गीतांजली राव : वयापेक्षा जास्त शोध लावणारी ‘किड ऑफ द इयर’

०९ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक गीतांजली राव हिचं नाव सध्या बरंच चर्चेत आहे. अवघ्या १५ वर्षांच्या गीतांजलीनं अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक शोध लावलेत. त्यासाठीच न्यूयॉर्कमधल्या टाईम मॅगझिनकडून तिला 'किड ऑफ द इयर' हा सन्मान देण्यात आलाय. पण तिची फक्त विज्ञानाशी मैत्री नाही. एवढ्या लहान वयातही जगाच्या समस्यांविषयीची जाण तिच्यात दिसते. या समस्यांवर ती नुसती टीकाच करत नाही. तर त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहत एक कृतिशील कार्यक्रमही आपल्यासमोर मांडते.

मलाला युसूफजई, ग्रेटा थनबर्ग ही नावं जगासाठी कुतूहलाचा विषय ठरली. एकीनं तालिबान्यांच्या विरोधात जाऊन मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार केला तर दुसरीनं पर्यावरणाच्या रक्षणासाठी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना फैलावर घ्यायला कमी केलं नाही. खेळायच्या, बागडायच्या वयात या मुलींनी शिक्षण आणि पर्यावरणासारख्या विषयांना हात घातला. त्यांची प्रेरणा घेत जगभर अनेक मुली उभ्या राहतायत.

मलाला आणि ग्रेटा यांच्या सोबतीनं गीतांजली राव या नावाची यात भर पडतेय. युवा वैज्ञानिक म्हणून गीतांजली राव हिचं नाव पुढे येतंय. शिक्षण, पर्यावरण, विज्ञान असे महत्त्वाचे विषय हाती घेत इतक्या कमी वयात त्यावर काहीएक भरीव काम करण्याची महत्वकांक्षा अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

म्हणूनच टाईम मॅक्झिनकडून तिला ‘किड ऑफ द इअर’ या सन्मानाने गौरवण्यात आलंय. हॉलिवूडची अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती एंजेलिना जोली हिनं गीतांजली रावची नुकतीच मुलाखत घेतलीय. त्यात तिनं या पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या रिसर्चबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्यात.

फोर्ब्सनेही घेतली दखल

गीतांजली मूळ भारतीय वंशाची आहे. अवघ्या १० वर्षांची असताना तिनं आपल्या पालकांना पिण्याच्या पाण्यातलं प्रदूषण ओळखणाऱ्या यंत्राचा शोध लावायचाय असं म्हटलं. हे ऐकून तिची आई बुचकळ्यातच पडली होती. या तिच्या भन्नाट ‘डोक्यालिटी’ला आणि सर्जनशीलतेला तिच्या पालकांनी कधीही खोडा घातला नाही. उलट ती करत असलेल्या वैज्ञानिक प्रयोगांना त्यांनी आणि शिक्षकांनी नेहमीच प्रोत्साहन दिलंय. त्यासाठी तिला अनुकूल वातावरण मिळालं.

याआधी गीतांजलीला डिस्कवरी एज्युकेशनचा यंग सायंटिस्ट चॅलेंज पुरस्कार मिळालाय. अमेरिकेतल्या महत्त्वाच्या शास्त्रज्ञांबरोबर काम करायची संधीही तिला मिळाली. ३० वर्षांच्या आतील ३० शास्त्रज्ञ या फोर्ब्स मासिकाच्या यादीत मागच्या वर्षी तिचं नाव होतं. जेनेटिक इंजीनियरिंगचं एक यंत्र बनवल्यामुळे 'हेल्थ पिलर प्राइज' तिला मिळालं. महत्त्वाचं म्हणजे हे यंत्र गांजा आणि इतर ड्रग्जच्या व्यसनापासून लांब राहण्यासाठी उपयोगाचं पडतं. त्यामुळे गांजा व्यसनाची सुरवातीची स्टेज आपल्याला समजते. त्यातून बाहेर पडणंही शक्य होतं. 

हेही वाचा : साना मारिन: जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान पाच पक्षांचं सरकार चालवतात

पाण्याचं प्रदूषण शोधणारं यंत्र 

अमेरिकेतली अनेक राज्य आज पाण्यात शिसं या धातूची मिसळ झाल्यामुळे पाणी प्रदूषणाचा सामना करतायत. पाण्यात शिसं शोधणं ही खूप खर्चिक गोष्ट आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेऊन ते लॅबमधे पाठवले जातात. त्याचं मोजमाप करणंही तितकंच अवघड असतं. त्यामुळे पाण्यात शिसं धातू आहे की नाही हे शोधण्यासाठी एका सोप्या यंत्राचा शोध गीतांजलीने लावला.

हे यंत्र मोबाईलसारखं दिसतं. त्यात ९ व्होल्टेजच्या बॅटरीचा वापर करण्यात आलाय. शिवाय त्यात सेंसिंग यूनिट, ब्ल्यूटूथ एक्सटेंशन आणि एक प्रोसेसरही असेल. एका ग्रीक देवतेच्या नावावरून या यंत्राचं नाव 'टेथीज' असं ठेवण्यात आलंय. फक्त काही सेकंद पाण्यात टाकल्यानंतर, या यंत्राला कनेक्ट केलेलं अॅप पाण्यात किती शिसं आहे हे सांगू शकतं.

पाण्याचं प्रदूषण ही आपल्यासाठी खूप मोठी समस्या आहे. त्याचा कळत नकळत आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. आपल्याला ते कळतही नाही. त्यामुळे गीतांजलीचा शोध काळाची गरज बनलीय. पण ती एवढ्यावरच थांबली नाही.

ट्रोलर्सचा खेळ बिघडवणारा शोध

सायबर क्राइम हे शब्द अनेक वेळा आपल्या कानावर पडतात. सोशल मीडियाचा वापर करून लोकांना अश्लील मॅसेज पाठवणं, खाजगी फोटोंचा वापर करून फोटो इकडे तिकडे फिरवणं, चुकीची भाषा वापरून लोकांना छळण्याचा प्रयत्न केला जातो. फोटो लीक केले जातात. लोकांना ट्रोल केलं जातं. अशा अनेक गोष्टी सायबर क्राइममधे येतात. सायबर क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून एक वेगळा शोध गीतांजलीनं लावलाय.

तिनं एक फोन आणि वेब यंत्र तयार केलंय. 'किंडली' नावाचं हे अॅप आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सायबर गुन्हेगारी आपण क्षणार्धात पकडू शकतो. एखाद्याविषयी आपण जाणूनबुजून चुकीचा शब्द टाईप करत असलो तर हे फोन किंवा वेब यंत्र आपल्याला एक ऑप्शन देतं. चुकीचा शब्द पुढं पाठवणं किंवा त्याला एडिट करणं. अर्थात पर्याय आपल्याला निवडायचा असतो. 

एखाद्याला ट्रोल करण्याच्या हेतूनं आपण लिहीत असू तर आपल्याला सुधरण्याची एक संधी दिली जाते. सायबर गुन्हेगारीचं प्रमाण सध्या खूप वाढतंय. आपण वेळोवेळी त्या बद्दलच्या बातम्या ऐकल्या असतील. आपल्या हातात मोबाईल आलाय. सोशल मीडियाचा वापर करताना आपण बऱ्याच चुका करतो. अशा वेळी त्या चुका सुधारण्यासाठी एक संधी आणि इशारा  दोन्ही गोष्टी गीतांजलीचा शोध देऊ शकतो. 

हेही वाचा : या आजींनी आत्ता कोरोनाला आणि १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूलाही हरवलंय

हाच माझा जगाला संदेश!

मुलाखतीत एंजेलिना जोली यांनी विज्ञान हे तुझं पॅशन आहे हे तुला कधी समजलं असा प्रश्न विचारल्यावर तिच्या चेहऱ्यावर छानसं हसू होतं. 'आज कुणाच्या चेहऱ्यावर हसू दिसेल हे माझं रोजचं ध्येय असतं. दुसरी तिसरीत असताना विज्ञानाच्या माध्यमातून आपण समाजात बदल घडवू शकतो असं मला वाटायचं,' असं गीतांजली म्हणते. 

‘मला टिपिकल शास्त्रज्ञ बनायचं नाहीये. आपल्याला टीवी सारख्या माध्यमाकडून नेहमीच गोरा रंग आणि पांढऱ्या केसांचा वृद्ध व्यक्ती एक पुरुष शास्त्रज्ञच म्हणून दाखवला जातो. यातून लिंग, वय आणि रंग यावर कर्तृत्व अवलंबून आहे असं सूचित करायचं  का?’ असा सवालही उपस्थित करते.

‘जगातील सामाजिक आव्हानांवर मात कारण्यासाठी केवळ तंत्रज्ञान किंवा अप विकसित करणं हे माझ्या ध्येयात बसत नाही. मला समस्या सोडवण्यासाठी इतर तरुणांनाही प्रेरित करायचं आहे. हे सगळं मी करू शकते तर तुम्हीही हे काम करू शकाल. कोणीही करू शकेल. हा महत्त्वाचा संदेश मला द्यायचा आहे,’ असंही तिनं सांगितलंय.

आपल्यालाच संपवायच्यात जगाच्या समस्या

‘आमच्या पिढीला अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. यामधे मागच्या पिढ्यांकडून आम्हाला अनेक नवीन धोके, सामाजिक आव्हानं मिळालीयत. सध्या आपण सगळे एका नव्या जागतिक साथरोगांशी मुकाबला करतोय. त्याचवेळी मानव अधिकारांच्या पीछेहाटीचा मुद्दा आजही जगात कायम आहे. जगात पर्यावरण बदल आणि सायबर गुंडगिरीची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. या सगळ्या आव्हानांवर आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मात देता येऊ शकते,’ असं गीतांजली आत्मविश्वासानं म्हणते.

१५ वर्षांच्या या सायंटिस्टनं तब्बल ३० हजारपेक्षा अधिक मुलांना शिकवलंय. याआधी कधीही न पाहिलेल्या संकाटांचा सामना आपली पिढी करतेय. यातल्या अनेक समस्या आपण तयार केलेल्या नाहीत. पण त्या आपल्याला संपवाव्या लागतील हे खरं. भविष्यात करायच्या गोष्टींकडे सकारात्मक आणि अधिक कृतिशील पद्धतीनं पहायची दृष्टी गीतांजली  आपल्याला देत राहते.

हेही वाचा : 

लाच न देण्याची चैन कुणाला परवडणार?

मारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’

पंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं

'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक

जागतिक कन्या दिनः स्त्री सन्मानासाठी दाढीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ