गीतांजली श्री: प्रचलित मानदंडाच्या पलीकडची मांडणी करणाऱ्या लेखिका

०९ जून २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


प्रतिष्ठेचं ‘बुकर पारितोषिक’ मिळवणार्‍या गीतांजली श्री या पहिल्या हिंदी भाषिक लेखिका आहेत. त्यांची ‘रेत समाधी’ ही कादंबरी देशातल्या आणि जगातल्या हिंदी वाचकांच्या आत्म्याशी जोडलेली आहे. या कादंबरीत स्त्रीच्या मनाची अवस्था अतिशय हृदयस्पर्शी आणि संवेदनशील भाषेत साकारली आहे. हिंदीला जागतिक स्तरावर नवं स्थान मिळवून देण्यात गीतांजली श्री यांचं यश महत्त्वाची भूमिका बजावेल.

यंदाच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकित १३ कादंबर्‍यांच्या यादीमधे भारतीय लेखिका ‘गीतांजली श्री’ यांच्या ‘रेत समाधी’ या हिंदी कादंबरीच्या ‘टॉम्ब ऑफ सँड’ या इंग्रजी भाषांतराचा समावेश करण्यात आला. साहित्यविश्वातला प्रतिष्ठेचा ‘बुकर पुरस्कार’ मिळाल्यानंतर ‘गीतांजली श्री’ यांचं नाव चर्चेत आलंय.

वडील आयएएस अधिकारी असल्यामुळे, उत्तर प्रदेशातल्या लहान-मोठ्या शहरांमधे त्यांची नियुक्ती होत होती. त्याच शहरांमधे गीतांजली श्री लहानाच्या मोठ्या झाल्या. दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून इतिहासात एम.ए. केलं. जामिया मिलिया इस्लामिया इथं काही दिवस शिकवल्या नंतर, सुरतच्या सेंटर फॉर सोशल स्टडीजमधे पोस्ट-डॉक्टरेट संशोधन केलं आणि तिथंच त्यांच्या साहित्यनिर्मितीला सुरवात झाली.

‘रेत समाधी’च्या पूर्वी त्यांच्या ‘माई’, ‘हमारा शहर उस बरस’, ‘तिरोहित’ आणि ‘खाली जगह’ या चार कादंबर्‍या प्रकाशित झाल्या आहेत. प्रतिष्ठित बुकर पारितोषिक मिळवणार्‍या गीतांजली श्री या पहिल्या हिंदी भाषिक लेखिका आहेत.

स्त्रीची हृदयस्पर्शी अवस्था

हिंदीला जागतिक स्तरावर नवं स्थान मिळवून देण्यात गीतांजली श्री यांचं यश महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास हिंदी साहित्यिकांनी व्यक्त केला आहे. मूळ हिंदी कादंबरीचं डेजी रॉकवेल यांनी भाषांतर केलंय. डेजी रॉकवेल या युनायटेड स्टेट्समधल्या चित्रकार आणि लेखिका आहेत. त्यांनी हिंदी आणि उर्दूमधे अनेक साहित्यकृतींची भाषांतरं केली आहेत. 

उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी बेतलेली आहे आणि एका ८० वर्षांच्या वृद्ध महिलेची ती कथा सांगते. ही महिला पाकिस्तानात जाते आणि फाळणीच्या वेळी झालेल्या त्रासावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करते. कादंबरीत स्त्रीच्या मनाची अवस्था अतिशय हृदयस्पर्शी आणि संवेदनशील भाषेत साकारली आहे.

डेजीने आपल्या इंग्रजी भाषांतरातही मूळ भाव जपत सुंदर शब्दांत मांडणी केली आहे. बुकरच्या आधी गीतांजली यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. ‘रेत समाधी’ ही कादंबरी देशातल्या आणि जगातल्या हिंदी वाचकांच्या आत्म्याशी जोडलेली आहे.

हेही वाचा: कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

कादंबरीतलं आई-मुलीचं नातं

ही कादंबरी मध्यमवर्गीय कुटुंबातले नातेसंबंध, वाद, भावना, व्यंग, आसक्ती, स्वप्नं-अपेक्षा यांचं चित्रण करते. कुटुंबातल्या दोन स्त्रिया, एक मुलगी आणि आई; एक मोठी आणि वयाने लहान, एक गंभीर आणि जबाबदार आणि दुसरी मुक्त आणि स्थिर, या कथेचा मुख्य भाग आहेत. त्यांच्या जीवनाभोवती संपूर्ण कादंबरी फिरते. त्यात आई आणि मुलीचं नातं तपशीलवारपणे चित्रित केलंय.

मुलीला सासरी सोडल्यानंतर, तिच्या घरचं पाणीही न पिणार्‍या समाजात आपल्या मुलीसोबत रहायला आईला क्वचितच मिळतं. पारंपरिक संस्कृतीनुसार आई आपल्या मुलीसोबत राहणं हे कशा पद्धतीचं असतं, याचं गीतांजली यांनी या कादंबरीमधे चित्रण केलंय.

या कथेत जेव्हा आई काही काळ मुलीसोबत राहायला येते, तेव्हा ती पुडीत बंद केलेल्या म्हातार्‍याची मुक्त बाहुली बनते. मुलगी आईच्या वाटेने जगू लागते आणि आई मुलगीच्या.जे संयुक्त कुटुंबात राहतात ते वेगळ्या कुटुंबाशी स्वतःला जोडू पाहतात, याचं भावनिक चित्रण या कादंबरीमधे आहे.

जीवनमूल्यांचं दर्शन

या कादंबरीची कथा काय आहे, हे चार ओळीत सांगता येणं शक्य नाही कारण ती ‘कथा’ नाही, असं गीतांजली श्री सांगतात. कादंबरीच्या प्रत्येक पानावर एक नवीन कथा जन्म घेते. यामधे प्रत्येक परिच्छेदांमधे एक नवीन पात्र प्रवेश करतं आणि आपली कथा सांगू लागतं. त्यात निर्जीव गोष्टीही जिवंत होतात आणि स्वतःच्या कथा सांगू लागतात. घराचं दार, भिंती, काठी आणि झाडं, पक्षी, फुलपाखरं आणि अगदी वाळू आणि वारा. या कादंबरीत मानवी जीवनाशी निगडित विविध संबंधांचं अतूट नातं जोडलेलं दिसून येतं. नवनवीन कथांचा संगम इथं चित्रित केलाय.

अडीच हजार वर्षांपूर्वी ज्या महामानवांनी एक नवीन जीवनमार्ग सांगितला, त्या तथागत गौतम बुद्धांचं वर्णनही इथं दिसून येतं. उत्खननामधे सापडलेल्या बुद्धाच्या मूर्तीचं वर्णन करून संशोधनाला नवीन वाट सापडते. मानवाने मानवाशी कसं वागावं, हे बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून सांगण्याच्या प्रयत्न केलेला दिसून येतो. सुजाताची खीर बुद्धाला कशी नवी दिशा दाखवून देते, हे सांगितलं आहे. वेगवेगळ्या जीवनमूल्यांचं दर्शन कादंबरीमधे दिसून येतं.

हेही वाचा: ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

सीमारेषा तोडणारी ‘रेत समाधी’

कादंबरीचे नाव ‘रेत समाधी’ का ठेवलं, हे वाचताना समजून जातं. पण प्रत्येक व्यक्ती या प्रश्नाचं उत्तर वेगळं देईल, हे नक्की. कादंबरी नात्याच्या जडणघडणीतल्या अनेक मुद्द्यांचा वेध घेते. स्त्रीकडून असलेल्या समाजाच्या अपेक्षा, तिच्या ठरलेल्या मार्गापासून दूर गेल्यामुळे निर्माण झालेला संघर्ष, पितृसत्ता, पुरुषत्व, स्त्रीवाद, राजकारण, पर्यावरण, जातीयवाद, ट्रान्सजेंडर समस्या, ब्रेन ड्रेन, फाळणी, भारत-पाकिस्तान राजकारण, प्रेम यांबरोबरच एक सामान्य कुटुंब सीमा ओलांडून पाकिस्तानात कसे पोचते, याची कथा वाचणं खूपच रोमांचक आहे.

ही कादंबरी केवळ भारत-पाकिस्तान सीमाच ओलांडत नाही, तर लेखनाच्या प्रत्येक सीमारेषाही तोडते. वाक्य न बनवताही शब्द इतके कसे चमत्कार करू शकतात, हे या कादंबरीत पाहायला मिळतं. कथेतून कवितेकडे आणि कवितेतून गाण्याकडे कादंबरी कधी वळते ते कळत नाही. मात्र, काहीवेळा त्यामुळे थोडा कंटाळाही निर्माण होतो. गोष्टी जबरदस्तीने खेचल्या जात आहेत, असं वाटतं. पण पुढची काही पानं नीरसपणे वाचल्यावर कथेला नवं वळण लागतं आणि वाचक पुन्हा कथेत रमून जातो. 

ही कादंबरी वाचत असताना चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. नवीन कथनशैली, प्रतीकात्मक शब्दरचना यांचा प्रत्यय कादंबरीत येतो. साम्राज्यवाद, सामंतवाद, बाजारवादाचं वर्णन करताना मानवी जीवनातलं हास्य कसं विलुप्त होतंय याचं चिंतन कादंबरीत आहे. त्याचप्रमाणे घरांमधला बंधुभाव, प्रेम, सुखशांती यामधे कसे बदल घडले आहेत यांची चर्चाही दिसून येते.

प्रचलित मानदंडाच्या पलीकडची मांडणी

साहित्याचा गंध हा आनंदित करणारा असतो. त्यामधे काय आहे आणि काय नाही, याची मीमांसा वाचक करत असतो. कारण की, व्यक्ती तितक्या प्रवृत्तीप्रमाणे एका व्यक्तीचं मत हे सर्वांचे मत असू शकेल, असं नाही. तर मतभिन्नता दिसून येते.

या संदर्भात गीतांजली श्री एक उदाहरण देतात की, ‘औपचारिक भोजनामधे ज्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या समोर त्याच्या नावाचं कार्ड ठेवलं जातं, त्याप्रमाणे इथं लेखकांची नावं एका ओळीमधे लावली आहेत. उदा. भीष्म साहनी, बलवंत सिंह, जोगिंदर पॉल, मंटो, राही मासूम रजा, शानी, इंतजार हुसैन, कृष्णा सोबती, खुशवंत सिंह, रामानंद सागर, मंजूर एहतेशाम आणि राजिंदरसिंह बेदी आदी.’

ही प्रसिद्ध हिंदी आणि इतर साहित्यिकांची यादी आहे, ज्यांनी भारत-पाकिस्तान फाळणीबद्दल संवेदनशीलतेने अतिशय सुंदर आणि भेदक लेखन केलं आहे. लेखिकेने हिंदी कादंबरीच्या प्रचलित मानदंडाच्या सीमारेषा ओलांडत नवीन मांडणी करून एक क्रांती केलेली दिसून येते.

हेही वाचा: 

तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा

'लाल श्याम शाह' हे पुस्तक मी का लिहिलं?

नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास