फेसबुकचं इन्स्टंट आर्टिकल बंद होतंय, तुमचं काय जातंय?

१० एप्रिल २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


फेसबुकची 'इन्स्टंट आर्टिकल' नावाची सुविधा या महिन्यापासून बंद केली जाणार आहे. आपल्यासारख्या बहुसंख्य फेसबुक युजरना ही सेवा बंद झाल्याचं कदाचित लक्षातही येणार नाही. ती सेवा वापरात होती तेव्हाही बऱ्यापैकी नकळतच वापरली जात होती. त्यामुळेच ही सेवा नेमकी काय होती, ती का बंद केली जातेय, त्याच्या फायद्या-तोट्याची गणितं समजून घ्यायला हवीत.

२०१५ मधे फेसबुकने इन्स्टंट आर्टिकलची सुविधा सुरू केली होती. त्यामागे दुहेरी हेतू होता, प्रकाशकांना आपलं साहित्य अत्यंत आकर्षक पद्धतीने आणि वेगानं वाचकांपर्यंत पोचवता यावं आणि फेसबुकवरच्या युजरना फेसबुकवरचं वैविध्यपूर्ण साहित्य वाचता यावं असे या सुविधेचे हेतू होते. ही सुविधा मोबाईल केंद्रित होती. म्हणजे जे साहित्य प्रकाशित केलं जायचं ते मोबाईलवर अत्यंत सहजपणे वाचता येऊ शकेल अशा फॉर्मॅटमधे प्रकाशित करता यायचं.

फेसबुकच्या मोबाईल ॲपवरून इन्स्टंट आर्टिकलच्या लिंकला क्लिक केलं की ते आर्टिकल अक्षरशः क्षणार्धात मोबाईल फोनवर लोड व्हायचं. वाचकांना फेसबुकचं ॲप सोडून दुसरीकडे न जाता किंवा दुसरं कुठलं ॲप इन्स्टॉल न करता अशी आर्टिकल वाचता यायची.

न्यूज पेपर, न्यूज पोर्टल, ब्लॉगर आणि डिजिटल माध्यमातून साहित्य प्रकाशित करणाऱ्या अनेक प्रकाशकांना या सुविधेमुळे फेसबुकवरच्या कोट्यावधी वाचकांपर्यंत पोचण्याची संधी इन्स्टंट आर्टिकलमुळे मिळत होती. या शिवाय इन्स्टंट आर्टिकल स्वरूपात साहित्य प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांसाठी फेसबुकने सबस्क्रीप्शन आणि रेफरल लिंक्सद्वारे उत्पन्न मिळू शकण्याची व्यवस्थाही केली होती.

हेही वाचा: ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य

इन्स्टंट आर्टिकल बंद का झाली?

गेल्या काही वर्षांमधे सोशल मीडियावर कोणत्या प्रकारचा कंटेंट आपण बघतो किंवा वाचतोय यात झपाट्याने बदल होत गेला. विशेषतः 'टिकटॉक'च्या आगमनानंतर सोशल मीडियाचा वापर हा शॉर्ट वीडियो बघण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला. लिखित मजकूर वाचण्यापेक्षा छोटे मनोरंजनात्मक वीडियो बघणं हे युजरना जास्त आकर्षक वाटायला लागलं. हा बदल आपण सगळेचजण अनुभवतो आहोत.

फेसबुकची पेरेंट कंपनी 'मेटा'ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेसबुकवर युजर घालवत असलेल्या वेळापैकी सुमारे ५० टक्के वेळ हा वीडियो बघण्यात जातो. शिवाय, फेसबुकवरच्या बातम्यांच्या लिंक्सवर तीन टक्क्यांपेक्षा कमी युजर क्लिक करतात.

थोडक्यात, इन्स्टंट आर्टिकलसारखी बातम्यांच्या लिंक देणारी सेवा तीन टक्क्यांहून कमी युजर वापरत असतील तर त्यात काहीही गुंतवणूक करणं हे आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचं नसल्यामुळे ती सेवा फेसबुकने बंद करायचं ठरवलं आणि अधिकाधिक गुंतवणूक ही फेसबुक वरच्या रील आणि वीडियो या माध्यमांकडे करायचं ठरवलं आहे.

बदललेला सोशल मीडिया

आपल्या वाचनाच्या आणि एकुणातच कोणत्याही प्रकारच्या साहित्याचं ग्रहण करण्याच्या सवयींमधे सोशल मीडियामुळे कमालीचा बदल झालाय. आपण काय वाचतो, किती वाचतो, कोणत्या माहितीस्रोतातून आलेल्या गोष्टी वाचतो आणि किती वेळ वाचू शकतो हे सगळं सोशल मीडियामुळे कमालीचं बदलत चाललं आहे.

उदाहरणार्थ, रोजच्या बातम्या वाचण्यासाठी काही वर्षांपूर्वी आपण छापील न्यूज पेपरवर अवलंबून असायचो. मात्र सोशल मीडियाच्या आगमनानंतर आपण सोशल मीडियावर आलेल्या पोस्ट्स आणि आपल्या फीडमधे आलेल्या बातम्यांच्या लिंकमधून प्रामुख्याने बातम्या वाचायला लागलो आहोत.

बातम्या सोडून वैचारिक काही वाचायचं तर पूर्वी आपण मॅगझीन वाचायचो, त्यानंतरच ब्लॉग वाचायचो.  या दोन्हीची जागा आता सोशल मीडियावरच्या पोस्ट्सने घेतली आहे.

हेही वाचा: भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

वीडियो कंटेंट, गुंतवून ठेवणारा

सोशल मीडियावरून होत असलेल्या कंटेंटच्या अखंड भडिमारामुळे आपला 'अटेंशन स्पॅन' अत्यंत कमी होत चालला आहे. काही वर्षांपूर्वी पान पानभर मोठे असलेले लेख सहज वाचू शकणारे आपण, आता मोबाईल स्क्रीनच्या एका आवाक्यात जेवढं दिसतं तेवढंच वाचू शकतो. खरंतर, त्याहूनही कमी असेल तर चांगलंच!

आपल्यातल्या बहुसंख्य लोकांची सलग लांबलचक काही वाचण्याची एकाग्रता अत्यंत झपाट्याने कमी होत चाललीय. सोशल मीडियामुळे निर्माण झालेल्या या समस्येचं उत्तर सोशल मीडियानेच शोधलं आहे आणि ते लिखित मजकूराऐवजी वीडियोच्या रूपात आपल्यासमोर आलं आहे.

आपला अटेंशन स्पॅन कमी झालेला असताना आणि वाचनातली एकाग्रता नाहीशी होत चाललेली असताना वीडियोच्या स्वरूपात आलेला कंटेंट हा आपल्याला जास्त आकर्षक आणि जास्त गुंतवून ठेवणारा वाटत आहे.

वीडियो कंटेंटचा महापूर

स्मार्टफोन्सच्या क्षेत्रात झालेल्या विस्मयकारक प्रगतीमुळे छोटे वीडियो तयार करण्याचं तंत्रज्ञान अक्षरशः प्रत्येक व्यक्तीच्या खिशात आलंय. कोणालाही कुठेही कोणत्याही प्रकारचे वीडियो तयार करणं आणि ते सोशल मीडियावर प्रकाशित करणं हे सहजसाध्य झालं आहे. कोणताही मजकूर लिहिण्यासाठी काही विशिष्ट कौशल्यं लागतात.

जे सांगायचं आहे ते थोडक्या शब्दांत, सोप्या आणि समजेल अशा भाषेत लिहिणं, व्याकरण दृष्ट्या निर्दोष लिहिणं, लिहिलेलं सगळं टाईप करणं इत्यादी. वीडियो करण्यासाठी ही कौशल्य लागत नाहीत. तिथं पूर्णपणे वेगळी दृष्य भाषेची कौशल्य लागतात. त्यातही नृत्याचे, गाण्याचे, रेसिपीजचे वीडियो करायचे असतील तर आपापली कला चांगली येणं आणि ती मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट करू शकणं हे कौशल्य लागतं.

त्यामुळे थोड्याफार प्रयत्नांनी कोणीही आपले वीडियो तयार करू शकतंय आणि सोशल मीडियावर सोशल मीडियावर वीडियो कंटेंटचा अक्षरशः एक प्रचंड मोठा महापूर आला आहे.

हेही वाचा: आयपॉड क्रांतीची सतरा वर्षं

सोशल मीडियाचं गणित

सोशल मीडियावर येणारे वीडियो हे पारंपारिक वीडियोपेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे असतात. पारंपारिक वीडियो म्हणजे सिनेमा, टीवीसाठीचे वीडियो. सोशल मीडियावरचे वीडियो बऱ्यापैकी कमी लांबीचे असतात आणि त्यांच्या आशय आणि विषयांमधे प्रचंड मोठ्या प्रमाणात वैविध्य असतं.

एखाद्या कलेच्या आविष्कारापासून ते एखादं कौशल्य किंवा पाककृती शिकवण्यापर्यंत, एखाद्या हॉटेलच्या रिव्यूपासून ते प्रवासवर्णनापर्यंत, एखाद्या अध्यात्मिक भाषणापासून ते चावट विनोदापर्यंत, खेळांच्या क्लिपपासून ते ऑनलाईन गेमच्या टिप्सपर्यंत अक्षरशः अगणित विषय या वीडियोमधे सामावलेले दिसतात. मात्र सोशल मीडियावरच्या वीडियोच्या विषयांमधे प्रचंड वैविध्य असलं तरी आशयामधे संपन्नता असतेच असं नाही.

किंबहुना, वीडियोच्या बाबतीतली सगळ्यात मोठी त्रासदायक गोष्ट म्हणजे अत्यंत सुमार आशयाचे किंवा अत्यंत बटबटित पद्धतीने तयार केलेले वीडियो. वीडियो 'वायरल' व्हावा म्हणून उत्तान पोषाख घालून किंवा अंगविक्षेप करून तो चित्रित करणं, गलिच्छ, आक्रस्ताळी भाषा वापरणं, सार्वजनिक ठिकाणी अत्यंत धोकादायक पद्धतीने चित्रण करणं असे अनेक आक्षेपार्ह प्रकार अनेकजन करताना दिसतात.

अशा वीडियोना लाखो व्यूवही मिळतात. त्यांची लोकप्रियता बघून आणखी लोक अशा प्रकारचे वीडियो तयार करायला लागतात, हे दुष्टचक्र प्रचंड वेगानं फिरू लागलेलं दिसतं. सोशल मीडियावरच्या लोकप्रियतेसाठी वीडियोमधे केला जाणारा थिल्लरपणा, बटबटितपणा आणि बिभत्सता कोणत्या दिशेला जाईल हा अत्यंत चिंताजनक प्रश्न आहे.

फेसबुकचं व्यावसायिक हित

बातम्या आणि आशयसंपन्न लिखित मजकुराला आपल्या युजरचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारी इन्स्टंट आर्टिकल ही सेवा बंद करून फेसबुक वीडियोवर जास्त भर देणार आहे ही बातमी वाचल्यावर केलेलं हे सर्व विश्लेषण. फेसबुक ही व्यवसायिक कंपनी आहे. त्यांचे हे दोन्ही निर्णय अर्थातच व्यावसायिक आणि स्वतःचा आर्थिक लाभ बघणारे आहेत.

युजरनी जास्तीत जास्त काळ फेसबुकवर रहावं ह्यात फेसबुकचं व्यावसायिक हित असतं. जितके जास्त युजर जितका जास्त काळ फेसबुकवर रहातात तितका त्यांचा जाहिरातीचा महसूल वाढतो. दोन-चार वर्षांपूर्वी बातम्या आणि इतर वैचारिक आशयासाठी इन्स्टंट आर्टिकल वाचणारे युजर आणि प्रामुख्याने वीडियो बघण्यात जास्त वेळ घालवत आहेत. त्यातही जर थिल्लर वीडियो जास्त बघितले जात असतील तर फेसबुक ते जास्त प्रमोट करेल.

कमीतकमी वेळात जास्तीत जास्त कंटेंट ग्रहण करत  आपला अट्टाहास, ऍक्टिव लर्निंग ऐवजी पॅसिव कन्झम्पशनचा कल आणि थिल्लरतेला मिळत असलेली लोकप्रियता आपल्याला कोणत्या दिशेना घेऊन जाईल ह्याचं भाकित करणं अवघड आहे.

हेही वाचा: 

बॅननंतरही टिक टॉक वाजतं जोरात

आयफोनः नव्या जगाचा स्टेट्स सिम्बॉल

आपण मोबाईल गेमचा वीडियो एअर स्ट्राईकचा म्हणून पाहिला

सोशल मीडियाला आचारसंहिता लागू झालीय, म्हणजे काय झालंय?