आज ३० जानेवारी. महात्मा गांधीजींची पुण्यतिथी. गांधींबद्दलच्या खोट्या इतिहासाने नेहमीच त्यांना खलनायक ठरवलंय. पण तरीही गांधी आपल्या मनातून जात नाहीत. कारण, गांधी मेलेलेच नाहीत. ते कधी मरणारही नाहीत. गांधी हा एक विचार आहे. तो नेहमी जिवंत राहणार आहे. चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘गांधी का मरत नाही?’ या पुस्तकाची ही ओळख.
महात्मा गांधी यांच्याबद्दल समाजमनात आदर आहे. पण तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त अनादरही पसरवण्यात आलाय. माझा स्वतःचा असा अनुभव सांगतो. चार साडेचार दशकांपूर्वी शाळेत असताना पुस्तकातून, भाषणातून आणि व्याख्यानमालेतून गांधी मला भावले, राष्ट्रपिता वाटले. त्यासोबत आजूबाजूला, काही स्वतःला सुसंकृत समजणाऱ्या लोकांच्या कायावाचेतून महात्म्याचा चेहरा खलनायकाचा केला जात असल्याचं अनुभवलंय.
सोबतची बरीचशी मुलं आणि मग त्यांचे पालकही हे असंच बोलायचे. ते बोलतात म्हणून बाकीचे बोलायचे. अगदी पाकिस्तानच्या निर्मितीपासून ते दंगलीपर्यंत गांधी कसे दोषी आहेत आणि हिंदू समाज जो काही वाऱ्यावर पडला त्याला हा पंचा नेसलेला माणूस कसा कारणीभूत आहे, याचं रंगीत धावतं चित्रण त्यावेळी कानावर गेलं होतं.
आपल्या जाणिवा समृद्ध होण्याचा तो काळ नव्हता. पण काही तरी गडबड आहे, असं सतत वाटायचं. मग कॉलेज आणि भोवताल विस्तृत होत गेला आणि गांधी कालातीत आहेत, हे तनामनात पक्कं रुतून बसलं. इतिहास तोडून मोडून सांगणाऱ्या कुठल्या कुडमुड्यांची गरज भासली नाही. मेंदू आपल्या ताब्यात आहे, त्याच्यावर कोण राज्य गाजवू शकणार नाही, याचा तो आत्मशोध होता.
गांधीबाबा कुणाच्या 'वधा'ने मेला नव्हता. तो मरणारही नाही. गांधी कधी मरत नाही. तो विचार आहे. हा विचार माझ्या देशात नाही तर तो जगाच्या अंतापर्यंत टिकून राहणार आहे. हे लख्खपणे समोर येतं तेव्हा एक भारतीय असल्याचा अभिमान ओसंडून वाहतो. सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांचं 'गांधी का मरत नाही' हे पुस्तक वाचताना हा अनुभव पुन्हा एकदा आपल्याला समृद्ध करतो. लोकांना जो काही गांधींचा खोटा इतिहास काल, आज आणि उद्यासुद्धा सांगितला जाईल, तो कसा चुकीचा आहे हे सांगण्यासाठी हे पुस्तक मोलाचं ठरेल.
चंदूभाऊ यांचं याआधी 'आपुलाच वाद आपणाशी' हे पुस्तक वाचलं होतं. प्रमोद चुंचूवार या आमच्या विदर्भातल्या पत्रकार मित्रामुळे केवळ हे पुस्तक नाही तर चंदूभाऊंनाच आत बाहेर नीट वाचता आलं. मुद्द्याला थेट भिडणारा, आपल्याला जे वाटते ते स्पष्ट तोंडावर बोलणारा असा हा अवलिया माणूस आहे. मुख्य म्हणजे वयाने, विचारांनी ज्येष्ठ असूनही अजिबात अंतर न राखणारा मनमोकळा माणूस मला त्यांच्यात दिसला.
हेही वाचा : श्रीमंतांकडून जास्त टॅक्स घेण्याची सूचना अभिजीत बॅनर्जी का करतात?
आयुष्यातली दोन दशक दूर खेड्यात सामान्य माणसांत, शेतकऱ्यांमधे काम केल्यावर त्यांना आलेले अनुभव 'आपुलाच'मधून वाचताना आपल्या अंगावर काटा उभा राहतो. गांधींप्रमाणे हा सुद्धा त्यांचा 'सत्याचा प्रयोग' होता. याच पुस्तकात ते थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्याबद्दलचा अनुभव कथन करतात तेव्हा आपण चक्रावून जातो. खरेखोटेपणाचे अंगरखे आपोआप गळून पडतात.
कुणाला बरं वाटतं, छान दिसतं म्हणून उगाचच खऱ्याचा आभास करून खोटं बोलण्यासाठी आपला जन्म झालेला नाही, असं चंदूभाऊ सांगतात. त्यामुळे त्यांना गांधीच नाही तर आंबेडकर, जयप्रकाश नारायण असा एक लेखक म्हणून मोठा प्रवास करता येतो.
आपण बघतो की समाजात प्रत्यक्ष काम करणाऱ्या माणसांपेक्षा बोलघेवड्या माणसांचा समाजावर 'उगाचच' एक मोठा प्रभाव असतो. केवळ शब्दांचे खेळ करून आणि वाचिक ताकदीच्या जोरावर गारुड करून भारूड करणारी लोकं आता खूप झालीत. आपण काहीच करायचं नाही, पण आव असा आणायचा की मीच लोकांसाठी रक्ताचं पाणी केलं.
आताच्या सोशल मीडियाच्या जगात तर दररोज लोकांसमोर येत आणि आपल्या भाषणांनी लोकांचा मेंदू ताब्यात घेणारे अनेक गारुडी बाबा तयार झालेत. हे चित्र कीती आभासी आहे हे चंदूभाऊंमुळे आपल्या समोर येतं. हे एवढं सारं इथं मुद्दाम सांगायची गरज म्हणजे तोच त्यांचा सच्चेपणा गांधी पुस्तकात आलाय.
उगाच इतिहासाचे मोठे दाखले देऊन आणि जड शब्दात ते लांबलकच मांडून आपण फार थोर इतिहासकार असल्याचा अजिबात दावा न करता केलेलं हे लेखन आहे. छोट्या प्रसंगांनी, सोप्या आणि कमी शब्दात गांधी आपल्यासमोर मांडताना ते आपल्याला आधी नीट गांधी समजावून सांगतात.
हेही वाचा : गांधींच्या चातुर्वर्ण्याचं काय करायचं?
सामाजिक चळवळीत झोकून देऊन काम करणाऱ्या अनेक संवेदनशील कार्यकर्त्यांमुळेच आज महाराष्ट्र हे राज्य देशात पुरोगामी म्हणून ओळखलं जातं. त्याच परंपरेचे चंदूभाऊ हे पाईक आहेत. गांधी हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. गांधी हा डोक्यावर घेऊन नाचायचा नाही, तर डोक्यात ठेऊन तो आपल्या जगण्याला जोडण्याचा विषय असल्याची त्यांची भूमिका.
गेल्या दशकभरात त्यांनी महाराष्ट्रभर विविध वृत्ती-प्रवृत्ती आणि वयोगटाच्या लोकांसमोर गांधींवर शेकडो व्याख्यानं दिलीयत. गांधी हा दडपलेल्या चेहऱ्याने आणि मट्ठ निर्विकार मनाने ऐकण्याचा विषय नसून, गांधींच्या जगण्यातल्या विद्रोहाच्या ठिणग्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला रसरशितपणा समजून घेण्याचा विषय असल्याचं त्यांनी आपल्या अनेक व्याख्यानांमधून लक्षात आणून दिलंय.
गांधी ऐकताना एरवी कंटाळणाऱ्या वर्गालाही चंदूभाऊंच्या व्याख्यानानंतर गांधी खरंच वेगळ्या पद्धतीने समजावून घ्यायला हवा, असं मनापासून वाटतं. ते ऐकणारा दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो. खरंतर, ‘गांधी का मरत नाही’, हे पुस्तक म्हणजे त्यांच्या अशाच भारावून टाकणाऱ्या मांडणीचा दस्तावेज आहे.
'गांधींचा तिरस्कार करणारी मंडळी जगात कमी असली तरी त्यांनी भारतीय जनमानसात हे तिरस्काराचं विष पसरवण्यात बऱ्यापैकी यश मिळवलंय. हे विष पसरवण्याचं काम करणारी मंडळी कोण होती? त्यांनी हे का केलं? ज्यांनी हे काम सातत्याने केलं, गांधी त्यांना वारंवार कसा आडवा येत गेला? त्यांच्या आंतरिक स्वप्नांच्या आशा आकांक्षेचा कसा चुराडा होत गेला? आणि गांधींना थांबवण्यासाठी त्यांचा खून कसा केला, या सर्व प्रश्नांची सहज सरळ सोपी मांडणी म्हणजे, ‘गांधी का मरत नाही’, हे पुस्तक. चंदूभाऊ पुस्तकाच्या प्रस्तावनेत हीच भूमिका मांडतात.
हेही वाचा : बाप एकच असतो, तो कसा बदलणार?
३० जानेवारी १९४८ला नथुराम गोडसे याने गांधींची हत्या केली. गांधी हे मुस्लिमधार्जिणे, पाकिस्तानप्रेमी, देशाच्या फाळणीला जबाबदार, पाकिस्तानला पंचावन्न कोटी सरकारला द्यायला भाग पाडणारे, म्हणजेच देशद्रोही होते आणि या देशद्रोहाची शिक्षा म्हणजेच गांधी वध, असं नथुरामवंशीय लोक सतत सांगून, ती हत्या न्याय्य असल्याचं ठसवण्याचा प्रयत्न करतात.
खरंतर पाकिस्तान निर्मितीच्या आणि पंचावन्न कोटीच्या अगोरही १९३४ मधे पुण्यात गांधी हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यावेळी त्यांची हरीजनयात्रा सुरू होती. तो प्रयत्न यशस्वी झाला असता, तर गांधी भंगी, न्हावी आणि वकीलाला एका स्तरावर आणू इच्छितात आणि आमच्या ब्राम्हणी महत्त्वाकांक्षेच्या आड येतात म्हणून ही हत्या केली, असं ते म्हणू शकले असते का?
यासारखे बिनतोड प्रश्न लेखकानं उपस्थित करून गांधी हत्येसाठी, गांधींचा वर्णव्यवस्थाधारीत समाज व्यवस्थेतल्या उच्च निचतेच्या संकल्पनेला उद्धवस्त करण्याचा मनसुबा इथल्या उच्चवर्णीय लाभार्थी व्यवस्थेला भयंकपित करत होता. यातूनच ही हत्या झाली असं अधोरेखित करतात.
गांधींच्या मृत्यूनंतर विनोबा भावे यांना विचारलं गेलं. 'गांधींच्या मृत्यूची बातमी ऐकून पहिल्यांदा कोणता विचार तुमच्या मनात आला? त्यावर ते म्हणाले, 'माझ्या मनाला असंच वाटतं की गांधीजींचा मृत्यू झालाच नाही आणि आजपर्यंत माझ्या मनात विचार आहे की ते जिवंत आहेत. सज्जनांचे कधी मृत्यू होत नाही. ते जिवंत असतात आणि दुर्जन कधी जिवंत असत नाहीत, ते फक्त कल्पनेच्या जगात असतात.’
यातूनच 'गांधी का मरत नाही' या प्रश्नाचं उत्तर मिळतं. चंदू भाऊंच्या या पुस्तकाचा सगळ्या भाषांमधे अनुवाद होऊन काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येकाने ते वाचायला हवं. अशांत अशा वातावरणात आज समाजाला त्याची मोठी गरज आहे.
हेही वाचा :
बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं