शेकडो माफिया एकट्या उत्तर प्रदेशात आहेत आणि ते राजकारण्यांच्या चारापाण्यावर पोसले गेले आहेत. एवढेच नाही तर यातले अनेक जण कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या वळचणीला जाऊन ‘सन्माननीय’ही बनले आहेत. गुन्हेगारी जगताचा हा काळा इतिहास पाहता संपूर्ण देशावर आणि समाजावर पसरलेली ही दहशत संपवण्यासाठी काय करायला हवं, हा खरा प्रश्न आहे.
ग्रीक पौराणिक कथांमधे ‘हायड्रा’चं वर्णन सर्वात भयानक राक्षस म्हणून केलं जातं. हायड्रा हा अनेक डोकं असलेला साप होता. त्याच्याकडे आपलं डोकं आणि प्राणघातक विष पुन्हा निर्माण करण्याची अद्भुत शक्ती होती. त्याचं एक डोकं कापलं तर दोन नवीन डोकी उगवायचे. विविध प्रकारच्या अवैध धंद्यांमधे गुंतलेले माफिया आणि विविध प्रकारचे विषाणूही अशा हायड्रासारखे असतात.
एक डोकं कापलं तर दोन नवीन वाढतात. हे जगभर होत आलंय. पण ग्रीक पौराणिक कथेत एक नायकही आहे, हेरक्लस. रोमन पौराणिक कथांमधे त्याला हरक्यूलिस म्हटलं जातं. या नायकाने हायड्राचा पराभव केला. माफिया आणि गँगस्टर आणि वायरसबद्दलही असंच झालंय.
मेक्सिको आणि कोलंबियाचं ड्रग कार्टेल, अमेरिकेचे सिसिलियन माफिया, अल साल्वाडोरच्या भयानक टोळ्या, फिलीपिन्सचे ड्रग माफिया, ब्राझीलच्या टोळ्या हे सर्व हायड्रा आहेत. पोलीस, लष्कर, न्यायालय सारेच जण त्यांच्यापुढे हतबल झाले. पण सरकारांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांच्यापासून मुक्ती मिळवता आली. अर्थात हे सर्वत्र घडलं नाही. भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही. उत्तर प्रदेश त्याचं उत्तम उदाहरण आहे.
अनेक देशांमधे आणि समाजात गुन्हेगारी टोळ्या आजही हायड्रा बनून उपद्रव करत आहेत. भारताचंच उदाहरण पहा. अगदी आताचं ताजं प्रकरण म्हणजे अतीक अहमदचं. त्याने चांद बाबाच्या रूपातल्या सापाला मारलं आणि स्वतः त्याच सापाचं नवं शीर बनला. पण नंतर त्याच्याच टोळीतल्या इतर सदस्यांच्या रुपाने हायड्राची नवी डोकी उगवली. अतीकच्या मृत्यूनंतर यापैकी कोणी ना कोणी निश्चितपणाने डोकं वर काढण्याच्या प्रयत्नात असेल यात शंका नाही.
एका अहवालानुसार, अतिक अहमद आणि अश्रफची हत्या करणार्या तरुणांनी काही तरी मोठं बनण्याच्या इच्छेनेच हे कृत्य केलं असं म्हटलंय. मुख्तार अन्सारी, ब्रिजेश सिंग, धनंजय सिंग, अभय सिंग, विजय मिश्रा, हाजी याकूब, हाजी इक्बाल, बदन सिंग बड्डो, संजीव माहेश्वरी, डीपी यादव, रामू द्विवेदी, बबलू श्रीवास्तव असे शेकडो माफिया एकट्या उत्तर प्रदेशात आहेत आणि ते राजकारणातल्या चारापाण्यावर पोसले गेलेले आहेत. एवढेच नाही तर यातले अनेक जण कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या वळचणीला जाऊन ‘सन्माननीय’ही बनल्याचं दिसून आलंय.
एकेकाळी श्रीप्रकाश शुक्ला नावाचा गुन्हेगार उत्तर प्रदेशामधे चांगलाच चर्चेत आला होता. त्याला इतरांची हत्या करून गुन्हेगारी जगताचा बादशहा बनायचं होतं. केवळ आपली दहशत वाढवण्यासाठी त्याने अनेक धाडसी खून केले; पण शेवटी त्याचा खात्मा करण्यात आला. तो गेला असला तरी त्याच्या जागी अनेक नवे श्रीप्रकाश तयार झाले. याच साखळीमधे हरीशंकर तिवारी आणि वीरेंद्र शाही यांचीही नावं घेता येतील.
हेही वाचा: ईबोलापासून नायजेरियाला वाचवणाऱ्या डॉक्टरच्या सन्मानाबद्दल अबोला
कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम हा मुंबईतला माफिया होता. तोही अशाच ‘हायड्रा सिंड्रोम’चा परिणाम होता. त्याआधी हाजी मस्तान, करीम लाला यांसारखे स्मगलर आणि गुन्हेगार अंडरवर्ल्डमधे सक्रिय होते. त्यांचं साम्राज्य संपवून दाऊदने डी गँगची स्थापना केली आणि अंडरवर्ल्डचा डॉन बनला.
एक केस स्टडी म्हणून दाऊद किंवा मुंबईतल्या अंडरवर्ल्डकडे पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, हायड्राच्या रूपाने गुन्हेगारांचे नवे हस्तक म्हणून काही पोलिस अधिकारीही उदय पावले. उदाहरणार्थ, जेव्हा मुंबईतल्या अंडरवर्ल्डच्या टोळ्यांनी अतिरेक केला तेव्हा शेकडो गुन्हेगारांना मुंबई पोलिसांच्या एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलिसांनी संपवलं. पण यातले काही एन्काउंटर स्पेशालिस्ट स्वतःच या माफियांचे ‘गणवेशधारी प्रमुख’ बनले. ते एकेकाळी हिरो होते; पण नंतर ते खलनायक बनले.
गुन्हेगारी जगताचा हा काळा इतिहास पाहता संपूर्ण देशावर आणि समाजावर पसरलेली ही दहशत संपवण्यासाठी काय करायला हवं, हा खरा प्रश्न आहे. विशेषतः राज्यकर्त्या वर्गाने यासाठी काय करायला हवे? की त्यांनी फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतर्ते यांच्यासारखे बनलं पाहिजे? रॉड्रिगो यांनी आपल्या देशातून ड्रग्ज, भ्रष्टाचार आणि माफिया नष्ट करण्यासाठी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचं धोरण स्वीकारलं होतं.
या धोरणांतर्गत तेथील पोलिसांनी आणि सुरक्षारक्षकांनी जवळपास ३०-४० हजार लोकांना गोळ्या घालून ठार केलं. अल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले यांनी आपल्या देशावरील टोळ्या आणि गुंडांचा कलंक दूर करण्यासाठी एक लाख गुंडांना तुरुंगात टाकलं. त्यांना ठेवण्यासाठी देशात बांधण्यात आलेल्या मेगा जेलची क्षमता ४० हजार कैद्यांची आहे.
अमेरिकेचेही उदाहरण यानिमित्ताने पाहता येईल. इटलीच्या सिसिली प्रदेशातल्या माफिया टोळ्यांनी अमेरिकेच्या जरायमावर पूर्णपणे नियंत्रण ठेवलं होतं. खून, दरोडे, लुटमार, बलात्कार यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांचा माफियांनी अक्षरशः धडाका लावला होता. यापलीकडे जाऊन या माफियांनी पोलिस आणि न्यायाधीशांनाही विकत घेतलं होतं. पण ६० आणि ७० च्या दशकात या माफियांविरुद्ध सुरु केलेल्या राजकीय मोहिमेमुळे बडे माफिया उद्ध्वस्त झाले. त्यांना १०० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली आणि हळूहळू करत त्यांचं साम्राज्य संपुष्टात आलं.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे जोपर्यंत माणूस अस्तित्वात आहे तोपर्यंत गुन्हे आणि गुन्हेगार संपणार नाहीत. कितीही कटू असली तरी ही वस्तुस्थिती आहे. हायड्राच्या रूपातल्या संघटित गुन्हेगारी आणि माफिया राक्षसांचा नायनाट केला जाऊ शकतो. पण त्यामागे राजकीय प्रामाणिकपणा आणि तळमळ असावी लागते.
आपण माफिया किंवा गुन्हेगारांना निवडणूक लढवण्यासाठी परवानगी देतो, राजाश्रय देतो, राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर त्यांना सन्मानाने बसण्याची परवानगी देतो आणि त्याचवेळी दुसरीकडे गुन्हेगारी संपवण्याच्या गोष्टी करतो हा विरोधाभास आहे. अशा दुहेरी भूमिकेमुळे गुन्हेगारी साम्राज्यांवर नियंत्रण मिळवणं किंवा त्यांचा बिमोड करणं कदापि शक्य नाही.
हेही वाचा: पुन्हा कुणी लिहिल का एखादी संवेदना जागवणारी प्रार्थना?
पोलीस आणि राजकीय पाठिंब्याशिवाय गुन्हेगारीविश्व फोफावू शकत नाही, हे वास्तव आहे. अतिक, मुख्तार, आनंद मोहन, अनंत सिंग, शहाबुद्दीन, सूरजभान सिंग, पप्पू यादव, रमाकांत यादव, उमाकांत यादव, गुड्डू पंडित, त्रिभुवन सिंग यांना सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. ते माफिया आहेत हे सर्वांनाच माहीत होतं; पण त्यांच्या या माफियापणाचा आपल्याला फायदा होईल या उद्देशाने या गुंडांना राजाश्रय मिळाला.
दाऊद, अरुण गवळी, भाई ठाकूर, हाजी मस्तान यांच्यापासून बिहार आणि उत्तर प्रदेशातल्या गुंडांना, बाहुबलींना राजकीय खतपाणी भरपूर मिळालंय. आजही ते मिळतंय. एकदा का राजकीय पाठबळ मिळालं की पोलीस आणि प्रशासन आपोआपच त्यांच्याशी हातमिळवणी करतात. अतिकच्या प्रकरणात काय झाले? प्रयागराजचे अनेक पोलीस अधिकारी अतीकच्या पेरोलवर असल्याचं दिसून आलं.
त्यांची हातमिळवणी ही आजची नव्हती. या पोलीसांनी, अधिकार्यांनी आणि कर्मचार्यांनीच आतिक आणि विकास दुबे यांना मोठं केलं. त्यांची मालमत्ता ताब्यात घेण्याची हिम्मत या अधिकार्यांत होती का? या गुंडांनी अनेक बेकायदा अतिक्रमणं केली, बांधकामं उभी केली. कारण या हायड्रांना पोसण्यात संपूर्ण यंत्रणा गुंतलेली होती.
ग्रीक पौराणिक कथांमधला हायड्रा एका तलावात राहात होता. त्याला अनेक डोकी होती. त्याचा श्वास, वास आणि रक्तही अत्यंत विषारी होतं. टायफस आणि एकिडना हे प्राणी त्याचे मातापिता होते आणि त्याच्या भावंडांमधे सेर्बरस आणि चिमेरासारखे इतर बहुशीर असणारे प्राणी समाविष्ट होते. ते सर्व भयंकर राक्षस होते आणि त्या सर्वांनी हायड्राला पोषण दिलं.
अशा हायड्रांच्या ठिकाणी आपण कोणत्याही माफियाला ठेवा आणि त्याच्या मातापित्यांच्या जागी आपल्याकडे पारदर्शक यंत्रणा ठेवण्याची जबाबदारी असणार्यांना ठेवा, तुमच्यासमोर चित्र आपोआप स्पष्ट होईल. दुर्दैवाची गोष्ट अशी की, चित्र स्पष्ट होऊनही काहीही होणार नाही. म्हणूनच हे चित्र नष्ट व्हायला हवं.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंडाराज संपवण्याची घोषणा केलीय. त्यांची मोहीम चालू राहावी, यासाठी सोशल मीडिया, माध्यमे आणि जनतेतून त्यांना पाठिंबाही मिळतोय. त्यांची लोकप्रियता वाढतेय, असंही काहींचं म्हणणं आहे. पण यातून खरंच काही घडतं का, ते पाहायला हवं. देशातले नेते यातून काय शिकतात, तेही कळेलच.
हेही वाचा: १४ वर्षांच्या भारतीय मुलाने तयार केला गलवान व्हॅलीचा इतिहास
उत्तर प्रदेशातले गुंड आणि माजी खासदार अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येने देशभरात खळबळ उडालीय. अतिकने कुटुंबियांच्या साथीने स्थापन केलेल्या गुन्हेगारी साम्राज्याची सध्या मोठी चर्चा सुरु आहे. अतिकचे दोन मुलगे तुरुंगात आणि इतर दोन अल्पवयीन मुलं बालगृहात आहेत. अतिकची पत्नी आणि इतर अनेक कुटुंबीय फरार आहेत.
गेल्या तीन दशकांमधे अतिकने सुमारे १२०० कोटी रुपयांच्या अवैध संपत्तीचं साम्राज्य उभं केलं होतं. अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम यांच्या एन्काउंटरपूर्वी ईडीने अतिक आणि त्याच्या जवळच्या लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर ईडीला १५ ठिकाणांहून १०० हून अधिक बेकायदेशीर आणि बेनामी मालमत्तांची कागदपत्रे मिळाली होती.
त्याने लखनौ आणि प्रयागराजमधल्या श्रीमंत भागात अनेक मालमत्ता खरेदी केल्याचंही समोर आलंय. या मालमत्ता अतिकच्या किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर आहेत. अतिकचे वडील हाजी फिरोज हे टांगा चालवायचे. पैशाच्या हव्यासापोटी त्याने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. मारहाण, अपहरण, खंडणी असे गुन्हे करु लागला. अवघ्या १७ वर्षांचा असताना अतिकवर खुनाचा आरोप होता.
१९८९मधे अतिकने अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली आणि निवडूनही आला. यानंतर तो समाजवादी पक्षात आणि नंतर अपना दलात गेला. तब्बल पाच वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेल्या अतिक अहमदवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी यांसारखे १०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
१९८९मधे चांद बाबा यांची हत्या, २००२मधे नॅसनची हत्या, २००४मधे मुरली मनोहर जोशी यांच्या जवळचे भाजप नेते अश्रफ यांची हत्या, २००५मधे राजू पाल यांची हत्या असे आरोप त्याच्यावर आहेत. त्याचा भाऊ अशरफवर ५२ गुन्हे दाखल आहेत. २०१२मधे निवडणुकीत अतिक अहमद यांचा राजू पाल यांच्या पत्नी पूजा पाल यांच्याकडून पराभव झाला होता.
आतिकचा मोठा मुलगा मोहम्मद उमर लखनौ तुरुंगात आहे. त्याच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप आहे. लहान मुलगा अली अहमद हा हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रयागराजच्या तुरुंगात बंद आहे. अलीकडेच त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळालाय. मात्र, इतर एका फौजदारी खटल्यामुळे तो तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही.
अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन हिच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. प्रयागराजच्या उमेश पाल हत्याकांडात अतिकच्या पत्नीचं नाव आहे. २४ फेब्रुवारीला राजू पाल हत्याकांडाचा साक्षीदार उमेश पाल याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी माफिया अतिकसह शाइस्तावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून शाईस्ता फरार होती.
हेही वाचा:
भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी
बेगमपूर : संत रविदासांचं दु:ख नसलेलं शहर (भाग २)
बेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र
चीनी कंपनीशी करार झाल्याच्या आनंदात २० जवानांचा बळी चढवला का?
(लेखक आऊटलूकचे उत्तर प्रदेशातले माजी ब्युरोचिफ आहेत.)