जब प्यार किया तो डरना क्या?

०६ जून २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी २९ मेला तिसऱ्यांदा लग्न संबंधात अडकले. त्यांची पत्नी त्यांच्यापेक्षा २४ वर्षांनी लहान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. जॉन्सन यांच्यासारखं तिसऱ्यांदा लग्न करणं, म्हातारपणात प्रेमात पडणं किंवा लग्नाशिवायच संबंध ठेवणं भारतात अजिबात शक्य होत नाही. मात्र परदेशात ते सहज स्वीकारलं जातं. असं का?

२०१२ ला त्यांची भेट झाली. कामानिमित्त. तेव्हा तो इतका मोठा माणूस नव्हता. पण तिनं त्याच्यासाठी काम सुरू केलं. तो एकप्रकारे तिचा बॉस होता. तिच्या कामातली हुशारी, तिच्यामुळे त्याला होणारा फायदा यामुळे खूप कमी काळात तिला बढती मिळत गेली. तोही जगप्रसिद्ध व्यक्ती झाला. अखेर २०१८ ला त्यांनी आपल्यात नातं असल्याचं सगळ्या जगासमोर मान्य केलं आणि नुकतंच जगभरात लॉकडाऊन सुरू असताना काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांनी गुपचूप लग्न उरकलं.

हाऊ रोमँटिक ना? अगदी बॉलिवूडच्या सिनेमात दाखवतात तशी ही लव स्टोरी आहे. पण बॉलिवूडसारखा दोघांच्या प्रेमात अडथळा आणणारा ट्विस्ट इथं नाही. थेट हॅपी एण्डिंग! 

जॉन्सन यांचं तिसरं लग्न

यातले हिरो हिरोईन २०१२ ला भेटले. तेव्हा हिरोईन होती तेवीस वर्षांची होती आणि आपला हिरोला अठ्ठेचाळीसावं लागलं होतं. दोघांमधे २४ वर्षांचं अंतर. एवढंच नाही, तर आधी दोन बायकांना डिवोर्स देऊन या २३ वर्षीय कन्येबरोबर झालेलं त्याचं हे तिसरं लग्न होतं. लग्नाआधीच तिनं त्याच्या बाळाला जन्म दिला होता. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांची पत्नी कॅरी सायमंड यांची ही लव स्टोरी आहे. 

२९ मेला दोघांनी इंग्लंडमधल्या वेस्टमिनिट्र कॅथेड्रल या मोठ्या चर्चमधे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लग्न केलं. गेल्या २०० वर्षांनंतर सत्तेवर असताना लग्न करणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरलेत. निवडणुकीच्या राजकारणातच या दोघांची भेट झाली होती. लंडनच्या महापौरपदासाठी बोरिस जॉन्सन निवडणूक लढवत होते. तेव्हा कॅरी सायमंड त्यांच्या प्रचार कॅम्पेनमधे काम करत होत्या. तेव्हा जॉन्सन यांच्या पत्नी होत्या मरिना विलर.

आधीच्या एका पत्नीला घटस्फोट देऊन मरिना आणि बोरिस यांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर ५ महिन्यात त्यांना मूल झालं. २५ वर्ष त्यांनी नेटाने संसार केला. पण २०१८ला बोरिस यांचे संबंध कॅरी यांच्याशी जुळल्यावर दोघांनी वेगळं व्हायचं ठरवलं. २०१९ ला दोघं एन्गेज झाले. तेव्हाच नव्या बाळाची चाहूल लागली असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. २०२० च्या एप्रिलमधे कॅरी यांनी एका मुलाला जन्म दिला. आणि आता लग्न.

हेही वाचा : मुलामुलींना 'लिव इन रिलेशनशीप'मधे राहावंसं का वाटतं?

संस्कृतींचं वेगळेपण

या दोघांच्या तपशील ऐकल्यावर मात्र ती बॉलिवूडची रोमँटिक स्टोरी वाटत नाही. त्यांची ही ‘नॉट सो’ रोमँटिक लव स्टोरी ऐकल्यावर कुणी म्हणेल यातला क्रम पूर्णपणे चुकलेला आहे. शक्यतो माणसं आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहतात. नाहीच जमलं, तर आधी वेगळे होतात. तेही नाही जमलं तर निदान आधी प्रेमात पडतात. मग एन्गेजमेंट म्हणजे आपल्या इथला साखरपुडा करतात. मग लग्न, नंतर संसार आणि मूल असा तो क्रम असायला पाहिजे. पण तो कुठे? फक्त भारतासारख्या काही देशांमधे.

युरोप, अमेरिकासारख्या अनेक पाश्चिमात्य देशात हा क्रम अतिशय लवचिक असतो. तो कसाही उलटापुलटा करता येतो. गरज वाटली तर यातली एखादी पायरी गाळलीही जाते किंवा पुन्हा पुन्हाही चढली जाते. तिथली संस्कृती इथल्यापेक्षा फारच वेगळी आहे.

लग्न झालेलं नसतानाही मुलाला जन्म देणाऱ्या कुमारी मातांकडे आपण डोळे वटारून पाहत असलो तरी युरोप, अमेरिकेत अशा खुपशा मुली ताठ मानेनं फिरत असतात.  तिथं लोक गरज वाटली तरच लग्न करतात. नाहीतर लग्न न करताच एकमेकांसोबत लीव इनचा संसार मांडतात. एकदा लग्न झालेलं असूनही डिवोर्स घेऊन दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा नव्यानं प्रेमात पडतात. आपल्या जोडीदाराच्या आधीच्या मुलांना स्वतःचं नाव देण्यालाही तिथं फार मोठा गोंधळ होत नाही. आणि त्यात तिथल्या समाजाला काहीही गैर वाटत नाही.

काचेच्या घरांवरची दगडफेक

आपल्याकडे मात्र हे सहजासहजी पचवलं जात नाही. प्रेम, लग्न, संसार, मुलं हा क्रम भारतात अपवादानेच चुकतो. त्या अपवादाचीही चर्चा चहूबाजुंनी होत असते. त्यातही ती व्यक्ती राजकारणी असेल तर त्याचं तिसरं लग्न, त्याची लग्नबाह्य संबंधांतली मुलं, लग्नाआधीचे संबंध अशा कोणत्याही गोष्टीमुळे वोट बँकेत जनता मतांचं डेबिट मारू शकते.

याचं ताजं उदाहरण म्हणजे संजय राठोड प्रकरण. एका तरुणीनं केलेल्या आत्महत्येशी  संबंध आल्याने महाविकासआघाडीतले वन मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. त्याआधीचं धनंजय मुंडे प्रकरण तर देशभर गाजलंय. इतकंच काय, नेहरुंचं तारुण्य उलटून दशकं उलटली तरी त्यांच्या अफेअर्सचं खरंखोटं सत्य आजही सोशल मीडियावर सांगितलं जातं.

ज्यांची स्वतःची घरं काचेची आहेत तेही दुसऱ्यांवर दगडफेक करतायत. एकीकडे ही दगडफेक चालू असतानाच देशातला सर्वोच्च नेता, आपले पंतप्रधान किती चारित्र्यवान आहेत ही प्रतिमा रुजवण्याचंही काम चालूय. देशासाठी आहे त्या बायकोला सोडणारा, ‘महान’ त्याग करणारा आपला नेता आहे. पण बोरिस जॉन्सन हेही उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे नेते असतानाही त्यांनी असला त्याग केलेला नाही.

हेही वाचा : आईचं बदललेलं रुप: चार भिंतीतली आई ते स्मार्ट मॉम

संस्कृती धार्मिक आहे म्हणून?

अर्थात, असं करणारे बोरिस जॉन्सन हे काही एकमेव नेते नाहीत. मागच्या फेब्रुवारीत भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे माजी पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांनीही तीन लग्न केलीयत. त्यांच्या आत्ताच्या पत्नी, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिलेनिया ट्रम्प याही डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा २४ वर्षांनी लहान आहेत. आधीच्या दोन बायकांकडून झालेली मूल, मिलेनिया आणि ट्रम्प असा सगळा गोतावळा वरवर पाहता तरी अगदी सुखात राहतो. 

फक्त नेतेच नाहीत तर अमेरिका, युरोप अगदी आफ्रिकेतल्या काही देशातही लग्न, लैंगिक संबंध, लग्नाआधीची मुलं यांचा फार बाऊ केला जात नाही. तिथे तरुण मुलंमुली एकमेकांना पब, बस, हॉटेल अशी कुठेही भेटतात, आवडलं तर बोलतात, बोलूनही मस्त वाटलं तर रिलेशनशिप निर्माण होतं, त्यातून प्रेमाकडे जातात आणि मग वाटलंच तर लग्न करतात. यात ‘जर-तर’चा अंश खूपच असतो. यात त्यांचा भूतकाळ, त्यातले जोडीदार, त्यांच्यापासून झालेली मुलं हे काहीच मधे येत नाही. 

भारतात ही गोष्ट निव्वळ अशक्य वाटते. याचं कारण बहुतेक लोक भारतीय संस्कृतीचं धार्मिकपण असा देतात. हिंदू धर्माप्रमाणे एकापेक्षा जास्त बायका करणं, आई वडीलांच्या इच्छे विरोधात लग्न करणं, लग्नाआधी शरीर संबंध ठेवणं हे सगळं वर्ज्य मानलं गेलंय म्हणून इथं नात्यात हवी तशी लवचिकता आणणं अवघड होतं असं अनेकांचं म्हणणं असतं. पण खरं पहायला गेलं तर लैंगिक संबंधांविषयी, लग्नाविषयीचे असे गैरसमज हे जगातल्या सगळ्याच धर्मांमधे आहेत. अगदी ख्रिश्चन धर्मात सुद्धा! मग दोन्ही संस्कृतींमधे एवढा फरक राहण्याचं कारण काय?

खासगीपणाची मोकळीक

या प्रश्नाचं उत्तर शोधताना सगळ्यात पहिले दोन्हीकडच्या कुटुंब व्यवस्थेकडे पहायला हवं. परदेशात मूल १८ वर्षांची झाली की पालकांपासून लगेच वेगळी होतात. मुलांना पोसण्याची जबाबदारी पालक फार काळ आपल्या अंगावर घेत नाहीत. ती घरात रहात असतात तेव्हाही त्यांना पालकांनी दार न वाजवता खोलीत आलेलं, खासगीपणात लुडबूड केलेली अजिबात आवडत नाही.

अशात एकदा मुल घराबाहेर पडलं किंवा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालं तर त्याच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करायला पालक अजिबातच जात नाहीत. सज्ञान मुल कुणासोबत फिरतंय, कुणासोबत राहतंय, कोणत्या मुलीसोबत किंवा मुलासोबत कोणत्या प्रकारचे संबंध ठेवतंय, जोडीदार म्हणून कुणाला निवडतंय या कशातच परदेशात पालक ढवळाढवळ करत नाहीत. मुलांनाही ती केलेली चालत नाही.

याउलट, भारतात पालक आपल्या मुलांवर बारीक लक्ष ठेवून असतात. कुणालाही डेट करणं, कुणासोबतही कुठेही जाणं हे तर शक्यच नसतं. मुलीचा किंवा मुलाचा जोडीदार निवडण्याची जबाबदारी इथं शक्यतो पालकांचीच असते. पोरांनी स्वतःचा जोडीदार ठरवला असला तरी त्याच्याशी लग्न करण्यासाठी पालकांची संमती लागते.

हेही वाचा : ट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची? 

दोन कुटुंबांचं मिलन वगैरे

इतकंच नाही तर भारतात मुलाच्या आयुष्यात, त्याच्या निर्णयात फक्त आई वडीलच नाहीत तर आत्या, मामा, काका, काकू या सगळ्याच नातेवाईकांचा सहभाग असतो. अगदी प्रेमात पडून मग लग्नाचा निर्णय घेतला असला तरी रितसर चहा पोह्याचा कार्यक्रम करून, जवळच्या अनेक नातेवाईकांना बोलावून देण्याघेण्याचे निर्णय घेतले जातात.

त्यामुळेच भारतात लग्न दोघांनी केलं असलं तरी त्यात दोन्हीकडची कुटुंब एकमेकांशी जोडली जातात, असं म्हटलं जातं. लग्न म्हणजे दोन कुटुंबाचं मिलन वगैरे. असं लग्न पुढे जाऊन सहज तोडता येत नाही. दुसरं आवडलं म्हणून पहिल्याला किंवा पहिलीला सोडून तिच्यासोबतही राहता येत नाही. दोन्हीकडच्या कुटुंबांच्या सन्मानाचा प्रश्न इथं गुंतलेला असतो. तो सोडवण्यापेक्षा आयुष्यभर एकाच नात्यात राहणं जास्त सोपं वाटतं. अनेकदा तर मुलगी सासरच्या माणसांशी इतकी समरसून गेलेली असते की आपल्या मुलाने दुसरी बाई घरात आणली तरी सासरची माणसं आधीच्या बायकोसोबत उभे राहतात.

परदेशात अशी नात्यांची गुंतागुंत राहत नाही. एकतर मुलंमुली लग्नाआधीच एकत्र रहायला सुरवात करतात. लग्न केलंच तरी मुलगी मुलाच्या घरी रहायला जात नाही. दोघं वेगळे राहतात. एकमेकांचे आई वडील सोडले तर शक्यतो इतर नातेवाईकांशी दोघांचा संबंधच येत नाही. त्यामुळेच एकमेकांपासून वेगळं व्हायची वेळ येते तेव्हा सहज नाती तोडून पुढे जाता येतं.

बाईच्या आत्मसन्मानाचा प्रश्न

तसं नातं तुटलं तरी परदेशात तो बाईच्या आत्मसन्मानाचा प्रश्न नसतो. पुरुषानं तिला सोडलं तर तीही नवा जोडीदार शोधू शकते. ती एकटी राहत असली तरी तिच्या मर्जीशिवाय कुणी लैंगिक संबंधांची सतत मागणी करत नाही. भारताप्रमाणे तिच्या आयुष्यात नवरा आहे की नाही यावरही तिचं सामाजिक स्थान टिकत नाही.

भारतात मात्र नवऱ्यापासून वेगळं झालेल्या बाईला इतर पुरुष फार त्रास देतात. अनेकदा नवऱ्याचे मित्र किंवा नात्यातलेच लोक सतत संबंधांची मागणी करत राहतात. दुसरं लग्न करणारी बाई बाहेरख्यालीच असणार असंच मानलं जातं. त्यामुळेच स्त्रिया वेगळं होण्याचा फारसा विचार करत नाहीत. शिवाय, कमावत असल्या तरी आर्थिकदृष्ट्या बायका नवऱ्यावर अवलंबून असतात.

आधीच्या नवऱ्याला दुसरी बाई मिळाली तरी आपण दुसरा जोडीदार शोधायची किंवा लग्नाशिवाय कुणासोबत रहायची बायकांची हिंमत होत नाही. जोडीदार म्हणून समाजात राहणारा हा माणूस उद्या आपल्याला मारायला लागला, त्रास द्यायला लागला तर  नातेवाईक सोबत लागतात.

हेही वाचा : चला, आज तरी मासिक पाळीवर चर्चा करूया

मुलांचं काय करायचं?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे लग्न हे जोडीदाराची सोबत मिळवण्यापेक्षा जास्त मूल आणि वंशावळ वाढवण्यासाठी केलं जातं. मूल जन्माला घालणं हा लग्न आणि संसारातला फार महत्त्वाचा भाग असतो. मुलांना पोसण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आई वडील आयुष्य वेचतात. त्यामुळेच आपण वेगळे झालो तर आपल्या मुलांचं काय होईल या विचारानं नातेसंबंधातली लवचिकता सोडून दिली जाते.

सावत्र आई, सावत्र वडील या संकल्पना तर आपल्याकडे फारच नकारात्मक रंगवलेल्या आहेत. त्यामुळेच आपल्या वडलांची बायको किंवा आपल्या आईचा बॉयफ्रेंड असं काही मुलांच्या कल्पनेतही येत नाही. दुसऱ्याच्या मुलांना आपलं नाव देणं इथं सहजासहजी होत नाही. मुलांसकट बाईला स्वीकाराणं अवघड जातं. त्यामुळेच लग्न न करता मूल जन्माला घालणं, लग्नानंतरही प्रेमाच्या नव्या शक्यता धुंडाळून पाहणं, लग्न न करता राहणं हे भारतातल्या लोकांना शक्य होत नाही. 

टिंडर कल्चरचा बदल

पण जमाना बदलतोय हेही खरंच. भारतातलं सध्याचं टिंडर कल्चर फार वेगळं आहे. ते उच्चमध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोकांपुरतं मर्यादित असलं तरी ही परिवर्तनाची सुरवात आहे, असंही म्हणता येईल. लिव इनमधे राहून आत्ताचे तरुण तरुणी एकमेकांना पारखून घेतायत. सोयीचं वाटलं तरच लग्न करतायत.

चांगल्या घरात लग्न झालं म्हणजे आयुष्याचं सार्थक झालं असाही विचार या मुली करत नाहीत. लग्नाआधी लैंगिंक संबंध ठेवणं, मुलं जन्माला घालणं त्यांना पाप वाटत नाही. लग्नात पटत नसलं तरी कुढत बसण्यापेक्षा वेगळं झालेलं चांगलं असा प्रॅक्टिकल विचार ते करतात. वय झालं, मूल बाळं झाली तरी प्रेम शोधण्याचा प्रत्येकालाच हक्क आहे असंच ते मानतात. अर्थात यात ते जबाबदारी विसरत नाहीत. डिवोर्स घेऊनही मुलांना छानपैकी सांभाळणारे काही पालक भारतातही आहेत. 

प्रेम ही लपून छपून नाही तर मोकळेपणाने करायची गोष्ट आहे यावर या टिंडर कल्चरचा विश्वास आहे. प्रेम झालं तरी घाबरायचं काय कारण हा विचार रुजतोय. मुघले आझम मधलं जब प्यार किया तो डरना क्या हे गाणं नव्या संदर्भासह पुन्हा गुणगुणलं जातंय.

हेही वाचा : 

#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?

मराठी टीवी सिरियलमधल्या मुली असं का वागतात?

बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?

महिला दिन विशेष : आईंना हमे देखके हैरान सा क्यूँ हैं?

नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?