इन्स्टाग्रामवर बॉईस लॉकर रूम या ग्रुपमधल्या मुलांचं सिक्रेट चॅटिंग लिक झालंय. या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट वायरल झालेत. ओळखीच्या मुलींचे फोटोशेअर करून त्यावर अतिशय घाणेरड्या कमेंट केल्या जात होत्या. बलात्कार करण्याचं प्लॅनिंग चाललं होतं. आता दिल्ली पोलिसांनी काही मुलांची चौकशी चालू केलीय. ती करायलाच हवी. पण पोलिसी कारवाईनं आपल्या मुलांमधली बलात्कारी संस्कृती संपेल का?
गेल्या तीनेक दिवसांत सोशल मीडियावर बॉईस लॉकर रूम असं काही वाचलंय? किंवा ऐकलंय? याबद्दल काही माहीत नसेल तर हे वाचावंच लागेल. आणि माहीत असेल तरी हे वाचणं गरजेचं आहे. कारण समाजाच्या खूप आत आत दडलेलं वास्तव या लॉकररूममधून समोर येतंय.
बॉईस लॉकर रूम हा इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचा एक प्रायवेट ग्रुप आहे. प्रायवेट म्हणण्यापेक्षा आपण याला सिक्रेट ग्रुप म्हटलं पाहिजे. इन्स्टाग्राम हे फेसबूकच्या मालकीचं एक अमेरिकन ऍप. या ऍपमधून प्रामुख्याने वीडियो आणि फोटो शेअर केले जातात. सेलिब्रेटी लोकांमधे इन्स्टा अकाऊंट असणं हे स्टेट्स सिंबॉल होऊन बसलंय. फेसबूकसारखंच अनेकांचं एक अकाउंट इथं असतं. त्या अकाउंटवरून आपण आपले, आपण काढलेले फोटो किंवा वीडियो शेअर करतो. त्या फोटो किंवा वीडियोला लाईक येतात, त्यावर कमेंट करता येतात.
हेही वाचा : लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा
वॉट्सअपसारखं इन्स्टाग्रामवर आपल्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप तयार करता येतो. अशाच प्रकारचा बॉईसलॉकररूम हा इन्स्टाग्रामवरचा ग्रुप. या ग्रुपमधे सगळे मुलगे एकमेकांशी बोलायचे. पण त्यांचे विषय साधेसुधे नसायचे. तर, त्यांच्या ओळखीच्या मुलींच्या शरीराविषयी यांचं बोलणं चालू असायचं.
आपल्या मैत्रिणींच्या अकाऊंटवर जाऊन ही मुलं तिचा एखादा फोटो ग्रुपवर टाकायची. त्यानंतर त्या मुलीच्या स्तनांचा आकार, तिच्या नितंबाचा आकार, तिची कंबर, तिच्या मांड्या, तिचे ओठ अशा तिच्या सगळ्या असल्या नसलेल्या अवयवांवर घमसान चर्चा केली जायची. बरं, चर्चा करून ही पोरं थांबत नव्हती. तर फोटोत दिसणाऱ्या मुलीचं वय काय असेल, त्या फोटोत दिसणाऱ्या मुलीच्या स्तनांच्या आकारावरून त्या मुलीच्या ब्राचा साईज काय असेल, याचा अंदाज बांधायचे खेळही खेळले जायचे.
या मुलांची कल्पनाशक्ती इथपर्यंतच थांबली नाही. मुलींची छेड काढण्यासाठी काय करायचं याच्या टिप्सही एकमेकांना दिल्या जात होत्या. आणि चक्क एका ओळखीतल्या मुलीवर बलात्कार कसा करायचा याचं प्लॅनिंगही या ग्रुपवर सुरू होतं.
हे सारं काही चघळण सुरू असतानाच या ग्रुपवर चॅट लिक झालं. ग्रुपवरच्या मेसेजचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर वायरल झाला. आणि ३ मेला या ग्रुपचं पितळं उघडं पडलं. पण फक्त ग्रुपचंच नाही तर आपलंही पितळ उघड पडलं. वायरल झालेल्या स्क्रीनशॉटमधलं संभाषण भयंकर आहे.
एक :
‘आपण तिचा सहज रेप करू शकतो.’
‘मी सिरियसली सांगतोय.’
दोन :
‘आपण अनेक गोष्टी सहजपणे करू शकतो.’
‘पण त्याचा अर्थ आपण त्या करूच असं नाही.’
एक :
‘आपण करूच.’
‘तिला फोन कर.’
‘तू जेव्हा बोलावशील तेव्हा मी येईन.’
‘आणि एक दोन आणखी मुलांना मी फोन करून बोलावतो.’
‘आपण सगळे मिळून तिचा गँगरेप करू.’
हे सगळं संभाषण मुळात हिंदी आणि इंग्रजी भाषेतून झालेलं आहे. याशिवाय मुलींच्या शरीरावर केलेल्या कमेंट्सचेही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर सगळीकडे वायरल होतायत. #boislockerroom #boyslockerroom नावानं सोशल मीडियावर हॅशटॅगही ट्रेंड होतोय.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!
या ग्रुपमधले बहुतेक जण साऊथ दिल्लीमधे राहणारे आहेत. ही मुलं म्हणजे फार मोठी नाहीत. बहुतेक शाळेत जाणारी आहेत. दिल्लीतल्या अनेक शाळांमधे बारावीचेही वर्ग भरतात. त्यामुळे त्यांची वयं १५ ते १८ अशा गटातली आहेत. आणि ही मुलं ज्या मुलींच्या फोटोंविषयी बोलत होती, त्या मुली त्यांच्यापेक्षाही लहान वयाच्या आहेत.
या मुलींनी धीटपणे हे सगळे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर टाकले. काही वेळातच हे स्क्रीनशॉट वायरल झाले आणि लोकांनी या ग्रुपवर आणि मुलांच्या बलात्कारी मानसिकतेवर जोरदार टीका करायला सुरवात केली. आपल्या विरोधात एवढे लोक बोलतायत हे कळल्यावर तरी ही मुलं शांत बसतील, असं वाटलं होतं.
पण उलट या मुलांनी याचा बदला घ्यायचा ठरवलं. स्क्रीनशॉट वायरल करणाऱ्या मुलींच्या फोटोंचं एडिटिंग करून त्याचे न्यूड फोटो बनवले. हे न्यूड सगळ्या सोशल मीडियावर वायरल करण्याची तयारी त्यांनी सुरू केली. त्यासाठी त्यांनी ‘जय का स्कर्ट एसकेआरटी गँग’ या नावाने नवा ग्रुपही तयार केला.
नव्या ग्रुपवरचं संभाषण तर आधीपेक्षा भयानक आहे.
एक :
मित्रांनो, ज्या ज्या मुलींनी स्क्रीनशॉट टाकलेत ना, त्या सगळ्या मुलींचे न्यूड फोटो लिक करूया
काही काहींचे आहेत माझ्याकडे
थांबा पाठवतो
दोन :
अरे खूप भारी आयडिया आहे.
तीन :
ऐका, मी अजून पाठवतो
तोपर्यंत हे वायरल करा
नवं अकाउंट काढा
कुणाला काही कळणार नाही
आता त्यांना कळेल, हे सगळं करण्याचे परिणाम काय होतात?
आता तोंड बंद ठेवतील या
मोठं स्त्रीवादी बनायचंय ना सगळ्यांना
यातल्या शेवटच्या तीन वाक्यांमधे घाणेरड्या शिव्या असाव्यात. कारण वायरल होणाऱ्या स्क्रीनशॉटमधून या शिव्या ब्लर करण्यात आल्यात.
‘द प्रिंट’च्या एका लेखानुसार, हे स्क्रीनशॉट वायरल झाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली. `आयोगाने इन्स्टाग्राम आणि दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्यासंबंधी नोटीस पाठवलीय. या प्रकरणात गुंतलेल्या सगळ्यांना लवकरात लवकर अटक व्हावी आणि कडक कारवाई केली जावी, यासाठी आयोग प्रयत्न करत आहे,’ अशी प्रतिक्रिया दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी दिलीय.
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दक्षिण दिल्लीच्या सायबर सेलला दिलेत. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं बघून या मुलांनी पटापट आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटची नावं बदलली. काहींनी फोनही स्वीच ऑफ केले. पण सायबर सेलने या मुलांचे मोबाईल सहज ट्रॅक केले आणि त्यातल्या एका मुलाला सोमवारी ४ मेला ताब्यात घेतलं.
या ग्रुपमधे वयात आलेली जवळपास २० ते २२ पोरं होती. हे सगळेच दिल्लीतल्या तीन-चार खासगी शाळांमधे शिकतात. दोन तीन मुलं कॉलेजमधे शिकतात. साधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटी हा ग्रुप सुरू झाला आणि त्यानंतर त्यामधे वेगवेगळी मुलं जोडली गेली. म्हणजे हा सारा प्रकार लॉकडाऊनमधल्या रिकामपणातला आहे. या ग्रुपशी जोडल्या गेलेल्या दोन मुलांनीच हे स्क्रीनशॉट त्यांच्या शाळेतल्या एका मुलीला पाठवले असावेत. त्यामुळे हे प्रकरण फुटलं.
हेही वाचा : ‘हो, मी गे पॉर्न स्टार आहे, आणि मला त्याचा गर्व वाटतो!’
नवजीवन इंडिया या वेबसाईटवरच्या बातमीनुसार, सध्या दिल्ली पोलिसांनी मुलांवर आयपीएस कलम ६७ आणि ६७ अ अंतर्गत केस दाखल केलीय. त्यानंतर सायबर सेलने आयपीसीच्या ४६५, ४७१, ४६९ आणि ५०९ या आणखी चार कलमांचा समावेश केलाय. यातली पहिली तीन कलमं ही फसवणुकीशी संबंधित आहेत. तर कलम ५०९ महिलांविरोधात होणाऱ्या गुन्हांसाठी वापरलं जातं.
या कलमांमुळे ३ वर्षांपर्यंत जेल आणि ५ लाख रूपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. हाच गुन्हा दुसऱ्यांदा करताना पकडले गेलात तर ५ वर्षांची अटक आणि १० लाख रूपये दंड सुनावला जाऊ शकतो. ज्या मुलींचे फोटो या मुलांनी ग्रुपवर शेअर केलेत त्यापैकी एखादी मुलगी किंवा तिचे पालक समोर आले तर २०१२ मधल्या ‘द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स’ म्हणजे पॉक्सो कायद्याअंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
या प्रकरणात पॉक्सो कायदा लागू झाला तर या मुलांना लवकरात लवकर अतिशय कडक शिक्षा सुनावण्यात येईल. अब्रू जाण्याच्या किंवा करिअर बिघडण्याच्या भीतीने अनेक मुली आणि पालक पुढे येत नाहीत. आले तरी पैशाच्या दबावाखाली त्यांचा आवाज दाबणं अत्यंत सोपं असतं. दक्षिण दिल्लीचा हा भाग तर पैशानं श्रीमंत असलेल्यांचा इलाखा म्हणून ओळखला जातो.
#बॉईसलॉकररूम ग्रुपमधे ऍक्टिव नसणाऱ्या मुलांवरही आयपीसी कलम ५२० अंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे. या मुलांना कायद्यानं शिक्षा झालीच पाहिजे. पण फक्त ही शिक्षा देऊन हा प्रश्न सुटणारा नाहीय. कारण आपण काय चूक केलीय याची जाणीवच या मुलांच्या मनात नाहीय.
या ग्रुपमधले सदस्य पकडले गेले असले तरी बॉईस लॉकर रूम २ या नावाने नवा ग्रुप सुरूही झालाय. आणि या ग्रुपमधे फक्त फेक अकाउंट वापरूया, असंही सांगण्यात आलंय. इतकंच नाही, तर या गोष्टी करण्यासाठी इन्स्टाग्राम ऐवजी स्नॅपचॅट या ऍपचा वापर केला जावा, अशीही चर्चा या मुलांमधे केली जातेय. कारण, स्नॅपचॅटमधे आपण काय बोलतोय याचा कुठलाही डाटा इंटरनेटवर साठवला जात नाही. असा फाजीलपणाही मुलांनी इंटरनेटवरून शोधून काढलाय.
शाळेतल्या मुलांना त्यांचे पालक सहज मोबाईल हातात देतात. पण तितक्या तत्परतेने त्या मोबाईलसोबत येणारी जबाबदारीची जाणीव पालक करून देत नसतील का? ही जाणीव या मुलांना करून देणं, ही फक्त त्यांच्या पालकांची नाही, तर समाज म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण समाज म्हणून वागतो, त्याचंच अनुकरण ही मुलं करतायत, हे आपण लक्षात घ्यायला हवं.
हेही वाचा : माझ्या न्यूड मॉडेलिंगची खरीखुरी गोष्ट
इन्स्टाग्रामवरचा हा ग्रुप हे काही पहिलं उदाहरण नाही. डिसेंबरमधेही अशाच एका वॉट्सअपग्रुपबद्दल माहिती समोर आली होती. त्यावरही शाळेतली मुलं आपल्या वर्गातल्या मुलींच्या शरीराविषयी गप्पा मारायची. अनेक घरांमधे सगळे पुरूष नातेवाईक किंवा मित्रमंडळी एकत्र येऊनही असे ग्रुप करतात. दुसऱ्या पक्षातल्या किंवा विचारधारेच्या महिलांच्या शरीरावर हलकट कमेंट करणारे आयटीसेलचे लोकही आपल्याला दुसरं काय शिकवतात?
बॉईस लॉकर रूमचं पितळं उघडं पडल्यानंतर याचा विरोध करणाऱ्या अनेक पोस्ट ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पडल्या. तसंच, त्यातल्या मुलांच्या वागण्याचं समर्थन करणाऱ्या पोस्टही दिसतात. ‘बॉइज विल बी बॉइज’ म्हणजे ‘मुलं अशीच असतात’, ‘फक्त फोटोंबद्दल खासगीपणे बोलले ना? त्या मुलीला जाऊन काही बोलले का?’ किंवा अगदी ‘ही मुलं फक्त बलात्काराबद्दल बोलत होती ना? त्यांनी बलात्कार केला तर नाही ना?’ अशा प्रकारचं हे समर्थन फार भयानक आहे.
अशा समर्थनामुळे बाईला वस्तूसारखं बघणं योग्यच आहे, असं वाटतं. आपल्या वर्गातल्या मुली त्यांच्या स्तन आणि नितंब याच्या पलिकडे काही असूच शकत नाहीत या विचाराला दुजोरा मिळतो. त्यातूनच बलात्काऱ्यांची संस्कृती निर्माण होत जाते. पैशाच्या जोरावर हे प्रकरण दाबता येईल, पण ही संस्कृती दाबणं पैशालाही शक्य होणार नाही.
हेही वाचा :
नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?
‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र
महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं
कितीही टाळा फ्रॉइडने सांगितलेला सेक्स आडवा येणारच!
आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?
सोशल मीडियात ज्ञानदा कोरोनापेक्षा जास्त वायरल का होतेय?
महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून
छत्रपती शाहूंचं निधन झालं, तिथे त्यांचं स्मारक उभं राहिलंच नाही
१०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेणाऱ्या तरुणीचं म्हणणं ऐकायलाच हवं!
भाव पडल्यावर लगेच दूध सांडून देणारे शेतकरी आता लॉकडाऊनमधे दूध का सांडत नाहीत?