पुरोगामी पत्रकारितेला प्रोत्साहन देणारे राजर्षी

०६ मे २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं हे स्मृती शताब्दी वर्ष. शाहू महाराजांनी पुरोगामी विचारसरणी मांडणार्‍या चळवळींना प्रोत्साहन दिलं. अनेक पुरोगामी वृत्तपत्र, नियतकालिकं महाराजांच्या अर्थसहाय्य आणि उत्तेजनानेच चालली होती. बहुजन समाजातल्या शिकलेल्या तरुणांना त्यांनी वृत्तपत्र काढायला प्रोत्साहन दिलं होतं. तसंच सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या बातम्यांवर त्यांचं बारीक लक्ष असायचं.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक २ एप्रिल १८९४ला झाला. त्यांनी आपल्या संस्थानातल्या प्रजेचं दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा यांचं सगळीकडे फिरून बारकाईने निरीक्षण केलं, अभ्यास केला. प्रजेच्या दुःखाचं मूळ कशात आहे, हे अभ्यासलं. आपल्या प्रागतिक दृष्टीने त्यांनी पुरोगामी विचारसरणी मांडणार्‍या चळवळींना प्रोत्साहन दिलं.

त्या काळात देशात वर्तमानपत्रांचं युग सुरू झालं होतं. अगदी कोल्हापुरापर्यंतही वृत्तपत्रं येऊन पोचली होती. शाहूराजांनी वृत्तपत्राचं सामर्थ्य जाणलं होतं. त्यांच्याही आधी कोल्हापुरात वृत्तपत्रं सुरू झाली होती.

शाहू महाराजांच्या आधीची वर्तमानपत्रं

‘ज्ञानसंग्रह’ हे कोल्हापूर संस्थानातलं पहिलं वृत्तपत्र नाना मोरोजी त्रिलोकेकर यांनी १८५३ला सुरू केलं. काही काळ ते चालू राहिलं. करवीर संस्थानातले राजनैतिक प्रतिनिधी कर्नल अँडरसन यांनी ‘वर्तमानसंग्रह’ हे मराठी पत्र १८६४ला सुरू केलं. राजदरबारातल्या कामाची माहिती प्रजेला मिळावी म्हणून ते सुरू करण्यात आलं. तेही काही काळ चालल्यानंतर बंद करण्यात आलं.

‘विद्याविलास’ हे वृत्तपत्र १८६६ला रघुनाथ ऊर्फ बाबुराव गोखले यांनी सुरू केलं. कोल्हापुरात हे दीर्घकाळ सुरू राहिलं. ‘विद्याविलास’ हे सुरवातीला मासिक होतं, १८६८ला ते साप्ताहिक स्वरूपात निघू लागलं.

कालांतराने १८६९ला त्याचं दैनिकात रूपांतर झालं. हे राष्ट्रीय चळवळीचा पुरस्कार करणारं पत्र असलं, तरी त्याचा सामाजिक सुधारणांना विरोध होता. वास्तविक हे संस्थानकाळातलं पहिलं दैनिक होतं, पण संस्थानाशी त्याचं सख्य नव्हतं. त्यात देशातली क्रांतिकारी चळवळ, स्वातंत्र्य आंदोलन यासबंधीचा मजकूर प्राधान्याने येत होता.

जागृती करणारं ग्रंथमाला नियतकालिक

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातलं पहिलं नियतकालिक होतं ‘ग्रंथमाला’. ते प्रा. विष्णू गोविंद विजापूरकर चालवत. शाहू राजांच्या राज्याभिषेकावेळी विजापूरकर यांनी ते सुरू केलं. स्वदेश, स्वभाषा आणि स्वधर्म ही तत्त्वत्रयी घेऊन हे प्रजेत जागृती करण्याचे कार्य ‘ग्रंथमाले’नं केलं. महाराजांनी त्याला भरघोस अर्थसहाय्य केलं.

१८९८ला विजापूरकर यांनी ‘समर्थ’ हे साप्ताहिक चालू केलं. त्यांनी ‘समर्थ’ मधून राष्ट्रीय शिक्षण हा विषय प्रामुख्याने हाताळला. पुढे महाराजांचं ‘वेदोक्त’ प्रकरण घडलं. त्यावेळी विजापूरकर यांनी कर्मठ ब्रह्मवृंद आणि लोकमान्य टिळक यांची तळी उचलून धरत महाराजांवर कडवट स्वरूपाची टीका केली. १९००मधे ‘समर्थ’ बंद पडले.

१९०६ला विजापूरकर यांनी ‘विश्ववृत्त’ नामक नव्या वृत्तपत्रातून महाराजांवर टीकेचा भडिमार केला. त्यांना वारंवार समज देऊनही त्यांनी टीका सुरूच ठेवली, तेव्हा महाराजांना नाइलाजाने विजापूरकरांचं अनुदान बंद करावं लागलं.

हेही वाचा: शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा

नियतकालिकांना शाहू महाराजांची मदत

१९१२-१३ च्या सुमारास कोल्हापूर संस्थानात बरीच वृत्तपत्रं सुरू झाली. ही वृत्तपत्रं धार्मिक आणि आध्यात्मिक प्रसाराला वाहिलेली होती. नंतरच्या काळात सामाजिक जागृतीच्या आणि सत्यशोधक विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दिवाण भास्करराव जाधव यांनी ‘दीनबंधू’ सुरू केलं.

भुजंगराव गायकवाड यांचं विजयी मराठा’ आणि बाबुराव यादव यांचं ‘गरिबांचा कैवारी’ ही नियतकालिकंही सुरू झाली. त्यांनी सामाजिक प्रबोधनाचा वसा घेतला होता. १८७७ला कृष्णराव भालेकर यांनी पुण्यातून ‘मराठा दीनबंधू’ हे नियतकालिक सुरू केलं. या सर्वांना महाराजांनी प्रोत्साहन तर दिलंच, शिवाय अर्थसहाय्यही केलं.

प्रतिगाम्यांवर हल्ला करणारी वर्तमानपत्रं

१९१५ नंतरच्या काळात शाहूराजांना वृत्तपत्राचं महत्त्व विशेषत्वाने लक्षात आलं. त्यांनी कुलकर्णी वतन रद्द केलं होतं, त्यामुळे ब्राह्मणांमधले कर्मठ त्यांच्या विरोधात गेले. त्यांनी आपल्या वृत्तपत्रांमधून महाराजांवर जोरदार टीकाप्रहार सुरू केला. त्यांना तितकंच उत्तर देण्यासाठी बहुजन समाजातल्या शिकलेल्या तरुणांना त्यांनी वृत्तपत्र काढायला प्रोत्साहन दिलं. भरघोस अर्थसहाय्य केलं.

त्यातून बळवंत कृष्ण पिसाळ यांनी ‘विश्वबंधू’ हे वृत्तपत्र सुरू केलं. कर्मठ विचारांच्या लोकांवर ‘विश्वबंधू’ सडेतोड टीका करत असे. ती टीका जिव्हारी लागल्यामुळे पिसाळ यांच्यावर तत्कालीन ब्राह्मणी संस्थानिकांनी रोष धरला. पिसाळ यांच्यापेक्षाही जहाल टीका करणारे दिनकरराव जवळकर पुण्यात होते. केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांनी टिळक गोटाच्या प्रतिगामी प्रवृत्तींवर प्रखर हल्ला चढवला. महाराजांनी त्यांना कोल्हापूरला आणलं. त्यांना अर्थसहाय्य केलं.

दिनकररावांनी ‘तरुण मराठा’ हे पत्रक सुरू केलं. त्यातून त्यांनी लोकमान्य टिळक आणि ब्राह्मणी संस्थानिकांवर तुफानी टीका करायला सुरवात केली. ही टीका सहन होऊन औंधच्या महाराजांनी ब्रिटिश राजप्रतिनिधींकडे दिनकररावांविरुद्ध तक्रार केली. ब्रिटिशांनी शाहू महाराजांकडे याचं स्पष्टीकरण मागितलं. त्यामुळे शाहूराजांनी नाइलाजाने दिनकररावांना पुण्याला परत पाठवून दिलं.

पुण्यातले केशवराव बागडे आणि कीर्तीवानराव निंबाळकर यांनी पुरोगामी विचाराच्या प्रसारासाठी ‘शिवछत्रपति’ हे वृत्तपत्र शाहू महाराजांच्या अर्थसहाय्याखाली सुरू केलं. सत्यशोधक विचारांचे खंदे समर्थक असलेल्या वा. रा. कोठारी यांनी १९१७ला पुण्यातून ‘जागरूक‘ हे वृत्तपत्र सुरू केलं. त्याला शाहूराजांनी तीन हजार रुपये अर्थसहाय्य केलं. कोठारी यांनी जिद्दीने आणि करारी बाण्याने ‘जागरूक’ चालवलं.

हेही वाचा: शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

सत्यशोधक चळवळीचं मुखपत्र

त्याच काळात सुरू असलेल्या प्रागतिक आणि सत्यशोधक चळवळीला श्रीपतराव शिंदे यांच्या ‘विजयी मराठा’चं मोलाचं योगदान लाभलं. वास्तविक श्रीपतराव हे बडोद्याला पोलिस खात्यात फौजदार होते. पण ती सरकारी नोकरी सोडून ते पुण्यात आले. तिथे त्यांनी १ डिसेंबर १९१९ पासून ‘विजयी मराठा’ हे पत्र सुरू केलं. एका संसारी माणसाने सरकारी नोकरी सोडून आल्याबद्दल शाहूराजे त्यांच्यावर वरकरणी तरी रागावले. पण श्रीपतरावांनी जिद्दीने ‘विजयी मराठा’ चालवले.

५ डिसेंबरला धार इथं मराठा शिक्षण परिषदेचं अधिवेशन होतं. तिथं विजयी पत्राचे अंक वाटण्यात आले. सत्यशोधक विचाराच्या प्रचाराच्या दृष्टीने त्यांचा खूप उपयोग झाला. पहिल्या अंकाच्या वेळी खंडेराव गणपतराव भालेकर हे श्रीपतरावांचे निकटचे सहकारी होते. ‘विजयी मराठा’ प्रसिद्ध झाला, तेव्हा १९१८च्या नव्या राजकीय सुधारणांची घोषणा झालेली होती आणि पुढे १९२०मधे नव्या कायद्यानुसार निवडणुका झाल्या. शाहू महाराजांना श्रीपतरावांविषयी आपुलकी वाटत होती, कौतुकही वाटत होतं.

‘विजयी मराठा’ हे सत्यशोधक चळवळीचं चांगलं मुखपत्र बनलं. बहुजनांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेलं ते पत्र होतं. मराठा समाज तसंच शिक्षणात मागास असलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक, शिक्षण या विषयांना ते वाहिलेलं होतं. शाहू महाराजांनी नंतर त्याला अर्थसहाय्य सुरू केले. महाराजांचं ६ मे १९२२ला निधन झालं. त्यानंतर त्यांच्या प्रथम पुण्यदिनी विजयी मराठ्यांचा खास अंक काढण्यात येऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या अंकातल्या संपादकीयात शाहू महाराजांच्या कार्याचं महत्त्व सांगण्यात आलं होतं.

सुशिक्षित तरुणांना वृत्तपत्रासाठी प्रोत्साहन

अहमदनगर जिल्हयातल्या सोमठाणा नामक एका खेड्यातून मुकुंदराव पाटील यांनी ‘दीनमित्र’ हे पत्र सुरू केलं. त्यालाही महाराजांनी भरघोस अर्थसहाय्य केलं. हे पत्र अनेक प्रतिगामी आणि विषमतावादी हल्ल्यांना तोंड देत जगलं. बिकट आर्थिक संकट कोसळलेलं असताना महाराजांनी त्यांना तारून नेलं. याच मुकुंदराव पाटील यांनी ‘कुलकर्णी लीलामृत’ हे उपरोधिक काव्य लिहिलं. 

महाराजांनी जसं मध्य महाराष्ट्रातल्या ‘दीनमित्र’ला सहाय्य केलं, तसं बेळगावातल्या श्यामराव देसाई आणि श्यामराव भोसले या सुशिक्षित तरुणांना वृत्तपत्र सुरू करायला उत्तेजन दिलं. त्या दोघांनी ‘राष्ट्रवीर’ हे वृत्तपत्र सुरू केलं. त्यामधून त्यांनी महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या समतेच्या विचाराचा प्रसार करायला सुरवात केली.

हेही वाचा: शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!

'मूकनायक’मागे शाहू महाराज

केवळ मराठीच नाही, तर भारतीय वृत्तपत्रसृष्टीतच १९२० मधे एक क्रांतिकारक गोष्ट घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या वेदनांना वाचा फोडणारं ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र मुंबईतून सुरू केलं. ३१ जानेवारीपासून उच्चविद्याविभूषित बाबासाहेबांनी हे पत्र सुरू केलं. महाराजांनी अडीच हजार रुपयांचं भरघोस अर्थसहाय्य केलं.

'जर या हिंदुस्थान देशातील सृष्ट पदार्थांच्या व मानजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले तर, हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे, असे निःसंशय दिसेल,' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ’मूकनायक’च्या पहिल्या अंकात लिहिलेल्या लेखामधलं सुरवातीचं वाक्य आहे. हे आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारितेच्या स्वरूपाचं लेखन असावं.

दलित, गरीब आणि शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोचवणं हा या पाक्षिकाचा उद्देश होता. ‘मूकनायक’मधे बाबासाहेबांनी वैचारिक लिखाण केलं. कालांतराने बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला निघून गेले. त्यामुळे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ‘मूकनायक’ सव्वातीन वर्षांपेक्षा जास्त काळ चालू शकलं नाही. एप्रिल १९२३ला ते बंद पडलं पण शाहू महाराजांच्या प्रेरणा आणि प्रोत्साहनातून सुरू झालेल्या ‘मूकनायक’ची कामगिरी इतिहासात नोंद घेण्यासारखी आहे.

बातम्यांसाठी वृत्तपत्र निरीक्षकाची नेमणूक

बडोद्याच्या भगवंतराव पाळेकर यांचं ‘जागृति’, विदर्भातल्या काशिनाथ देशमुख यांचं ‘सुबोधमाला’ ही वृत्तपत्र हे महाराजांच्या अर्थसहाय्य आणि उत्तेजनानेच चालली होती. १९२०-२१ च्या दरम्यान श्रीपतराव शिंदे यांचं ‘विजयी मराठा’ आणि कोठारी यांचं ‘जागरूक’ यांच्यात नेमस्त ब्राह्मणांचं सहकार्य ब्राह्मणेतरांनी घ्यावं का? या विषयावर एक संघर्ष झाला. पण, आपापसातल्या अशा यादवीमुळे परिवर्तनाच्या चळवळीला ओहोटी लागेल, म्हणून शाहूरायांनी त्यांच्यात समेट घडवून आणला.

देशातलं राजकारण आणि एकूणच घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराजांनी मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित होणारी देशातली सगळी वृत्तपत्रं राजवाड्यावर मागवली होती. त्यातल्या राष्ट्रीय चळवळीच्या आणि कोल्हापूर संस्थानाविषयीच्या ते काळजीपूर्वक वाचत असत. सत्यशोधक आणि बाह्मणेतर चळवळीच्या बातम्यांवर त्यांचं बारीक लक्ष असायचं.

महत्त्वाच्या बातम्यांची कात्रणं करून त्यांची चिकटवही करून त्यांची धारिका बनवून त्या राजवाड्याच्या ग्रंथालयात जमा करण्यात येत. त्यासाठी रावबहाद्दूर महादेव डोंगरे यांना त्यांनी ‘वृत्तपत्र निरीक्षक' म्हणून नेमलं होतं. अशाप्रकारे वृत्तपत्रांचं महत्त्व ओळखून त्यांना प्रोत्साहन देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे एक विरळाच राजे होते.

हेही वाचा: 

शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी

आंबेडकरांनी नाकारलेला शब्द पंतप्रधानांनी वापरू नये

गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कूळकथा

शाहू महाराजांवरचं पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय? आपण वाचलंत का?