कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

०७ मे २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


जानेवारीपासून चालू असलेली कोरोना वायरसची वर्ल्ड टूर अजूनही संपलेली नाही. चीन, अमेरिका, युरोप, भारत असा त्याचा प्रवास चाललाय. आता जवळपास साऱ्या देशांमधे त्यानं विना पासपोर्टची एंट्री मिळवलीय. त्याचा अगदी विसा फ्री प्रवास सुरू आहे. पण कोविड १९ चा एकही पेशंट नसणारेही काही देश या पृथ्वीवर आहेत. या देशांमधे फिरून येण्याची स्वप्न कोरोना पाहत असेल का?

युनायटेड नेशन्स म्हणजेच युएनच्या नोंदीनुसार, आपल्या पृथ्वीवर सध्या एकूण १९७ देश आहेत. यातले अनेक देश लोकशाही मार्गाने चालतात. काही हुकूमशाही तर काही राजेशाही मार्गानेही चालतात. पण आज २१ व्या शतकाच्या सुरवातीला यापैकी बहुतांश देश हे जागतिकीकरणाचा भाग झालेले आहेत. जगातल्या वेगवेगळ्या भागात निर्माण झालेल्या वस्तू, त्यांची संस्कृती, त्यांचे विचार, राहणीमान, खाणंपिणं अशा सगळ्याची देवाणघेवाण हे देश आपापसात करत असतात.

अशातूनच आपण कुठल्याही चेकिंगशिवाय कोरोना वायरसची देवाणघेवाण केली. चीनच्या वुहान शहरातून हा वायरस अवघ्या तीनचार महिन्यातच सगळ्या देशभर पसरला. तो पसरण्याचं एकमेव कारण होतं आणि ते म्हणजे आपला जगभरातला प्रवास. एका देशातून नकळतपणे हा वायरस सोबत घेऊन लोक दुसऱ्या देशात गेले आणि म्हणूनच इतक्या वेगाने या वायरसचा प्रसार होऊ शकला.

हेही वाचा : साथीच्या आजाराला पळवता येऊ शकतं असं सांगणारं अमेरिकेतलं सेंट लुईस शहर

जगभरात १३ देश कोरोना फ्री

आज जगातल्या १९७ पैकी १८३ देशांना कोरोना वायरसची लागण झाली. ही आकडेवारी जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटीच्या कोरोना वायरस रिसोर्स सेंटरनं जाहीर केलीय. महिन्याभरापूर्वीच देशातल्या ३ लाख लोकं कोरोनाने संक्रमित झालेत. पण यासगळ्यात अनेक देश असेही आहेत जिथं कोरोना आजपर्यंत पोचलाच नाहीय.

कोरोना वायरसचे सगळ्यात जास्त पेशंट अमेरिकेत सापडलेत. कॅनडामधेही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. रशिया आणि युरोपमधल्याही जवळपास सगळ्या देशांमधे कोरोनानं प्रवेश मिळवलाय. पण कोरोना वायरसची लागण न झालेले देश प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका या दोन खंडांमधले आहेत. ओशनिया या बेटावरच्या खंडाचाही यात समावेश आहे. या तीन खंडांमधल्या जवळपास १३ देशांना कोरोनाची अजिबात लागण झालेली नाही.

नॉर्थ कोरियामधे कोरोना येईल कुठून?

द डिप्लोमॅट या साईटवर उपलब्ध माहितीनुसार, आशिया खंडात उत्तर कोरिया, इराण आणि अफगणिस्तानचा शेजारी असलेला तुर्कमेनिस्तान, चीन आणि अफगणिस्तानच्यामधे वसलेला ताजिकिस्तान या तीन देशांमधे कोरोनाचा एकही पेशंट सापडलेला नाही. यूएनकडे तशी आजरोजीपर्यंत नोंद नाही.

डेमोक्रॅटिक पिपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणजेच उत्तर कोरिया हा देश नावानं डेमोक्रेटिक म्हणजे प्रजासत्ताक असला तरी तिथं किम जोंग उन या हुकूमशाहची सत्ता चालते. देशाच्या उत्तरकडे चीन, पूर्वेकडे रशिया, पश्चिमेकडे समुद्र आणि दक्षिणेकडे दक्षिण कोरिया अशा चारही बाजुंनी वेढलेल्या या देशात हुकमशहाची काटेकोर सत्ता चालते.

मध्यंतरी या देशात कोरोना वायरसची लागण झालेल्यांना तिथल्या हुकूमशाहनं गोळ्या घालून ठार मारल्याचं बोललं जात होतं. पण ही अफवा असल्याचं स्वतः किम जोंग उन यांनी स्पष्ट केलं. खरंतर, उत्तर कोरियानं आधीपासूनच स्वतःला बाकीच्या जगापासून तोडूनच घेतलंय. म्हणजे, देशातल्या कुणालाही सरकारी परवागनीशिवाय देश सोडून जाता येत नाही आणि बाहेरच्या कुणालाही आत येता येत नाही. आणि कुणी परदेशी माणूस आलाच तर त्याला कुठं फिरायचंय हे आधीच सांगितलं जातं. त्यामुळे उत्तर कोरियात कोरोनाचा एकही पेशंट न सापडणं साहजिकच म्हणायला हवं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं

आकडेवारी लपवल्यामुळे कोरोना फ्री झालेत?

ताजिकिस्तान हा मध्य आशियातला एक देश चारही बाजुंनी वेढलेला आहे. अफगणिस्तान, उझबेकीस्तान, किर्गिझस्तान आणि चीन या देशांच्यामधे ताजिकिस्तान वसलेला आहे. इथली ९० टक्के जमीन छोट्यामोठ्या डोंगरांनी व्यापलेली आहे. मार्चच्या सुरवातीला या देशानं कोरोनाचा प्रभाव असणाऱ्या ३५ देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली होती. पण नंतर लगेचच हे निर्बंध मागे घेतले. पण बाहेरून आलेल्या सगळ्या प्रवाशांना त्यांनी विगलीकरण कक्षात ठेवलं होतं.

ताजिकिस्तानसारखंच मध्य आशियातल्या तुर्कमेनिस्तान या देशाच्या सीमाही चार देशांना लागून आहेत. पण त्याचबरोबर याच्या एका बाजुला कॅसपिअन समुद्राचा किनाराही लागतो. जगातली सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला देश म्हणून तुर्कमेनिस्तान ओळखला जातो.

ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या दोन्ही देशांमधे अत्यंत कमी दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. इथल्या नागरिकांना कोणताही मानवी हक्क मिळत नाही. बालमृत्यूचं प्रमाण इथं खूप जास्त आहे. तुर्कमेनिस्तानमधे तर कोरोना वायरस हा शब्द उच्चारण्यावरही बंदी आहे. त्यामुळेच हे दोन देश कोरोना वायरसची खरी आकडेवारी लपवून ठेवताहेत, असा संशय तज्ञांकडून व्यक्त केला जातो.

आफ्रिकेतले दोन देश

आफ्रिकेतल्या लेसोथो आणि कॉमोरोस या दोन देशांना त्यांच्या भौगोलिक स्थितीचा फायदा मिळाल्यामुळे कोरोनाला अटकाव करता आलाय. कॉमोरोस हा देश म्हणजे आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीजवळचं एक छोटा आयलँड आहे. ‘द प्रिंट’च्या एका लेखानुसार, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसोबत हातमिळवणी करत जानेवारी महिन्यापासूनच या देशाने कोरोनाविरोधात पावलं उचलली होती.

बाहेरून येणाऱ्या सगळ्या प्रवाशांचं थर्मल स्क्रिनिंग करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं जात होतं. जवळपास २५० लोकांचं विलगीकरण करून त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. पण त्यापैकी एकाचीही टेस्ट पॉझिटीव आलेली नाही. सध्या या देशांत थोड्या प्रमाणावर लॉकडाऊन पाळला जातोय.

मात्र, दक्षिण आफ्रिकेतल्या लेसोथो या देशाने मात्र कडक लॉकडाऊन पाळलाय. हा लेसोथो देश समुद्र सपाटीपासून हजार किलोमीटरवर आहे. त्यामुळेच मे ते सप्टेंबर या महिन्यात इथं बर्फवृष्टी होते. देशाची सगळी आर्थिक सूत्रं आपल्या हातात घेऊन इथल्या सरकारनं खासगी कंपन्यांही सरकारच्या मार्गदर्शनाखाली आणलंय. देशाबाहेर असलेल्या नागरिकांनाही त्यांनी कोरोना संपेपर्यंत देशात न येण्याचं आवाहन केलं होतं. कालच म्हणजे ६ मेला या देशानं लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय जाहीर केलाय. असं असलं तरी या देशाच्या सीमा अजून काही महिने बंदच ठेवण्यात येणार आहेत.

हेही वाचा : कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

आठ ओशीनीया आयलँड 

कोरोना वायरसच काय, साधा कोरोना नावाचा शब्दही फारसा फिरकलेला नाही, असेही देश या पृथ्वीवर आहेत, असं सांगूनही कुणाचा विश्वास बसणार नाही. पण खरंतर, असे एक किंवा दोन नाही तर तब्बल आठ देश आहेत. हे देश ओशीनीया भागातली लहान लहान बेटं आहेत. हा ओशीनीया भाग पॅसिफिक महासागराच्या उत्तरेला ऑस्ट्रेलियाच्या जवळ आहे.

किरीबाटी, तुवालू, तोंगा, सामोओ, मार्शल आयलँड, सोलोमोन आयलँड, नाऊरू, पलाऊ, वालुआटू आणि फ्रेडरल स्टेट्स ऑफ मायक्रोनेशीया अशी या आठ छोट्या छोट्या आयलँडची नावं आहेत. आणि ती आपण आजपर्यंत कधी ऐकलीही नसतील.

या सगळ्या बेटांवरची लोकसंख्या ७० हजाराहूनही कमी आहे. लोकसंख्या कमी असल्याने आरोग्य सुविधा पुरवणं या देशांना सोपं जातं. गणित एवढं साधंसोप्पं असूनही या देशांना आपल्या कमी लोकसंख्येला पुरवता येईल एवढीही आरोग्य व्यवस्था सक्षम नाही. उदारणार्थ नाऊरू हा देश जगातला दुसऱ्या क्रमांकाचा छोटासा देश आहे. इथे फक्त १० हजार लोक राहतात. पण त्या सगळ्यांसाठी अख्ख्या देशात एकच हॉस्पिटल आहे. आणि त्या हॉस्पिटलमधे एकही वेंटिलेटर उपलब्ध नाही.

त्यामुळेच कोरोनाच्या सुरवातीलाच यातल्या बहुतेक देशांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. या सगळ्या देशांची अर्थव्यवस्था ही निर्यातीवर अवलंबून आहे आणि त्यांचे बहुतेक व्यवहार शेजारी असलेल्या ऑस्ट्रेलियाशी होतात. कोरोनामुळे या देशांनी ऑस्ट्रेलियाला जाणारी विमानं अगदी कमी केलीत. त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय. कोरोना वायरस पोचण्याची पृथ्वीवरची शेवटची जागा म्हणूनच या आयलँडकडे पाहिलं जातंय.

हेही वाचा : 

एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं?

‘आयडिया ऑफ इंडिया’ महाराष्ट्रामुळंच

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

छत्रपती शाहूंचं निधन झालं, तिथे त्यांचं स्मारक उभं राहिलंच नाही

महाड ते वर्साय, फ्रेंच राज्यक्रांती ते भारतीय राज्यघटना, व्हाया ५ मे

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं

जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी