आपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया

०४ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


मध्यंतरी टीवीवर निर्मलबाबा जोरात होता. तो कोणत्याही अडचणीवर एकदम सोपासा उपाय सांगायचा. पुढे उघड झालं की ते सारं थोतांड होतं. आज खुद्द पंतप्रधान कोरोनासारख्या महासंकटावर निर्मलबाबासारखेच सोपेसोपे तोडगे सांगत आहेत. ते त्यांचं निर्बुद्ध लोकांना वश करण्याचं तंत्र आहे. म्हणून आता आपल्याला निर्णय घ्यायची वेळ आलीय, स्वतःचं डोकं वापरायचं की कुणीतरी हाकलत असणारी मेंढरं बनायचं.

कोरोनाची टाळेबंदी सुरू झाली. जगभरातल्या भीतीदायक बातम्या येऊ लागल्या. आणि अचानक अनेक गावांमधल्या कडुनिंबाच्या झाडांखाली रात्री कणकेचे दिवे दिसू लागले. संचारबंदी, जमावबंदी असतानाही बायका घोळक्याने रात्री कडुनिंबाची झाडं शोधू लागल्या.

वॉट्सअपवर अंधश्रद्धेचे दिवे पेटले

हे राज्यातल्या अनेक भागांमधे घडत होतं. त्याला कारण होती एक वॉट्सअप पोस्ट. राज्यातल्या एका पशुपालक समाजाविषयी त्यात मजकूर होता. त्या वॉटस्अप पोस्टनुसार नाशिक परिसरात या समाजाच्या लोकांनी एका तृतीयपंथीयाचा खून केला. त्याने मरताना शाप दिला की महामारी येऊन तुमचा समाज निर्वंश होऊन संपून जाईल. त्यामुळे कोरोना आलाय.

आता कोरोना पळवायचा असेल तर एकच उपाय आहे. ज्या बाईला फक्त एकच मुलगा आहे, दुसरं कोणतंही अपत्य नाही, अशा बाईने कणकेचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे पाच दिवे कडुनिंबाच्या झाडाखाली लावावेत. त्या वॉट्सअप पोस्टचा संसर्ग कोरोनापेक्षा जोरदार होता. त्यामुळे आधी तो समाज आणि नंतर इतरही समाजातल्या एकपुत्रा बायका दिवे लावू लागल्या.

या आठवड्यात या वॉट्सअप मेसेजचा शहरी अवतार वायरल झाला. पाच, सात किंवा नऊ दिवे लावून कोरोना पळवून लावा. त्यानंतर आणखी एक टिपिकल मेसेज आला. दिवे लावा आणि हा मेसेज इतक्या लोकांना पाठवा, नाहीतर कोरोना वाढेल. बायकांनी मुंबईभर उत्साहाने दिवे लावले. त्याचे फोटो काढून स्टेटसवर ठेवले. पण मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच राहिली.

हेही वाचाः दिल्लीच्या तबलिगी प्रकरणात नेमकं खरं काय आणि खोटं काय?

आपण याला बळी का पडतो?

हा निव्वळ भोंदूपणा आहे. या अफवा आणि अंधश्रद्धा आहेत, हे सगळं सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. दिवे लावण्याने कोरोना जाणार नाही, हे उघड होतं. तरीही गावोगाव दिवे लावले गेले. कारण या अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना आपली मानसिकता बरोबर माहीत होती.

आपण कोरोनाने हादरलेले आहोत. आपल्याला त्यातून आधार हवा आहे. त्यात एका वॉटसअप मेसेजने आपल्याला एक सोपा उपाय सुचवला. तो दिव्यासारख्या एखाद्या धार्मिक प्रतिकाशी, आपल्या जातीशी, वंशक्षयासारख्या पौराणिक कल्पनेशी जोडलेला होता. आपण सहज त्याला बळी पडलो. तात्पर्य एकच, आपण डोकं लावत नाही म्हणून आपण दिवे लावतो.

निर्मलबाबा आठवतोय का?

मध्यंतरी टीवी चॅनलवर एका निर्मलबाबाची चलती होती. त्यालाही आपली मानसिकता बरोबर माहीत होती. तो सोपे सोपे उपाय सांगायचा. उदाहरणार्थ, कुणी कमाईची अडचण सांगितली की सांगायचा, दहा रुपयाच्या नोटेची देव्हाऱ्यात ठेवून पूजा कर. किरपा वहीं अटकी हैं. सब ठीक हो जायेगा, हे त्याचं वाक्य होतं.

कधी कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ व्हायची. त्यामुळे त्याचं प्रस्थ वाढलं. पण नंतर उघड झालं की त्याच्या शोमधे अडचणी सांगणारे लोक भाड्याने आणलेल्या नटनट्या होत्या. त्यामुळे टीवीवाल्यांनी त्याचा शो दाखवणं बंद केलं. त्याचा धंदा बसला.

हेही वाचाः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

उपाय सोपा आहे, दिवे लावा

आज शुक्रवारी सकाळीच असाच एक दाढीवाला बाबा टीवीवर आला होता. त्याने कोरोनासारखं महाभयंकर संकट असताना एकदम सोपा उपाय सांगितलाय. ५ एप्रिलला ९ वाजता ९ मिनिटं दिवे, मेणबत्त्या पेटवा. किरपा वहीं अटकी हैं. सब ठीक हो जायेगा.

परवा मुंबईत खासगी हॉस्पिटलच्या मूर्खपणामुळे एका आईला आणि तिच्या तीन महिन्यांच्या बाळाला कोरोना झालाय. धारावीत एका सफाई कर्मचाऱ्याला कोरोना झाला. कस्तुरबा हॉस्पिटलातल्या डॉक्टरांना कोरोना झालाय. वरळी पोलिस लायनीतल्या हवालदारांना कोरोना झालाय. वांद्रे गवर्नमेंट कॉलनीतल्या सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय. उपाय सोपा आहे, दिवे लावा.

चुली बंद आहेत, पण दिवे लावा

मरणाऱ्यांना देण्यासाठी आपल्याकडे वँटिलेटर नाहीत. डॉक्टरांना देण्यासाठी आपल्याकडे सॅनिटायझर्स नाहीत. पोलिसांना देण्यासाठी आपल्याकडे मास्क नाहीत. पण या लढाईत आपण एकटे नाही, हे आपणच पटवून घेण्यासाठी पंतप्रधानांकडे एक आयडियाची कल्पना आहे. रात्री नऊ वाजता अंधार करून दिवे लावायचेत. मग मोबाईलचे टॉर्च लावले तरी चालतील. पण दिवे लावा आणि डोकी बंद करा.

ज्याच्यामुळे कोरोनाचं काहीही वाकडं होणार नाही, अशा गोष्टी करायला आपल्याला थेट पंतप्रधान सांगत आहेत. मूर्खपणाचा बाजार नाही का हा? त्याऐवजी ते काय करतात, तर आपला देश कोरोनावर विजय मिळवणारच, अशी फक्त शब्दांची हवा भरतात. कोरोनावर मात करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान कोणता, तर उत्साहाचं महत्त्व सांगणारं संस्कृत सुभाषित. पंतप्रधानांचा दिवे लावण्याचा संदेश म्हणूनच भयंकर आहे.

लोक पंतप्रधानांना मानतात. त्यामुळे त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे. इतक्या मोठ्या संकटात त्यांनी लोकांना धीर द्यायला हवा. आपण काय करतोय, लोकांनी काय करायचं, ते सांगायला हवं. पण त्यांच्याकडून मिळतं काय, तर फुटकळ शब्दांचे बुडबुडे. नाहीतर टाळेबंदीचा हादरा. त्यानंतर लाखो घरांमधली चूल पेटत नाहीय. पण त्यापेक्षा लोकांनी दिवे पेटवणं पंतप्रधानांना महत्त्वाचं वाटतंय.

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

महाराष्ट्राचे एक मंत्री कोरोना संशयित बनतात तेव्हा

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

भारतीय मुसलमानांना बदलवण्याचं तबलिगचं पॉलिटिक्स काय?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

कोरोनाः जग सारे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?

आपल्या प्रामाणिक भावनांचं मार्केटिंग

कोरोनात पंतप्रधान पहिल्यांदा टीवीवर आले तेव्हा त्यांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यू पाळायला सांगितला. तो संपताना थाळ्या वाजवायला सांगितलं. कशासाठी तर कोरोनाच्या विरोधात मैदानावर उतरून लढणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी. कृतज्ञता हा माणुसकीला पर्यायी शब्द आहे. भारतीय संस्कृतीतल्या चांगुलपणाचं सार कृतज्ञता या एका शब्दात सांगता येतं. त्यामुळे कृतज्ञता या मूल्याला भारतीय मनात अत्यंत आदराचं स्थान आहे.

हे अगदी परफेक्ट माहीत असलेल्या मोदींनी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम दिला. त्याला शंखाची जोड देऊन धार्मिक पापुद्रा चढवला. देशभरात आपल्यासारख्या कोट्यवधी लोकांनी ते अगदी मनोभावे केलं. आपण आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्यांविषयी डोळ्यांत पाणी आणून मनापासून धन्यवाद दिले. ती संधी दिल्याबद्दल आपण मोदींनाही धन्यवाद दिलेच.

अर्थातच ढोल ताशे वाजवत मिरवणुका काढणाऱ्यांनी त्या प्रामाणिक भावनांचा बॅण्ड वाजवला. संकटाचं गांभीर्य विसरून उत्सवीकरण केल्याने त्याचे दुष्परिणाम दिसणारच होते, अशा आशयाचं ट्विट संजय राऊतांनी केलं होतं. ते निरीक्षण अगदी बरोबर होतं. राजकारणी साध्या माणसाच्या प्रामाणिक भावनांचं स्वार्थासाठी मार्केटिंग करत असतात आणि त्याचा राजकीय फायदा व्याजाने उपटतात. मोदी त्यातले सुपरमास्टर आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

हेही वाचाः प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक

एकदा थाळ्या वाजवल्या, बस्स झालं

मोदींना इवेंटीकरणाचा सोस आहेच. त्यांचं सगळं राजकारणच त्यावर आधारित आहे. गुजरातचे मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममधे नर्मदा यात्रेपासून आजपर्यंत त्यांचे इवेंट सतत सुरूच आहेत. या इवेंटचे काही फायदेही असतात. जनता कर्फ्यूने कोरोनाविषयीची जागृती शेवटच्या माणसांपर्यंत नेली, हे मान्य करायलाच हवं.

पण त्यातून राजकीय उन्माद हा साईडइफेक्ट होणार होताच. ते होईल याची कल्पना मोदींना नसेल का? आपल्याला सांगता येणार नाही. पण अशा उन्मादाने मोदींच्या राजकीय प्रगतीत फार मोठं योगदान दिलंय, हे लक्षात ठेवायला हवं. एकदा थाळ्या वाजवल्या. पुरे झालं. आता पुन्हा दिवे लावायला सांगण्यात काहीतरी गोची आहे.

जनता जनार्दनाला सेवा की आज्ञा?

शुक्रवारच्या भाषणात पंतप्रधानांनी `जनता जनार्दना`च्या सेवेचं महत्त्व सांगितलंय. जनता जनार्दन ही काही प्राचीन टर्म नाहीय. उलट आपल्या परंपरेने सेवेला शूद्रांचं काम ठरवून त्याची प्रतिष्ठा नाकारलीय. संतांनी त्याविरुद्ध बंड केलं. आधुनिक काळात स्वामी विवेकानंदांनी लोकांची सेवा ही देवपूजेपेक्षा मोठी असल्याचं क्रांतिकारक भान दिलं. महात्मा गांधींनी जनता जनार्दन हा वाक्प्रचार लोकांमधे रुजवत त्याला देशसेवेशी जोडलं.

जनता जनार्दनाचा विचार साध्या साध्या लोकांविषयी पूज्यभाव ठेवायला शिकवतो. प्रेम करायला शिकवतो. मात्र तोच विचार सांगत कुणी बिनडोक अंधश्रद्धाळू घडवत असेल, तर त्याच साध्या माणसांनी म्हणजे आपण सावध व्हायला हवं. काहीही हुकूम सोडले तर ते करायची सवय लोकांना लागायला हवी, असं कुणाला वाटत असेल तर आपले अँटेना उभे राहायला हवेत. डोकं सुरू व्हायला हवं.

हेही वाचाः लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी

मेंदू गुलाम व्हायला नको

इतक्या अडचणीच्या काळातही आपण सरकार सांगेल ती सगळी काळजी घेतोय. घरी थांबलोय. हात धुतोय. गर्दी टाळतोय. यासाठी सरकारच्या सूचना काटेकोरपणे पाळायला हव्यातच. या कशाशीही संबंध नसलेल्या पंतप्रधानांच्या आवाहनाला आपण एकदा जोरदार प्रतिसाद दिलाय. त्यातून फारसं काही घडलेलं नाही.

त्यामुळे आता पुन्हा नको. समजा काही घडलं असेल तरीही पुन्हा नको. त्यात मोठा धोका आहे. आपला मेंदू कुणाचाही गुलाम बनायला नको. आपल्यात रोबोसारखा प्रोग्राम फीट व्हायला नको. मग हुकूम सोडणारा माणूस कितीही मोठ्या पदावरचा का असेना.

लहानपणी शुभं करोती म्हणताना आपण म्हणायचो, `घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे.` पण आपण मोठे झालो, शहाणपण आलं, तसं आपल्याला त्यातला फोलपणा कळत जातो. दिवा लावल्याने नाही, तर मेहनत, प्रयत्न, ज्ञान, समंजसपणा यामुळे घरातली पीडा बाहेर जाते आणि लक्ष्मी घरात येते.

हे घराच्या बाबतीत खरं आहे. तितकंच घराबाहेरच्या जगण्यातही लागू आहे. समाजातली पीडा घालवायची असेल, तर आपल्याला आपलं शहाणपण जागवावं लागतं. विचारांच्या बाबतीतही मोठं व्हावं लागतं. हाच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. पण हेच नेमकं राजकारण्यांना नको असतं. त्यामुळेच आपल्या निर्मलबाबाला ठणकावून सांगायला हवं, दिवे लावून काही होणार नाही म्हणून आम्ही दिवे लावणार नाही.

हेही वाचाः 

सोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग!

जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

अविनाश धर्माधिकारींनी अशी विकृत पोस्ट का टाकलीय?

रघुराम राजन सांगतात, कोरोना जगाला एकत्र आणू शकतो

कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

पंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक