देवनुरु महादेव: असहिष्णूतेचा लॉकअप तोडणारा लेखक

०२ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


सुप्रसिद्ध कन्नड साहित्यिक देवनुरु महादेव यांच्या ‘आरएसएस: आळा मत्तू अगला’ या नव्या कन्नड पुस्तकाचा ‘रा. स्व. सं: खोली आणि व्याप्ती’ हा मराठी अनुवाद प्रा. दत्ता दंडगे आणि मुग्धा कर्णिक यांनी केलाय. या पुस्तकासाठी श्रीरंजन आवटे यांनी लिहलेल्या प्रस्तावनेत देवनुरु महादेव आणि त्यांनी मांडलेल्या विषयाची ओळख करून दिलीय. त्या प्रस्तावनेचा हा संपादित भाग.

‘त्या काळात काय घडतं होतं हे मला सांगू नका, मला त्या काळातले कवी काय करत होते ते सांगा. ते अन्याय अत्याचाराला कसा प्रतिसाद देत होते, ते सांगा.’
- बर्टॉल्ट ब्रेख्त, जर्मन नाटककार

कवींची भूमिका अधिक महत्वाची आहे, असं बर्टॉल्टला वाटतं कारण कविता ही समाजाची नार्को टेस्ट असते. समाज किती अस्सल आहे, याचीच प्रचिती त्यातून येते. केवळ कवितेबद्दलच हे खरंय, असं नाही. तर एकूणात साहित्य, लेखक, कवी किती समर्थपणे समकाळाला भिडतात, हे महत्वाचं. बहुमताहून, लोकमताहून वेगळं काही सत्य असू शकतं आणि ते वेगवेगळ्या रुपातून लोकांसमोर आणण्याचं, समाजाला दिशा देण्याचं सामर्थ्य कवी-लेखकांमधे असतं.

देशात जेव्हा खुलेआम झुंडींचं हत्यासत्र सुरु होतं, अल्पसंख्यांकांना, दलितांना ठेचून मारलं जात होतं, माध्यमं, न्यायसंस्था सरकारनं ताब्यात घेतल्या होत्या, त्या काळात कवी-लेखक काय करत होते, असा प्रश्न जर येणाऱ्या पिढ्यांनी विचारला तर ज्यांनी निर्भीडपणे त्या काळाला तोंड दिलं अशा काही मोजक्या साहित्यिकांमधे देवनुरु महादेव यांचा समावेश होईल.

हेही वाचा: नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास

लॉकपमधे घडला लेखक

कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातल्या नंजनगुंड तालुक्यातल्या देवनूर या गावी देवनुरु महादेव यांचा जन्म १९४८ला झाला. लहानपणापासूनच त्यांना लेखन वाचनाची आवड होती. त्यामुळं नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाहून ते वेगळं काही करत असायचे. याचा परिणाम म्हणून बारावीत ते नापास झाले. त्यांचे वडील पोलिस कॉन्स्टेबल. वडलांनी त्यांना लॉकअपमधे ठेवलं. या लॉकअपमधेच १९६७ला ‘कत्तल तुरुवू’ ही त्यांची पहिलीवहिली कथा लिहून झाली.

त्यानंतर गेली पन्नास-पंचावन्न वर्षं देवनुरु सातत्याने लिहितच आहेत. ही परीक्षा नापास होण्याच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जाळ्यात ते अडकले होते. ‘सब हिंदू एक है’ म्हणणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची घोषणा कशी फोल आहे, हे त्यांना हळूहळू कळत गेलं. त्याचवेळी लोहियांच्या चष्म्यातून गांधी भेटले आणि आपलं जगणं कसं बदललं याविषयी देवनुरु यांनी अनेकदा सांगितलंय.

पुरस्कार वापसीतला सहभाग

‘द्यावनुरु’, ‘वडलाळा’, ‘कुसुमबाला’ या प्रमुख तीन कथनात्म संहिता देवनुरु यांच्या नावावर आहेत. ‘येदगे बिद्द अक्षरा’ हा त्यांचा लेखसंग्रहही प्रसिद्ध आहे. चिंतनशील लेखक असूनही बेस्टसेलर असणारे देवनुरु हे विरळा लेखक आहेत आणि बेस्टसेलर असूनही साहित्य वर्तुळाने त्यांची सन्मान्य दखल घेतलीय.

भारतीय भाषा परिषद प्रशस्ती, साहित्य अकादमी, कर्नाटक साहित्य अकादमी असे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेत. २०११मधे त्यांना पद्मश्रीने गौरवण्यात आलं. पण त्यांना मिळालेल्या पुरस्कारांहून त्यांनी नाकारलेल्या सन्मानांची यादी मोठी होईल.

विद्यापीठाने देऊ केलेली मानद डॉक्टरेट त्यांनी नाकारली. कर्नाटक राज्य सरकारचा राज्योत्सव पुरस्कार त्यांनी नाकारला. पाच लाख रुपयांचा ‘नृपतुंगा’ हा कर्नाटक सरकारचा पुरस्कार नाकारताना त्यांनी सवाल उपस्थित केलाः कन्नड मरत असताना, तिला वाचवण्याचे कोणतेच प्रयत्न होत नसताना मी हा पुरस्कार कसा स्वीकारु?

लेखकांचा प्रतिनिधी म्हणून सरकारनं देऊ केलेली राज्यसभेची खासदारकी त्यांनी नाकारली. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर आणि दादरीतल्या अखलाकच्या हत्येनंतर वाढणाऱ्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पद्मश्री आणि साहित्य अकादमी हे पुरस्कार परत केले.

हेही वाचा: 'लाल श्याम शाह' हे पुस्तक मी का लिहिलं?

नव्या पुस्तकामागची भूमिका

दलित चळवळ असो की शेतकरी आंदोलन, देवनुरु महादेव प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन लोकांमधे मिसळून काम करणारे साहित्यिक विचारवंत आहेत. आंतोनियो ग्राम्शी याने ‘सेंद्रिय विचारवंत’ ही संकल्पना मांडली. देवनुरु महादेव हे असे सेंद्रिय विचारवंत आहेत. आता ‘आल मट्टू अगला’ हे पुस्तक हा तोच सक्रिय, सकारात्मक हस्तक्षेप आहे.

या छोटेखानी पुस्तकाच्या सुरवातीलाच एका लोककथेचा संदर्भ देवनुरु महादेव यांनी दिलाय. चेटक्याचा प्राण जसा दूर गुहेत आहे, तसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्राण नक्की कुठंय, हे शोधण्याचा धाडसी प्रयत्न त्यांनी केलाय. सध्याच्या प्रस्थापित हिंदुत्ववादी सरकारचा पाया १९२५ला स्थापन झालेल्या संघाने घातलाय. त्यामुळं आजच्या काळाला अनुसरुन संघ समजावून सांगणं देवनुरु महादेव यांना महत्वाचं वाटतं.

देवनुरु यांचा लोकांना साध्या सोप्या भाषेत संघ समजावून सांगून सावध करण्याचा हा प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहे. मूळ कन्नडमधे हे पुस्तक देवनुरु यांनी लिहिलं. त्यासाठी एक छदामही मानधन घेतले नाही. कॉपीराइट सांगितला नाही. त्यामुळे कन्नडमधे अनेक प्रकाशकांनी हे पुस्तक छापून त्याची विक्री सुरु केली. अवघ्या दोन आठवड्यात या पुस्तकाने एक लाख प्रतींचा टप्पा ओलांडला.

हे पुस्तक लगेच पाच भाषांमधे अनुवादित झालं. या संदर्भाने मी फेसबुकवर पोस्ट करताच अनेकांनी हे पुस्तक मराठीत यावं, अशी इच्छा व्यक्त केली आणि अवघ्या एका आठवड्यात प्रा. दत्ता दंडगे आणि मुग्धा कर्णिक यांनी केला. सध्या मराठीतले पाच प्रकाशक हे पुस्तक प्रकाशित आणि वितरित करतायत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मराठीसाठी हे शुभवर्तमान आहे. 

जुन्या पुस्तकांची माहिती

देवनुरु यांचं हे पुस्तक मराठीत येत असताना याआधीही संघावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचा नामोल्लेख जरुरीचा आहे. ख्रिस्तोफर जेफरलॉ यांच्यासारख्या विद्वान अभ्यासकाने १९१०पासून ते आजवरचा हिंदू राष्ट्रवाद कसा आकाराला आलाय, याचं सविस्तर विवेचन विविध पुस्तकांमधून आणि नियतकालिकातल्या लेखांमधून केलंय. शम्सूल इस्लाम यांनी संघाचा फॅसिझम काय स्वरूपाचा आहे, हे स्पष्ट केलंय.

राम पुनियानी यांनी संघाच्या जमातवादाच्या आयामाविषयी सातत्यानं लेखन, प्रबोधन केलंय. अशी अनेक सन्माननीय उदाहरणं सांगता येतील. रावसाहेब कसबे यांचं संघाच्या विचारधारेवर प्रकाशझोत टाकणारं ‘झोत’ १९७८ला प्रसिद्ध झालं तेव्हा जनता पक्षाच्या अधिवेशनात संघाच्या कार्यकर्त्यांनी या पुस्तकाची होळी केली. संघाचा पर्दाफाश करणाऱ्या अगदी सुरवातीच्या काही मोजक्या मांडणींमधे कसबे यांचं हे काम लक्षवेधी होतं.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं ‘संघाची ढोंगबाजी’ हे पुस्तकही सुप्रसिद्धय आहे. अगदी अलीकडेच पत्रकार जयदेव डोळे यांच ‘आरेसेस’ हे प्रकाशित झालेलं पुस्तक महत्वाचं आहे. ही यादीही वाढवता येऊ शकेल. या साऱ्या पार्श्वभूमीवर देवनुरु महादेव यांचं हे पुस्तक येणं हे या आधीच्या प्रबोधन परंपरेला पुढं नेणारं महत्वाचं पाऊल मानावं लागेल.

हेही वाचा: एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा

संघाचा संविधान विरोध

२०१७ला भाजपचे नेते अनंतकुमार हेगडे यांनी संविधानविरोधी वक्तव्य केल्यानंतर देवनुरु यांनी प्रतिवाद करणारा लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी हेगडे यांना उद्देशून लिहिलं होतं, ‘आता आम्हाला तुमच्या वंशावळीविषयी जागरुक करायला हवं. द्वेष हा तुमचा बाप आहे आणि असहिष्णुता ही तुमची आई आहे. भ्रम हे तुमचे पूर्वज आहेत आणि मिथ्या ही तुमच्या ज्ञानाची संपत्ती आहे!’

देवनुरु महादेव यांचं हे पुस्तक म्हणजे या विधानाच्या खात्रीसाठी पुरावे देत केलेली मांडणी आहे. द्वेषाला नकार आणि प्रेमाला होकार देण्यासाठीची ही आर्त हाक आहे. संविधानाला ‘गोधडी’ म्हणणारा संघ स्वीकारायचा की स्वातंत्र्य, समता, बंधुता सांगणारं बाबासाहेबांचं संविधान स्वीकारायचं, अशा एका टोकावर आपण येऊन पोचलोय. यातून योग्य ती निवड करता येण्यासाठी हा पुस्तक प्रपंच आहे.

सरदार पटेलांनी १९४९मधे संघावर बंदी आणली होती. मात्र बंदीपेक्षाही लोकांनी संघाचं खरं संविधानविरोधी रूप ओळखून संघाला नाकारणं आज सर्वाधिक जरुरीचं आहे. हे पुस्तक त्यासाठी सहाय्यभूत ठरेल, अशी मला आशा वाटते.

देवनुरु महादेव यांचं हे पुस्तक म्हणजे धोक्याची पूर्वसूचना आहे. आपत्तीत अडकलेल्या व्यक्तीने टाहो फोडून केलेलं मदतीसाठीचं आवाहन आहे. झोपलेल्यांना जागं करण्याचा हा प्रयत्न आहे. जागं असलेल्यांना नेमकं भान देण्यासाठीची ही मांडणी आहे.

प्रेम पोचवण्याची जिगर

‘उनका जो काम है वो अहले सियासत जाने 
मेरा पैगाम है मोहोब्बत जहां तक पहुंचे’

जिगर मुरादाबादी यांची ही जिगर देवनुरु महादेव यांचीही आहे. वाचकांपर्यंत ती योग्यरित्या पोचेल आणि मराठी साहित्यिक, सांस्कृतिक विश्व त्याचं मनापासून स्वागत करेल, असा मला विश्वास वाटतो. देवनुरु यांच्या शब्दांनी वडलांच्या लॉकअपला भेदत मांडणी केली. आज अवघा देश बंदिशाळा झालेला असताना त्यांचे हे शब्दही साऱ्या बेड्या तोडत जातील, अशी आशा वाटते.

सनय प्रकाशन हे पुस्तक मराठीमधे प्रकाशित करतंय, याचा मला मनापासून आनंद वाटतो. या प्रकाशनाच्या शिवाजी शिंदे यांनी प्रस्तावनापर लिहावं, अशी आग्रहपूर्वक विनंती केली. वास्तविक देवनुरु महादेव यांच्यासारख्या श्रेष्ठ लेखकाच्या पुस्तकाला प्रस्तावनापर लिहिण्यासाठी मी कोणत्याही अर्थाने पात्र नाही, याची मला नम्र जाणीव आहे.

पण मराठी वाचकांसमोर देवनुरु आणि हा विषय या दोन्हीचा परिचय व्हावा, या हेतूने शिंदे यांनी आग्रह केल्याने मी लिहिलंय. या आधी ‘मायमावशी’ नियतकालिकाच्या २०१७च्या दिवाळी अंकात गजानन अपिने यांनी ‘देवनुरु महादेवः मिथकांचा लेखक आणि लेखकीय मिथक’ या शीर्षकाचा लेख लिहिलाय. या लेखाचा अपवाद वगळता देवनुरु यांच्याबद्दल मराठीत बिलकुलच लिहिलं गेलं नसल्यानं सदर प्रस्तावनापर लेखन मी केलंय.

हेही वाचा: 

तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह

बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं