आणि जगातली सगळ्यांत मोठी लोकशाही असलेला हा देश माहिती, तंत्रज्ञान आणि डिजिटल जगातल्या उत्पादनांसाठी जगातली सगळ्यांत मोठी बाजारपेठ ठरू शकतो. ही बाजारपेठ वाढेल तेव्हा त्यातल्या डिजिटल व्यवसायाचा अधिकाधिक हिस्सा आपल्याला मिळावा या हेतूने तंत्रज्ञान क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. मात्र हे होत असताना परदेशी कंपन्यांची एकाधिकारशाही निर्माण होणार नाही अन ग्राहकांची खाजगी आणि गोपनीय माहिती सुरक्षित राहील यासाठी प्रभावी कायदे होणं गरजेचं आहे.

ते कायदे झाले तर, या गुंतवणुकींमुळे भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, भारतीय बाजारपेठेसाठी उपयुक्त अशी नवी डिजिटल प्रॉडक्ट्स तयार होत रहातील, आरोग्य, शिक्षण, शेतीसारख्या क्षेत्रांमधे तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती घडून येऊ शकेल आणि या सगळ्यामधून ‘डिजिटल इंडिया’ अधिक वेगानं अग्रेसर होईल.

हेही वाचा : 

वारी चुको नेदी हरी

तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच?

चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?

पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज

(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामधे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत.)