...पण मुख्यमंत्री बनलेलं बघायला आई नव्हती

२६ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


मराठीतील संपादकांचं आपल्या आईविषयीचं मनोगत असलेल्या ‘मु. पो. आई’ या पुस्तकाचं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी प्रकाशन केलं. मंगळवारी, २३ नोव्हेंबरला मुंबईत हा कार्यक्रम झाला. पत्रकार संदीप काळे संपादित या पुस्तकाला शरद पवारांचीच प्रस्तावना आहे. आपण राजकारणात सध्या जे काही आहोत, ते सगळं आईमुळं अशी प्रांजळ भावना पवारांनी या प्रस्तावनेत नोंदवलीय.

जगाची उत्पत्ती कशी झाली, कधी झाली याविषयीचं कल्पनाविश्व अमर्याद आहे. उत्क्रांतीने हे घडलं असंल, निर्जीवाकडून जीवित्वाकडे हा प्रवास झाला असंल. संस्कृतीसभ्यतेच्या जडणघडणीतला महत्त्वाचा धागा, कुटुंबव्यवस्थेचा गाभा म्हणजे आई! आई जन्मदात्री, आई पोषिंदा, आई पालनहार, आईच तारणहार! ‘आई’या विषयावर लिहायला शब्द कमी पडतात. लिहिलेले शब्दही तोकडे वाटतात. इतका अपार महिमा आहे, ह्या विश्वात्मक नात्याचा!

आई खरंच घरात गजबजलेलं गाव असतं. आई हेच आपलं विश्व असतं. आपण चारचौघात बसलेलो असू, कितीही व्यापात असू: पण तिची आठवण क्षणभर जरी आली आणि ती समोर नसली की, मनात प्रकर्षाने एक प्रकारची पोकळी जाणवते. जीवला ओढ लागते, ‘आई’ हा शब्द उच्चारला किंवा मनात आला, तरी आपणाला लहान झाल्यासारखं वाटतं. याला वयाचं बंधन नाही. आई आहे,तोपर्यंत आपण मानाने अथवा पदाने कितीही मोठे असू: तिच्यासमोर आपण मूलच असतो.

मी मुख्यमंत्री व्हावं हे आईचं स्वप्न!

माझी सामाजिक आणि राजकीय जडणघडण झाली ती आईमुळेच! माझ्या जन्माआधी माझी आई ‘शारदाबाई पवार’ पुणे जिल्हा लोकल बोर्डावर निवडून गेलेल्या प्रतिनिधी होत्या. आईला आम्ही भावंडे ‘बाई’ असं संबोधत असू. आपलं प्रत्येक मूलं शिकलं पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रात स्वबळावर मुलं उभी राहिली पाहिजेत, ह्या बाईंचा ध्यास होता. आईने मोठ्या हिंमतीने कौटुंबिक आणि राजकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यामुळेच आमच्यातील प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केलं. मी राज्याचा मुख्यमंत्री व्हावं, असं तिचं स्वप्न होतं. मी झालोदेखील; पण ते पाहण्यासाठी आई हयात नव्हती, त्याचं दु:ख मात्र सतत जाणवत राहतं.

संदीप काळे यांनी माध्यमांतील जाणकार संपादक मंडळींचे संपादित केलेले सगळे लेख वाचले तर जाणवतं की, आई म्हणजे प्रतिकूलतेशी अव्याहत झगडणारी, न डगमगणारी, मुलांच्या भल्यासाठी तगमगणारी, कधी हळवी; तर कधी खंबीर, मुलांना घडवणारी वात्सल्यमूर्ती असते. ‘माय डिअरेस्ट मदर’ या कवितेत कर्स्टन रोलँडर या कवयत्रीने आईचं खूप छान वर्णन केलं आहे.

She is an angel without wings
Makes life special with littlest things
Whenever I’m in need of a shoulder
There’s no one as devoted as my mother

वस्तुत: मूल जन्मलं की बाईचा दुसरा जन्म होतो, त्या जन्माचं नाव आई. ह्या जन्माचे ज्येष्ठ संपादक मंडळींनी स्वानुभवातून वर्णन केलेले आहे. आई संसारासाठी वाहून घेते. मुलांसाठी झोकून देते. स्वत:च्या आवडी-निवडी, व्यासंग-कला यांना दुय्यम स्थान देते किंवा कायमचं बाजूला ठेवते. पण तिने स्वत्व जपायला हवं. कला जोपासायला हवी. त्यामुळे मुलांवर सहज संस्कार घडतात.

संपादकांवरचे संस्कार

कुमार केतकरांच्या आईने काटकसरीने जीवन व्यतीत करत मुलांना जिद्दीने शिकवलं; पण त्याचबरोबर साहित्य, संगीत, हार्मोनियम वादन यांमधली अभिरुची जपली. श्रीपाद अपराजित यांच्या आईनेही सतारवादन, नाट्यगीत गायनकला जोपासली. भारतकुमार राऊतांच्या आईने चित्रकलेचे कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता जिद्दीने जमशेदजी टाटांचे रेखाचित्र रेखाटून सर्जशीलता दाखवली. ह्या गोष्टी खूप काही शिकवून जातात. आपण पाहतो की, बऱ्याचदा आवर्जून केले जातात, ते उपचार ठरतात आणि नकळत झालेले संस्कार होतात, असे संस्कार घडून येण्यासाठी आईचं स्वत:चं जीवन हा एक धडा असतो. संपादकांच्या माऊलींनी असेच धडे दिले. माझ्या आईनेदेखील राजकीय-सामाजिक कार्यात सहभाग घेतला, म्हणूनच माझ्यावर तसे संस्कार झाले.

माझी आई कमालीची स्थितप्रज्ञ व धीराची बाई होती. बैलाने ढुशी मारल्यानंतर पाय मोडला. पण ती मनाने मोडली नाही. जिद्दीने काम करत राहिली. माझ्या आईप्रमाणेच वडिलांवरील हल्ल्यानंतर विलक्षण स्थितप्रज्ञता दर्शवणारी महेश म्हात्रेंची आई मला भावली. सत्कर्मावर अढळ श्रध्दा ठेवून संतवचनं ही केवळ हरिपाठापुरती नसून दैनंदिन परिपाठासाठी विनियोगी असतात, हे त्या माऊलीने मुलांना शिकवलं.

धीरादोत आई म्हणावी, तर शिवाजी बनकर पाटील यांची आई. घरातली माणसे कालव्यात बुडून वारली, तरी डगमगली नाही. असं वाघाचं काळीज फार कमी व्यक्तींमध्ये पाहावयास मिळते. श्रीपाद अपराजितांची आई संकटांचे धक्के पचवीत पुन्हा उभी राहिली. वडील वारले,तरी आशीष दीक्षितांची आई हताश झाली नाही. काळाच्या पुढं चालत राहिली. आशीष जाधवांच्या आईने उतारवयात शेती कसण्यासाठी कंबर कसली. राही भिडेंची आईदेखील पाचवीला पुजलेल्या कष्टप्रद जीवनाला कंटाळली नाही. पानोपानी असं नि:स्वार्थ सेवेचं, क्षमाशीलतेचं आणि स्थितप्रज्ञतेचं दर्शन सर्वच लेखांमध्ये घडतं.

देशासाठीसुद्धा तेवढीच तत्पर

आई केवळ कुटुंबासाठीच त्याग करणारी नसते; तर देशासाठीसुद्धा तेवढीच त्तपर असते, हे अभिनंदन थोरातांच्या आईने दाखवलं. १९६२ मधील भारत-चीन युद्धावेळी त्या मातेने स्वत:चे दागिने युद्धनिधी म्हणून दान केले. घरकामासाठी येणाऱ्या बाईला चहा करुन देणारी श्रीपादांची आई मुलांचे पाय जमिनीवर ठेवण्याचा, सामान्यांबद्दल आदर-अनुकंपा ठेवण्याच्या किती मोठा आदर्श घालून देत होती! कुवतीनुसार दानधर्म करणाऱ्या ह्या आईने केवढं मोठं मूल्यशिक्षण दिलं आपल्या मुलांना!

आईच्या अंगी केवळ सहनशक्तीच नसते; तर वहनशक्ती असते. संसाराचा गाडा नेटाने ओढते, पतीची साथ असो वा नसो ! ती अवसान टाकत नाही. राही भिडेंच्या आईला पतीने दूर लोटले, आजीकडून त्रास झाला, तरी रडत न राहता ती आयुष्यभर लढत राहिली. मधुकर भावे यांच्या वडिलांना गांधीहत्येनंतर अटक झाली. पण जिगरबाज आईने हिकमतीने मुलांना वाढवलं. ज्ञानेश महारावांची आईसुद्धा अपयशाला कवटाळून न बसणारी, प्रतिकूलतेत झगडणारी, नव्वदीतसुद्धा कार्यमग्न असते.

श्रीराम पवारांच्या आईनेदेखील मुलांना व्यवहारी जगात जगण्याचे धडे दिले. म्हातारपण स्वत:ला स्पर्शू दिलं नाही, स्वत:ला सतत गुंतवून ठेवणं जमलं, त्या आईला. चंद्रमोहन पुप्पालांची आई म्हणजे सत्तरीच्या उंबरठ्यावर असताना ओतप्रोत ऊर्जेने ओसंडून वाहणारा स्वंयस्फूर्तीचा झराच! तिने पतीची आर्थिक फसवणूक झाल्याने ओढवलेल्या अरिष्टातून पाककलेच्या माध्यमातून मार्ग काढला. भारतकुमार राऊतांची आईदेखील अशीच कुटुंबासाठी झिजली. घरात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ सुरु करण्यासाठी एजंटाच्या घरी दूध पोचवले. कुठून येते त्यांच्या अंगी एवढी शक्ती!

काळाच्या पुढं जाणारी, उदारमतवादी

आई ही काळाच्या पुढं जाणारी, उदारमतवादी आणि बंडखोर वृत्तीचीसुद्धा असते. मंदार फणसे यांच्या आईने घरातून पलायन करुन पसंतीच्या मुलाशी लग्न करण्याचा केवढा धाडसी निर्णय घेतला! विनोद राऊतांच्या आईने आंतरजातीय विवाहरप्रथेचे स्वागत केलं. शैलेश पांडे यांच्या आईच्या बाबतीत ‘ब्राह्मण्य केव्हाच गळून पडलं, केवळ माणूसपण शिल्लक राहिले’ असं अंत:प्रेरणेने आपोआप झालं. विद्याविलास पाठकांची आईसुद्धा त्याच पठडीतली, जातीपातीच्या पलीकडे विचार आणि आचार असणारी. स्त्रीसुलभ मन तसं हळवं,संवेदनशील; पण आशीष दीक्षितांची आई मुलाला न चुकता अंत्यसंस्काराला पाठवत. जगातल्या अंतिम सत्याची ओळख लहाणपणीच करुन देऊन लौकिक जीवनाचे महत्त्व सांगणारी खमकी आई विरळाच.

सुभाष शिर्के आणि भारतकुमारांच्या आईँनी वयाची पन्नाशीदेखील गाठली नाही; परंतु दोहोंच्या आयुष्याला आकार दिला. उत्तम कांबळे यांच्या बाबतीत तर आई असूनही तिच्यापासून सतत ताटातूट. मग त्यांनी शिक्षण आणि पोटापाण्यासाठी भटकंतीवेळी कितीतरी आयांमध्ये स्वत:ची आई पाहिली. पण आईचं वैश्विक मूल्य ते विसरले नाहीत. आईशी असलेलं नाळेचं अतूट नातं इतरांमध्ये आई शोधताना अधिक दृढ झालं.

लोला रिज या आयरिश कवयित्रीने ‘मदर’ ह्या कवितेत ‘भेसूर-भकास वातावरणात सौंदर्य ओतणारा शीतल चंद्रप्रकाश म्हणजे आई’ असं सुरेख वर्णन केलं आहे. राजदीप सरदेसाईंनी आईचे केलेलं वर्णन वाचलं, की अशीच सात्विक, सुंदर आणि शिस्तप्रिय आई डोळ्यांसमोर उभी राहते. राजीव खांडेकरांची आई बोट रक्तबंबाळ झालं, तरी वेदना सहन करते. पण मुलाने न विचारता दुकानदाराकडून गोळ्या घेतल्याने तिचे मन रक्तबंबाळ होतं. अशी हळवी; पण शिस्तीची भोक्ती आई लेखात चितारली आहे. सुरेश द्वादशीवार यांच्या आईने निर्व्याज हसणं लोपू दिले नाही.

जगण्याचा धडा

माया पंडित नारकर यांनी आई हा विषय अगदी संशोधनासाठी किंवा स्पर्धात्मक परीक्षेसाठी संदर्भ घ्यावेत, इतक्या अभ्यासपूर्वक रीतीने हाताळला आहे. तुळशीदास भोईटे, राम शेवडीकर, ह. मो. मराठे ही ज्येष्ठ मंडळीसुद्धा लेखांमध्ये आई कमी-अधिक शिकलेली किंवा शिकली नसली तरी ती जगण्याचे धडे देते हे वाचकापर्यंत पोचवतात. दिलीप चितलांगे यांची आईदेखील मुलांनी शिकावं, सुविद्य व्हावं अशी अपेक्षा बाळगणारी.

आज माझी आई या जगात नाही. ती पुन्हा येणे नाही. पण मनाला पंख यावेत आणि भूतकाळात त्याने भरारी घ्यावी असं वाटतं. एलिझाबेथ एकर्स एलेन या कवयित्रीच्या ‘रॉक मी टू स्लीप’ ह्या कवितेतील निवडक पंक्ती भूतकाळात जाऊन

Backward, turn backward, O Time, in your flight
Make me child again just fot tonight !
Backward, flow backward, O tide of the years!
I am so weary of toil and of tears…
None like a mother can charm away pain
From the sick soul and the world weary brain…

वास्तवाचं भान आहे, पण कल्पनेनंसुद्धा आईचा मायेचा हात डोक्यावरुन फिरल्यासारखं वाटतं.

‘मार्क डार्क प्लेसेस’ या कादंबरीचा लेखक जेम्स एलरॉय एका ठिकाणी म्हणतो, ‘हे आई, मी तुला नवा श्वास देऊ इच्छितो!’ संदीप काळे यांनी संपादित केलेले संपादकांचे मातृस्मरण करणारे लेख आईच्या स्मृती जाग्या करुन तिला नवा श्वास देतात. ‘मु. पो. आई’ ह्या पुस्तकाच्या माध्यमातून बुद्धिजीवी संपादकांच्या ह्रदयातील हळवं संचित संकलनाच्या माध्यमातून वाचकांसमोर येतंय. हा ठेवा जपून ठेवण्यासारखा आहे. वाचकांकडून त्याचं निश्चित स्वागत होईल.

मु. पो. आई (संपादकांचे मातृस्मरण)
संपादन : संदीप काळे
ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
पानं : २४३
किंमत : २५० रुपये