चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता

२२ जुलै २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


अवकाशातल्या गोष्टींचा अभ्यास करण्याच्या द्दीष्टाने या अवकाश मोहिमा होतात. मागच्या वर्षी २२ जुलैलाच आपलं चांद्रयान २ चंद्रावर काय आहे यांच्या संशोधनासाठी निघालं होतं.तसंच ५० वर्षांपूर्वी अमेरिकेची चंद्रावर माणूस पाठवण्याची मोहिम झाली होती. पण या मोहिमेचं उद्दीष्ट थोडं वेगळं होतं.

माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलं त्याला पन्नास वर्षं झाली. अमेरिकेने २० जुलै १९६९ ला चांद्रविजय मिळवला असं आपल्याला म्हणता येईल. ही घटना मानव इतिहासातली नक्कीच महत्वाची ठरते. चंद्राबद्दलच्या सर्व कल्पनांना विराम मिळाला तो हा दिवस. तोवर भारतात तरी चंद्र दुहेरी भूमिका निभावत होता. तो प्रेयसीच्या मुखाची प्रतिकृती होता आणि तमाम बहिणींसाठी भाऊरायासुद्धा होता. पण चंद्राचं खरं रूपडं उघड झालं आणि अनेक भावकवींच्या मनाचा चुराडा झाला.

चंद्र ही देवतासुद्धा, ग्रहसुद्धा अशी भारतामधली संकल्पना. ती आजही आहे. माणसांच्या भावनांवर चंद्राचं नियंत्रण असतं अशी एक श्रद्धा आहे. म्हणूनच तर पौर्णिमेला उत्कट भावनांचा कल्लोळ होत असतो असं मानलं जातं. आता काय असेल ते असो. या चंद्रावरच्या मोहिमेचा इतिहास तपासला तर एक गोष्ट नक्कीच जाणवते ती म्हणजे भावनांच्या कल्लोळातूनच ही मोहीम झाली.

हेही वाचा : पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

माणसाला चंद्रावर धाडायचं

रशिया आणि अमेरिका यांचे शीतयुद्ध सुरु होतं. यादरम्यान अंतराळात आपल्या विजय पताका लावायचा फंडा १९५० नंतर जोर धरू लागला. यातूनच रशियाने १९५० मधे पहिला उपग्रह अवकाशात सोडला. मग त्यांचा युरी गागारीनसुद्धा अंतराळात झेपावला. त्यांच्या या बुद्धी आणि कौशल्याच्या झेपेने अमेरिका गांगरून गेली. जगाचे डोळे दिपवणारे कार्य आपल्यालाच जमतं. अशा अहंकाराने पछाडलेल्या अमेरिकेला रशियाचा हा झगमगत बघवत नव्हता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी चंद्रावर अमेरिका माणसाला धाडणारच असा संकल्प केला. हे म्हणजे राजा बोले आणि प्रजा हले तसं झालं. नासा ही त्यांची संस्था झटून कामाला लागली. आणि मग चंद्रावर माणूस पाठवण्याच्या मोहिमांना वेग आला. अपोलो ८ ही त्यांची मोहीम साफ फसली. यानाचा स्फोट होऊन तीन अंतराळवीरांचा अंत झाला. काही दिवस मोहिमा थंडावल्या. पण फिरून अधिराज्य गाजवणाऱ्या भावना उचंबळू लागल्या.

आल्ड्रिनचे प्रयत्न विफल

पुढे अपोलो ११ ची मोहीम निश्चित झाली. तेव्हा कसून काळजी घेतली गेली होती. यावेळेस चुकायचे नाही, अशीच व्यवस्था केली होती. नील आर्मस्ट्रॉंग या अंतराळवीराने चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं आणि इतिहास घडवला. त्याचे नाव जणू अमर झालं. पण फारच थोड्यांना माहित असेल की या इतिहासासाठी इतरही आसुसलेले होते. एडविन आल्ड्रिन याला तो पहिला माणूस व्हायचं होतं. त्याचा अभ्यास, सराव कमी नव्हता. आर्मस्ट्रॉंग, तो आणि मायकेल आल्विन यांची अपोलो ११ साठी निवड झाली.

एकीकडे यांच्यापैकी चंद्रावर पहिल्यांदा कोण उतरणार? हे जाणून घेण्यासाठी पत्रकारांनीसुद्धा पिच्छा पुरवला होता. ही गोष्ट नासाचे प्रवक्ते स्टेलॉन यांनी गुलदस्त्यात ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र ऐनवेळी ही गोष्ट जाहीर करायचं ठरचं. पण दुसरीकडे आल्ड्रिनला कुणकुण लागली होती की आर्मस्ट्रॉंग या मोहिमेचा कमांडर आहे म्हणजे त्यालाच हा मान मिळणार. त्याच्या मनाला हे पटलं नाही. तो सैरभैर झाला. इतर सर्व अंतराळवीर, वैज्ञानिक, तंत्रज्ञ यांना तो समजावत होता ‘मला पहिलं ठरवलं पाहिजे’ पण कमाल म्हणजे आपला गट बनवून दबाव आणण्याचे त्याचे प्रयत्न विफल ठरले.

आल्ड्रिनच्या उद्वेगाला कुणी किंमत दिली नाही की सहानुभूती दर्शवली नाही. द्वेष, मत्सर यावर कशीबशी मात करत आल्ड्रिनने मग आर्मस्ट्रॉंगला सहकार्य केलं. तरीही स्टेलॉन यांनी आर्मस्ट्रॉंगला खाजगीत विचारलं होतं की, आल्ड्रिनबरोबर जमेल ना? नाहीतर त्याच्याऐवजी जिम लॉवेलला पाठवायचं त्यांनी ठरवलं होतं. पण आर्मस्ट्रॉंगने स्पष्ट केलं त्याचं कुणाशीही पटणार आहे. जिम लॉवेल अपोलो १३ चा कमांडर असणार आहे. त्याच्याकडे तीच जबाबदारी राहू द्या. आल्विन आणि कोलीन्स्च्यामते आर्मस्ट्रॉंग हा एकलकोंडा होता. तो फारसा मिसळणारा असाही नव्हता.

हेही वाचा : पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

आल्ड्रिनने चंद्रावर पूजा केली होती

काही चाचण्यांच्या वेळी ही गोष्टसुद्धा लक्षात आली की आल्ड्रिन थोडा धांदरट आहे. अतिउत्साही म्हणतात तसा. याला कारण त्याचे वडील, काका, भाऊ, चुलत भाऊ सगळे लष्करात होते. अति जोमात रहायची त्याला त्यामुळे सवय जडली असावी. आर्मस्ट्रॉंग हा शांत आणि संयमी होता. त्याचे वडील फायनान्स क्षेत्रात ऑडीटचं काम करणारे होते. चंद्रावर पहिलं पाऊल आर्मस्ट्रॉंगनेच ठेवावं असं सर्वांनाच वाटत होतं. आणि तसंच झालं.

पहिलं पाऊल ठेवल्यावर नील आर्मस्ट्रॉंगने केलेलं विधानही अजरामर झालंय, ‘मानवाचं हे छोटं पाऊल आहे. पण मानवतेची झेप आहे.’ या विधानाचे जगभरात स्वागत झालं. आर्मस्ट्रॉंग हा अति धार्मिक नव्हता. त्यामुळे त्याच्या आईला चिंता वाटायची. पुढे तर त्याने इस्लाम धर्म स्वीकारल्याचीसुद्धा अफवा उठली होती. आल्ड्रिन मात्र पक्का धार्मिक होता. ख्रिस्ती होता. त्याने आपल्या सोबत गुपचूप युनिकॉमचे साहित्य घेतलं होतं. आणि चंद्रावर त्याने ख्रिस्ती धर्माला अनुसरून ‘पूजा’ही केली. नंतर त्याला ह्या गोष्टीचा पश्चाताप झाला की आपण गेलो होतो ते तमाम मानवधर्माचे प्रतिनिधी म्हणून, कुणा एका धर्मासाठीचे नव्हे.

गंमत म्हणजे चंद्रावरची सर्वाधिक छायाचित्रे ही नीलची नव्हे तर आल्ड्रिनची निघाली. आर्मस्ट्रॉंगकडे कॅमेरा होता आणि तो आल्ड्रिनचे जमेल तसे फोटो काढत सुटला होता. पुढे याचंही आल्ड्रिनला चुकल्यासारखं वाटलं. एकूणच आल्ड्रिन हा पक्का आतल्या गाठीचा आणि खंबीर असा होता. त्याचे तीन तीन विवाह झाले ते उगीच नव्हे. आर्मस्ट्रॉंगचेही दोन विवाह झाले. पण तो उथळ, उतावळा नव्हता. तो पक्का तत्त्ववादी होता.

नील आज हवा होता

काही वर्षांनी नीलच्या केस कापणाऱ्या न्हाव्याने त्याचे काही केस तीन हजार डॉलर्सना विकले. वीस वर्षं मैत्री असलेल्या या न्हाव्याला नील आर्मस्ट्रॉंग नोकरासारखा वागवत नव्हता. पण जेव्हा त्याला त्याने केलेली आगळीक समजली तेव्हा मात्र तो त्याच्यावर संतापला. आणि त्याने त्याला आपले केस परत करावेत नाहीतर डॉलर्स चरीटीसाठी द्यावेत असा दम भरला. तो यासाठी त्याला कोर्टातही खेचणार होता. मग त्या न्हाव्याने डॉलर्स चॅरीटीला द्यावे लागले.

नील आर्मस्ट्रॉंगआणि एडविन आल्ड्रिन यांच्यात वैर असं नव्हतं. आर्मस्ट्रॉंगच्या मृत्यूच्या वेळीच तो म्हणाला होता, ‘नील आमच्या मोहिमेच्या पन्नाशीच्या वेळेपर्यंत असायला हवा होता.’ आज आल्ड्रिन ९० वर्षांचा आहे. नीलची अनुपस्थिती त्याला जाणवते आहे.

काम भावनांचा स्वामी चंद्र आहे हे खरं मानायचं का? हे ज्याचं त्यानं ठरवावं. या दोघांना चंद्राचा खरा सहवास घडला हे बाकी खरं.

हेही वाचा : 

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर

अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव

चांद्रयान २ : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारं पहिलं अंतराळयान