भारतातले चिन्मय-तन्मय अमेरिकेत ज्ञानासोबत जात भेद घेऊन गेलेत

२९ मे २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


एकीकडे गणेशोत्सव, मुंज, वैदिक पद्धतीनं लग्न तर दुसरीकडे ‘थँक्स गिविंग’सारख्या अमेरिकन उत्सवाची नक्कल, यात उच्चवर्णीय अडकलेत, तर त्याचवेळी इथून गेलेल्या बहुजनांना ते वाईट वागणूक देत असल्याच्या तक्रारी पुढं येतायत.

बफेलोमधल्या हत्याकांडाच्या किंकाळ्या विरतात न विरतात तोच टेक्ससमधे शाळेत जाऊन एका माथेफिरूनं गोळीबार करत आणखी काही चिमुकल्यांचा बळी घेतला. टेक्सस या राज्यात शस्त्रास्त्रं बाळगणं कायदेशीर आहे. शिवाय शस्त्रास्त्रांना पाठिंबा देणाऱ्या रिपब्लिकन पक्षाची तिथं सातत्यानं सत्ताही. श्वेतवर्णीयांच्या प्रभुत्ववादी गटांच्या कारवायाही तिथं सतत चालू असतात. तर ट्रम्पनंतरची अमेरिका ही अशी एका वेगळ्या आवर्तात सापडलेली आपल्याला पाहायला मिळते.

ट्रम्प यांचं प्रभुत्ववादी राजकारण

बराक ओबामांच्यासारखा कृष्णवर्णीय सलग दोनवेळा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला खरा. दोन्ही वेळी निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाची यंत्रणा ओबामांनी अत्यंत पद्धतशीर राबवली. क्लिंटन दांपत्याचा पगडाही या पक्षावर होता. अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडन, ओबामांच्या काळात अमेरिकेचे उपाध्यक्ष होते.

तरीही ट्रम्प यांच्या विरोधात ओबामांनी अध्यक्षपदासाठी त्यांच्या परराष्ट्र मंत्री असलेल्या हिलरी क्लिंटन यांच्या परड्यातच आपलं वजन टाकलं. पण ओबामांच्या निवडणुकीच्या वेळी डेमॉक्रॅटिक पार्टीची यंत्रणा जशी शिस्तबद्धतेनं राबली, तशी ती हिलरींच्या वेळी सर्वत्र राबली, असं घडलं नाही. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले.

अल्पकाळ यश मिळालं तरी, प्रभुत्ववादी राजकारणाच्या मर्यादाही असतात. समस्यांना सर्वंकष विचार करून भिडण्याऐवजी आपलं अपयश झाकण्याकरता त्यांना सतत एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत रहावं लागतं. अमेरिकेच्या समस्या या मेक्सिकोतून झालेल्या घुसखोरीतून निर्माण झाल्या, असं एकीकडे ट्रम्प खुलेआम बोलत राहिले. मेक्सिकेच्या सीमेवर भिंत उभारू, अशा वल्गनाही करू लागले.

हेही वाचा: माणुसकीचे धागे मजबूत करणारी गडहिंग्लजची सलोखा परिषद

वर्णवादाला साथ जातीयवादाची

दुसरीकडे, श्वेतवर्णीय प्रभुत्ववादी आपल्या समस्यांचं खापर, कृष्णवर्णीयांची गुलामगिरी संपुष्टात आल्यानंतर त्यांना समान संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राबवलेल्या कृष्णवर्णीयांसाठीच्या राखीव जागांवर फोडत राहिले. प्रभुत्ववादी श्वेतवर्णीयांसाठी बाहेरून आलेले सारे कृष्णवर्णीय- मग ते आफ्रिकन अमेरिकन असोत किंवा आपल्याकडून गेलेले चिन्मय-तन्मय असोत किंवा जगभरातले इतर वांशिक समूह, हे सगळेच त्यांच्या बेरोजगारीसारख्या समस्याचं मूळ आहेत.

आपल्याकडून गेलेले पांढरपेशे ‘ब्लॅक लाईफ मॅटर्स’सारख्या कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी झालेल्या आंदोलनात अभावानेच दिसले. उलट ते श्वेतवर्णीयांशी नातं जोडू पाहतात, हे वास्तव आहे. भारतातून गेल्या ४०-५० वर्षांत मोठ्या प्रमाणावर अभियंते, डॉक्टर, संशोधक तिथं गेले. भारतातल्या कमी खर्चातल्या शिक्षणाचा लाभ घेऊन प्रारंभी आपल्याकडचे पांढरपेशे उच्चवर्णीय अमेरिकेत दाखल झाले. जाताना शिक्षण आणि ज्ञानाबरोबरच आपली जातीव्यवस्थाही ते तिथं घेऊन गेले.

नंतर बहुजनांनीही, आपल्याला तिथंच भरभराटीची वाट सापडेल, म्हणून अमेरिकेचा रस्ता धरला. आज जातीव्यवस्थेचा चटका अमेरिकेत या बहुजनांना बसताना दिसतोय. गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, सिस्कोसारख्या मोठ्या कंपन्यांमधे सुमारे २०-२२% भारतीय आहेत. त्यांच्यातूनच भेदभावपूर्ण वागणुकीच्या तक्रारी आल्या असून सिस्कोमधलं एक प्रकरण तर न्यायालयाची पायरीही चढलंय.

सिस्कोमधलं अय्यर-कॉम्पला प्रकरण

सुंदर अय्यर आणि रमणा कॉम्पला या आयआयटीच्या एकाच बॅचच्या दोघांमधला हा किस्सा. सुंदरला २० वर्षांपूर्वी मेरिट लिस्टमधे रमणाचं नाव दिसलं नाही, तेव्हा तो राखीव जागांमधून निवडला गेल्याचं सुंदरच्या लक्षात आलं. पुढे दोघेही चांगल्या मार्कानं पदवीधर झाले. मधे बराच काळ गेला आणि २० वर्षांनंतर दोघांची गाठ पडली अमेरिकेत सिस्को या मोठ्या आयटी कंपनीत.

रमणाचं तोवर बरं चाललं होतं. पण त्यानंतर रमणाला आलेले अनुभव विचित्र होते. इतर भारतीयांची त्याच्याबरोबरची वागणूक बदलली होती. मग त्याचा संघर्ष सुरु झाला. अनेक वर्षांच्या तपासानंतर कॅलिफॉर्निया सरकारनेच हा मामला सिस्कोविरूध्द न्यायालयात नेला. आता दलितांना या कंपन्यातल्या उच्चवर्णीय भारतीयांकडून मिळणाऱ्या वागणुकीच्या तक्रारींची दखल या कंपन्यांना घ्यावीच लागलीय.

नोकरीत घेताना ‘वर्ण आणि धर्मावरून भेदभाव अमेरिकेतल्या नागरी हक्कविषयक कायद्यान्वये बेकायदेशीर आहेत’ असं प्रत्येकाला लेखी दिलं जातं आणि ते मान्य केल्यावरच नोकरीत रूजू होता येतं. अमेरिकेत कृष्णवर्णीयांनी भेदभावाविरोधात प्रदीर्घकाळ केलेल्या आंदोलनाची परिणती या कायद्यात झाली होती. पण त्यात ‘जातीवर आधारित भेदभावा’चा अंतर्भाव नव्हता. अमेरिकेला भारताकडून मिळालेला हा एक दुर्दैवी वारसा.

एकीकडे गणेशोत्सव, मुंज, वैदिक पद्धतीनं लग्न तर दुसरीकडे ‘थँक्स गिविंग’सारख्या अमेरिकन उत्सवाची नक्कल, यात उच्चवर्णीय अडकलेत, तर त्याचवेळी इथून गेलेल्या बहुजनांना ते वाईट वागणूक देत असल्याच्या तक्रारी पुढं येतायत. न्यू जर्सीमधे तर उच्चवर्णीय आणि दलित शीख यांची दोन वेगळी गुरुद्वारे आहेत, असं माझ्या मित्रानेच सांगितलं.

हेही वाचा: चळवळीच्या यशाचे मापदंड आज बदलतायत

ओबामांची सेकंड इनिंग

दोनदा अध्यक्षपद भूषवलेले ओबामा आता निवडणूक लढू शकत नाहीत. मग ते काय करतात, असा मला प्रश्न पडला होता. तर ओबामांनी ‘हायर ग्राउंड’ ही मनोरंजन क्षेत्रातली निर्मिती संस्थाच सुरु केलीय.

‘ओबामा जी जीवनमूल्यं मानतात, त्याचं प्रतिबिंब या कंपनीच्या सर्व निर्मितींमधे पडलेलं दिसेल’, असं जाहीर करत या निर्मिती संस्थेची घोषणा झाली आणि ‘नेटफ्लिक्स’सोबत या कंपनीचा तसा करारही झाला. एवरेस्टवर चढाई करणाऱ्या शेर्पा तेनसिंगवरचा सिनेमा, जगभरातले वैविध्यपूर्ण नॅशनल पार्क ही मालिका तसंच इतर अनेक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्सची घोषणा ओबामांनी केलीय.

यावर, ‘ओबामा आता कोट्यवधी डॉलर कमावण्याच्या मागं लागलेत,’ अशी टीका त्यांचे टीकाकार करतायत, तर ‘यातून ओबामा चांगल्या मूल्यांचा प्रसार तर करतीलच, पण त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते जगभरातल्या वंचितांसाठी नक्की काहीतरी करतील,’ असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करतात.

भेदभावाच्या विरोधाभासांची अमेरिका

न्यूयॉर्कमधे भेटलेले दोन उबर ड्रायवर अगदी प्रातिनिधिक होते. एक होता पाकिस्तानी अमेरिकन. त्याचे वडील १९८०च्या सुमाराला अमेरिकेत आले. मग हा २००६ला आला. आता त्याचं सगळं कुटुंब अमेरिकेत आहे. इथं यायचं कारण विचारल्यावर त्यानं पाकिस्तानी राज्यकर्त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. सगळे भ्रष्ट, मग दुसरा पर्याय काय देश सोडण्याशिवाय, असा सवालच त्यानं केला.

नंतर एका ठिकाणी जाताना एक आर्मेनियन वंशाचा ड्रायवर भेटला. याचं नाव गॅरी. एकेकाळी सोविएत युनियनचा भाग असलेल्या जॉर्जियातून सात वर्षांपूर्वी गॅरी अमेरिकेत आला. आत कसा शिरलास या प्रश्नावर, मेक्सिकोमधून असं तात्काळ उत्तर त्यानं दिलं. मेक्सिकोतून सीमा ओलांडताना अमेरिकन सुरक्षा दलांनी त्याला अटक केली.

काही आठवडे तुरुंगात काढले आणि मग राजकीय आश्रयासाठी त्यानं अर्ज केला आणि त्याला तो मिळालाही. मग त्यानं थेट न्यूयॉर्क गाठलं. आता त्याच्याकडे ग्रीन कार्ड आहे. सगळ्या कुटुंबाला मी अमेरिकेत घेऊन आलोय, असं गॅरीनं आनंदानं सांगून टाकलं. भारतीय, कृष्णवर्णीयांची वस्ती असलेल्या क्वीन्स या भागात हे दोघंही राहतात. 

अशी असंख्य विरोधाभास असलेली अमेरिका. श्वेतवर्णीय-कृष्णवर्णीय, जगभरातल्या अनेक वांशिक समूहांसाठी स्वप्नवत् असलेली. शस्त्रास्त्रांचा खुलेआम संचार असलेली. भारतीयांनी तिथं नेलेली जातीव्यवस्था अनुभवणारी. जगभरातून होणारी घुसखोरी आणि एवढं असूनही अनेकांना खुणावणारी, आकर्षित करणारी अमेरिका.

हेही वाचा: 

दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?

‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

(लेखक राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष तसेच सिनेमा निर्माते आहेत.)