तमिळ-तेलुगू सिनेमांनी करून दाखवलं, आपल्या मायमराठीचं काय?

३० मार्च २०२३

वाचन वेळ : ८ मिनिटं


‘आरआरआर’ हा २०२२च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांपैकी एक सिनेमा. याच सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या लोकप्रिय तेलुगू गाण्याने नुकतंच सिनेसृष्टीतल्या मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. ऑस्कर मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय. या गाण्याच्या निमिताने दक्षिण भारतातल्या आजवरच्या सिनेसंगीत आणि सिनेगीतांचा मुद्दा चर्चेत आलाय.

लॉस एंजिलीसच्या हॉलीवूड डीस्ट्रिक्टमधलं डॉल्बी थियेटर १२ मार्चच्या रात्री खच्चून भरलं होतं. निमित्त होतं यावर्षीच्या ९५व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं. सोहळा सुरु होऊन दीड तासच उलटला होता. तेवढ्यात डाव्या विंगेतून दीपिका पादुकोनने एंट्री घेतली. आपल्या मधाळ आवाजात तिने एक घोषणा केली, ‘तुम्हाला नाटू माहितीय? जर माहीत नसेल, तर तुम्हाला ते आता कळेलच!’

ही घोषणा ऐकताच खच्चून भरलेल्या त्या हॉलमधे बसलेल्या बहुभाषिक सिनेप्रेमींमधे उत्साहाची लाट संचारली. भारतीयांना साजेश्या अभिमानाने ही घोषणा करणारी आणि हिंदी सिनेमांचं माहेरघर असलेलं बॉलीवूड गाजवणारी दीपिका मूळची तुळूभाषिक तर ज्या गाण्याने सगळ्यांना वेड लावलं होतं, ते गाणं मात्र ‘आरआरआर’ या तेलुगू भाषेतल्या सिनेमातलं होतं. ऑस्करसाठी नामांकित झालेलं हे पहिलंच भारतीय गाणं होतं.

दीपिकाच्या घोषणेनंतर स्टेजवर काला भैरवा-राहुल सिप्लीगंज या मूळ गायकद्वयीसोबत जेसन ग्लोवर-बिली मुस्तफा या अमेरिकन-कॅनेडियन विदेशी कलाकारांनी ‘नाटू नाटू’ सादर केलं. प्रांत आणि भाषेच्या मर्यादा बिनदिक्कतपणे तुडवणारं संगीत म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा प्रसंग.  पुरस्कार सोहळा संपायला अवघा पाऊण तास बाकी असताना ‘नाटू नाटू’च्या पदरात ऑस्करची ट्रॉफी पडली आणि या गाण्याला आणखीनच महत्त्व प्राप्त झालं.

हेही वाचा: ऑस्करच्या आयचा घो!

‘नाटू नाटू’चं वेगळेपण

‘आरआरआर’च्या कथानकानुसार, ब्रिटीश सत्तेचा माज मोडण्यासाठी ‘नाटू नाटू’ या गाण्याचा प्रतिकात्मकरित्या वापर केला गेला होता. सत्ताधारी ब्रिटीशांकडून भारतीय संस्कृतीचा होत असलेला अपमान ही या गाण्याची मूळ प्रेरणा ठरली. स्थानिकांची सांस्कृतिक अस्मिता ठळक करणारे गाण्याचे बोल आणि कुणालाही ठेका धरायला प्रवृत्त करणारी सांगीतिक साथ या दोन्ही ‘नाटू नाटू’च्या जमेच्या बाजू होत्या.

त्यात राम चरण तेजा आणि ज्युनियर एनटीआर या दोघांनी केलेल्या जबरदस्त नृत्याविष्काराने या गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेलं. देवीच्या जत्रेतल्या पोतराजासारखं, ज्वारीची भाकरी आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्यातल्या ठसकेदार चवीसारखं, छातीत धडकी भरवणाऱ्या ढोलाच्या नादासारखं बेभान होऊन नाचायचं असं आवाहन राम चरण तेजा आणि ज्युनियर एनटीआर या गाण्याच्या माध्यमातून ब्रिटिशांना करताना दिसतात.

‘आरआरआर’चा दिग्दर्शक एस. एस. राजामौली, ‘नाटू नाटू’चे गीतकार चंद्रबोस आणि संगीतकार एम. एम. किरवाणी हे तसं बरंच जुनं समीकरण. मधल्या काही सिनेमांचा अपवाद वगळता राजामौलीच्या ‘स्टुडंट नं. १’ या पहिल्या सिनेमापासून ते आत्ताच्या ‘आरआरआर’पर्यंत चंद्रबोस यांनी एकापेक्षा एक दर्जेदार गाणी लिहलीयत. ‘नाटू नाटू’ला मिळालेल्या ऑस्कर आणि गोल्डन ग्लोबसारख्या मानांकित पुरस्कारांनी त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय.

किरवाणींचा जादुई स्पर्श

‘नाटू नाटू’चं संगीत हे जितकं स्थानिक संस्कृतीशी सांगड घालतंय, तितकंच ते जागतिक स्तरावरही गाजतंय. याचं संपूर्ण श्रेय जातं ते राजामौलीचे चुलत भाऊ आणि संगीतकार एम. एम. किरवाणी यांना. किरवाणींचा बाज मुळातच लोकगीत आणि भक्तिगीतांचा होता. त्याचबरोबर पाश्चात्य शैलीच्या संगीतावरही त्यांची चांगली पकड होती. एक गायक आणि गीतकार म्हणूनही त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध केलं होतं.

खरं तर, किरवाणींनी तेलुगू सिनेसृष्टीबरोबरच कन्नड, तमिळ, मल्याळम आणि हिंदी सिनेमांसाठीही संगीत दिग्दर्शक म्हणून काम पाहिलंय. त्यातल्या काही सिनेमांना म्हणावा तसा प्रतिसाद सिनेप्रेमींकडून लाभला नसला तरी, त्यातल्या गाण्यांनी मात्र संगीतप्रेमींच्या मनात घर केलं. ‘गलीमें आज चांद निकला’सारखी सदाबहार मेलडी देणाऱ्या किरवाणींनी तितक्याच सहजतेने देहभान विसरून ठेका धरायला लावणारं ‘नाटू नाटू’ दिलंय हे विशेष!

किरवाणींनी या गाण्यासाठी गावच्या जत्रेत रंग भरणाऱ्या तालवाद्यांचा सढळ हाताने वापर केला होता. आठहून अधिक डफ या गाण्यासाठी किरवाणींनी वापरले. लोकसंगीताची उत्तम जाण असलेले किरवाणी हे खरंतर त्यांच्या मेलडीयुक्त गाण्यांसाठी आधी ओळखले जातात; पण ‘नाटू नाटू’सारख्या उडत्या चालीच्या गाण्यांच्या वेळी किरवाणी आपला स्टुडियो सोडून थेट गावातल्या जत्रेत सहभागी होतात आणि हेच संगीतवेड त्यांना थेट ऑस्करपर्यंत घेऊन जातं.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

आदिमतेशी नाळ जोडणारं संगीत

ऑस्कर आणि गोल्डन ग्लोबसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांवर आपलं नाव कोरणाऱ्या ‘नाटू नाटू’बरोबरच ‘आरआरआर’मधली इतर गाणीही तुफान लोकप्रिय ठरलीत. या गाण्यांच्या लोकप्रियतेचं कारण आहे त्यातल्या तालवाद्यांचा वापर. किरवाणींनी वापरलेल्या वेगवेगळ्या तालवाद्यांमुळे ही गाणी लोकसंगीताचा बाज धारण करून आपल्यासमोर येतात.

यातून त्यांचं प्रादेशिक असणं अधिकच ठळक होत जातं. त्यामुळे ही गाणी भाषिक आणि प्रादेशिक अस्मिता जपत असल्याचं चित्र इतर भाषिक संगीतप्रेमींसमोर आपोआपच निर्माण होत जातं. साधारणतः इतर सर्वच गाण्यांसारखा ‘आरआरआर’च्या गाण्यांवरही पाश्चात्य संगीताचा प्रभाव आहे. पण किरवाणींनी तालवाद्यांच्या आधारे या गाण्यांचं केलेलं लोकसंगीतीकरण त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि वरचढ ठरवतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर, अशा प्रकारच्या गाण्यांची तुलना वर्णभेदाची शिकार ठरलेल्या काळ्यांच्या संगीतविश्वाशी केली जाणं साहजिकच आहे. त्यांच्या संगीतात, गाण्यांमधे आढळणारा अस्सलपणा म्हणजे एक प्रकारे गावदेवीच्या जत्रेत पोतराजाने सादर केलेला ‘नाटू’च आहे. हा तोच अस्सलपणा आहे, जो शब्दांवाचूनही खूप काही सांगून जातो. भाषा आणि प्रांतासारख्या दृश्यादृश्य सीमांना पार करत हा अस्सलपणा तमाम संगीतप्रेमींची नाळ आदिमतेशी जोडण्यात यशस्वी ठरतो.

रागदारीला साज लोकसंगीताचा

लोकसंगीतीकरणाच्या जोरावर गाण्यांमधे उतरलेला हा अस्सलपणा खऱ्या अर्थाने रुपेरी पडद्यावर आणला तो तमिळ सिनेसृष्टीतले ख्यातनाम संगीतकार ‘इसैज्ञानी’ इलैराजा यांनी. कर्नाटकी संगीतातल्या शास्त्रीय रागदारीवर आधारित असलेल्या सिनेसंगीताचा तो काळ होता. आपल्या दलित वस्तीत दणाणणाऱ्या तमिळ लोकसंगीताचं बाळकडू पीत मोठे झालेले इलैराजा तमिळ सिनेसृष्टीच्या संगीतविश्वात लोकसंगीतीकरणाची लाटच घेऊन आले.

‘अन्नाकिली’ या सिनेमातून संगीतकार म्हणून आपली कारकीर्द सुरु करताना इलैराजा यांनी कर्नाटकी शास्त्रीय संगीत, पाश्चात्य शास्त्रीय संगीत आणि तमिळ लोकसंगीताचा अनोखा, अवघड आणि अभूतपूर्व मिलाफ घडवून आणला. पुढे तमिळ सिनेसृष्टीतल्या प्रख्यात दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या मणी रत्नमसोबत काम करताना इलैराजा यांनी तमिळ सिनेसंगीताचा चेहरामोहराच बदलून टाकला.

जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर देश येऊन थांबला होता. तमिळनाडूतल्या द्राविडी सांस्कृतिक राजकारणाच्या जोरावर उभ्या राहिलेल्या अब्राम्हणी चळवळीचाच एक भाग म्हणून खेड्यांमधून शहरांकडे स्थलांतराचा टक्का वाढत होता. या स्थलांतरितांना आपल्या गावाशी जोडणारं संगीत इलैराजा यांनी दिलं. शास्त्रीय संगीताची अभिजात मक्तेदारी मोडून काढत त्यांनी ग्रामीण आणि नवशहरी जनतेला आपलंसं वाटेल असं संगीत द्यायला सुरु केली.

बघता बघता, इलैराजा हे नाव मोठं झालं. सतत कुठल्या ना कुठल्या सिनेमासाठी ते काम करत असल्याने वेळेचं नियोजन करणं त्यांना जड जाऊ लागलं. त्यामुळे अनेक निर्माते-दिग्दर्शकांशी त्याचं बिनसू लागलं. अशावेळी इतर संगीतकारांचा शोध सुरु झाला. संधी पाहून किरवाणींनी आपल्या नावातली एम. एम. ही एवढीच अक्षरं घेऊन तमिळ सिनेसृष्टीत प्रवेश केला. पण या खेळात खरी रंगत आणली, ती रेहमानने!

हेही वाचा: हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

रेहमान नावाचं वादळ

आपल्या पहिल्या दहा सिनेमांसाठी मणी रत्नमने इलैराजांनाच संगीतकार म्हणून पसंती दिली होती. पण आपल्या अकराव्या ‘रोजा’ या सिनेमासाठी त्याने ए. आर. रेहमान नावाच्या अवघ्या पंचविशीतल्या पोराला संधी दिली होती. मणी रत्नमचा हा धाडसी निर्णय ऐतिहासिक ठरला आणि ‘रेहमान’पर्वाची नांदी सुरु झाली. टाइम्स मॅगझीनने सार्वकालीन सर्वोत्तम १० साऊंडट्रॅकपैकी एक म्हणून ‘रोजा’ची निवड केली. 

इलैराजांच्याच बँडमधे पियानो वाजवत घरखर्च सांभाळणाऱ्या रेहमानने ‘रोजा’नंतर आजतागायत मागे वळून पाहिलेलंच नाही. कर्नाटकी शास्त्रीय संगीत, पाश्चात्य शास्त्रीय संगीत आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत या तिन्ही आघाड्यांवर समर्थपणे तमिळ सिनेसंगीताचा गड राखणाऱ्या रेहमानच्या भात्यात सुफी संगीत आणि कव्वालीसारखे दोन अमोघ बाणही होते.

‘जंटलमन’ आणि ‘कादलन’ या एस. शंकर दिग्दर्शित दोन्ही सिनेमांनी रेहमानला रोजापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवून दिली. ‘हमसे है मुकाबला’ या नावाने हिंदीत डब झालेल्या ‘कादलन’च्या गाण्यांच्या २५ लाखांहून अधिक सीडींची विक्री झाली. ‘रोजा’ही हिंदीत डब होऊन तुफान लोकप्रिय ठरला. त्यानंतर रेहमानने संगीत दिलेल्या सिनेमाला तमिळबरोबरच हिंदी आणि तेलुगूमध्येही रिलीज करायचं असा एक अघोषित ट्रेंडच सुरू झाला.

हिंदी डबिंगचा राडा

इलैराजानंतर आता रेहमानचीही गाणी हिंदीत डब केली जात होती. खरं तर, या गाण्यांचे बोल तितकेसे महत्त्वाचे नव्हते. त्यांचं पार्श्वसंगीत हा त्या गाण्यांचा आत्मा होता. तरीही व्यावसायिक दृष्टीकोन लक्षात घेता मूळ गाण्यांचं डबिंग केलं गेलं आणि या डब झालेल्या गाण्यांनाही मूळ गाण्यांइतकाच जोरदार प्रतिसाद मिळाला. घरोघरी पोचलेल्या सॅटेलाईट टीवींमुळे या गाण्यांच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली.

‘जंटलमन’ आणि ‘कादलन’मधल्या ‘टेक इट इझी पॉलिसी’, ‘चिक्कू बुक्कू रैले’ आणि ‘मुकाबला’सारख्या गाण्यांवर लीलया थिरकणाऱ्या प्रभूदेवाला भारताचा मायकल जॅक्सन याच हिंदीत डब झालेल्या गाण्यांनी बनवलं. ‘अपूर्व सहोदरर्गळ’च्या हिंदी ‘अप्पू राजा’मधलं ‘आया है राजा’ हे गाणं नीट लक्ष देऊन ऐकलं तर त्याचे शब्द मीटरमधे बसत नसल्याचं लगेच लक्षात येईल पण तरीही हे गाणं प्रत्येक मिरवणुकीचा अविभाज्य भाग बनलंय.

तमिळ गाणी ज्या वेगाने हिंदीत डब होत होती, त्या तुलनेत तेलुगू गाण्यांचं प्रमाण कमी होतं. कन्नड आणि मल्याळम गाण्यांबद्दल असलेली प्रचंड उदासीनता तर अजूनही दिसून येते. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातल्या बऱ्याच ठिकाणच्या थियेटरमधे तेलुगू सिनेमांचे शो होत असतात. या शतकाच्या सुरवातीच्या काळात रिलीज झालेले ‘जयम’, ‘नुव्वोस्तानांटे नेनोड्डंटाना’, ‘आर्या’, ‘कॉलेज’ ही त्यातली काही निवडक नावं.

या सिनेमातल्या ‘चिन्नदो चिन्नदे’, ‘मायादारी मैसम्मो’, ‘आ आंटे अमलापुरम’सारख्या गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने सीमावर्ती भागातल्या पोरांनी पुण्या-मुंबईत येताना आपल्यासोबत ही गाणीही आणली. तेव्हा इंटरनेटचा प्रसार झाला नव्हता. हिंदी डब तेलुगू सिनेमांचं टीवीवर येणं तोवर अजूनही लांब होतं. पण तोवर ही कळायला अगम्य पण ऐकायला जबरदस्त वाटणारी गाणी गणपती, दहीहंडीला वाजू लागली होती.

हेही वाचा: सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

इतरांनाही जेव्हा जाग येते…

भारतीय सिनेमा म्हणजे ‘बॉलीवूड’ असा तो काळ होता. एकीकडे बॉलीवूड मराठी सिनेसृष्टीला डावलून महाराष्ट्राच्या मातीत वाढतच होतं, तर दुसरीकडे गाण्यांच्या जोरावर दक्षिणेचा महाराष्ट्रातला प्रभाव हळूहळू वाढू लागला होता. वर्षानुवर्षे एका ठराविक, रटाळ लयीत पुढे सरकणाऱ्या मिरवणुकांमधे ‘आया है राजा’ किंवा ‘आपडी पोडे’ ऐकल्याबरोबर उत्साह संचारताना दिसू लागला आणि मग मात्र उत्तरेतल्या संगीतकारांना दक्षिणेकडून येणारं सिनेसंगीत दखलपात्र वाटू लागलं.

संगीतकार-दिग्दर्शक विशाल भारद्वाजने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातले ठुमरी आणि कजरीसारख्या लोकसंगीताचे प्रकार आपल्या खास शैलीत बॉलीवूडमधे आणले. उत्तरेतही लोकसंगीताची उत्तम परंपरा आहे, हे विशालच्या ओंकारा, मकबूल आणि हैदरसारख्या सिनेमांतून जाणवत गेलं. पुढे यात अमित त्रिवेदी, स्नेहा खानवलकरसारखी नावं जोडली गेली. ‘गुंडे’च्या निमित्ताने बंगाली लोकसंगीताची एक झलक इथल्या संगीतप्रेमींना अनुभवता आली.

अजय-अतुल या संगीतकार जोडगोळीने मराठी सिनेसंगीताला खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस आणले. या दोघांनी हालगी आणि संबळाच्या आदिम ठेक्यावर मराठी संगीतप्रेमींना थिरकायला भाग पाडलं. ‘अगं बाई अरेच्चा’च्या निमित्ताने महाराष्ट्राच्या लोकसंगीताची परंपरा सातासमुद्रापार नेणाऱ्या शाहीर साबळेंचा वरदहस्त त्यांना लाभला आणि तिथून सुरु झालेली ही सांगीतिक ‘उलाढाल’ आता ‘साडे माडे तीन’ म्हणत ‘सैराट’ सुटलीय.

शब्दार्थांपलीकडचा ‘कोलावरी’ इफेक्ट

दक्षिणेतून उसळणारी ही उडत्या चालीच्या गाण्यांची लाट रोखण्याचे अनेक कौतुकास्पद प्रयत्न उत्तरेकडून झाले. पण दरवेळी दक्षिण या सगळ्यांना पुरून उरलंय. २०११मधे ‘व्हाय धिस कोलावरी डी’ हे तमिळ गाणं युट्यूबवर रिलीज झालं आणि अवघ्या काही तासांतच ते वेगाने वायरलही होऊ लागलं. नादस्वरम, दविल ढोलकीसारखी तमिळ लोकसंगीतातली तालवाद्यं आणि धनुषचा शराबी आवाज हे समीकरण ‘कोलावरी’च्या तुफान लोकप्रियतेचं कारण ठरलं.

या गाण्याचा संगीतकार अनिरुद्ध रविचंदर हा सध्याच्या आघाडीच्या तमिळ संगीतकारांपैकी एक आहे. त्याने संगीतबद्ध केलेली अनेक तमिळ सिनेगीतं गाजतायत. इलैराजा, रहमान, अनिरुध असा तीन पिढ्यांचा हा सांगीतिक प्रवास तमिळचा गंधही नसलेल्या श्रोत्यांना आजही भुरळ घालतोय. दुसरीकडे तेलुगू सिनेसृष्टीत किरवाणींसोबतच देवी श्री प्रसाद, काला भैरवासारखे संगीतकार आपल्या कारकीर्दीचा आलेख कायम उंचावत ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतायत.

मध्यंतरी बॉलीवूडने तेलुगू सिनेमांच्या रिमेकच्या धर्तीवर तेलुगू गाण्यांचेही रिमेक करून पाहिले. पण त्यातही एक ‘ढिंगचिका’ चालतंय तर दुसरं ‘सीटीमार’ फ्लॉप होतंय, अशी गत झालीय. बॉलीवूडकडे सध्या उडत्या चालीची गाणी जरूर आहेत, पण ती डिस्को, पबबाहेर पडायला तयार नाहीत. मराठी सिनेसंगीत उसाच्या फडापासून तमाशाच्या फडापर्यंत वाजत असलं, तरी त्याला अजून युट्यूबवर ‘कोलावरी’ इफेक्ट साधता आलेला नाही.

सध्या पॅन इंडिया सिनेमांची गर्दी वाढतेय. प्रादेशिक सिनेमा जर भारतभर पोचवायचा असेल तर त्यातलं संगीतही तितक्या ताकदीचं हवं. तमिळ-तेलुगू सिनेमांना ते चांगलंच जमतंय. कन्नड सिनेसृष्टीनेही गुलीगा-पंजुर्लीची आरोळी देशभर पोचवलीय. यातून मराठी सिनेसृष्टीने धडा घ्यायला हवा. येत्या एप्रिलमधे शाहीर साबळेंवर आधारित ‘महाराष्ट्रशाहीर’ रिलीज होतोय. त्यानिमित्ताने आपल्या सिनेसंगीताचा दर्जा उंचावून मराठी सिनेसृष्टी शाहीर साबळेंना अनोखी मानवंदना देईल, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

हेही वाचा: 

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

#बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?

‘मिशन मंगल’ सिनेमा बघून आपलं मंगलयानही आत्महत्या करेल!

हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?