आज १८ जुलै. सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन. आज काका आपल्यात नाहीत तरी त्यांचे सिनेमे, गाणी यांच्यातून ते आपल्यात आहेत. आजही टीवीवर किंवा एफएमवर त्यांचं गाणं लागलं की आपण काही क्षण त्यात रमून जातो. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या फॅन्सचे किस्से ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो.
अभिनेते राजेश खन्नाला भारताचा पहिला सुपरस्टार मानलं जातं. त्याने सलग १५ हिंदी सिनेमे हिट दिले. हा विक्रम अबाधित आहे. १९६९ तो १९७३ पर्यंत त्याने आपलं गारुड कायम ठेवलं. जो तो त्याच्या प्रेमात होता. अगदी लहानापासून ते वृद्धापर्यंत. त्याचा सिनेमांत चांगलं कथानक असायचं. त्यात मारधाड अभावाने असायची. सहकुटुंब सहपरिवार बघता येतील असे सिनेमे असायचे. त्याचा गोड चेहरा, त्याचा सहज अभिनय लोकांना भावत असे.
हेही वाचा : आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा
‘हाथी मेरे साथी’ या सिनेमामुळे तो घराघरात पोहचला. मधले त्याचे दो रास्ते, अमर प्रेम, कटी पतंग, सच्चा झूठा, आपकी कसम हे सर्वच सिनेमे. त्यातलं संगीत आणि काळजाला हात घालणारी कथा यामुळे ते गाजले. तशात बहुधा बऱ्याच चित्रपटाचा शेवट हा त्याच्या मृत्यूबरोबर असायचा. ह्यामुळे भाबडा, भावूक प्रेक्षक अधिकच त्याच्या प्रेमात पडायचा. साहजिकच त्याला सुपरस्टार व्हायला वेळ लागला नाही आणि ह्यानेच त्याचा घात झाला.
तो प्रति परमेश्वरासारखा होऊन राहिला. त्याचे चाहते त्याला गळ्यातला ताईत बनवून होते. उपर आका, नीचे काका असं बोललं जाई ते उगाच नाही. हे त्याला लहानपणापासून लाडाने पंजाबी थाटातलं काका नाव पडलं होतं. त्याच्या नावाची तर गंमतच होती. त्याचं खरं नाव जतीन. पण चित्रपटासाठी त्याला राजेश हे नाव घ्यावं लागलं. आणि त्याला लाडाने काका संबोधलं जाई. तो एवढा भराभर लोकप्रिय झाला.
आपण जे काही करतो ते अलौकिक असतं असं त्याला वाटू लागलं. आपली प्रत्येक कृती योग्य असते, तिचं अनुकरण केलं जातं याचा त्याला अभिमान वाटायचा. त्याने जी हेअरस्टाईल केली तशी तरुण करायचे. त्याने गॉगल नाकावर आणला की तेही तसंच करायचे. त्याने झब्बा सलवार घातलं की त्याचंही अनुकरण व्हायचं. गुरुशर्ट आणि पोटावर पट्टा ही सुद्धा फॅशन त्याने आणली. कपाळाला रंगीबिरंगी रुमाल आणि पिळदार मिशा अशी टपोरी फॅशनही त्याने सर्वांमधे लोकप्रिय केली. लांब केसांचे कल्ले त्यांनेच आणले.
तो ज्या तऱ्हेनं टाटा करताना हात हलवायचा तसंच सर्वजण करायचे. तो डोळे मिचकावायचा, केसांवरून हात फिरवायचा ते सर्वकाही लोकांना आवडत होतं. त्याच्यावर तरुणी तर एवढ्या फिदा होत्या की त्याने पडद्यावर ‘अच्छा तो हम चलते है’ म्हटलं की हात हलवून अच्छा करायच्या. त्याच्या घरासमोर तासन तास त्याचं दर्शन होईल या आशेनं उभ्या रहायच्या.
हेही वाचा : लुका छुपीचा डायरेक्टर लक्ष्मण उतेकरः पोलादपूरच्या शेतातून बॉलीवूडपर्यंत
एकदा त्याचे कपडे इस्त्री करण्यासाठी एक लॉंंड्रीवाला त्याच्या घरी गेला. कपड्याचं गाठोडं घेऊन त्याच्या घरातून बाहेर पडला तोच काही तरुणींनी त्याच्याभोवती गराडा घातला. आणि ते गाठोडे हिसकावून घेत हाताला येईल ते त्याचे कपडे घेऊन पळाल्या होत्या. काश्मिरमधे एका शुटिंगच्या ठिकाणी त्याची पांढरी शुभ्र गाडी पार्क केली होती. ती त्याची आहे समजताच तिथल्या तरुणींनी आपल्या ओठांचे ठसे त्या गाडीवर उमटवले. आणि कुणाला खोटं वाटेल पण त्या पांढऱ्या गाडीचा रंग बराचसा गुलाबी झाला होता.
तो चेन्नई म्हणजे तेव्हाच्या मद्रासमधे एका लॉट्री सोडतीसाठी आला होता. तेव्हा त्याला बघायला एवढी गर्दी झाली की काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. महिला आणि शाळेतल्या पोरी तर रस्त्यातच बसून राहिल्या होत्या. त्याला त्याच्या एका चाहतीने लग्नाचे आर्जव करणारं पत्र चक्क आपल्या रक्ताने लिहिलं होतं. ही एवढी प्रचंड ‘हिस्टेरिया’ म्हणावी अशी लोकप्रियता कुठल्याही हिंदी हिरोला लाभली नव्हती आणि पुढेही लाभली नाही.
अलीकडेच मराठीतले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर ह्यांच्यावरचा सिनेमा गाजला. त्यात त्यांनी डॉक्टरांची अशीच नाटकाद्वारे मिळालेली लोकप्रियता दर्शवली. त्यांचं काशा हे लाडकं नाव. काका आणि काशा एकाच जमान्यातले. दोघंही मनस्वी कलाकार. पण स्वतःच्या यशात एवढे बुडून गेले की त्या कैफात आपल्या अभिनयात तोच तोचपणा येतोय हे त्यांना जाणवलं नाही. आपल्या स्पर्धेत आणखी कुणी कलाकार आलेत याची दखल त्यांना घ्यावीशी वाटली नाही. आता नवंनवे प्रयोग होताहेत. आपणही थोडं बदललं पाहिजे असं त्यांनी समजून घेतलं नाही. प्रेक्षक आपला पाठीराखा आहे, आपण जे करतो ते त्यांच्यासाठी याच धुंदीत हे दोघेही राहिले आणि पटकन त्यांची घसरगुंडी झाली.
ही घसरगुंडी इतकी भयानक होती की, याचा त्यांच्या खाजगी आयुष्यावर विपरीत परिणाम झाला. आपण संपलो, आपल्याला जो तो नाकारतोय हे त्यांना पटणारं नव्हतं. काका म्हणतात, कधी कधी स्वतःला खोलीत कोंडून घेई आणि व्यसनं करी. त्याच्या मनात कधी आत्महत्येचेही विचार यायचे. डॉक्टरसुद्धा व्यसनाधीन झाले होते. आपण प्रति परमेश्वर झाल्याचं जेव्हा वाटू लागतं आणि मग अचानक आपल्याला कुणी विचारत नाही तेव्हा होणारी मनाची वाईट अवस्था ह्या दोघांनी अनुभवली.
हेही वाचा :
अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी
#बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?
बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?
‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?
हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका
पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे
सारं काही चांगलं असूनही डिप्रेशन येतंय ना, मग दीपिकाची ही गोष्ट वाचा