ना दत्त ना बाबा बुदानगिरी, भाजपची सपशेल हाराकिरी

१६ मे २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यात कर्नाटकमधला भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा बालेकिल्ला समजला जाणारा चिकमंगळुरू जिल्हा आपल्या ताब्यात घेऊन काँग्रेसने भाजपच्या जखमेवर चांगलंच मीठ चोळलंय. गेल्या काही वर्षांत भाजपने या भागातली हिंदू-मुसलमान बहुमिश्र संस्कृती संपवायचा घाट घातला होता. पण इथल्या मतदारांनी भाजपलाच कात्रजचा घाट दाखवलाय.

अवघ्या देशाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी कर्नाटक विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली ही निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. त्यानुसार, कर्नाटकातल्या मतदारांनी यावेळी काँग्रेसच्या परड्यात झुकतं माप टाकत सत्ताधारी भाजपला खुर्चीवरून खाली खेचलंय.

या निवडणुकीत २२४ पैकी १३५ जागा मिळवत काँग्रेसने इतर पक्षांचा दणदणीत पराभव केलाय. १९८९च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच काँग्रेसला इतकं घवघवीत यश मिळालंय. भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारण आणि प्रचाराला विरोध म्हणून स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या काँग्रेसने चिकमंगळुरूसारखा भाजपचा हिंदुत्ववादी राजकारणाचा बालेकिल्लाच आपल्या ताब्यात घेतल्याने पक्षाचा आत्मविश्वास दुणावलाय.

हेही वाचा: विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवली

काय घडलं चिकमंगळुरूमधे?

चिकमंगळुरू जिल्ह्यात शृंगेरी, कडूर, तरीकेरे, मुडीगरे आणि चिकमंगळुरू असे एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत शृंगेरीचा अपवाद वगळता इतर ठिकाणी भाजपने विजय मिळवला होता. शृंगेरीतही काँग्रेसला अगदीच कमी मतांच्या फरकाने जिंकता आलं होतं. विशेष म्हणजे २०१३च्या विधानसभा निवडणुकीत फक्त चिकमंगळुरू आणि शृंगेरीतच भाजपला विजय मिळाला होता.

त्यात चिकमंगळुरू हा विधानसभा मतदारसंघ २००४च्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपच्याच ताब्यात आहे. त्याचं कारण इथले आमदार आणि भाजपचे केंद्रीय सरचिटणीस सी टी रवी. २००४, २००८, २०१३ आणि २०१८च्या विधानसभा निवडणुकीत चिकमंगळुरूमधून भाजपच्या तिकिटावर एकहाती विजय मिळवत चारवेळा आमदारकी भूषवलेल्या रवी यांची राजकीय कारकीर्द आजवर तशी बरीच वादग्रस्त राहिलीय. 

२०२३च्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच रवी यांचे निकटवर्तीय असलेल्या एच डी तमैय्यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमधे प्रवेश केला. भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचे पोस्टर बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसंच एकेकाळी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या रवींसाठी हा मोठा धक्का होता. त्यात या निवडणुकीत तमैय्या यांनी रवींच्याच विरोधात उभं ठाकत चिकमंगळुरू आपल्या खिशात घातलंय.

इतर मतदारसंघातही कमीअधिक फरकाने हेच चित्र दिसलंय. भाजपने जोर लावून हिंदुत्वाचा प्रचार करत इथली हिंदू-मुसलमान बहुमिश्र संस्कृती संपवायचा प्रयत्न केला खरा, पण मतदारांनी मात्र या धार्मिक ध्रुवीकरणाच्या नादी न लागता स्थानिक मुद्द्यांबद्दल बोलायचा आग्रह धरला. काँग्रेसने याचा फायदा घेत आपली प्रचारयंत्रणा राबवली आणि पाचही मतदारसंघांमधे भाजपला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

कर्नाटकात दुसरी अयोध्या

सांस्कृतिक प्रतिकांच्या राजकारणात हिंदुत्ववादी अस्मितेचं बीज रोवण्यात भाजपला याआधीही बऱ्याच ठिकाणी यश आलंय. कर्नाटकमधेही भाजपने हेच सूत्र वापरायचं ठरवलं होतं. त्यासाठी गायपट्ट्यात सत्ता मिळवण्यासाठी फायद्याचा ठरलेल्या अयोध्या आणि बाबरी मशिदीच्या वादाच्या धर्तीवर एक नवा वाद कर्नाटकमधे उपस्थित करायचा प्रयत्न भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून केला गेला.

या वादासाठी बाबा बुदानगिरी समाधी हे ठिकाण निवडलं गेलं. कर्नाटकचा कॉफीमळा म्हणून ओळख असलेल्या चिकमंगळुरूमधलं हे एक पवित्र स्थान. भारतात कॉफी आणण्याचा मान ज्या बाबा बुदान यांना जातो, त्यांची ही समाधी. १७६०च्या सुमारास, कर्नाटकमधले सुफी संत बाबा बुदान यांनी हज यात्रा करून परतत असताना येमेनवरून कॉफीच्या सात बिया आपल्या दाढीत लपवून आणल्या होत्या.

तेव्हाच्या म्हैसूर म्हणजेच आत्ताच्या कर्नाटकमधे असलेल्या चंद्रद्रोण डोंगराच्या उतारावर बाबा बुदान यांनी आपल्या सोबत आणलेल्या बियांची लागवड केली. पुढे त्यांनी याच डोंगरावर शेवटचा श्वास घेतला आणि हा डोंगर बाबा बुदानगिरी म्हणून ओळखला जाऊ लागला. या समाधीला भेट देण्यासाठी येणाऱ्या भक्तांमधे मुसलमानांसोबतच हिंदूंचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

या डोंगरावर असलेल्या गुहांमधे हिंदू देवता दत्तात्रेयांचं स्थान असल्याची स्थानिकांची श्रद्धा आहे. त्यात बाबा बुदान यांची समाधी असलेली गुहा आणि दत्तात्रेयांना काशीला नेणारी गुहा एकच असल्याचा दावाही गेल्या काही वर्षांपासून केला जातोय. गेल्या काही वर्षांपासून भाजपने 'दत्तपीठ' विरुद्ध 'बाबा बुदानगिरी' या नव्या वादाला जन्म देऊन कर्नाटकात दुसरी अयोध्याच उभी केलीय.

हेही वाचा: नरेंद्र मोदींना इतकं मोठं यश मिळालं, याची सर्वात महत्त्वाची ५ कारणं

राजकीय स्वार्थासाठी सारं काही

या पर्वतावर आधी दादा हयात या प्रेषित मोहंमदांच्या शिष्याचं वास्तव्य असल्याची स्थानिक मुसलमानांची धारणा आहे. इस्लामच्या प्रचारासाठी भारतात आलेले दादा आपलं कार्य संपल्यावर इथल्याच एका गुहेतून मक्केला गेले आणि पुढे बाबा बुदान या त्यांच्या शिष्याने इथं कॉफीची लागवड केली आणि सुफी पंथ वाढवला, असं मानलं जातं. त्यांचीही समाधी इथल्याच गुहेत आहे. 

त्यामुळे ही गुहा हिंदू मान्यतेनुसार दत्तात्रेयांना काशीला पोचवते, तर मुसलमानी मान्यतेनुसार इथूनच दादा हयात मक्केला गेले, असं मानलं जातं. त्यामुळे बाबा बुदान यांचा उरूस आणि दत्तजयंतीच्या दिवशी या भागात सांप्रदायिक दंगली घडल्याचं दिसून येतं. २०००च्या आसपास 'दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ' या म्हणीनुसार भाजपने या वादात उडी घालत वातावरण आणखीनच बिघडवलंय.

स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी आधी सौम्य आणि प्रासंगिक स्वरूपाचा असलेला वाद धार्मिक अस्मितेच्या जोरावर आणखी भडकवला. आधी 'श्री गुरू दत्तात्रेय बाबाबुदान स्वामी दर्गा' असं नाव असलेल्या समाधीस्थळाला आता 'श्री गुरू दत्तात्रेय स्वामी दत्तपीठ' असं नाव देत गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्ववादी गटांकडून इथं दत्तजयंतीचं जंगी आयोजन केलं जातंय.

इतकंच नाही, तर धार्मिक प्रतिकं मिरवणाऱ्या शोभायात्रांनाही या भागात सुरवात झालीय. सुप्रीम कोर्टाने फक्त १९७५आधीच्या धार्मिक कार्यक्रमांना मान्यता दिली असल्याने आता शोभायात्रेला स्थानिक प्रशासनाकडून विरोध होतो. तरी गेल्यावर्षी दत्तजयंतीला समाधीस्थळी हिंदू पुजाऱ्यांची नेमणूकही केली गेली होती. पण भाजपच्या इथल्या जुन्या बहुमिश्र संस्कृतीला विरोध करण्याच्या या डावाला स्थानिक आता कंटाळल्याचं मतपेटीतून स्पष्टपणे जाहीर झालंय.

इतिहासाची पुनरावृत्ती होईल?

दत्त-नाथ-सुफी या तिन्ही अध्यात्मिक परंपरा एकत्र नांदल्या असल्याचा पुरावा देणाऱ्या अनेक जागा आहेत. देशभर आणि सीमेपलीकडे थेट काबुल-कंदाहारपर्यंत या धार्मिक सलोख्याच्या खाणाखुणा सापडतात. दुसरीकडे या एकोप्याच्या परंपरेत विष कालवण्याचं काम हिंदू-मुसलमान असे दोन्हीकडचे कट्टरपंथीय कायम करत आले आहेत. तरीही ही गंगा-जमनी संस्कृती सगळ्यांना पुरून उरते, हेच चिकमंगळुरूच्या निकालानं स्पष्ट केलंय.

या निवडणुकीच्या तसंच चिकमंगळुरू विधानसभा निकालाच्या निमित्ताने १९७८च्या गाजलेल्या पोटनिवडणुकीच्या आठवणींना उजाळा मिळालाय. आणीबाणीनंतर डळमळीत झालेली राजकीय कारकीर्द सावरण्यासाठी इंदिरा गांधींना एका सुरक्षित जागेची गरज होती. त्यासाठी त्यांनी चिकमंगळुरूमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आल्या. पुढे काही महिन्यांतच त्यांची ही खासदारकी रद्द करण्यात आली.

त्यावेळी 'एक शेरनी सौ लंगूर, चिकमंगलूर चिकमंगलूर' या काँग्रेस समर्थकांच्या घोषणांनी सत्ताधारी जनता पक्षाला हैराण केलं होतं. पुढे इंदिरा गांधींनी देशभर दौरा करत काँग्रेसच्या पंखात बळ भरलं आणि १९८०च्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत सत्तेत पुनरागमन केलं. या घटनेचा संदर्भ आता राहुल गांधींच्या रद्द झालेल्या खासदारकीशी जोडला जात असून, काँग्रेस पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करणार का, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

हेही वाचा: 

सुप्रिया सुळे का जिंकल्या, पार्थ पवार का हरले?

महिलांना उमेदवारी देतानाही घराणेशाहीचंच कार्ड

काय आहेत मतमोजणीच्या पहिल्या धारेचे अपडेट?

जागतिक कासव दिनी लोकसभेच्या स्पर्धेत राहुलचं कासव जिंकलंच नाही