आसाममधल्या कामाख्या देवीच्या मंदिरात आंबुवाची पर्व म्हणजेच मासिक पाळीचा उत्सव सुरू झालाय. असे सण कश्मीर, केरळ आणि ओडिसातही साजरे होतात. धरणी मातेला मासिक पाळी येते आणि ती नवनिर्मितीसाठी तयार होते, अशी यामागची धारणा आहे. एकीकडे पाळीचा उत्सव करायचा तर दुसरीकडे तिला तुच्छतेचं लेबल लावून बाजुला सारायचं. हे दोन्ही परस्पर विरोधी विचार करणारा समाज एकच आहे.
कामाख्या देवी. आसामची राजधानी गुवाहाटीमधे या देवीचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे. पण गेले चार दिवस मंदिर बंद आहे. खरंतर, कोरोनामुळे राज्यातली सगळीच मंदिरं बंद आहेत. पण २२ जूनपासून कामाख्या देवीचं मंदिर पुजाऱ्यांसाठीही बंद झालंय. पहाटे देवीचं स्नान होत नाही, तिची पूजा होत नाही की इतर कोणतीही धार्मिक कार्य होत नाहीयत. २६ तारखेलाच देवी कुलपातून बाहेर येईल. २२ ते २६ जून या काळात कामाख्या देवीचं आंबुवाची पर्व चालू असेल. आंबुवाची पर्व म्हणजे देवीची मासिक पाळी.
कामाख्या देवीला दरवर्षी जून महिन्यात अशीच मासिक पाळी येते. याकाळात देवीचं मंदिर भाविकांसाठी, पुजाऱ्यांसाठी पूर्णपणे बंद असतं. पण परिसरात आंबुवाची यात्रा भरते. हजारोंनी भाविक मंदिराच्या आवारात येतात. सगळीकडे दिव्यांची रोषणाई केलेली असते. देवीची वस्त्र, लहान मुलांसाठी खेळणी यांची रंगीबेरंगी दुकानं थाटली जातात. बंगाल आणि बिहार या भागातून आलेल्या आंब्यांनी आणि टपोऱ्या झेंडूच्या फुलांनी परिसर सजवला जातो. देवीची गाणी, वाद्यांचा आवाज सगळ्या वातावरणात भरलेला असतो. मंदिराला कुलूप लागलं की बाहेर देवीची मासिक पाळी सेलिब्रेट करण्यासाठी आबुंवाची उत्सव सुरू होतो.
सध्या कोरोनामुळे ही यात्रा रद्द केलीय. भाविकांना प्रवेश नाहीय. पण आंबुवाची उत्सव सुरू झालाय. देवीची मासिक पाळी सुरू झालीय, असं समजून तिला एकटं सोडलंय. आता २६ तारखेला सकाळी स्नान केल्यानंतर देवीचं दर्शन घेता येईल. या दर्शनावेळी प्रसाद म्हणून लाल रंगाचा ओला कपडा दिला जाईल. याला रक्तवस्त्र असं म्हणतात. मासिक पाळीच्या काळात देवीनं वापरलेल्या या वस्त्राची पूजा केली तर घरात भरभराट होते, असा समज इथं आहे.
हेही वाचा : मुलीच्या मासिक पाळीने देवाचं ब्रम्हचर्य भ्रष्ट होईल?
खरंतर, मासिक पाळी हा आपल्याकडचा सगळ्यात जास्त टॅबू असणारा विषय. बाईच्या मासिक पाळीबद्दल कुणी बोलायचं नाही, कुणाला विषेशतः घरातल्या पुरुषांना कळू द्यायचं नाही. कावळा शिवलाय, आजारी आहे असं काहीतरी म्हणत मासिक पाळीच्या काळात शिवताशिवत पाळायची, जमिनीवर झोपायचं, अमकं तमकं खायचं नाही, मासिक पाळीत बाई अशुद्ध असते त्यामुळे तिनं देवळात जायचं नाही, देवाचं काही म्हणायचं नाही असे अनेक नियम आजही घराघरात पाळले जातात.
दरवर्षी मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या संस्था मासिक पाळी उलट कशी शुद्ध आहे, नवनिर्मितीचं प्रतिक आहे, मासिक पाळी आली नाही तर आपला जन्म होणार नाही असं बरंच काही सांगून पाळीबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. पण तरीही मासिक पाळीभोवतीचं गुढतेचं वलय, अंधश्रद्धांचं प्रमाण काही कमी होत नाही. घरातल्या बाईला मासिक पाळी आली की त्रास सोसावाच लागतो.
बाईची मासिक पाळी आली म्हणून दर महिन्याला तीन दिवस उत्सव साजरा होत नाही. उलट घरातलं काम करायला, स्वयंपाक करायला एक माणूस कमी झाला म्हणून तिच्यावर चिडचिडच केली जाते. त्यातही घरात ती एकटीच बाई असेल आणि तिच बाजूला बसली तर मासिक पाळी आली म्हणून तिलाच दोष दिला जातो. जसं काही मासिक पाळी कधी यावी आणि कधी नाही हे तिच्या हातात असतं. मासिक पाळीचा सण फक्त कामाख्या देवीच्याच नशीबात आहे.
ही कामाख्या देवी अतिशय महत्त्वाचं शक्तीपीठ आहे. सतीच्या देहाचे तुकडे झाल्यावर तिचे अवयव पृथ्वीवर ठिकठिकाणी येऊन पडले. ते जिथं पडले तिथं तिथं मंदिरं उभी राहिली. कामाख्या देवी म्हणजे सतीची योनी आहे, असं मानलं जातं. या देवीला सामान्य बायांप्रमाणे दर महिन्याला पाळी येते. पण फक्त आषाढ महिन्यातली मासिक पाळी साजरी केली जाते.
प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक रा.चिं.ढेरे यांनी त्यांच्या 'लज्जागौरी' या पुस्तकात कामाख्या देवीची मासिक पाळी म्हणजे खरंतर पृथ्वीची, धरणीची मासिक पाळी असल्याचं म्हटलंय. पाऊस पडू लागला की पृथ्वीला नवी पालवी फुटत असते. रा.चिं.च्या भाषेत, अन्नाचा गर्भ वाहण्याची क्षमता तिच्यात विकसित होते. त्यामुळे आंबुवाची सणाचा शेती संस्कृतीशीच संबंध असल्याचं ढेरे सांगतात.
आंबुवाचीचा शेतीशी असणारा संबंध दाखवून देताना कृषीशास्त्रीय ग्रंथातला एक श्लोक ढेरेंनी उदाहरण म्हणून दिलाय. मूळ संस्कृत श्लोकाचा अर्थ असा की, द्यौ म्हणजे सूर्य हा पुरुष आहे. धरणी ही नारी आहे. या द्यौकडून आलेले पावसाचे थेंब हे बीज आहे. द्यौ, धरणी आणि पावसाचे थेंब यांच्या संयोगातून धान्य येतं. ढेरे लिहितात, ‘वर्षेच्या प्रारंभकाळात अंतरी ओलावलेल्या धरणीचे रूप रजस्वलावस्थेच्या धारणेने स्वीकारले जाणे स्वाभाविक आहे. मृगाच्या धारांत चिंब झालेली धरणी आद्रेच्या प्रारंभकाळात अंतरी पुरेशी आर्द्र होते आणि त्यानंतच ती नवसर्जनाचा गर्भ वाहू शते. धरणीची ही गर्भधारणक्षम आर्द्रता आंबुवाची या संज्ञेने अभिव्यक्त झाली आहे.’
म्हणूनच आसाममधे आंबुवाची उत्सव सुरू असताना जमिनीवरुन नांगर फिरवणं, बीज लावणं पाप मानलं गेलंय. बीज लावलंच तरी चांगलं पीक येत नाही, अशी तिथली लोकांची धारणा आहे. आसाममधल्या कामरुप जिल्ह्यात या सणाला ‘अमती’ म्हटलं जातं. बंगालच्याही काही भागात असाच उत्सव साजरा केला जातो.
हेही वाचा : मासिक पाळीविषयी आपल्या मुलामुलींशी कसं बोलायचं?
आसाममधे आंबुवाची उत्सव असतो तर ओडिसामधे रजप्रभा किंवा रजउत्सव साजरा करतात. सणात बायका नटून थटून एकत्र जमतात. तीन दिवस घरातलं काम करायला मनाई असते. उपास करायचा, एकत्र येऊन गाणी म्हणायची, मुलींनी झोपाळ्यावर झुलायचं आणि जमिनीवर पाय ठेवताना पायात चपला घालायच्या असतात. यावर्षी नुकताच १४,१५ आणि १६ जूनला हा सण ओडिसात साजरा झाला
या तीन दिवसांना पहिली रज, भुई नअण आणि ठाकुराणी गाधुआँ अशी नावं आहेत. याही दिवसात नांगर धरणं, पेरणी करणं, जमीन खोदणं याला मनाई असते. ओडिसात सगळीकडे सुट्टी जाहीर केलेली असते. सण सुरू व्हायच्या आधीच बायका तयारीला लागलेल्या असतात.
रा.चिं. ढेरे सांगतात त्याप्रमाणे ‘राज्ञीस्नापन’ या नावाचं एक व्रत काश्मीर प्रदेशातही पाळलं जातं. ‘राज्ञीस्नापन’ याचा अर्थ होतो ‘राणीचं न्हाणं’. यातली राणी म्हणजे सूर्याची पत्नी म्हणजेच पृथ्वी. चैत्रात हा सण साजरा होतो. तीन दिवस काश्मीर भूमीची मासिक पाळी सुरू असते आणि चौथ्या दिवशी ती शुद्ध होते, अशी मान्यता आहे. चौथ्या दिवशी काश्मीर भूमीची शिलामुर्ती केली जाते. तिला अभ्यंग स्नान, नेवैद्य वगैरे करायचा असतो. तिची पूजा फक्त स्त्रियांनीच करायची असते.
आंबुवाची सारखेच ‘त्रिप्पुखरट्टू’ आणि ‘उछारल’ हे उत्सव केरळमधे साजरे केले जातात अशी माहिती ढेरेंनी दिली आहे. आंबुवाचीमधे दिला जातो तसाच रक्ताच्या कापडाचा तुकडा प्रसाद म्हणून ‘त्रिप्पुखरट्टू’ उत्सवातही दिला जातो. त्यासाठी ते रॉबर्ट बिफ्रॉ या फ्रेंच सर्जनच्या ‘दि मदर्स’ या इंग्रजी ग्रंथाचा आधार घेतात. जानेवारी फेब्रुवारी महिन्यात शेतीचा हंगाम संपल्यावर केरळमधे ‘उछारल’ साजरा होतो. शेतीची सगळी अवजारं तीन दिवस एका खोलीत ठेवली जातात. तीन दिवसांनी भगवती देवी शुद्ध झाल्यावरच ती खोली उघडली जाते.
असा कुठलाही पारंपरिक सण महाराष्ट्रात साजरा केल्याचं ढेरेंनी नोंदवलेलं नाही. पण अलिकडेच मासिका महोत्सव साजरा करणं चालू झालंय. म्यूस फाऊंडेशनकडून महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या भागात हा महोत्सव साजरा केला जातो. मासिक पाळीविषयीच्या गैरसमजुती दूर व्हाव्यात, खेड्यापाडातल्या सगळ्या मुलींना मासिक पाळीसाठीची आवश्यक ती साधनं मिळावीत यासाठी जनजागृती केली जाते.
हेही वाचा : साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!
पृथ्वीला माता म्हटलं जातं. बाई आणि पृथ्वी यांची एकमेकांशी सांगड घालण्याची वृत्ती फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. त्यावरुनच अशा लोकपरंपरा तयार होतात. मासिक पाळी आल्याशिवाय जसं स्त्रीला बाळ होऊ शकत नाही. तसंच पृथ्वीही पावसाळा सुरू झाला की नवीन सृष्टीला जन्म देत असते. याचा अर्थ तिलाही त्याआधी मासिक पाळी येत असणार. त्यासाठीच पृथ्वीची वेगवेगळ्या स्वरुपातली मुर्ती घडवून तिची योनी पुजली जाते.
प्रजननशक्तीची पूजा ही माणसाच्या इतिहासातली पहिली पूजा आहे, असं अनेक अभ्यासक म्हणतात. ही प्रजनन शक्ती बहरत रहावी म्हणून आजही अनेकजण आपल्या घरात खड्डा खणून त्यामधे नवजात अर्भकाची नाळ पुरतात आणि त्यावर दिवा लावतात. मासिक पाळीचं रक्त नवीन जीवन निर्माण करणारं सृजनाचं प्रतीक म्हणून फार पुर्वीपासून ओळखलं जातं. अनेक वर्षांपूर्वी बाईच्या मासिक पाळीचं रक्त शेतात शिंपडण्याची प्रथाही अस्तित्वात होती. स्त्रीला गर्भाशय असतं तसंच पृथ्वीलाही असतं. यातूनच पहिले जमिनीवरची आणि नंतर स्त्रीवरची मालकी घट्ट होत गेली असावी.
आजही महाराष्ट्रासकट भारतातल्या अनेक राज्यात मुलीला पहिली मासिक पाळी आली की त्याचं सेलिब्रेशन केलं जातं. मुलीला हिरवे कपडे घालून, बांगड्या भरून गोडधोड खायला दिलं जातं. ती आई होण्यासाठी सक्षम झाली या गोष्टीचा मनापासून आनंद साजरा केला जातो. नंतर मात्र तिला बाजुला बसवून मासिक पाळीचे नियम चालू होतात.
एकतर मासिक पाळी येते म्हणजे आपल्या शरीरात काही वेगळं घडतंय या भावनांनी मुलगी गोंधळून गेलेली असते. त्यातच एकीकडे पहिल्या मासिक पाळीचा उत्सव करुन, सण साजरा करून तिचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. तरीही मासिक पाळी मुलींना शाप वाटतो. स्वतःच्याच शरीराविषयी घाणेरडेपणाची भावना निर्माण करणारी बंधनं या काळात मुलींना पाळावी लागतात. मासिक पाळीबद्दलचे हे दोन परस्पर विरोधी दृष्टिकोन तयार करणारा समाज एकच आहे.
एकतर तो त्याची पूजा करतो किंवा त्याला तुच्छतेचं लेबल लावून बाजुला सारतो. हा दृष्टिकोन बदलण्याचे प्रयत्न करणाऱ्या संस्था, स्वतःला आधुनिक म्हणवणाऱ्या महिलाही मासिक पाळी नवनिर्मितीसाठी कशी गरजेची आहे हेच सांगत राहतात. पण मासिक पाळी येते याचा अर्थ नवनिर्मिती केलीच पाहिजे असा होत नाही. अनेकींना मासिक पाळी येत असूनही मूल होतच असंही नाही. असं होत असेल तरी त्यात एवढं मोठं काही नाही, हेही पोचवायला पाहिजे.
पाळीकडे पवित्र, अपवित्र, गरजेची, बिनगरजेची, शुद्ध अशुद्ध असं काहीही न पाहता बाईच्या शरीरातली साधी वैज्ञानिक प्रक्रिया म्हणून आपण पाळीला का स्वीकारत नाही?
हेही वाचा :
लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?
मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याच्या निर्णयाचं आपण स्वागत करायला हवं?
राधिका सुभेदार सांगते, मासिक पाळीविषयी गुप्तता नको स्वच्छता बाळगा
बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार