येत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत?

०२ ऑगस्ट २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे.

महाराष्ट्रात चिपळूण, कोल्हापूर भागात आलेला पूर म्हणजे छोटी ढगफुटी होती, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं. हा पूर ओसरतोय न ओसरतोय तोपर्यंत लगेचच जम्मू काश्मीरमधे आभाळ फाटलं. तिथल्या किश्तवाड या गावात २८ जुलैला ढगफुटी झाली. लगेचच हिमाचल प्रदेशमधल्या लहुल आणि कुल्लू जिल्ह्यांमधे झालेल्या दोन ढगफुटीच्या घटनांमधे ९ जणांचे मृत्यू झाले. तेव्हाच लेह आणि उत्तराखंमधेही ढगफुटीच्या काही घटना नोंदवण्यात आल्या.

त्याआधी १२ जुलैलाही हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला शहरात ढगफुटी झाली होती. मागे जून २०१९ ला उत्तराखंडमधे,  आलेल्या ढगफुटीमुळेही कितीतरी नुकसान झालं होतं. २०१८ च्या ऑगस्टमधे केरळमधेही अतिपावसामुळे पूर आला होता. अशा ढगफुटीच्या घटना गेल्या काही वर्षात भारतात वारंवार घडत असल्याचं निरिक्षण इंडियन मेटॉरॉलिकल डिपार्टमेंट म्हणजेच आयएमडीनं नोंदवलंय. 

हवामान बदलामुळे भारताचा मान्सूनच पूर्णपणे बदलतोय. त्यामुळे ढगफुटीच्या घटनांची फक्त संख्याच वाढलीय असं नाही. तर त्याची वेळही बदललीय. सहसा मान्सूनोत्तर काळात सप्टेंबर ऑक्टोबरमधे ढगफुटीच्या होणाऱ्या घटना आता मान्सूनच्या सुरवातीलाच जून, जुलैमधे घडू लागल्यात असं जगभरातून झालेल्या अभ्यासात समोर आलंय. इथून पुढच्या काळात ढगफुटीच्या घटना वाढत जाणार असल्याचा अंदाजही शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा : तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

ढगफुटी म्हणजे काय?

इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनुसार, एका दिवसात २.५ मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला तर तो पावसाळी दिवस म्हणून ओळखला जातो. तर एका दिवसात १२४.५ ते २४४.४ मिलीमीटर पाऊस पडला तर त्याला ‘मुसळधार पाऊस’ असं म्हटलं जातं. यापेक्षा जास्त पाऊस पडला तर त्याला अतिवृष्टी म्हटलं जातं. पण ढगफुटी असते तेव्हा एका तासात चक्क १०० मिलीमीटर पाऊस पडतो. तोही अतिशय छोट्या म्हणजे साधारण १० किलोमीटर भागात.

काही वेळा, पावसाचं पाणी असणाऱ्या ढगातून पाऊस सुटतो. पण तो जमिनीवर पडत नाही. जमिनीकडच्या गरम तापमानामुळे त्याची परत वाफ होते आणि ती त्या ढगातच सामावली जाते. एकाच ठिकाणी पावसाचे असे अनेक ढग एकत्र जमा झाले की पाण्याचा भार वाढतो. तो भार तसाच घेऊन हे ढग पुढे जात राहतात. डोंगरामुळे वारा अडला की त्यांचा प्रवासही थांबतो. शेवटी, भार सहन न झाल्याने अचानक एखादा ढग फुटून नळातून पाणी आल्यासारखा वाहू लागतो. अनेकदा एकापेक्षा जास्त ढगही फुटू शकतात.

त्यामुळेच शक्यतो काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश अशा डोंगराळ भागात ढगफुटी होत असते. थोड्या वेळात खूप पाऊस पडल्याने पूर तर येतोच. शिवाय, डोंगरावरून पाणी खाली येऊ लागलं की ते आपल्यासोबत प्रचंड माती, मोठी दगडं, झाडं घेऊन खूप वेगाने खाली येतं. त्यामुळेच घरांचं नुकसान होतं. पाण्यात गाड्या, माणसं, जनावरं वाहून जातात.

तापमान वाढल्यामुळे वाढणार ढगफुटी

वातावरण बदल म्हणजेच हवामान बदलामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होतेय. तापमान वाढल्यामुळे कमी वेळात पाण्याची जास्त वाफ होते. वातावरणात आद्रर्ता वाढत जाते. एकाचवेळी अनेक ढग तयार होतात आणि साहजिकच ढगफुटी तयार होते, असं गांधीनगरमधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधल्या अर्थ सायन्स विभागात काम करणारे विमल मिश्रा इंडियन एक्सप्रेसला सांगितलंय.

‘येत्या काही वर्षात थोड्या वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना अधिकाधिक तीव्र होणार आहेत. शिवाय, अशा घटनांमधे वाढ होणार असल्याचंही पुराव्यांवरून दिसून येतंय. तापमानात वाढ होत असल्यानं किंवा हवामान बदलामुळे आपण निश्चितच भविष्यात ढगफुटीच्या घटना सतत अनुभवणार आहोत,’ असंही ते पुढे म्हणालेत.

हेही वाचा : वेळेत उपाय केले नाही तर पुण्याची मुंबई होईल

धरण की मरण?

काश्मीरमधे झालेली ढगफुटीही अशीच अनेक ढग एकत्र आल्यामुळे झालेली दिसून येते. सध्या मान्सून सुरू असल्यानं दक्षिणेकडून अरबी समुद्रातून वारे वाहतायत. त्यांच्यासोबत त्यांनी पावसाचे ढग काश्मीरपर्यंत नेले. तिथे मोठमोठ्या डोंगरांमुळे ते अडले. तर पश्चिम डिस्टर्बन्समुळे भूमध्य समुद्रातून इराण, पाकिस्तान आफगणिस्तानमार्गातून वाऱ्यांसोबत आद्रर्ता असलेले ढगही तिथे जमा झाले. या सगळ्या ढगांचं एकत्रिकरण होऊन शेवटी ढगफुटी झाली, असं दिल्लीच्या हवामान प्रादेशिक खात्याचे प्रमुख डॉ. कुलदिप यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

उत्तराखंड, केदारनाथमधे २०१३ मधे झालेल्या ढगफुटीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारच्या जलसंपदा खात्याकडून सात सदस्यांची समिती स्थापन केली गेली होती. या समितीनं दिलेल्या ६४ पानी अहवालात ढगफुटीला कारण ठरलेल्या गोष्टींमधे टिहरी धरणाचाही उल्लेख केलाय. मोठ्या मोठ्या धरणांमुळे एकाच ठिकाणी जास्त पाणी साठून राहतं. साहजिकच, पाण्याची वाफही जास्त होते. त्यात उत्तराखंडसारख्या ठिकाणी चारही बाजुंनी डोंगर असताना ही वाफ एकाच जागी साठून राहते आणि त्यातून ढगफुटी होते. 

पश्चिम घाटात झपाट्याने होणारी जंगलतोड आणि तितक्याच वेगाने होणारं शहरीकरण यामुळे वातावरणाच्या तापमानात वाढ होतेय, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. यामुळेच आद्रर्ता धरून ठेवण्याची हवेची क्षमता वाढतेय. यामुळे ढगफुटीचे क्युमुलौनिमबस हे ढगफुटीचे ढग वाढतायत. 

हिमालयातही जंगलतोड आणि हायड्रोपॉवर प्लान्ट, रस्ते, हॉटेल किंवा घरांचं बांधकाम यामुळे माती ढिली पडतीय. त्यामुळेच थोडासा पाऊस झाला तरी लगेचच दरड कोसळायला लागते किंवा जमीन खचते.

कोणता पॉपकॉर्न पहिले फुलणार?

हवामान खात्याकडून वादळाचा, जास्त पावसाचा किंवा पाऊसच होणार नसल्याचा अंदाज लावला जातो. तसा ढगफुटीचा अंदाज लावून होणारं नुकसान थांबवता येऊ शकत नाही का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

आयआयटी मुंबईचे सुबिमाल घोष यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं, 'समजा, आपण पॉपकॉर्न बनवत असू. कच्चे पॉपकॉर्न ठेवलेत ते भांडं गरम होतं आणि मग एक एक कॉर्न फुलतात. समजा कॉर्न पहिले पॉप होणार किंवा फुलणार असं कुणी आपल्याला विचारलं तर आपण खात्रीशीर उत्तर देऊ शकत नाही. पुढच्या १० मिनिटांत किती कच्चे कॉर्न फुलतील असं कुणी विचारलं तर त्याचं ९० टक्के फुलतील असं उत्तर आपण देऊ शकतो. पण पुढच्या १० सेकंदात किती फुलतील असं विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याकडे नसतं.'

तसंच आसपासचं वातावरण इतकं गरम होत असताना नेमका कुठे आणि किती तीव्रतेने पहिल्यांदा ढगफुटी होणार हे कुणीही सांगू शकत नाही, असं घोष सांगतात. फक्त येत्या काही वर्षात ढगफुटीच्या ९० टक्के घटना होणार आहेत, हे नक्की.

हेही वाचा :  पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही

भविष्य आलं जवळ

येत्या पाच वर्षात  जगाचं तापमान ४० टक्क्यांनी वाढणार आहे, असं मे २०२१ मधे वर्ल्ड मेट्रॉलॉडिकल ऑर्गनायझेशनं नोंदवलंय. २०२१ ते २०२५ पैकी एका वर्षात तापमान चक्क १.५ डिग्री सेल्सियसने वाढेल. ही तात्पुरती वाढ असेल. पण २०१६ ला मागे टाकत ते वर्ष जगाच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त गरम वर्ष होईल अशी ९० टक्के शक्यताही या संस्थेनं नोंदवलीय. 

हवामान बदल आणि त्यामुळे होणाऱ्या ढगफुटी, पाऊस किंवा दुष्काळ यासारख्या गोष्टी आता फार दूर राहिलेल्या नाहीत, हे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनसारख्या संस्थांनी केलेल्या अभ्यासातून स्पष्ट होतं. भविष्यात आपल्याला या संकटांना सामोरं जायचंय, याचा आता कशाला विचार करा असं म्हणूनही चालणार नाही. ती आजची, आताची, या वर्षाची गोष्ट झालीय. 

भारतीय मान्सूनमधले बदल

‘असेसमेंसट ऑफ क्लायमॅट चेंज ऑवर द इंडियन रीजन’ हा भारतातला पहिला हवामान बदलाबद्दलचा रिपोर्ट इंडियन सायंटिफिक कम्युनिटीनं लिहिलाय. २०२० मधे भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान खात्याकडून तो प्रकाशित करण्यात आला होता. या अहवालानुसार, मान्सून काळात होणाऱ्या एकूण पावसात १९५० ते २०१५ या काळात ६ टक्क्यांनी घट झालीय. तर याकाळात मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी होण्याच्या संख्येतही ७५ टक्क्यांनी वाढ झालीय. यासोबतच मान्सूनमधला अवर्षण काळ म्हणजे पाऊस नसलेले दिवस १९८१ ते २०११ या वर्षांत २७ टक्क्यांनी वाढलेत.

पावसाळा आला तरी पाऊस येत नाही. शेवटी पाऊस पडावा, दुष्काळ जावा म्हणून पुण्याच्या दगडुशेठ समोर यज्ञ वगैरे करतात. त्यानंतर जुलै, ऑगस्टमधे इतका पाऊस पडतो की पाऊस थांबावा म्हणून लोक परत देवाच्या विनवण्या करू लागतात.

थोडक्यात, मान्सूनमधले पाऊसाचे दिवस कमी झालेत. सोबतच अवर्षण काळ वाढतोय. पण अहवालानुसार, पाऊसाच्या प्रमाणात फार घट झालेली नाही. याचाच अर्थ असा की, मान्सूनमधे फार कमी दिवस पाऊस पडत असला तरी संपूर्ण ऋतूत पडला असता तितका पाऊस या दिवसांत पडतोय. त्यामुळेच पूर, ढगफुटी यासारख्या घटना वाढतायत.

हेही वाचा : पावसाळ्यात पुण्या-मुंबईतल्या इमारती पत्त्याच्या डावासारख्या का कोसळतात?

मान्सूनचं भवितव्य काय?

जवळून जाणारी विषुवृत्ताची रेष, दोन बाजुंना असणारा समुद्र, उत्तरेला हिमालय आणि त्यापुढे असणारं तिबेटियन पठार अशी भौगोलिक रचना भारत सोडल्यास जगात इतर कुठेही नाही. त्यामुळेच जगाच्या तुलनेत भारतामधला मान्सून अतिशय वेगळा ठरतो. असा मान्सून तयार होण्यामागे एक अतिशय मोठी प्रणाली काम करत असते.   साहजिकच या मान्सूनमधे होणारा कोणताही बदल ही मोठ्या धोक्याची सुचना असते, असं शास्त्रज्ञ मानतात. 

यासोबतच, जगात हवामान बदलाचा सगळ्यात मोठा फटकाही भारतालाच बसणार आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ, हिमनग आणि हिमालयातला बर्फ वितळणं, जिवघेणी वादळं, अति उष्णतेची लाट अशा सगळ्याचे परिणाम भारताला सोसावे लागणार आहेत. हे परिणाम वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी येणार असले तरी त्याचा एकत्रित परिणाम भारताच्या मान्सूनचं भवितव्य ठरवणार आहे.

हेही वाचा : 

डॉन को पकडना चापलुसों को मुमकीन नही!

पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट

 इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट