हायडेगरला नाझीवादी म्हणून बाजूला सारणं आपल्याला परवडणारं नाही!

२६ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज २६ सप्टेंबर. थोर फिलॉसॉफर मार्टिन हायडेगर यांची जयंती. जगाने हिटलरच्या नाझीवादाला झिडकारलं. हायडेगर यांनी मात्र नाझीवादाला पाठिंबा दिला. तरीही तत्त्वचिंतकांना आणि अभ्यासकांना त्यांच्या फिलॉसॉफिकडे दुर्लक्ष करता आलं नाही, एवढी त्याची प्रतिभा होती. हायडेगरच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला हा प्रकाश.

जर्मनीतल्या मेसकीर्श शहराच्या रस्त्यांवरून लहानगा मार्टिन बाबांचं बोट धरून रोज चर्चला जात होता. त्याचे बाबा तिथल्याच स्थानिक चर्चचे रखवालदार होते. मार्टिनवर त्यामुळे फार लहानपणापासूनच रोमन कॅथलिक चर्चचे संस्कार झाले. त्याची ही कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता मोठा झाल्यावर ख्रिश्चन धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी मार्टिन काम करणार हे जवळजवळ निश्चितच झालं होतं. पण मार्टिनने मात्र कॅथलिक धर्म नाकारला आणि विसाव्या शतकातला थोर फिलॉसॉफर होण्याच्या प्रवासाला तो लागला.

हा मार्टिन म्हणजेच विसाव्या शतकातला थोर फिलॉसॉफर मार्टिन फ्रेडरिक हायडेगर. २६ सप्टेंबर १८८९ ला मेसकीर्श शहरातच त्याचा जन्म झाला. हायडेगरला मुख्यतः संज्ञामिमांसा म्हणजेच फेनॉमेनॉलॉजी, थिऑलॉजी, मानसशास्त्र आणि अस्तित्ववाद या विषयांची आवड होती. फिलॉसॉफीच्या या प्रमुख शाखांवर त्याची जशी पकड होती, तसाच तो कलेतही मुरलेला होता. कलेचं फिलॉसॉफीच्या अंगानं विश्लेषण करण्यात त्याचा जाम हातखंडा होता.

कलेलाही अस्तित्व असतं

‘बीईंग अँड टाइम’ या पुस्तकानं त्याला फिलॉसॉफर म्हणून मोठं नाव मिळवून दिलं. या पुस्तकात हायडेगरनं मानवी अस्तित्वाचा ‘काळ’ या संकल्पनेशी संबंध लावून फार  भारी विश्लेषण केलंय. या पुस्तकात हायडेगर अस्तित्ववादाची चर्चा करतो. तो अस्तित्व आणि माणसाचं अस्तित्व अशा दोन संकल्पना मांडतो.

अस्तित्वासाठी हायडेगरने साइन sein हा जर्मन शब्द वापरलाय. तर मानवी अस्तित्वासाठी हायडेगर dasein डासाईन असा शब्द वापरतो. हायडेगर म्हणतो, ‘फक्त मानवी अस्तित्वाला स्वतःच्या अस्तित्वाची आणि अस्तित्व या संकल्पनेची जाणीव असते. म्हणून साईन आणि डासाईन वेगवेगळे असतात.’

फिलॉसॉफीत सौंदर्यमीमांसा करताना कला आणि कलेची वस्तू यात फरक केला जातो. चित्र काढता येणं ही कला असते. तर एखादं चित्र ही कलेची वस्तू असते. हायडेगरच्या मते, ‘कलेच्या वस्तूंनासुद्धा अस्तित्व असतं. आणि अस्तित्व असणाऱ्या कलेच्या वस्तूंकडे सौंदर्यशास्त्रातल्या स्वरूप, आकार, पोत अशा टिपिकल संकल्पना वापरून बघता येत नाही.’

हेही वाचाः निकोल टेस्ला: मानसिक आजारावर मात करून बनले जग बदलणारे शास्त्रज्ञ

बुटांच्या चित्राचं परीक्षण

हायडेगरने द ओरिजिन ऑफ द वर्क ऑफ आर्ट या निबंधात व्हॅन गॉग या प्रसिद्ध चित्रकाराच्या ‘अ पेअर ऑफ शु’ या चित्राचं परीक्षण केलंय. १८८६ मधे व्हॅन गॉगने पॅरिस शहरात हे चित्र काढलं होतं. झिजून जीर्ण झालेल्या बुटांची जोडी या चित्रात व्हॅन गॉगने रेखाटलीय. या बुटांचं तोंड चित्र बघणाऱ्याकडे आहे. दोन्ही बुटांच्या नाड्या सुटलेल्या, जमिनीवर लोंबणाऱ्या. बुटांच्या बॅकराउंडला मागं पिवळसर प्रकाश. बस्स! बाकी काही म्हणजे काहीच नाही.

व्हॅन गॉगच्या या चित्रात बोलण्यासारखं आहे तरी काय असा प्रश्न सहज एखाद्याला पडेल. मोठ्या मोठ्या लेखकांना आणि कलाआस्वादकांनाही तो पडला. व्हॅन गॉग स्वतः फार गरिबीत राहिला, वाढला. एवढा मोठा चित्रकार असूनही दारिद्र्य त्याच्या पाचवीलाच पुजलेलं होतं. त्यामुळे हे असे मळकट, कळकट बूट त्याने स्वतःचं दारिद्र्य दाखवण्यासाठी रेखाटले होते, असा अर्थ अनेकांनी या चित्रातून काढला.

ते बूट कुणबीन बाईचे

१९३० मधे अमस्टरडॅम शहरातल्या एका चित्र प्रदर्शनात हायडेगरने व्हॅन गॉगचं हे चित्र बघितेलं. आतापर्यंत या चित्रावर अनेक मोठ्या चित्रकारांनी, लेखकांनी लिहिलंय. पण हायडेगरसारखी सर्जनशीलता आणि वैचारिक खोली वापरून या चित्राचं परीक्षण याआधी कधी झालं नाही आणि यानंतरही कधी होणार नाही, असं वारंवार म्हटलं जातं.

हायडेगरचं परीक्षण इतकं खास का मानलं जातं? कारण हायडेगरसाठी हे बेट म्हणजे एका शेतकरी बाईचे बूट आहेत! या चित्राकडे निव्वळ बघून हायडेगर फार मोठं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. हायडेगर म्हणतो, हा बुटांचा जोड ठेवलाय त्याच्या मागे, पुढे, खाली वर काहीही काढलेलं नाही.

ते बूट ज्याचे आहेत त्याची प्रतिमाही या चित्रात दिसत नाही. हे बूट कुणाचे आहेत हे कळेल असा कोणता पुरावाही चित्रकाराने या चित्रात सोडलेला नाही. पण व्हॅन गॉगने या बुटाच्या आजुबाजुला काहीही काढलेलं नाही. तिथं फक्त पोकळ जागा आहे. ही जागासुद्धा फार अर्थपूर्ण आहे. तरीही हायडेगरसाठी हे एका शेतकरी बाईचेच बूट आहेत.

हेही वाचाः मार्शल आर्टचा अनभिषिक्त सम्राट ब्रुस ली खूप मोठा फिलॉसॉफरही आहे

काबाडकष्टाचे साक्षीदार

हायडेगर लिहितो, ‘बुटांच्या तोंडाशी असणारा अंधार जणू या शेतकरी बाईने उपसलेल्या काबाडकष्टांचं चित्रण उभं करत असतो. टणक झालेल्या बुटांसोबत आपल्या विस्तीर्ण शेतात ही बाई एक एक पाऊल टाकत संथपणे जात असते. तेव्हा जमिनीवरची ओली माती बुटांनी शोषुन घेतल्यावर उरलेले कण आणि ओलसर झालेलं बुटांचं लेदर हायडेगरला या चित्रात दिसतं.’

‘संध्याकाळ संपताना शेताच्या पायवाटेवर पसरलेला एकटेपणा या बुटांच्या खालच्या सोलवर लागलाय. बुटांच्या आत होणाऱ्या कंपनाशिवाय दुसरा कोणताही आवाज न करता पृथ्वी बोलत राहते. एकीकडे वर आलेली पिवळसर कणसं ही या पृथ्वीनेच दिलेली निश्चल भेट. तर दुसरीकडे उजाड राहून स्वतःचंच अस्तित्व नाकारण्याचा तिचा अनाकलनीय प्रयत्न. हे सगळं या बुटांनी पाहिलंय.’

‘आज भाकरी मिळेल की नाही याची शेतकरी बाईच्या मनातली बिनतक्रार काळजीही या बुटांत सामावलीय. या बुटांनी शेत बहरल्यावर होणारा शब्दात न मावणारा आनंद पाहिलाय, तसंच दुष्काळ पडल्यावर त्या बाईच्या चेहऱ्यावरची अस्वस्थताही पाहिलीय. रात्री दमुन झोपताना ही बाई बूट बाजुला काढून ठेवेल तेव्हा तिच्या पायाच्या जखमाही हे बूट पाहतील.’

हायडेगरने केलेलं हे परीक्षण फार नितळ, सुंदर आहे. एखाद्याच्या बुटांकडे बघून त्याच्या माणूसपणाची किंमत हायडेगर करतो. यात तो सकारात्मक राहतो. शेतात राबणाऱ्या बाईच्या कष्टाचं प्रतिक म्हणून या बुटांकडे पाहण्याची हायडेगरची दृष्टी ‘क’ ‘मा’ ‘ल’ आहे!

मग हिटलरच्या नादाला का लागला?

काबाडकष्ट करणाऱ्या माणसांचा शोध घेणारा हायडेगर नाझीवाद आणि हिटलरच्या नादाला का लागला असा नेहमीच प्रश्न पडतो. दुसऱ्या महायुद्धात १९३३ पासून हायडेगरने राष्ट्रीय समाजवादी जर्मन कामगार पक्ष म्हणजेच नाझी पार्टीला सार्वजनिक पाठिंबा द्यायला सुरवात केली. आपल्या भाषणातून तो मोकळेपणाने हिटलरची प्रशंसा करायचा.

गंमत म्हणजे, याच काळात हायडेगरचं त्याच्या दोन विद्यार्थीनींसोबत अफेअर चालू होतं. आणि या दोन्ही विद्यार्थीनी ज्यू होत्या. त्यातल्या एकीला तर हायडेगरने महायुद्धात जर्मनी सोडून पळून जाण्यासाठी मदतही केली होती.

दुसऱ्या महायुद्धानंतर नाझीवादाचा जर्मनीला तिटकारा वाटू लागला तेव्हा त्यावेळेच्या सरकारनं हायडेगरवर बंदी घातली. विद्यापीठात शिकवण्याची परवानगी त्याला नाकारली. नंतर ही बंदी उठवली. पण हायडेगरने कधीही नाझीवादाला पाठिंबा दिल्याबद्दल जाहीर माफी मागितली नाही किंवा आपली भूमिका चुकल्याचा कधी पश्चातापही व्यक्त केला नाही. उलट, मरेपर्यंत तो नाझीवादी भूमिकेचं समर्थनच करत राहिला.

नाझीवाद आणि हिटलरला साथ दिल्यामुळं हायडेगर नेहमीच वादात राहिला. तरीही एखाद्या महान तत्त्वचिंतकाची राजकीय भूमिका बाजुला ठेवून निव्वळ त्याच्या महान संकल्पना आपण पुढे नेऊ शकतो का, यावर जगभरातले विचारवंत, अभ्यासक आज हायडेगरच्या १३० व्या जयंतीदिवशी काथ्याकूट करताहेत.

हेही वाचाः 

संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

आपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय?

संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया