मुलांना कोडिंगचं शिक्षण द्यावं का?

१८ ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


बिल गेट्स अमूक वर्षी प्रोग्रॅमिंग शिकले. मार्क झुकेरबर्गने अमक्या वर्षी फेसबुक तयार केलं. हे ऐकायला छान आहे. पण अशी उदाहरणं खूप कमी आहेत आणि आपल्या मुलांना ठरवून त्यांच्यासारखं बनवणं, ही अतिशय अवघड गोष्ट आहे. कोडिंग सोडा, आपण क्रिकेट इतकी वर्ष बघतोय, खेळतोय. आपण आपल्या मुलाला ठरवून सचिन तेंडुलकर बनवू शकतो का?

सगळीकडे दिसणार्‍या जाहिरातींमुळे, सध्या आपण सगळेच आपल्या लहान मुलांनी कोडिंग किंवा प्रोग्रामिंग शिकावं की नाही, या पेचात आहोत. काही जण सांगतात, की शिकलंच पाहिजे. तर काही जण सांगतात, की अजिबात गरज नाही. या सांगणार्‍यांमधे प्रोग्रॅमर म्हणून काम करणार्‍या लोकांपासून, कम्प्युटर चालूदेखील करायला लागत नाही, अशा सर्वांचा समावेश आहे.

मी गेली वीस वर्ष तंत्रज्ञान क्षेत्रात काम करूनही हे नीट ठरवू शकत नाही. म्हणजे काही दिवसापर्यंत ठरवू शकत नव्हतो. पहिल्यांदा जेव्हा लहान मुलांना कोडिंग शिकवा अशी जाहिरात पाहिली, त्यावेळी मला २२ वर्षांपूर्वीचा काळ आठवला. १९९८ मधे मला कोडिंग शिकायचं आहे आणि त्यासाठी 45 हजार रुपये खर्च करा म्हणून मी बाबांच्या मागे लागलो होतो.

४५ हजार ही रक्कम त्यावेळी आणि आजही खूपच मोठी आहे. फरक इतकाच आहे, की त्यावेळी माझ्या बाबांना कोडिंग म्हणजे काय ते कळत नव्हतं. आज माझा मुलगा माझ्यामागे लागला, तर मला थोडंफार तरी समजतं किंवा ते समजणारे चार लोक आजूबाजूला आहेत. ज्यांना विचारू शकतो.

कोडिंग म्हणजे काय?

त्यावेळेस या जाहिराती चकचकीत ऑफिस आणि अमेरिकेला जायची स्वप्नं दाखवायच्या. आता अ‍ॅप्लिकेशन बनवल्यावर इन्व्हेस्टर्स कसे मागे लागतील, याची स्वप्नं दाखवतात. त्यावेळच्या काही जणांची ती स्वप्नं प्रत्यक्षात पूर्णही झाली. आताही होतील. पण ते लोक खूप कमी असतात. इन्व्हेस्टर्स तुमच्या मुलांच्या मागे लागण्याची शक्यता ही तुमच्या मुलांना क्रिकेटचा क्लास लावल्यावर लगेच आयपीएल किंवा रणजी करंडक स्पर्धेत खेळायला मिळण्याइतकीच आहे.

भारतात थेट आयटी क्षेत्रात काम करणार्‍यांची संख्या जवळपास 40 लाख आहे. त्यावर अवलंबून असलेल्या बाकी नोकर्‍या बघितल्या, तर तो आकडा एक कोटीच्या आसपास जातो. म्हणजेच भारताच्या लोकसंख्येच्या एक टक्क्यापेक्षा कमी लोक या क्षेत्रात काम करतात आणि त्याच्याहून निम्मे लोक कोडिंग करतात.

कोडिंग का करतात? कोडिंग हे कुठलेही सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी करतात. सगळी सॉफ्टवेअर्स ही कुठले ना कुठले मानवी प्रश्न सोडवण्यासाठी किंवा काम सोपं, कमी आणि चुका विरहित करण्यासाठी तयार केलेली असतात. कोडिंग कशात करतात? आपण जशा वेगवेगळ्या भाषा बोलतो, तशा कम्प्युटरला समजणार्‍या काही भाषा आहेत. त्या वापरून कोडिंग करतात. थोडक्यात, त्या भाषा शिकणं आणि त्यांचा वापर करायला शिकणं म्हणजेच कोडिंग शिकणं.

हेही वाचा : द सोशल डायलेमा: सोशल मीडियाने  आपल्याला विकायला काढलंय

मोठं झाल्यावर शिकावं कोडिंग

कोडिंग शिकण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रात चांगलं करिअर करायच्या अनेक संधी उपलब्ध होतात. दुसरा फायदा म्हणजे तंत्रज्ञान कसं चालतं याचं पूर्ण ज्ञान मिळतं. त्यामुळे आपण त्याबाबतीत एकप्रकारे साक्षर होतो, असंही म्हणता येईल. नुसतं साक्षरच नाही तर आता यापुढे जी सायबर विश्वातली संधी आणि संकटं आपल्यापुढे येणार आहेत किंवा येत आहेत, त्याबाबतीत जागरूक होण्याची शक्यता निर्माण होते.

हे सगळे फायदे जरी असले तरी हे पण लक्षात घ्यायला हवं, की सध्या आपण वापरत असलेली बरीचशी सॉफ्टवेअर्स ही अशा लोकांनी बनवलेली आहेत, ज्यांनी कोडिंग सोडा, वयाच्या अठरा-विसाव्या वर्षांपर्यंत कम्प्युटर बघितलाही नव्हता. तसंच तंत्रज्ञान समजण्यासाठी कोडिंग सोडूनही अनेक मार्ग आहेत.

कोडिंगचा पुढे जाऊन एक करिअर यादृष्टीने विचार केला, तरी मुलांच्या लहानपणी त्यांच्यासाठी आपणच एवढा मोठा निर्णय घेणं ही अवघड गोष्ट आहे. वर म्हटल्याप्रमाणे बरेचसे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स हे कॉलेजमधे किंवा शिक्षण संपल्यावर कोडिंग शिकले आणि त्यानंतर त्यांनी अनेक चांगली सॉफ्टवेअर्स तयार केली. त्यातल्या बर्‍याच जणांनी तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवीपण घेतलेली नाही. याचा अर्थ असा होतो, की कोडिंग तुम्ही थोडं मोठं झाल्यावर शिकायला काही हरकत नाही.

चांगली कोडर / प्रोग्रॅमर कोण?

१. जिला आपल्याला नक्की कोणता प्रश्न सोडवायचा आहे, हे माहीत आहे.

२. नुसता प्रश्नच नाही, तर त्याचं उत्तरही माहीत आहे.

३. जिला भविष्यात या प्रश्नाचे कोणते उपप्रश्न तयार होऊ शकतात, याचा थोडा तरी अंदाज आहे.

४. आपण प्रोग्रॅम लिहिण्यासाठी कोणती लँग्वेज वापरतोय आणि का वापरतोय, याची पूर्ण माहिती आहे. तसंच कोणती लँग्वेज वापरायची, याचा निर्णय घेण्याची क्षमता आहे.

५. प्रोग्रॅम लिहिताना आपण दुसर्‍यांचं काम सोपं करण्यासाठी लिहितो आहे, हे समजणारी व्यक्ती.

अशा अनेक गुणांची यादी करावी लागेल आणि यातले बरेचसे गुण लहान मुलांमधे असणं, ही अवघड गोष्ट आहे. बिल गेट्स वयाच्या अमूक वर्षी प्रोग्रॅमिंग शिकले, मार्क झुकेरबर्गने वयाच्या अमक्याअमक्या वर्षी फेसबुक तयार केले, हे ऐकायला छान आहे; पण अशी उदाहरणं खूप कमी आहेत आणि आपल्या मुलांना ठरवून त्यांच्यासारखं बनवणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे.

कोडिंग सोडा, आपण क्रिकेट इतकी वर्ष बघतोय, खेळतोय. आपण आपल्या मुलाला ठरवून सचिन तेंडुलकर बनवू शकतो का? जर याचं उत्तर ‘हो’ असेल, तर मग आपण स्वतःलाच ‘बनवतोय’, असं म्हणायला लागेल.

हेही वाचा : फेसबुक झालंय 'बुक्ड'!

इंटरनेटवर फुकट कोर्सेस आहेत

लहानपणी कोडिंग शिकणं हे हौस म्हणून लहान वयात कुठलतरी वाद्य वाजवायला शिकणं, गाणं शिकणं, क्रिकेट किंवा कुठला तरी खेळ शिकणं यासारखं नाही. लहान वयात कोडिंग शिकण्याची बरोबरी फारतर लहान वयात प्लम्बिंग, इलेक्ट्रिक वायरिंग अशा गोष्टी शिकण्याशी होऊ शकते. त्यात मुलं करिअर करतील असं नाही. पण माहिती असणं ही चांगली गोष्ट आहे.

आपल्याला, लहान मुलांनी कोडिंग शिकण्याची किती नितांत गरज आहे, हे विविध जाहिराती सतत सांगत आहेत, म्हणून त्याची दुसरी बाजू मांडायचा या लेखात प्रयत्न केलेला आहे. यानंतर जर तुम्ही मुलांना कोडिंग शिकवायचा निर्णय घेतला, तर इंटरनेटवर कोडिंगचे अनेक कोर्सेस फुकट उपलब्ध आहेत.

मुलांना ते आधी करायला सांगून आणि त्यातील त्यांची आवड आणि गती बघून मग कुठल्या तरी ब्रँडेड कोर्सवर पैसे खर्च करावेत, असं वाटतं. बाकी या कोडिंग शिकवणार्‍या ब्रँडेड कोर्सेसबद्दल बोलायचं झाल्यास, हे अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यांचा युजर इंटरफेस आणि कोर्सचं साहित्य आणि रचना हे भरपूर रिसर्च आणि अभ्यास करून बनवलं आहे आणि अनेक तज्ज्ञ मंडळींचा यास हातभार लागलेला आहे. आपल्याला फक्त त्याची मुलांना लहानपणीच गरज आहे का, हे ठरवायचं आहे.

हेही वाचा : 

भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

फेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय