ब्लूस्काय: ट्विटरच्या पाखराला झाकू पाहणारी नवी निळाई

२१ मे २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्कने ट्विटर आपल्या ताब्यात घेतल्याचं कित्येकांना अजूनही आवडलेलं नाही. सीईओ म्हणून मस्क करत असलेला आडमुठेपणा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसोबतच वापरकर्त्यांनाही त्रासदायक ठरू लागलाय. हा त्रस्त ग्राहकवर्ग आपल्याकडे वळवण्यासाठी अनेकजण ट्विटरसारखा दुसरा प्लॅटफॉर्म बनवू पाहतायत. ट्विटरमधून हकालपट्टी झालेल्या माजी संस्थापक जॅक डॉर्सीचा 'ब्लूस्काय' हा नवा प्लॅटफॉर्मही त्यापैकीच एक आहे.

कित्येक महिन्यांच्या बिझनेस मिटींग आणि न्यायालयीन सुनावण्यांनंतर शेवटी इलॉन मस्कने ट्विटर आपल्या ताब्यात घेतलंच. ते ताब्यात घेतल्याघेतल्या मस्कने ट्विटरच्या जुन्या संचालकांना घरचा रस्ता दाखवला. ट्विटरचा ताबा घेण्यासाठी आसुसलेल्या मस्कला या संचालक मंडळाने चांगलंच जेरीस आणलं होतं पण मस्क त्यांना पुरून उरला आणि संचालकांना आपली खुर्ची रिकामी करावी लागली.

त्या दिवसापासून आजपर्यंत ट्विटर आणि इलॉन मस्कने मालकी हक्काने घेतलेले सगळे निर्णय नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. मस्कच्या आडमुठेपणाचा फटका बसलेल्या ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना आणि ट्विटर वापरकर्त्यांना एक आयता ग्राहकवर्ग म्हणून आपल्याकडे खेचण्यासाठी ट्विटरच्या स्पर्धकांमधे रस्सीखेच सुरु आहे. त्यात आता ट्विटरचा संस्थापक असलेल्या जॅक डॉर्सीच्या 'ब्लूस्काय'ची भर पडलीय.

हेही वाचा: तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?

काय आहे 'ब्लूस्काय'?

'ब्लूस्काय'ची स्थापना खरं तर २०२१मधे एक सोशल नेटवर्क प्रोटोकॉल बनवण्याच्या उद्देशाने झाली होती. जसं इंटरनेटवर माहितीचं आदानप्रदान सुरळीत व्हावं यासाठी एक ठरवलेला इंटरनेट प्रोटोकॉल असतो, तशाच प्रकारे 'ब्लूस्काय'हे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक प्रोटोकॉल म्हणून काम करावं असा ट्विटरचा तत्कालीन संस्थापक जॅक डॉर्सीचा उद्देश होता.

आधी सोशल नेटवर्कमधली एक सेवा एवढ्याच मर्यादित उद्देशाने बनवलेलं 'ब्लूस्काय' आता स्वतःच एक सोशल नेटवर्क बनू पाहत ट्विटरला टक्कर देण्याची भाषा करतंय. त्यासाठी 'ब्लूस्काय सोशल' नावाचं एक स्वतःचं सोशल नेटवर्कच उभं केलं गेलंय. 'ब्लूस्काय'चं बाह्य रुपडं अर्थात युजर इंटरफेसही ट्विटरशी अगदीच मिळताजुळता असल्याने ट्विटरच्या स्पर्धकांमधे 'ब्लूस्काय'चं नाव अग्रक्रमाने घेतलं जातंय.

फेब्रुवारी २०२३मधे 'ब्लूस्काय'चं आयओएस वर्जन बाजारात आलं. प्रायोगिक तत्त्वावर चालणारं हे ऍप फक्त आणि फक्त इन्वाईट कोड असलेल्यांनाच वापरता येणं शक्य होतं. हा कोड स्वतः कंपनी किंवा नोंदणीकृत ऍपधारकच देऊ शकतात. एप्रिल २०२२मधे अशाच प्रकारचं अँड्रॉइड वर्जन 'ब्लूस्काय'कडून प्लेस्टोअरवर रिलीज केलं गेलं. आत्तापर्यंत ५० हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी हे ऍप घेतल्याचं 'फायनान्शियल टाईम्स'ने सांगितलंय. 

कसं काम करतं 'ब्लूस्काय'?

'ब्लूस्काय' हा सध्यातरी ट्विटरसारखाच मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून काम करतो. मायक्रोब्लॉगिंग म्हणजे कमीत कमी शब्दातला आशय पोस्ट करणं. सध्या ट्विटरवर आपला आशय पोस्ट करण्यासाठी २४० अक्षरांची मर्यादा आहे, तर ट्विटर ब्लूवर वापरकर्ते ४००० अक्षरांपर्यंत ट्विट करू शकतात. 'ब्लूस्काय'वर हीच मर्यादा २५६ अक्षरे इतकी आहे. त्यासोबतच फोटो टाकण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.

'ब्लूस्काय' वापरकर्त्यांनी 'ब्लूस्काय'वरच्या आशयाला 'स्किट' असं नाव दिलंय. 'ब्लूस्काय'मधला 'स्काय' आणि ट्विट यांचं एकत्रीकरण म्हणजे स्किट. या स्किटला लाईक करण्याचा, रिप्लाय देण्याचा, रिट्विट करण्याचा पर्याय वापरकर्त्यांना मिळतो. त्याचबरोबरीने थ्री-डॉट मेनू वापरून रिपोर्ट आणि शेअर करण्याचाही पर्याय दिला गेलाय. वीडियो कंटेंट 'ब्लूस्काय'वर पोस्ट करण्यासाठी मात्र अजून कसलाही पर्याय दिला गेला नाही.

ज्यांना इन्वाईट कोड मिळतो, ते वापरकर्ते ट्विटरप्रमाणेच इथंही आपलं एक हँडल बनवू शकतात. त्या हँडलला नाव म्हणून वापरकर्ते आपलं डोमेनही वापरू शकतात. उदाहरणादाखल बोलायचं झालं तर फक्त 'कोलाज' असं नाव न वापरता 'कोलाजडॉटइन' असं नाव रोमनलिपीमधे लिहणं आता सहजशक्य होणार आहे. आपल्या वेबसाईटचं असं फुकट प्रमोशन म्हणजे व्यावसायिकांसाठी पर्वणीच आहे.

ट्विटरवर ज्या प्रकारे वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीचा आशय दिसावा म्हणून 'फॉर यू' हे फीड त्यांच्या टाईमलाईनवर दिलं जातं, तसंच 'व्हॉट्स हॉट' या नावाने एक फीड 'ब्लूस्काय'वरही दिलं गेलंय. आपण फॉलो करत असलेले वापरकर्ते त्यांच्या टाईमलाईनवर नेमकं काय शेअर करतायत हे सांगणारं 'फॉलोईंग' फीड ट्विटर आणि 'ब्लूस्काय' अशा दोन्ही ऍपच्या टाईमलाईनवर उपलब्ध आहे.

हेही वाचा: 'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!

'ब्लूस्काय'चं भविष्य कसं असेल?

सध्या 'ब्लूस्काय' प्रायोगिक तत्त्वावर सुरु असल्यामुळे वापरकर्त्यांना सर्व सोयींचा लाभ घेणं अजूनही शक्य नाही. दुसरीकडे, प्रायोगिक तत्त्वामुळे वापरकर्त्यांना हवी तशी सुधारणा करण्यासाठी 'ब्लूस्काय'ला पुरेसा वेळही मिळतोय. त्यामुळे वापरकर्त्यांना हवा तसा म्हणजेच कस्टमायझेबल इंटरफेस पुरवण्यावर 'ब्लूस्काय'चा विशेष भर असणार आहे. ऍपमधे भविष्यात होणाऱ्या सुधारणांबद्दल 'ब्लूस्काय' वेळोवेळी आपल्या वेबसाईटवर वेगवेगळ्या ब्लॉगच्या माध्यमातून कळवतंय.

सोशल मीडियावर पोस्ट होणाऱ्या आशयावर ठेवल्या जाणाऱ्या नियंत्रणाबद्दल बोलायचं झालं तर 'ब्लूस्काय'ने ऑटोमेटेड मॉडेरेटींगचा पर्याय निवडलाय. हे फीचर पोस्ट होणाऱ्या प्रत्येक आशयावर बारकाईने नजर ठेवून त्याच्या आक्षेपार्ह असण्याचं प्रमाण ठरवेल. त्यानिमित्ताने कम्युनिटी लेबलिंगची सुविधा वापरकर्त्यांना मिळेल, ज्यातून आक्षेपार्ह वापरकर्त्यांना सामूहिकरीत्या म्युट किंवा ब्लॉक करुन ती यादी आपल्या परिचितांसोबत शेअर करता येणार आहे.

'ब्लूस्काय'चं भविष्यातलं आणखी एक उत्तम फीचर म्हणजे अल्गोरिदम चॉईस. सध्या ठराविक अल्गोरिदम वापरून सोशल मीडियावरचा कंटेंट वापरकर्त्यांना दाखवला जातो. कुणालाही फॉलो करून किंवा ब्लॉक करून आपल्याला अल्गोरिदममधला हवा तो कंटेंट बघता येतो. पण 'ब्लूस्काय' याही पुढचं पाऊल टाकत वापरकर्त्यांना चक्क त्यांच्या आवडीचा अल्गोरिदमच निवडण्याचा पर्याय देऊ करतंय.  यावर आत्ता युद्धपातळीवर काम सुरु आहे.   

'ब्लूस्काय' ट्विटरला खरंच टक्कर देईल?

इलॉन मस्कच्या मालकीत वाढणाऱ्या ट्विटरची मोठ्या पातळीवरची स्पर्धा तशी फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिकटॉकसारख्या मोठ्या सोशल मीडिया जायंटशी आहे. त्याचबरोबर ट्विटरसारखी सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या कू, मॅस्टडॉन आणि 'ब्लूस्काय'सारख्या स्पर्धक ऍपमुळे ट्विटरला दुहेरी संघर्षाला तोंड द्यावं लागतंय. याला इलॉन मस्कच कारणीभूत आहे.

मस्कने ट्विटर ताब्यात घेण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उचलून धरला होता. आपल्या ताब्यात ट्विटर आल्यानंतर फ्री स्पीचला प्रोत्साहन मिळेल, डिजिटल सेन्सॉरशिपची दादागिरी संपून जाईल, असाच आवेश त्यांच्या त्यावेळच्या भाषणांमधून, मुलाखतींमधून स्पष्टपणे दिसून येत होता. पण अशा प्रकारे ट्विटरचं लोकशाहीकरण करताना ऑनलाईन ऍब्युजचं प्रमाण वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात होतीच.

त्यामुळे काही प्रमाणात का होईना, सोशल मीडियावर नैतिकतेला बळ देणारं मॉडेरेशन हवंच. ट्विटरचे प्रतिस्पर्धी ऍप या तुलनेत ट्विटरपेक्षा अग्रेसर असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यातही ट्विटरच्या तुलनेत 'ब्लूस्काय'चे कम्युनिटी लेबलिंग, अल्गोरिदम चॉईससारखे अतिरिक्त फीचर वापरकर्त्यांना अधिक आकर्षक वाटतायत. ट्विटरसारख्या बलाढ्य सोशल मीडिया जायंटला टक्कर देऊ पाहणाऱ्या 'ब्लूस्काय'साठी हे चित्र आशादायी आहे.

हेही वाचा: 

फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!

ज्ञानदा कदमः वायरल होणारी मराठी न्यूज अँकर

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

आपल्यावरच्या नियंत्रणासाठीच चाललाय सोशल मीडिया आणि सरकार यांच्यातला संघर्ष