इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

०१ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात जानेवारी महिन्यात पार पडला. अशा महोत्सवाविषयी ऐकलं की कसे होते सिनेमे हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण खरंतर रसिक कोणत्या पायरीवरून या दुनियेच्या सफरीकडे पाहतो, त्यावर या प्रश्नाचं उत्तरं मिळतं. आपल्या डोक्यातल्या चित्रपटाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर अवलंबून असतो. या महोत्सवाच्या छटा दाखवणारा हा लेख.

गोव्यात यंदा कोरोनामुळे १६ ते २४ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी पार पडला. दरवर्षी २० नोव्हेंबरला हा महोत्सव सुरू होतो. यंदा कोरोनामुळे तो जानेवारीत झाला. हा ५१ वा महोत्सव. आता येत्या २० नोव्हेंबर २०२१ ला ५२ वा महोत्सव सुरू होईल. एकाच वर्षी दोन महोत्सवांची पर्वणी रसिकांना लाभेल. 

यंदाचा महोत्सव प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा हायब्रीड पद्धतीने झाला. वर्तुळाचा थोडा विस्तार झाला. महोत्सवाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच करावं लागलं. या पुढचा महोत्सव प्रत्यक्ष आणि दणक्यात होईल, असं केंद्र सरकारतर्फे जाहीर केलंय. येणारा महोत्सवही ऑनलाईनही असेल, असं गोवा सरकारतर्फे गोवा मनोरंजन संस्थेने म्हणजेच ईएसजी म्हटलंय.

फसगतीची भावना

कसे होते यंदाचे सिनेमा? यंदाचे सिनेमे काय भारी आहेत ना?  यंदाचे सिनेमे फारसे काही चांगले नाहीत ना? या दोन्ही टोकाच्या प्रतिक्रिया सिनेमा रसिकांच्या वर्तुळातून दरवर्षी हमखास ऐकू येतात. धडकन असते ना हो! यंदाचे सिनेमा कसे आहेत? हाही एक नेहमीच्या धडकनीचा प्रश्न. खरंतर रसिक कोणत्या पायरीवरून या दुनियेच्या सफरीकडे पाहतो, त्यावर यांसाख्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आपल्या डोक्यातल्या चित्रपटाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर असतो अवलंबून. दिल तो बच्चा है जी!

केंद्र आणि राज्य सरकारतर्फे या महोत्सवाचे आयोजन केलं जातं. दोन्ही सरकारं मिळून आर्थिक बाजू सांभाळतात.

‘महोत्सव घरबसल्याही पाहता येणार’ अशी सिनेमा रसिकांची प्रारंभीची भावना होती. ते खरंही होते. पण तितकंच ते पुरेसं नव्हतं. समन्वयाचा, स्पष्टतेचा गोंधळ राहिल्याने आपली फसगत झाली की काय, अशी भावना चित्रपटाचा ऑनलाईन आनंद घेऊ पाहणार्‍यांची झाली. महोत्सवातले सरसकट सिनेमे पाहू शकू, असा बहुतेक रसिकांचा समज झालेला. तो एक भ्रम ठरला. ठराविकच सिनेमा त्यांना पाहता येणार होते. झाडून सगळं काही नाही. याची अपेक्षित जाहिरातबाजी मात्र झाली नाही. त्यामुळेच निर्माण झाली ती फसगतीची भावना.

हेही वाचा : जुन्या इफ्फीच्या ताज्या आठवणी

नानारंगी भारतच दिसावा

महोत्सवात दरवर्षी इंडियन पॅनोरमा हा विभाग असतो. नानारंगी भारत या विभागात भेटावा अशी अपेक्षा असते. या विभागातल्या विविध वर्गीकरणानुसार चित्रपटांची निवड केली असते. या विभागातल्या सिनेमा निवडीविषयी संशय निर्माण व्हावा असं वातावरण राहिलं. निवडीवर राजकीय विचारसरणीचा प्रभाव जाणवला.

अलीकडील काही वर्षांत असं होतंय. आपल्या विरोधी विचारांचा सिनेमा असेल तर दाखवाच कशाला, त्याऐवजी अमूक-तमूक सिनेमा आपल्याला सर्वार्थाने जवळचा आहे, तर तोच दाखवूया असं घडताना जाणवतं. त्यामुळे बालिश म्हणता येतील असे काही सिनेमा झळकताना पहावे लागले. या उलट समाजमाध्यमांतून भेटणार्‍या छोट्या-मोठ्या कलाकृती जास्त कसदार असतात.

उद्घाटन आणि समारोप सोहळ्यात राजसत्तेची भलावण करणारी भाषणे आठवली तरी काही एक अदमास येतोच. यापुढे महोत्सवाच्या आयोजनात खासगी क्षेत्राचा सहभाग असेल, असं केंद्रातर्फे जाहीर केलंय. त्यामुळे उत्पादन आणि ग्राहक या नातेसंबंधांचा महोत्सवी पट ठळक होईल. महोत्सव महागही होईल. प्रतिनिधींना जीएसटी आकारला म्हणून यंदा ओरड झालीच आहे.

ताकदीचा बौद्धिक खुराक

जागतिक सिनेमा विभागात मात्र दरवर्षी बौद्धिक खुराक ताकदीचा असतो. यंदाही तसा तो होता. काही चित्रपटांमधून अन्न, वस्त्र आणि निवार्‍याच्या शोधार्थ माणसांचं होणारं स्थलांतर, त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम हा विषय अधोरेखित झाला. गोव्यात परप्रांतीय लोकांना ‘बाह्यला’ म्हणून हिणवण्यात स्थानिक पिढ्यान् पिढ्या आत्ममुग्ध आहेत. अर्थकारण मात्र बाह्यल्यांच्यावरच अवलंबून राहिल्याचं वर्तमान आणि भविष्य आहे.

जागतिक सिनेमा पाहताना असे पैलू आणखी स्पष्ट होत गेले. समाजमाध्यमांचा मानवी जीवनावरील परिणाम चित्रपटाचा विषय झाला नसता तरच नवल. सोशल मीडिया म्हणजेच मानवी अस्तित्व अशा भ्रमात माणूस वावरतोय याची मांडणी ‘ला व्हेरोनिका’  सारखा सिनेमा करतो.

हेही वाचा : जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

सिनेमांची नशा

उत्कृष्ट कलाकृतीने प्रश्नांची मांडणी उत्कृष्ट करावी आणि उत्तराचं किमान सूचन करावं, अशी अपेक्षा असते. रेड सॉईल हा फ्रान्स आणि बेल्जियमचा सिनेमा महाकाय रासायनिक प्रकल्पांमुळे होत असलेली क्षती दाखवतो तेव्हा सुन्न व्हायला होतं. माणसाने जल, जमीन आणि जंगलांची केलेली राख आठवल्याशिवाय राहत नाही. विशेष म्हणजे सत्य घटनांवर आधारित हा सिनेमा आहे. 

दिव्यांगांच्या लैंगिक समस्येवर भाष्य करणारा सायलेंट फॉरेस्ट हा तैवानचा सिनेमा बक्षिसे पटकावतो. अपरिचित अशा विषयाच्या जंगलात हा सिनेमा घेऊन जातो. दारूच्या नशेच्या केवळ पार्श्वभूमीवर प्रारंभ होतो तो अनादर राऊंड या डेन्मार्कच्या सिनेमाचा आणि तो थांबतो तेव्हा आपल्या डोक्यात सुरू होते ती जगण्याची नशा. ‘तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कुणाची’ हे किती नशिल्या पद्धतीने सांगितले आहे, त्याचा अनुभव देतो तो ओपनिंग फिल्मचा मान मिळालेला अनादर राऊंड.

एक नजर

स्पॅनिश दिग्दर्शक पेट्रो अलदोमोअर यांचे सिनेमे सिंहावलोकन म्हणजेच रेट्रोस्कोपिक विभागात दाखवले. उच्चभ्रू वर्तुळातल्या मानवी नातेसंबंधाच्या कैक छटा हा दिग्दर्शक पकडतो.

बांगला देशाच्या सिनेमांची निवड कंट्री फोकस म्हणून होती. त्यांचे सिनेमे अर्थातच भारतीयच वाटले. ते अपेक्षितही होते. बांगला देशच्या संदर्भाने राजकीय हेतू महोत्सवात व्यक्त झाले.

दक्षिण कोरियाच्या चित्रपटातली हिंसा, लैंगिकता जोरकसपणे आविष्कृत होत असे. असं असलं तरी किम कि डूकसारखा दिग्दर्शक काव्यात्म धमनी छान पकडतो. त्यांचे सिनेमे गौतम बुद्धाकडे घेऊन जातात. यंदा त्यांचा वन ऑन वन चित्रपटाचा खेळ झाला. एक वर्षी महोत्सवात त्यांच्या चित्रपटांची मालिकाच अनुभवता आलेली.

जागतिक साथरोगावर महोत्सवात सिनेमा नव्हता. यासंदर्भात रोगराईबाबतच्या कल्पनांचं सूचन करणारे काही सिनेमा झालेत. पुढील काही महोत्सवांमधून कोरोनाची भेटही पडद्यावर होऊ शकेल.

हेही वाचा : 

फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!

बजेटमधे हवा कोरोना लसीकरणाचा प्लॅन

जयंत नारळीकर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच!

श्रीमंतांकडून जास्त टॅक्स घेण्याची सूचना अभिजीत बॅनर्जी का करतात?

( साभार पुढारी ‘बहार’)