लेखक, दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘कोबाल्ट ब्ल्यू’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सचिन कुंडलकर यांनीच लिहलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या सिनेमाचं रसग्रहण करणारा प्रमोद मुनघाटे यांच्या ब्लॉगवरचा हा लेख.
काल रात्री नेटफ्लिक्सवर ‘कोबाल्ट ब्ल्यू’ पाहिला. आवर्जून पाहण्याचं कारण म्हणजे सचिन कुंडलकरची याच नावाची २००६मधे आलेली मराठी कादंबरी आवडली होती. त्यानिमित्ताने कुंडलकरांशी पत्रव्यवहारही झाला होता. विशेष महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाचं आर्ट प्रोडक्शन मित्र संजीव खांडेकरांचं आहे, असं त्यांनी सांगितलं होतं.
‘थिंक महाराष्ट्र’ या वेबपोर्टलवर माझा त्या कादंबरीवरचा लेखही काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. अप्रतिम! अशी माझी तत्काळ पहिली प्रतिक्रिया आहे. या सिनेमाच्या देखणेपणाच्या इतक्या बाजू आहेत की कुठून सुरवात करावी हे कळत नाही.
‘कोबाल्ट ब्ल्यू’ हा सिनेमा कादंबरीवरून केला असल्यानं पाहताना तीच तुलना मनात येत होती. सिनेमांच्या बाबतीत मराठी कादंबरीवरून बनवलेले बहुतेक सिनेमे फसलेत. ‘कोबाल्ट ब्ल्यू’ हा मराठी सिनेमा नाही. तो हिंदी-इंग्रजी असा आहे. पण कादंबरीचा लेखक हा स्वतः पटकथालेखक आणि स्वत:च दिग्दर्शक असेल तर कलाकृतीचं कसं सोनं करू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सिनेमा. या दृष्टीतून साहित्याच्या अभ्यासकांनी आवर्जून पहावा, असा हा सिनेमा आहे.
कादंबरीचा ‘जर्म’ आणि कादंबरीच्या मूळ संहितेतलं सौंदर्य कायम राखत तपशीलात कुंडलकरांनी सिनेमात खूपच बदल केलेत. त्यामुळे कादंबरीतलं अनुभवविश्व सिनेमा या दृश्यमाध्यमात रूपांतरित करताना अधिक सखोल, परिपूर्णतेकडे जाणारं आणि शुद्ध स्वरूप धारण करणारं झालं आहे. संपूर्ण कादंबरीत येणारा ‘कोबाल्ट ब्लू’ हा रंग सिनेमात प्रत्यक्ष डोळ्याला दिसतो म्हणून तो अधिक परिणामकारक वाटतो.
शब्दातून व्यक्त होणाऱ्या अमूर्त संवेदना सिनेमात दृश्यरूपात जिवंत करता आल्या आहेत. म्हणून या सिनेमाच्या निर्मितीमधे पटकथा, दिग्दर्शन याबरोबरच कला व्यवस्थापनाला पुष्कळच अवकाश होता. संजीव खांडेकर आणि वैशाली नारकर यांनी तो अवकाश अत्यंत कलात्मकतेने भरून काढलाय. निव्वळ यासाठी देखील हा सिनेमा पाहायलाच पाहिजे.
हेही वाचा: आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा
मूळ कादंबरीत पुण्यासारखं शहर आहे. एक आधुनिक सुखवस्तू मराठी कुटुंब. या कुटुंबात आधुनिक जीवनशैलीत, पण परंपरागत मूल्यांसह जगणारी माणसं आहेत. चित्र, संगीत, साहित्य, निसर्ग आणि पर्यावरण या क्षेत्रात मनस्वीपणे विहरणारी तरुण मुलंमुली आहेत.
या तरुणांचं जगणं इतकं स्वाभाविक आहे, की ती सभोवतालच्या ‘चौकटबद्ध आणि व्यवहारी’ जीवनात मिसफिट आहेत. स्वाभाविक जगणं म्हणजे आपल्या स्वाभाविक संवेदनांना न्याय आणि अर्थ देण्याचा आणि त्या संवेदना शुद्ध रूपात जगण्याचा प्रयत्न.
पण सिनेमात मात्र पुण्याऐवजी केरळमधलं एक गाव दाखवलंय. त्यामुळे कादंबरीचा मजकूर टेक्स्ट अधिक चांगल्या रितीने सिनेमॅटिक झालाय. बऱ्याच संवादांचं माध्यम आपोआपच हिंदीकडून इंग्रजीकडे गेलंय.
केरळमधल्या जुन्या जाडजूड भिंतीच्या वास्तू, भिंतींचे पांढरे आणि गडद रंग, मोठ्या खोल्यांमधल्या अंधार आणि प्रकाशाचे हिरवे-पिवळे कवडसे, दक्षिणेकडच्या चर्चशी निगडीत माणसं, गडद रंगातले पेहराव आणि छोटे-मोठे हिरव्या-निळ्या पाण्याचे तलाव यामुळे सिनेमातल्या शारीरसंबंधाच्या अनुभवांना घनता आलीय.
समलैंगिक आकर्षण हे ‘कोबाल्ट ब्लू’च्या कथेचं एक आशयकेंद्र आहे. मुळात कादंबरीत ‘तो’, तनय आणि त्याची बहीण अनुजा या तिघांची कथा आहे. कादंबरीचं निवेदन प्रथमपुरुषी आहे. आधी तनय स्वतःबद्दल म्हणजे, ‘तो’ आणि तनय यांच्यातल्या संबंधाबद्दल बोलतो. नंतर अनुजा आपली डायरी लिहिते. त्या डायरीत ‘तो’ आणि ती स्वतः यांच्यातल्या संबंधाविषयी ती लिहिते.
सिनेमातही कॅमेरा तनयच्या डोळ्यातून फिरतो. तो कवी आहे. घराशेजारच्या छोट्या तलावातील ‘पाब्लो नेरुदा’ या काल्पनिक श्रोत्याला तो कविता ऐकवतो. तो स्वतःला महाराष्ट्रातून केरळमधे आलेला विस्थापित समजतो. पण सिनेमाचं एकूण संभाषण पाहता तनय आणि त्याची बहिण अनुजा भावनिकदृष्ट्या अधिक विस्थापित आहे. तनयचे सर्व शारीरिक विभ्रम बायकी आहेत. तो मुलींचे मॉइश्चराइजर आणि डिओ वापरतो.
अनुजाला पारंपरिक स्त्रीसुलभ जगायला आवडत नाही. ती हट्टाने मुलांसारखे केस ठेवते. मुलींच्या कपड्यात तिला गुदमरतं. ती शॉर्ट्स घालते. रांगडे खेळ खेळते. कादंबरीत अनुजा ट्रेकींगला जाते. हिंदी सिनेमे तिला हास्यास्पद वाटतात. लग्न म्हणजे मुलं तयार करण्याची संस्था वाटते. विवाह आणि कुटुंबाच्या चौकटीबाहेर आपलं स्वाभाविक जगणं खरं जगणं वाटतं. तनय आणि अनुजा हे दोघेही स्वतःला स्वतःच्या शरीरात मिसफिट समजतात.
हेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा
मग या कथेत ‘तो’ येतो. ‘तो’ तनयच्या घरी पेईंग गेस्ट आहे. आईवडील नसलेला, बरीच संपत्ती नावावर असलेला, कादंबरीत लिहल्याप्रमाणे हातात गिटार आणि ब्रश घेऊन दरक्षणी नवा जन्म घेऊन जगणारा ‘तो’ तनयच्या लैंगिक आकर्षणाचा विषय आहे. त्याचं दिसणं, उठणं-बसणं, त्याचे सगळे विभ्रम, त्याचे कपडे, त्याचा वास, त्याची प्रत्येक गोष्ट तनयला आकर्षित करते.
एखाद्या प्रेयसीसारखा तो प्रेम करतो. दोन शरीरं जवळ येतात, एक होतात. वासनेचे हे खेळ जितके उत्कट, उन्मुक्त आहेत, तेवढेच ते हळुवारपणे चित्रित केले आहेत. घर, नदीकाठ आणि सर्वत्र. ‘तो’ उन्मत्त प्रियकरासारखा तनयला स्वतःशी बांधून ठेवतो. ‘तो’च्या प्रत्येक हालचाली न्याहाळताना तनय कामलालसेने आतून विद्ध झालाय. त्या प्रत्येक दृश्यातून त्यांच्या नात्यातली तरलता आणि त्याचवेळी वासनेचं तापलेपण जाणवतं. रंग, गंध आणि स्पर्श या संवेदना प्रेक्षकांच्या मनात जागृत होतात.
तनयच्या घरी ‘तो’ पेईंग गेस्ट म्हणून येतो आणि त्या कुटुंबाची घडी विस्कटते. तनयच्या मोठ्या भावाचं लग्न ठरतं. पण त्यापूर्वी अनुजाने लग्न करावे असा हट्ट घरचे धरतात. खरं तर ‘तो’ आल्याने आत्ता कुठे तनय आणि अनुजाच्या शरीरातल्या विस्थापित आत्म्यांना जीवनाच्या स्वाभाविक गरजांची लय सापडली असते. त्या लयीत एकीकडे संवेदनांचा उत्सव सुरू होतो. पण तो लपतछपत.
संपूर्ण पुरुषी तनयचं कवीमन आणि ‘तो’चं रंगांशी असलेलं नातं यांच्यातल्या सूक्ष्म लहरी या सिनेमात फार फार हळुवारपणे चित्रित केल्या आहेत. भिंतीवर आणि इझलवरच्या कॅनवासवर कोबाल्ट ब्ल्यू रंगाचे फटकारे मारणे, दोघांचेच गुपित असलेल्या कविता ऐकवणे हे फार तरलपणे, एखाद्या कवितेसारखं सिनेमात आणलंय. त्या दोघातल्या कामभावना-वासना दृश्यरूपात जिवंत करण्यासाठी निवडलेले लोकेशन, प्रकाश आणि कॅमेरा यासाठी हा सिनेमा पाहायलाच हवा.
एका सकाळी ‘तो’ आणि अनुजा घरातून निघून जातात आणि सिनेमाला वळण मिळतं. तनयसाठी हा मोठा आघात असतो. तो उद्ध्वस्त होतो. सहा महिन्यांनी अनुजा एक दिवस घरी परत येते. बरीचशी विमनस्क. आईवडिलांशी सतत खटके. भाऊ असीमचं लग्न जुळतं. पाहुण्यांसाठी तरी अनुजाने साडी नेसावी अशा विनवण्या होतात. अखेर लग्नाच्या दिवशीच ती हॉकीची कोच म्हणून ईशान्य भारतात निघून जाते.
सिनेमाचं आणि कादंबरीचं नाव आहे, ‘कोबाल्ट ब्ल्यू’. निळा रंग कामवासनेचा रंग आहे. पण तनयच्या नेणिवेतला, स्वप्नातला एकटेपणा आणि ‘तो’च्या सहवासाची ओढ यांचं दृश्यरूप म्हणून सिनेमात क्षणोक्षणी निळ्या रंगाचा वापर अत्यंत कलात्मकतेने केलाय. सिनेमाच्या अखेरीस ‘तो’ निघून गेल्यानंतर असीमच्या लग्नाच्या निमित्ताने त्याची खोली पाणी टाकून साफ केली जाते, तेव्हा निळया रंगाच्या पाण्याचा ओघळ पायऱ्यावरून खाली उतरत येतो.
तनयच्या विश्वातल्या ‘तो’चं अस्तित्व असं नष्ट होते. शब्दातून, दृश्यातून आणि अभिनयातून संवेदनांचा शुद्ध अनुभव हा कोणत्याही कलेचा-कलावंताच्या निर्मितीचं अंतिम लक्ष्य असतं. त्यासाठी मानवी अनुभवाच्या अनवट मुशीचा शोध कलावंत घेत असतात.
‘कोबाल्ट ब्ल्यू’ या सिनेमापुरतं सांगायचं तर हा अनुभव म्हणजे नैसर्गिकरित्या समलिंगी शारीर आकर्षण असलेल्या एका कविमनाच्या तरुणाच्या कवितेची कथा आहे. ही कथा दृश्यरूपातून मांडण्यासाठी कवी-कथाकार, चित्रकार आणि अभिनय अशा कलावंतानी केलेली निर्मितीची पराकाष्ठा आहे.
हेही वाचा:
इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप