एन. डी. पाटील : सत्यशोधक, विज्ञाननिष्ठ राजकारणी

१७ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ९ मिनिटं


प्रश्न शेतकऱ्यांचा असो, कामगारांचा असो किंवा सीमाभागातल्या गावांचा असो एन. डी. पाटील हे नाव त्यात कायमच आघाडीवर असायचं. अंधश्रद्धा निर्मुलनातही त्यांनी नरेंद्र दाभोलकरांसोबत काम करून विधीमंडळात पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्त्व केलं. आज दाभोलकरही नाहीत आणि 'एन.डी'ही नाहीत. आज 'एन.डीं'ना जाऊन वर्ष झालं. त्यामुळे दाभोलकरांनी 'एन.डीं'वर लिहिलेला हा जुना लेख एक दस्तावेज म्हणून महत्त्वाचा आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक स्पंदनासोबत संपर्क असल्यानं एन. डी. पाटील हे नाव मला अपरिचित नव्हतं. सातारा जिल्ह्यात राखीव जागांचं समर्थन करणार्‍या समितीत काम करताना वकिलांच्या बैठकीसमोर आणि नंतर गांधी मैदानावरच्या जाहीर सभेत राखीव जागांच्या बाजूनं वेगवेगळ्या प्रकारचे तर्कशुद्ध, प्रभावी युक्तिवाद पोटतिडकीने करताना मी एन. डीं. ना पाहिलं होतं; पण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात त्यांचा संपर्क आला तो काहीसा अनपेक्षितपणे.

झालं असं की, आम्ही १९९०ला पुण्यामधे अंधश्रद्धा निर्मूलन जाहीरनामा परिषद घेतली. त्या परिषदेत शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत एक महाराष्ट्रव्यापी चर्चासत्र घेण्याचा निर्णय झाला. यासाठी सहकार्य मागण्यासाठी मी रयत शिक्षण संस्थेचे त्यावेळचे सचिव सुभाषचंद्र भोसले यांना भेटायला गेलो होतो. एन. डी. सर त्यावेळी चेअरमन नव्हते. पण माझ्या या भेटीच्यावेळी योगायोगाने तिथं होते.

हेही वाचा: शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा

माणूस आडवा जातो तेव्हा...

अंधश्रद्धा निर्मूलन जाहीरनाम्याची एक पुस्तिका आम्ही काढली होती आणि त्याच्या मुखपृष्ठावर रस्ता ओलांडणारं मांजर दाखवलं होतं. ती पुस्तिका पाहून एन. डी. म्हणाले, 'दाभोलकर, तुम्हाला माहीत आहे का? मांजर आडवं गेलं की, फक्त माणूसच असं म्हणत नाही, की आता काम होणार नाही, तर मांजरही मनातल्या मनात म्हणतं, ‘अरे बापरे, माणूस आडवा गेला, आता आज काही उंदीर मिळणार नाही आणि उपवास घडणार.' या प्रतिपादनावर सारेचजण खळाळून हसले. मग बराचवेळ अंधश्रद्धा निर्मूलनाचा विषय चर्चेत राहिला. त्याचवेळी मला जाणवलं की, सरांचं चळवळीशी नातं जुळलं, तर बहार येईल.

१९९१ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पूर्ण कार्यकारिणीची निर्मिती पहिल्यांदाच झाली. स्थायी स्वरूप लाभलं. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी अध्यक्षपदासाठी एकमुखाने एन. डी. सरांचं नाव सुचवलं. आधीच असंख्य जबाबदार्‍या खांद्यावर असतानाही चळवळीच्या प्रेमापोटी त्यांनी होकार दिला. त्यानंतर आता गेली १३ वर्ष ते महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक तीन वर्षांनी राज्य कार्यकारिणी एकमताने त्यांचीच फेरनिवड करते; दुसरं नावही चर्चेला येत नाही. एन. डी.ही संघटनेच्या प्रेमापोटी होकार देतात.

एन. डी. समितीचं अध्यक्ष झाल्यानंतर सुरवातीचा एक भाग म्हणून सातारा शहरातल्या रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातल्या इच्छुक प्राध्यापकांचं आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं प्रशिक्षण शिबीर घेतलं. सर्व शिबिरार्थी सातारा शहरातलंच असल्याने रोज संध्याकाळी एक ते दीड तास व्याख्यान आणि अर्धा तास प्रश्नोत्तरं असा १५ दिवसांचा कार्यक्रम होता. उद्घाटनाचं पहिलं भाषण अर्थातच, एन. डीं.चं झालं. या विषयावरची त्यांची मांडणी तोपर्यंत मी कधी ऐकलेली नव्हती.

अंधश्रद्धा निर्मुलनाची नवी मांडणी

त्यावेळी माझ्या हे लक्षात आलं की, मार्क्सवादाचं अध्ययन आणि महाराष्ट्रातल्या सत्यशोधकी विचारांची आणि चळवळीची सखोल जाणीव यामुळे एन. डीं.च्या अंधश्रद्धा निर्मूलन विषयावरच्या मांडणीला स्वाभाविकच एक औरस-चौरस भरभक्कम व्यापकत्व प्राप्त होतं – ‘माणूस हा त्याच्या बुद्धीने श्रेष्ठ ठरला; पण उत्क्रांतीमधे त्याला लाभलेली ही विकसित बुद्धी ही काही देवाची कृपा नाही. माणसाने पहिल्यांदा स्वत:च्या दहा बोटांचा हत्यारासारखा वापर करायला सुरवात केली.'

'उत्क्रांतीच्या या टप्प्यावर हाताची बोटं सुटी झाल्यानं आणि अंगठा अधिक प्रमाणात वळवता येऊ लागल्याने त्याला हे शक्य झालं. यानंतर त्याने दगडाचा वापर हत्यार म्हणून करायला सुरवात केली. पुढे त्या दगडाला धार लावून अणकुचीदार केलं. नंतर धार लावलेल्या दगडाला झाडाची फांदी तोडून जोडली आणि ओबडधोबड कुर्‍हाड तयार केली. यानंतर धातूंचे शोध लागले आणि हत्यारं विकसित होत गेली. विकसित हत्यारांच्या आधारे आजूबाजूच्या निसर्गावर विविध स्वरुपाच्या प्रक्रिया म्हणून घडवलेला माणूस सर्वश्रेष्ठ ठरला.' एन. डीं.च्या मांडणीतला हा एक भाग.

मला जाणवलेली दुसरी गोष्ट अशी की, युरोपमधल्या प्रबोधनाच्या कालखंडाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे आणि मुक्तीचे पास विकणार्‍या पोपसारख्यांच्या ढोंगीपणाबद्दल संतापही आहे. महाराष्ट्रातल्या सत्यशोधकी समाजसुधारकांची परंपरा हा तर त्यांच्या केवळ अभ्यासाचाच नव्हे, तर जिव्हाळ्याचा विषय आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या सारख्या उपेक्षा पदरी आलेल्या समाजसुधारकांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल त्यांना अपार आदर आहे.

शिक्षकांना शिकवणारा शिक्षक

एन. डीं. च्या प्रभावाने चालू झालेलं हे शिबीर उत्तम संपन्न झालं. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की, ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत संस्थेच्या कामासाठी एन. डी. फिरतात, तिथं त्या जिल्ह्यातल्या शिक्षक-प्राध्यापकांशी खुला संवाद साधायचा. कोल्हापूर, पुणे अशा काही जिल्ह्यांत असे प्राध्यापक-शिक्षक यांचे मेळावे झाले; पण मला असं लक्षात आलं की, दोन-तीन तासांच्या अपुर्‍या वेळेत शिक्षक-प्राध्यापकांच्या डोक्यांतला सर्व गोंधळ नष्ट तर होत नाहीच, उलट काही वेळेला वाढतो, काही प्रसंगी अकारण विरोधी मानसही तयार होतो.

देव, धर्म, पूजापाठ, कर्मकांडं याबद्दल राजकारणात राहूनही सर रोखठोक भूमिका घेतात; पण समोर असलेल्या बहुतेक प्राध्यापक, शिक्षकांना तो विचार झेपत नाही. मग आचार तर दूरच राहिला. यामुळे अशा बैठकांतून कामाला कृतिशील कार्यकर्ते मिळतील, हे साध्य होऊ शकलं नाही. यानंतर आम्ही ‘सत्यशोधक प्रज्ञा प्रकल्प’ सुरू केला. अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, सत्यशोधकी जाणिवा यांचा एक छोटा; पण आखीव-रेखीव अभ्यासक्रम चालू केला.

प्राथमिक, माध्यमिक शिक्षक; तसंच प्राध्यापक यांच्यासाठी अभ्यासक्रमाचा स्तर थोडा वेगवेगळा ठेवला. या घटकांची दोन-तीन दिवसांची अंधश्रद्धा निर्मूलन प्रशिक्षण शिबिरे घ्यायला सुरवात केली. या शिक्षक-प्राध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम शिकवावा आणि नंतर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्र द्यावं, असं या प्रकल्पाचं स्वरूप आहे.

हेही वाचा: चळवळीच्या यशाचे मापदंड आज बदलतायत

चळवळ करण्यासाठी कायदा हवा

महाराष्ट्रात हा उपक्रम खूप लोकप्रिय झाला. गेल्या दहा वर्षांत सुमारे १६-१७ हजार शिक्षकांची शिबिरं झाली आणि तीन ते चार लाख विद्यार्थी परीक्षांना बसले. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आज महाराष्ट्रात काही प्रमाणात सर्वदूर पोचल्याचं जाणवतं. याचं महत्त्वाचं कारण सत्यशोधक प्रज्ञा प्रकल्प हे आहे. याची सुरवात झाली एन. डीं. नी ‘रयत’च्या शिक्षक-प्राध्यापकांच्या घेतलेल्या शिबिरापासून.

अंधश्रद्धा निर्मूलनाचं मुख्य कार्य आहे शोषण करणार्‍या, फसवणूक, दिशाभूल करणार्‍या अंधश्रद्धांना विरोध करणं. चमत्कार, बुवाबाजीचे शोषणाचं प्रकार, भानामतीच्या गूढ घटना, करणीची दहशत, चेटूक, मूठ मारणं अशा स्वरुपाच्या अंधश्रद्धांच्या असंख्य घटना आजूबाजूला घडत असतात आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता कोणत्याही कायद्याच्या मदतीशिवाय त्याविरोधी झुंजत असतो.

या लढ्यात सहभागी होणं एन. डीं. ना शक्य नव्हतं आणि मुळात तशी अपेक्षाही नव्हती. अपेक्षा होती ती ही की, या स्वरुपाच्या उघड-उघड शोषण करणार्‍या अंधश्रद्धांच्या विरोधात एका स्वतंत्र कायद्याची निर्मिती शासनानं करावी याची. २०००ला महाराष्ट्रात सत्तारूढ झालेल्या लोकशाही आघाडी सरकारने किमान समान कार्यक्रमासाठी एन. डीं.च्या अध्यक्षतेखालीच एक समिती नेमली.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा लढा

या समान किमान कार्यक्रमात एन. डीं.नी आवर्जून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्याच्या कलमाचा समावेश केला. अर्थात, शासन अशा गोष्टींना भीक घालणारं नाही, हे या अध्यक्षांनाच माहीत होतं. यामुळे एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालीच हा लढा आम्ही लढलो. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू असताना एक महाराष्ट्रव्यापी धरणं आझाद मैदानावर धरलं होतं; परंतु सरकारच्या लेखी अशा गोष्टींची किंमत ती किती असणार? यामुळे विधिमंडळात जाऊनच मंत्र्यांना हलवण्याची गरज होती. हे जमू शकलं ते केवळ एन. डीं.च्यामुळे.

एका बाजूला संसदीय कामकाजमंत्री, गृहमंत्री, सभापती, मुख्यमंत्री यांना आम्ही भेटला; तर दुसरीकडे सभागृहात या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषदेत एक सक्षम फळी सरांनी तयार केली. त्यामुळेच भारतात पहिल्यांदा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतंत्र कायद्याची निर्मिती झाली. याबाबत शासन आपल्या दिलेल्या शब्दाला जागलं नाही. कायद्याचा हा मसुदा अवलोकनासाठी दिल्लीच्या गृहखात्याकडे पाठवणं आवश्यक होतं.

एका महिन्यात हे करून हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर करण्याचं आश्वासन एन. डी. पाटील यांना आणि मला अतिशय स्पष्ट शब्दांत त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. प्रत्यक्षात नऊ महिने कायद्याचा मसुदा दिल्लीला पाठवला गेला नाही. मग तो दिल्लीहून येऊन विधिमंडळासमोर मांडणं दूरच राहिलं, याबद्दल सरांनी सरकारला धारेवर धरलं. खास माणूस पाठवून दिल्लीला हा मसूदा पोचवावा. शिवाजीराव पाटील-चाकूरकर यांच्याशी मी व्यक्तिगत बोलून लवकरात लवकर तो तेथून परत येईल, हे पाहतो आणि राज्यपालांनी वटहुकूम काढून असा प्रस्ताव हा लेख लिहित असताना एन. डीं.नी राज्य शासनासमोर ठेवला आहे.

सुधारणांचा कृतीशील आग्रह

विधायक कृतिशील धर्मचिकित्सा हे समितीचं आणखी एक महत्त्वाचं काम आहे. रुढी, कर्मकांडं, परंपरा यामुळे माणसाच्या प्रतिष्ठेचं जे अवमूल्यन होतं, त्याला विरोध करणं महाराष्ट्र जवळजवळ विसरत चालला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे आवश्यक; पण अप्रिय काम मोठ्या चिकाटीने व सातत्याने करत असते आणि एन. डी. त्याला ताकदीने पाठिंबा देत असतात.

उच्च मराठा कुळातल्या आमच्या एका कार्यकर्त्याने चळवळीच्या विचारांच्या प्रभावाने मराठा समाजात आजही निषिद्ध मानलेला विधवा विवाह; तोही अपत्य असणार्‍या विधवेशी आवर्जून केला. या कार्यकर्त्याचा सत्कार एन. डीं.नी ‘रयत’मधे घडवून आणला आणि त्याप्रसंगी १९ व्या शतकात जी प्रथा संपूर्ण जायला पाहिजे होती, तिच्याविरोधी कृती केल्याबद्दल २० व्या शतकाच्या शेवटच्या दशकात सत्कार करावा लागतो, याबद्दल खंत व्यक्त केली होती.

शनिशिंगणापूर इथं शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश नाही, या विरोधात समितीने सत्याग्रह जाहीर केला. ‘बायकांना शनिदेवाकडे घेऊन जाणारा म्हणजेच परिवर्तनाच्या चळवळीची पीछेहाट करणारा असा हा कार्यक्रम आहे,’ असं टीकाकारांचं मत होते. समितीची भूमिका अशी होती की, हा प्रश्न प्रामुख्याने समतेचा आहे.

हेही वाचा: डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!

शनिशिंगणापूरमधला पेच आणि एनडी

ज्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश आहे, त्या ठिकाणी धर्म आणि रुढीच्या नावाने बाईला प्रवेश नाकारणं हे विषमतावादी आहे. पुरुष जाऊ शकतात, त्या शनिदेवाच्या चौथर्‍यावर जायचं की नाही, हा सर्वस्वी त्या बाईच्या इच्छेचा प्रश्न आहे आणि ती दूर व्हायला हवी. एन. डीं.चा या भूमिकेला पाठिंबा होता. सातत्याने पाच वर्ष प्रबोधन मोहीम चालवल्यानंतर समितीने महाराष्ट्रव्यापी सत्याग्रह नगर इथं केला.

त्याआधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आणि माझे सहकारी उपोषणाला बसलो होतो. त्यावेळी एन. डी. पूर्णवेळ आमच्यासमवेत होते. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुख यांच्याशी सतत चर्चा चालू होती. उपोषण ठरल्या वेळेआधी १२ तास बंद करावं, असा मोठा दबाव कलेक्टरांनी आणला नाही, तर ताबडतोब अटक करण्याचा इशाराही दिला.

या चर्चेला मी, डॉ. लागू, एन. डी. पाटील उपस्थित होतो. विचार करण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ मी मागितला. शेजारच्या खोलीत गेलो. माझा विचार साधा-सरळ होता. तो असा की, ‘उपोषण थांबवण्याचा काहीएक अधिकार जिल्हधिकार्‍यांना नाही. त्यामुळे त्यांना सांगायचं खुशाल अटक करा.’ लढाऊ असलेले एन. डी. पाटील सर हाच निर्णय घेतील, असं मला वाटत होतं; पण माझा अंदाज चुकला.

एनडींचा अनुभव कामाला आला

एन. डीं. नी माझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळे-पावसाळे चळवळीत अनुभवलेले होते. त्यांनी असं सांगितल, 'कलेक्टर अगदी चिडीलाच आल्याचं मला दिसतं. तो आपल्याला नक्कीच अटक करेल; पण त्यामुळे आपला मूळ उद्देशच असफल होण्याचा धोका आहे. तो उद्देश आहे, उद्या शनिशिंगणापूर सत्याग्रह करण्याचा. आज अटक झाल्यानंतर लढा शासकीय हस्तक्षेपाने मधेच खंडित झाला, असं एका बाजूला होईल. दुसरीकडे, आपले महाराष्ट्रातले सर्व कार्यकर्ते आज निघून उद्या नगरला पोचणार आहेत. शासनाने आडमुठी भूमिका घेऊन त्यांना जिल्हाबंदी केली, तर सर्वत्र सत्याग्रह कोसळेल. त्यापेक्षा आपण जिल्हाधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन उपोषण थांबवूया. आतापर्यंत त्यांनी याबाबत दिलेलं सहकार्य उद्यापर्यंत चालू राहण्याची शक्यता त्यामुळे वाढेल.'

एन. डीं.चा हा निर्णय अचूक होता, हे पुढे घडलेल्या घटनांनी सिद्ध केलं. दुसर्‍या दिवशीचा सत्याग्रह अतिशय शिस्तबद्धपणे पार पडला. पहिल्या तुकडीत एन. डी., डॉ. श्रीराम लागू, डॉ. बाबा आढाव, व्यंकटअण्णा रणधीर आदी मान्यवर होते. दोन दिवस नगरच्या जेलमधे होतो. सर्वजण एकाच बराकीत होतो.

मला गार पाण्याच्या आंघोळीची सवय आहे. सकाळी उठून बराकीसमोर असलेल्या हौदावर आंघोळीसाठी गेलो, तर माझ्या बाजूला एन. डी. सर हजरच होते. आंघोळ झाल्यावर त्यांनी ‘सराईतपणे’ स्वत:चे कपडे धुतले. ‘सराईतपणे’ हा शब्द यासाठी की, आयुष्यभर स्वत:चे कपडे स्वत: धुण्याचं व्रत ते कोणताही गाजावाजा न करता अत्यंत सहजपणे सांभाळत आले आहेत.

महाराष्ट्राच्या विवेकाचा वाहक

महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्राची ‘वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद’ आमच्या समितीने घेतली. त्यामधे महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापकांत ‘विवेकवाहिनी’ निर्माण करण्याचा निर्णय झाला. या संघटनेसाठी मी महाराष्ट्रभर महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या बैठका घेत फिरलो. आपल्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातही एन. डी. पाटील सरांनी ‘विवेकवाहिनी’साठी भरपूर वेळ दिला.

मुंबईत ज्या दिवशी ‘विवेकवाहिनी’साठी प्राध्यापकांची बैठक झाली, त्यावेळी प्रचंड पाऊस पडत होता. अवघे पाच प्राध्यापक आले होते. तरीही तेवढ्यांच्यासमोर सर नेहमीच्याच तळमळीने बोलले. तयारी करून पुन्हा आणखी एक बैठक घेतली. त्याही बैठकीला पाच-सहा कॉलेजचेच प्राध्यापक आले. त्यावेळी अर्थातच, हे स्पष्ट झालं की, प्राध्यापक न येण्याचं कारण पाऊस नाही, तर अनास्था आहे.

याही बैठकीला एन. डी. होतेच आणि इतक्या कमी संख्येबद्दल कोणतीही तक्रार न करता, नाउमेद न होता त्यांनी नेहमीच्याच पोटतिडकीने ‘विवेकवाहिनी’ची गरज पटवली. ‘विवेकवाहिनी’ आणि विवेकाधिष्ठित विचार-आचाराच्या आधारे आपला विकास आपल्या हाती या सूत्राने काम करणारी संघटना आहे. या विचाराला एन. डीं.नी एक चांगला मुद्दा पुरवला.

हेही वाचा: संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?

विद्यार्थ्यांना जागवणारा मोटिवेटर

ते विद्यार्थांना सांगत, 'आज महाराष्ट्रात १८ ते २३ या कॉलेज वयोगटात जाण्यायोग्य वयाचे जे विद्यार्थी आहेत, त्यापैकी फक्त ६ टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण मिळतं. या अर्थाने तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात. कारण उद्याच्या समाजातले शास्त्रज्ञ, कलेक्टर, न्यायाधीश, लष्करी अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनिअर हे फक्त तुमच्यातूनच तयार होणार आहेत. मात्र तुमच्याच वयोगटातल्या फार मोठ्या समुदायाला हे भाग्य लाभलेलं नाही, तुम्ही याची जाणीव ठेवायला हवी.'

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही व्यापक समाजपरिवर्तनाशी आपली बांधिलकी मानते. समाजात व्यापक परिवर्तन होऊन शोषणरहित समताधिष्ठित समाजाची निर्मिती झाल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलनाचा लढा यशस्वी होणार नाही, याचं पक्कं भान समिती बाळगून आहे. या दृष्टीने एन. डीं.चे मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचं ठरतं.

महाराष्ट्रातल्या व्यापक जनलढ्यांचे एन. डी. आज अग्रेसर असलेले सर्वमान्य नेते आहेत. प्राथमिक शिक्षणाची परवड स्पष्ट करणारी ‘हे शिक्षण आहे तरी कोणासाठी?’ ही मोहीम मोठ्या निर्धाराने त्यांनी चालवली. प्रकाश देण्याच्या नावाने महाराष्ट्रास कर्जबाजाराच्या अंधारात लोटणार्‍या ‘एन्रॉन’चा जमिनीत गाडला गेलेला लढा मोठ्या हिमतीने आणि हिकमतीने पुन्हा उभा केला.

मध्यरात्रीही धावून येणारा आधारस्तंभ

शेतजमिनीचा प्रश्न असो किंवा धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा; एन. डीं. चं नेतृत्व सर्वांना हवं असतं. कारण ते अभ्यासू आणि ठाम असतं. हे सारे प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दैनंदिन चळवळीच्या कार्यकक्षेबाहेरचे आहेत; पण समितीचे अध्यक्षच व्यापक लढ्याचे धुरिणत्व करत असल्याने स्वाभाविकच चळवळीतल्या कार्यकर्त्यांनाही आपण आपल्या कार्याच्या परिघाबाहेर व्यापक लढ्याशी जोडलेलं राहावं, अशी प्रेरणा मिळते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षांनी समितीच्या दैनंदिन कामासाठी वेळ द्यावा, अशी अपेक्षा नाही आणि तशी सवडही एन. डीं.ना असणं अशक्यच; पण चळवळीला ज्या-ज्या वेळी गरज असते, त्या-त्या वेळेला अग्रहक्काने सर कार्यकर्त्यांच्या अडचणीला धावून येतात. चळवळीतल्या दोन कार्यकर्त्यांना मुंबईच्या पोलिसांनी एकदा रात्री केवळ सूडापोटी अटक केली.

मध्यरात्री एन. डीं.नी पोलीस आयुक्तांना त्याबाबत फोन केला; एवढंच नाही, तर स्वत:च्या हस्ताक्षरांत गृहमंत्र्यांना खडसावणारं पत्रंही लिहिलं. नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी समितीच्या दोन कार्यकर्त्यांचं अपहरण करून मारहाण केली. तेव्हा ताबडतोब दुसर्‍या दिवशी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट घेऊन एन. डीं.नी कडक कारवाईची मागणी केली.

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले

या सार्‍यांबरोबरच सरांचा सर्वांत अनुकरणीय गुण म्हणजे त्यांचं ‘बोले तैसा चाले’ हे आचरण. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी अशा खंबीर नेत्याच्या आचरणाचीच गरज असते. राजकारणात प्रदीर्घ काळ वावरणार्‍या व्यक्तीला असं परखड मतप्रदर्शन आणि कणखर आचरण परवडणारं नसतं. सरांचं याबाबतचं वागणं आदर्श आहे.

सत्यनारायणाला त्यांनी आयुष्यात कधी हात जोडले नाहीत. त्यामुळे ‘विज्ञानाचा पदवीधर सत्यनारायण घालत असेल आणि मी कुलगुरू झालो, तर त्याची विज्ञानाची पदवी आपोआप रद्द करण्याचा आग्रह धरेन,’ असं ते नेहमी सांगत असतात. कोल्हापूर शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर होळीला नारळ देण्याचं आणि अंबाबाईचं दर्शन घेण्याचं नाकारलं. असं नेतृत्व विरळंच!

फारच आग्रह झाल्यावर पाहिजे तर माझा राजीनामा घ्या; पण माझ्या सत्यशोधकी गुरूने जे चूक आहे, असं मला शिकवलं, त्यांच्याविरोधी आचरण कधीच करणार नाही. असा तेजस्वी निर्धार असणारे नेते आता कुठे आढळतात? याचाच दुसरा पैलू म्हणजे राजकारणात असूनही सत्तेबद्दलची त्यांची निरिच्छ वृत्ती. काँग्रेसच्या राजवटीत त्यांना प्राथमिक शिक्षणावरच्या समितीचं अध्यक्षपद देऊ केलं होतं. त्याचा दर्जा कॅबिनेट मंत्रिपदाचं होता. मात्र ते त्यांनी नाकारलं.

अगदी अलिकडेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच्या शासकीय समितीचं अध्यक्षपद त्यांना लाभलं. तेही मंत्रिपदाच्या दर्जाचं होतं. हे अध्यक्षपद स्वीकारण्याची त्यांची पूर्वअटच होती, मंत्रिपदाला नकार देण्याची. सत्यशोधकी विचार, उच्चार आणि आचार यांचा असा खळाळता प्रवाह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला लाभावा, ही आमची फार मोठी उपलब्धी आहे, दिलासा आणि उमेद देणारी गोष्ट आहे.

हेही वाचा: 

कोणते आहेत गुड फॅट आणि बॅड फॅट्स?

चला, आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होऊया!

देशाने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा हा उन्मादच

विठुराय भक्तांना म्हणतात आषाढी, कार्तिकीला माझ्याकडे यायला विसरू नका