शिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण

२८ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


वीर सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी काय केलं हा इतिहास वाजपेयी सरकारच्या काळात अधिक प्रमाणात प्रकाशित झाला आणि मोदी सरकारच्या काळात त्याची अधिक चर्चा होतेय. त्यामुळेच संघ-भाजपच्या कथित हिंदुत्ववादी संघटनांनी सावरकर रक्षकच्या भूमिकेत पुढे येणं, हे ढोंग ठरतं. हे ढोंग उघडं पडू लागलं, तसं भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी सावरकरांच्या माफीपत्रांची बरोबरी शिवरायांनी औरंगजेबला पाठवलेल्या पत्रांशी केली.

भारताला स्वातंत्र्य हे कुणा एका 'वीर- वीरांगना'च्या पराक्रमामुळे मिळालेलं नाही. त्यासाठी असंख्य शिरकमळं धारातीर्थी झाली आहेत. पारतंत्र्याविरोधातल्या या संघर्षाची सुरवात महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसने ब्रिटिश सत्तेविरोधात पुकारलेल्या असहकाराच्या चळवळीपासून आणि १८५७ च्या फसलेल्या सैनिकी बंडापासून झालेली नाही. ती कधीपासून झाली ते सांगताना शाहीर आत्माराम पाटील लिहितात-

स्वराज्यक्रांती पणी लावले, सर्वधर्म-पंथ
महान राष्ट्रीयतेचा केला, महाराष्ट्र धर्म ॥१
सह्याद्रीच्या कडेकपारी, लढला शिवराया
हिमालयाच्या स्वातंत्र्याचा, घडविला मूळ पाया ॥२

स्वराज्यासाठीच्या लढाया लढताना मावळे शत्रूवर 'हर हर महादेव' अशी गर्जना करत तुटून पडत. त्यानंतर देशाला समता-स्वातंत्र्य-बंधुता यांचे धडे देणाऱ्या सगळ्या सामाजिक- राजकीय लढाया महाराष्ट्रात झाल्या; त्या 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशी घोषणा देत झाल्या. मग तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चवदार तळ्याचा संग्राम असो की, 'संयुक्त महाराष्ट्र'चा लढा असो.

भारतीय लष्कराच्या अनेक रेजिमेंट आहेत. त्यांच्या घोषवाक्यात देव-देवतांची नावं गुंफली आहेत. त्याला अपवाद 'मराठा रेजिमेंट'चा आहे. त्याचं घोषवाक्य 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' असं आहे. या रेजिमेंटची स्थापन ब्रिटिश काळात ४ फेब्रुवारी १७६८ला बेळगावात झाली आहे.

कोश्यारी संघाचं प्रॉडक्ट

इतिहास आणि वर्तमान लक्षात ठेवून प्रबोधनकार ठाकरे दगलबाज शिवाजी या पुस्तिकेत लिहितात, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषात इतकी ताकद आहे की, 'जय शिवाजी' म्हणताच ३३ कोटी देव-देवतांची फलटण पेन्शनीत निघते!' या ताकदीचे दुःख सलत असल्यामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या तोंडून शिवरायांना जुने-पुराणे ठरवलं जात असावं.

यापूर्वी कोश्यारींनी 'रामदास नसते, तर शिवाजी छत्रपती झाले नसते, असे अकलेचे तारे तोडण्यासाठी काळी टोपी झटकली होती. कोश्यारी हे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखेच भाजपमधे स्थापित केलेलं रा.स्व. संघाचं 'प्रॉडक्ट' आहे. पूर्वी संघ शाखेवर 'शिवाजी म्हणतो' हा खेळ खेळला जायचा. त्यामुळे कोश्यारींना टीकेचे कितीही जोडे हाणले तरी त्यांना 'शिवाजी' हा खेळाचा विषय वाटणार!

हेही वाचा: आजही सावरकरांना माफीच्या कोठडीतच का उभं केलं जातंय?

शिवरायांच्या चरित्राची छेडछाड

वीर सावरकर यांनीही छत्रपती शिवरायांना 'काकतालीय न्यायाने’ अर्थात कावळा बसायला नि फांदी तुटायला झालेला राजा असं म्हटलंय. स्पष्ट शब्दांत सांगायचं तर 'संधिसाधू' म्हटलंय. 'अंधश्रद्धा निर्मूलन'च्या कथेतल्या नामू न्हावी या पात्राद्वारे छत्रपतींची टवाळी केलीय; तर 'जय जय शिवराया' या आरतीत शिवरायांना 'हिंदूरक्षक' ऐवजी 'आर्यरक्षक' म्हटलंय. मग भारतातल्या मूलनिवासी द्रविडांचे रक्षक कोण?

'सात सोनेरी पाने'मधे शिवरायांच्या सर्वधर्मसमभावाला ’सगुण-विकृती’ ठरवलं आहे. अशा सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगातून सुटकेसाठी 'ब्रिटिश सरकार’ला जेलमधून सुटका करण्यासाठी दया- माफीपत्र पाठवली होती. त्याचं जाहीर प्रदर्शन राहुल गांधी यांनी करताच; 'भाजप’चे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांनाच ’माफीवीर’ ठरवण्याचा नीचपणा केला. हा शिवरायांच्या ऐतिहासिक कार्य-कर्तृत्वाचा घोर अपमान आहे. तशाच त्या महाराष्ट्राच्या अस्मितेला- स्वाभिमानाला दिलेल्या डागण्याही आहेत.

शिवरायांच्या चरित्राची छेडछाड करण्याचा हा उद्योग २००३ मधे झालेल्या विदेशी लेखक जेम्स लेन याच्या माध्यमातून घडवून आणलेल्या बदनामी प्रकरणापासून सुरू आहे. तो आता शरद पवार आणि नितीन गडकरी यांची तुलना राज्यपाल कोश्यारी यांनी कालच्या शिवरायांशी करण्यापर्यंत पोचला आहे. ताजं प्रकरण हे राहुल गांधी यांच्या भाषणापासून सुरू झालं.

खरे स्वातंत्र्यवीर बिरसा मुंडा

राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्रात सुरू  असताना १५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची जयंती होती. झारखंडमधल्या ’उलिहात’ गावात राहाणाऱ्या आदिवासी बिरसा मुंडा यांचं शिक्षण 'जर्मन मिशनरी स्कूल'मधे झालं होतं. वडिलांचं जबरदस्तीने धर्मांतर केल्यामुळे बिरसांना ख्रिस्ती मिशनऱ्यांचा आणि ब्रिटिश राजवटीचा राग यायचा.

आदिवासींवर होणारे अत्याचार असहनीय झाल्यामुळे त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. १८९५ला त्यांनी छोटा नागपूर भागात आदिवासींना संघटित करून ब्रिटिशांच्या अन्यायी सत्तेविरोधात आंदोलन पुकारलं. ब्रिटिशांनी बिरसांना अटक केली. तरुंगात जीवघेणा छळ केला. त्यातच बिरसा मुंडा यांचा रांचीच्या कारागृहात ९ जून १९०० रोजी ऐन पंचविशीत मृत्यू झाला.

यानंतर लोकांनीच ’बिरसा मुंडा’ यांना 'जननायक' हा किताब दिला. त्यांच्या या बलिदानाचं जयंती दिनी स्मरण करताना राहुल गांधी त्या दिवशीच्या सभेत म्हणाले, 'बिरसा मुंडा यांना जीव वाचवण्यासाठी सावरकरांप्रमाणे ब्रिटिशांकडे माफी मागता आली असती. तशी संधीही होती. पण बिरसा यांनी ती नाकारली. म्हणून ते खरे स्वातंत्र्यवीर आहेत!'

राहुल गांधी यांनी सावरकरांची माफीपत्रंही दाखवली. बिरसा मुंडा यांच्या जयंतीला सावरकरांच्या माफीचा कोळसा उगाळण्याची गरज नव्हती, हे खरंच आहे. पण त्याचवेळी बिरसा यांच्या स्वातंत्र्यासाठीच्या कार्याचा गौरव करताना, संधी असूनही बिरसा यांनी माफी ऐवजी बलिदान देणं पसंत केलं आहे, तर त्याची सावरकरांच्या माफीनाम्याशी तुलना होणं, अटळ आहे. ती टाळल्याने सावरकरांची माफीपत्रं खोटी ठरणार नाहीत.

हेही वाचा: दिल्ली दंगलीत काय काय झालं, हिंदू-मुस्लिम नसलेल्या पत्रकाराची आँखो देखी

सुटकेनंतर सावरकरांनी काय केलं?

या माफीपत्रांबरोबरच सुटकेनंतर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी काय केलं, तेही तपासण्यासारखं आहे. तेही अस्सल कागदपत्रांसह जाहीर झालंय. १९३९ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. ब्रिटिश शासनकर्त्यांना कोंडीत पकडून स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्याची संधी चालून आली होती. त्या दृष्टीने 'काँग्रेस' आणि गांधीजी रणनीती आखत होते.

दुसरीकडे काय होत होतं. तर सावरकर लॉर्ड लिनलिथगो यांची भेट घेऊन त्याला सांगत होते, 'जर आता आपले हितसंबंध इतक्या घट्टपणे एकमेकांशी बांधले गेले असतील, तर हिंदूधर्म आणि ग्रेट ब्रिटन यांनी दोस्त बनणं, ही आवश्यक बाब आहे. जुनी शत्रुत्वाची भावना आता गरजेची नाही.' (वाचा: 'अकथित सावरकर'- लेखक मदन पाटील, जिजाऊ प्रकाशन- पुणे, मोबा. ९९२३८१४३४३ )

याचा अर्थ सावरकर १९४२च्या 'चले जाव' चळवळीत नव्हते. पण गांधीजींच्या खून खटल्यात संशयित आरोपी म्हणून अडकले. हे कर्म स्वातंत्र्यवीराला शोभादायी नाही. हा इतिहास वाजपेयी सरकारच्या काळात अधिक प्रमाणात प्रकाशित झाला आणि मोदी सरकारच्या काळात त्याची अधिक चर्चा होतेय. 

भाजपमधे माफीवीरांची फलटण

इतका स्पष्ट इतिहास असताना संघ-भाजपच्या कथित हिंदुत्ववादी संघटनांनी सावरकर रक्षकच्या भूमिकेत पुढे येणं, हे  ढोंग ठरतं. हे ढोंग उघडं पडू लागलं, तसं भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सावरकरांच्या माफीपत्रांची बरोबरी शिवरायांनी औरंगजेबला पाठवलेल्या पत्रांशी केली.

त्यांचं म्हणणं, 'अशीच पत्रं छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा लिहून पाठवली होती. त्याचा अर्थ काय होतो?' हा त्यांचा प्रश्न संशय वाढवणारा आहे; तसाच भाजपचं पोटामधलं ओठावर आणणारा आहे. त्याचा निषेध करून त्यातला नीचपणा  संपणार नाही; थांबणार नाही. शिवरायांनी औरंगजेबला लिहिलेली पत्रं ही तहाची किंवा तत्सम प्रकारची होती. आग्र्‍याहून स्वतःची सुटका करून घेण्याइतके शिवराय समर्थ होते.

शत्रूपक्षाला सबुरी- मजबुरीचे खलिते पाठवणं, हा राज्यकर्त्याच्या परराष्ट्र व्यवहाराचा भाग असतो. त्याची तुलना सावरकरांच्या दया-माफीपत्रांशी होऊ शकत नाही. त्रिवेंदीच्या या आगाऊपणाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'माफी'सारखीच सारवासारव केलीय. ही भाजपमधे माफीवीरांची फलटण तयार होण्याची सुरवात आहे. यामुळे सावरकरांची आठवण जागती राहील.

हेही वाचा: 

आपण इतके हिंसक का होतोय?

पोह्या, तुझा बहुरंगी इतिहास भाजपवाल्यांना कोण सांगणार?

हिंदू-मुस्लिम नसलेली पत्रकार सांगतेय, दिल्ली दंगलीत काय काय झालं

एनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था?

दंगलीतून वाचण्यासाठी मला गळ्यातली रूद्राक्षाची माळ दाखवावी लागली!

(लेख साप्ताहिक ‘चित्रलेखा’मधून साभार)