भटकभवानी : वैचारिक दृष्टिकोन व्यापक करणारा लेखसंग्रह

३१ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : १३ मिनिटं


‘भटकभवानी’ हा समीना दलवाई यांनी लिहलेल्या एक्केचाळीस लेखांचा संग्रह. वेगवेगळ्या विषयांना हात घालत वाचकांच्या मेंदूला प्रगल्भ विचारांचे खाद्य पुरवणारा हा लेखसंग्रह हरिती प्रकाशनानं प्रसिद्ध केलाय. मुसलमान आणि मुख्य प्रवाह तसंच स्त्रीविषयक जाणीवांवर प्रकाश टाकणाऱ्या या लेखसंग्रहाची ओळख करून देणारा साधना साप्तहिकातला हा लेख.

विविध विषयांवरच्या एक्केचाळीस लेखांचा ‘भटकभवानी’ हा नवा लेखसंग्रह समीना दलवाई यांचा आहे. तो चिंतनीय असून पुण्याच्या हरिती प्रकाशनानं नुकताच प्रसिद्ध केलाय. ‘भटकभवानी’ हा शब्द देशविदेशांत भटकत राहण्याच्या अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाच्या अर्थानं वापरून लेखिकेनं एका बदनाम शब्दाला प्रतिष्ठा मिळवून दिलीय, यावरून समीना दलवाई या एक प्रखर लेखिका आहेत ते कळतं.

आशयसंपन्न लेखसंग्रह

हा संग्रह वाचायला घेतला की तो आपण आशय संपन्नतेनं वाचतच राहतो. वाचताना अनेक स्थळी चक्रावून अवाक होतो. इतकंच नाही तर आत्मपरीक्षणासह विचारही करायला लागतो. कारण भटकंतीतून लेखिकेला मिळालेलं ज्ञान आपल्याकडे सहजतेनं संक्रमित होत जातं.

खुद्द समीना दलवाईंनीच आपल्या मनोगतात असं कबूल केलंय की या भटकण्यातूनच त्यांना स्वतःच्या स्त्रीत्वाची, स्वतःच्या मुसलमानपणाची आणि स्वतःच्या डाव्या विचारांची नव्यानं पुन:ओळख झालीय. या ओळखीनं त्या आधी होत्या त्याहून अधिक समृद्ध, बहुश्रुत, समंजस, सुसंस्कृत आणि व्यापक झाल्या आहेत. म्हणून त्या आपल्या डोळ्यांपुढे ग्लोबल विलेजच्या नागरिक आणि महात्मा फुल्यांच्या सर्वधर्मीय कुटुंबाच्या सदस्या म्हणून तरळत राहतात. त्या खरोखरच देश, धर्म, जात, वंश यांच्या पलीकडे गेल्या आहेत. 

लिंगभावातल्या बारकाव्यांसह स्त्रियांच्या लैंगिक अधिकारांविषयी त्या कोणत्याही दडपणाशिवाय मोकळ्या मनानं बिनधास्तपणे लिहू शकतात. पुरुषप्रधान व्यवस्थेच्या मर्यादा तर त्या इतक्या सहज आणि कमीतकमी शब्दांत सांगतात की आपण अक्षरशः मनातल्या मनात ‘व्वा!’ म्हणून जातो. म्हणून हे लेखन सुटसुटीत, अल्पाक्षरी, आटोपशीर, खुसखुशीत होऊन खेळकर झालंय. यामुळे प्रत्येक मराठी वाचकानं ‘भटकभवानी’ हा लेखसंग्रह वाचायला हवा. 

हेही वाचा: बाहेरच्या झगमगाटात काळजात कँडल पेटवते ग्लुकची कविता

ना आकस, ना पूर्वग्रह

लेखिका आईकडून हिंदू आणि वडिलांकडून मुसलमान असल्या तरी सगळीकडेच त्या सारख्याच आत्मीयतेनं वावरताना दिसतात. कारण त्या आपल्या प्रा. नलिनी पंडित नावाच्या प्रसिद्ध आजीत जितक्या खोल मनानं गुंतलेल्या आहेत तेवढ्याच त्या भाना फुफ्फू-आत्यातही गुंतलेल्या आहेत. त्यांच्या मनात कोणाविषयीचा आकस नाही की कोणाविषयीचे पूर्वग्रह नाहीत.

म्हणून तर समीना दलवाई पु. ल. देशपांडे यांच्यासह स्वतःच्या काका असलेल्या हमीद दलवाईंनाही तर्कसंगत असे प्रश्न विचारू शकतात. त्या आपल्या प्रत्येक वर्ण्यविषयाची नाडी एखाद्या निष्णात वैद्यासारखी तपासून केवळ त्यातलं मर्मच स्पष्ट करत जातात. त्यामुळे स्त्री-शोषितांकडे पाहण्याची आपली दृष्टीच व्यापक होत जाते, असं मला वाटतं.

तर ह्या संग्रहाची अगदी मनापासून पाठराखण करणाऱ्या अभिनेत्री गीतांजली कुळकर्णींना हे लेखन प्रगल्भ करणारं वाटतं आणि कवयित्री नीरजा यांना हे लेखन या बीभत्स कोलाहलात मनाला ‘सुकून’ देणारं वाटतं. असा तुमचाही अन्वयार्थ शोधायला हा लेखसंग्रह वाचायला घेतलात तर हे पारदर्शी निर्मळ असं लेखन आपल्या खेळकरपणानं तुम्हालाही भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही. 

मुख्य प्रवाहाला सवाल

एक दिवस मुंबईत चालता-फिरता, बोलताना लेखिकेला केवळ तिच्या मुसलमान नावामुळे अनेक विचित्र असे अभिप्राय मिळतात. त्यामुळे तिच्या मनात प्रश्नांचा कल्लोळ निर्माण होतो. त्या प्रश्नांच्या जंजाळातून लेखिका आपला देश आणि आपल्या देशातला मुख्य प्रवाह यांविषयीचे गंभीर प्रश्न उभे करते. या प्रश्नांनी आपण विचार करू लागतो.

त्या विचारातूनच तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या परीनं आपल्या मनात झिरपू लागतं. लेखिका आपलं स्वतंत्र भाष्य करत नाही तर केवळ वाचकांनी विचार करावा एवढंच तिला हवं असतं. कारण, केवळ आणि केवळ मुसलमान असल्यामुळे,

तुम्ही मुसलमान असूनही मराठी छानच बोलता.
मॅडम, मुसलमान राष्ट्रीय प्रवाहात यायला हवेत. पण आमच्या सोसायटीत मात्र मुसलमान नकोत.
तुझे बाबा तर किती देखणे आहेत! ते मुसलमान दिसत नाहीत.
मुसलमान असूनही तुम्ही सोज्ज्वळ आहात.
तुम्ही मुसलमान असूनही तसे नाही आहात.

हे सर्व जे स्वतःला या देशाचे, संस्कृतीचे आणि भाषेचे मालक समजतात त्यांच्या मनातून न कळत बाहेर आलंय. त्यांना हेही माहीत नसतं की आपल्या एक पंचमांश बांधवांनीच इथं आलेल्या विविध धर्मांत प्रवेश केलाय. त्यामुळे लेखिका असं विचारते की, मुसलमानांनी आमची मराठी भाषा बोलू नये, आमच्या आसपास राहू नये, आमच्या मुलांबरोबर खेळू नये, आमच्या घरी जेवायला येऊ नये, सुंदरही दिसू नये. तर मग त्यांनी हा देश आपला मानावा तो कसा?

लेखिकेनं असाच गंभीर प्रश्न टीवी चॅनेलवर चाललेल्या ‘मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाहात येणं ही काळाची गरज आहे का?’ या विषयावरील चर्चेमुळे विचारलाय. सलवार-कुर्ता हा मुसलमानी वेश, मेहंदी मुसलमानी, जिलेबी-पान-लाडके हिरो मुसलमान, जुन्या गायिका आणि नट्यासुद्धा मुसलमान, फारसी, उर्दू, संस्कृत अशा अनेक भाषांचा मिलाप असलेली राष्ट्रभाषा हिंदुस्थानी! मग मुसलमानांनी मुख्य प्रवाहात यायचं म्हणजे नेमकं काय करायचं बुवा?

हेही वाचा: राजन गवसः जगण्यातूनच आली लिहण्याची भूमिका

मुख्य प्रवाह वाहता व्हावा

‘मुख्य प्रवाह आणि मुसलमान’ या लेखात तर लेखिकेनं अमर्त्य सेन यांच्या हवाल्यानं असं म्हटलंय की या देशात जातिव्यवस्थेनं आणि धर्मानं बहुजनांना शिक्षणापासून दूर ठेवलं. स्वतंत्र भारतातही पुन्हा तेच चालू असल्यानं स्त्रिया, आदिवासी, मुसलमानांसह बहुजनांचं प्रचंड मोठं मनुष्यबळ देश उभारणीसाठी वापरता आलं नाही म्हणून आज मुसलमान समाज दलितांहूनही अधिक दलित झालाय.

सततच्या पद्धतशीर द्वेषामुळे मुसलमानांचं मानसिक खच्चीकरण होतंय. मुसलमानांकडे नेहमीच संशयानं पाहिलं जातं म्हणून त्यांच्यात न्यूनगंड आलाय. एका विचित्र अशा अनामिक भीतीनं मुसलमान समाज ग्रासलाय. भोवताली अघटित असं काही ना काही तरी घडतच आहे. अजूनही काही तरी भयंकर घडेल याच्या छायेत तो सध्या जगतोय. तो दिवसेंदिवस सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागेमागेच जातोय.

कारण मुसलमान वस्त्यांत पुरेशा नागरी सोयी नाहीत की शाळा नाहीत. कुठे शाळा आहे पण तिथं मास्तरच नाही. आलाच कुठून बदलून मास्तर तर शैक्षणिक साधनंच नाहीत. फळा नाही की बाथरूम नाही. मोडक्या इमारतीची डागडुजी नाही. मराठी-इंग्रजी शाळा मुसलमान मुलांना सहज प्रवेश देत नाहीत. संकोच, भीती, एकटेपणामुळे मुसलमान मुलं त्या शाळांमधे जायलाही कचरतात. सगळं वातावरण, पाठ्यपुस्तकं विरोधी असल्यासारखीच असतात.

मुसलमान जीवनातले कुठलेही अनुभव, सण, समारंभ, नावं, मुख्य प्रवाहातल्या शिक्षणात नाहीत. इतिहास तर विपर्यस्तच शिकवला जात असल्यानं भावनिकदृष्ट्या मुसलमान मुलं शाळेपासून दूर जाऊ लागतात. त्यामुळे मुख्य प्रवाह वाहता असायला हवा, आजूबाजूचे सर्व प्रवाह स्वतःत सामावून घेतघेतच तो सर्वसमावेशक व्हायला हवा. तो वाहता, सतत प्रवाही राहायला हवा. आपल्याकडचा मुख्य प्रवाह तर अभेद्य तटबंदीसारखाच आहे. या अभेद्य तटबंदीला स्त्रिया, अदिवासी, भटके, मुसलमान टक्कर देऊन-देऊन थकतात आणि शेवटी बाहेरच राहतात. 

इतिहासाचं चुकीचं उदात्तीकरण

जर्मनांनी दोन्ही महायुद्धांत ज्यू लोकांचं केलेलं शिरकाण, स्वतःचं विभाजन आणि परत एकत्र येण्यासारख्या भल्याबुऱ्या सर्व ऐतिहासिक घटना सांभाळून ठेवल्यात. तसंच गुलामाच्या खरेदी-विक्रीमुळे आणि त्यांच्या फुकटच्या श्रमावर युरोप कसा श्रीमंत बनला हेही जपून ठेवलंय. म्हणजे त्यांनी केलेले गुन्हेही जगानं पाहावेत आणि त्यातून काही शिकावं, अशी त्यांची इतिहासाकडे बघण्याची भावना आहे, दृष्टीही आहे.

पण आपण मात्र याच्या अगदी उलट शोषितांचं बंड आणि लढे अनुल्लेखानं मारून टाकतो. आपला क्रूर इतिहास लपवतो आणि लपवतच राहतो. आपण निःशस्त्र, म्हाताऱ्या, राष्ट्रपिता असलेल्या म. गांधींचा खून करतो पण बऱ्याबोलानं ते कबूल न करता उलट खुन्याचंच उदात्तीकरण करत बसतो.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटिशांची दोनतीनदा लेखी माफी मागिलेली असताना, अ. भा. स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ माथूर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तैलचित्र संसदेत लावण्यास विरोध केलेला असतानाही आपण त्यांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, असाच सन्मान करत राहातो.

हेही वाचा: मी बंडखोर कसा झालो, सांगतायत राजा ढाले

बहुजनांचा इतिहास गायब

अशा प्रकारे आपला इथला इतिहासच उच्च जातवर्णीयांपुरताच मर्यादित ठेवल्यानं इथं बहुजनांना इतिहासच राहिला नाही. म्हणून आपल्या इतिहासात राजपुतांच्या हवेल्या, ब्राह्मणांची मंदिरं आणि मराठ्यांचे किल्ले यांशिवाय फारसं काही नाही. त्यामुळे दलित कोरेगावच्या स्तंभाला आपला इतिहास म्हणून जवळ करतात. दलितांवरचे अनन्वित अत्याचार आपण इतिहासापासून लपवत आल्यानेच असं होत असावं.

दलित बहुजनांचा संघर्षमय इतिहास डॉ. बाबासाहेबांपासून सुरु झालाय. म्हणून दादर चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी आणि मा. मायावतीनिर्मित लखनौचं आंबेडकर पार्क आज दलितांच्या इतिहासातली आदरणीय स्थळे आहेत. या आंबेडकर पार्कमधे डॉ. आंबेडकरांच्या जीवनपटासह फुले, शाहू, बिरसा, रविदास, कबीर आणि बुद्ध हेही तिथे भेटतात. कारण हिंदू धर्म हा त्रैवर्णीयांचाच आहे.

म्हणून बाबासाहेबांनी दलितांना बौद्ध धर्म दिल्यानं भारतातल्या बौद्धस्थळांचा इतिहासही आता दलितांचाही झालाय. या पार्कमुळे तर आज उत्तर भारत ते दक्षिण भारत अशी परिवर्तनाची सहलच घडते. या लेखात लेखिका स्वतःला ‘जय भीम’वाली म्हणवते, ते मोठं अर्थपूर्ण आणि अन्वर्थक आहे. हा लेखिकेचा निकोप असा बहुजनवादी दृष्टिकोन कोणालाही पटणारा आणि भावणाराच आहे. 

हिंदू म्हणजे कोण?

‘भटकभवानी’तल्या ‘हिंदू म्हणजे कोण?’ या लेखात तेलुगूंना वाटतं की लग्न करताना नवरानवरीनं डोक्याला गूळ थापणं म्हणजे हिंदू असणं. बंगाल्यांना वाटतं ‘शोंदेश’ खाऊ घालणं, हरियाणातल्या जाटांना वाटतं खाप पंचायत, बंगालची दुर्गापूजा ‘माछभाता’शिवाय पूर्ण होत नाही, काश्मीरचे पंडित शिवरात्रीला अक्रोड वाटून दुसऱ्या दिवशी मटण, मासे खाणं म्हणजेच हिंदू असणं समजतात.

आक्रमक म्हणून उत्तरेत आलेल्या तुर्कांना ‘स’ उच्चार येत नसल्यानं सिंधू नदीच्या खोऱ्यातील लोकांना ‘हिंदू’ म्हटल्यानं आपण हिंदू झालो. पण नंतर इथं आलेल्या ब्रिटिश कायद्याच्या न्यायालयालाच असा प्रश्न पडला की हिंदू म्हणजे कोण? म्हणून त्यांनी काशीच्या पंडितांना एकत्र बसवून हिंदू कायदा लिहून घेतला. वैदिक धर्मीय ब्राह्मणांनी लिहिलेला कायदा हिंदू कायदा म्हणून तो सर्व जातिवर्णांना लावून टाकला.

तसंच जनगणना करताना हिंदू, मुसलमान, पारशी अशी धार्मिक वर्गवारी करून बिटिशांनी सर्व जातिवर्णांचा मिळून हिंदू नामक महाप्राय असा वर्ग तयार केला. हिंदूत जसं जाती-वर्णांचं वैविध्य आहे तसेच ते इथं बाहेरून आलेल्या आणि इथं जन्माला आलेल्या सर्व धर्मांतही आहे. ही विविधता म्हणजे परस्पर भिन्नताच आहे; जी इथले विचारवंत इथल्या मुसलमानांचा विचार करताना लक्षातच घेत नाहीत.

इथल्या प्रचंड वैविध्यानं इथं आलेले विविध वंशीय - विविध धर्मीय लोकही बदलून गेले. त्यामुळे इथली संस्कृतीही संमिश्र झाली. मग त्यातून काही नव्या भाषाही निर्माण झाल्या. ब्रिटिशांनी शेकडो संस्थानांसह काही राज्यांचा मिळून एक देश उभा केला. विलगतेतून एक सलगता निर्माण होत गेली. हीच ती ‘विविधतेतील एकता’ आहे. तरीही आपण विशिष्ट बहुसंख्याकांच्या हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देश याचीच टिमकी वाजवत राहतो. 

हेही वाचा: इस्लामविषयी साध्यासोप्या मराठीत ए टू झेड माहिती देणारं पुस्तक बाजारात

हिंदूंची सहिष्णुता

सहिष्णुता आणि औदार्य यांबद्दल हिंदू धर्माची फार स्तुती केली जाते. त्याविषयी नरहर कुरुंदकर असं म्हणतात की, इतरांना आपल्या धर्मात घेण्याची हिंदूंची प्रथा नाही म्हणून हिंदू धर्म सहिष्णू वाटतो इतकंच. बाकी हजार-हजार वर्षं उभे गंध लावणारे उभेच लावतात, आडवं लावणारे आडवंच गंध लावतात.

अत्यंत कर्मठ, असहिष्णू, परंपरावादी आणि इतरांच्या अस्तित्वाविषयी कमालीचे उदासीन असणारे शे-दीडशे गट असं हिंदू धर्माच्या उदार सहिष्णुतेचं खरं रूप आहे. तरी आपण हिंदू जन्मतःच सहिष्णू असल्याची थाप स्वतःच स्वतःला अजून किती दिवस देत राहणार आहोत?

उदारमतवादी समाजाचं वास्तव

‘हमीद दलवाई आणि मुस्लिम प्रतिमा’ या लेखात तर समीना दलवाई यांनी पु. ल. देशपांडे यांच्यासकट हमीद दलवाई यांनाही प्रश्न विचारलाय. कारण बहुतेक मराठी लेखक विचारवंत असं मानतात की आगरकरांना लाभलेली हिंदूंमधली उदारमतवादी परंपरा मुसलमानी धर्मात जन्माला आल्यामुळे हमीद दलवाईंना लाभली नाही.

यावर लेखिका असं म्हणते की आगरकरांच्या काळात हिंदू- विशेषतः ब्राह्मण समाज किती उदारमतवादी होता? हे आगरकर, फुले, पंडिता रमाबाई यांचं लिखाण नुसतं चाळलं तरी दिसून येईल. उत्तर भारतात सलतनतींमुळे हिंदूना मुसलमान चालीरीती, कला, संस्कृती याची जाण असते.

महाराष्ट्रात मात्र आयुष्यात चार मुसलमान न भेटलेले लोक मुसलमानांच्या प्रश्नावर मतप्रदर्शन करतात. हा आपला अडाणीपणाच आहे. कारण भारतवंशीय मुसलमानांनाच पुरेपूर इस्लाम माहीत नाही तर मग इथल्या इतरांना कसा काय माहीत असणार? म्हणून या दोघांनीही स्त्रीवादी कायदेतज्ञ, फ्लेविया अग्नेस यांची हिंदू, ख्रिश्चनांपेक्षाही प्रगत असलेल्या इस्लामी स्त्री-कायद्याविषयीची मतं समजून घेतली पाहिजेत.

हेही वाचा: 'लाल श्याम शाह' हे पुस्तक मी का लिहिलं?

फ्लेविया अग्नेस यांची मांडणी

हिंदूमधे लग्न हा संस्कार आहे, देवाधर्मानं बांधलेली गाठ आहे जी मरेपर्यंत निघत नाही. इस्लाममधे लग्न हा करार असल्यानं गरजेनुसार तो संपुष्टात आणता येतो. 
हिंदूंमधे योनिशुचितेच्या संकल्पनेला खूपच अनाठायी महत्त्व असल्यानं बलात्कार हा मृत्यूपेक्षा भयंकर मानला जातो. पण इस्लाममधे योनिशुचितेची संकल्पनाच नसल्यानं दुसरी लग्नं सहज होतात. 
पित्याच्या संपत्तीत भावाचा अर्धा हिस्सा बहिणीला न मागता मिळतो.
घरात विधवा असतील तर हिंदूंप्रमाणे इस्लाममधे त्या अमंगळ, पांढऱ्या पायाच्या नसतात.
मासिक पाळीत वेगळे बसून अस्पर्श राहण्याची हिंदूंप्रमाणे इस्लाममधे गरजेचं नाही. 
उत्तर भारतात बुरखापद्धती प्रचलित आहे. पण तिकडे हिंदू स्त्रियाही हातभर घुंघट काढूनच वावरत असतात.

उदारमतवादी समाजाला प्रश्न

जॉर्डनसारख्या देशातल्या स्त्रिया ‘माझा नवरा मला सुख देत नाही,’ या कारणासाठी तलाक मागू शकतात पण हिंदूंमधे मनुस्मृतीनुसार नवरा नपुंसक, वेडा, क्रूर, वेश्यागमनी कसाही असला तरी पती-परमेश्वर म्हणून त्याला पुजावा. असं असलं तरी पु. ल. देशपांडे ‘बिचाऱ्या मुसलमान बायका विरुद्ध क्रूर मुसलमान पुरुष’ असं चित्र का उभं करत राहतात?

आगकरांच्या काळातला क्रूर ब्राह्मण समाज दलवाईंच्या कोकणी मुसलमान जमातीपेक्षा अधिक उदारमतवादी कसा काय वाटू शकतो? खरं तर इथली पुरुषप्रधान व्यवस्थाच हिंदू-मुसलमान पुरुषांना स्त्रीवर अत्याचार करायला प्रोत्साहन देत राहते. त्यामुळे सगळेच पुरुष शरीरसुखासाठी साऱ्याच धार्मिक, नैतिक कायद्यांना मूठमाती देऊन स्त्रीची शिकार करतच राहतात, हेच खरं. 

हेही वाचा: वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

स्त्री हाच केंद्रबिंदू

समीना दलवाई यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू स्त्रीच असणार आहे हे उघड आहे. म्हणून विविध स्त्रीरूपे या ‘भटकभवानी’ लेखसंग्रहात आढळतात. स्त्रीचं आदर्श रूप सीता, स्त्रीचं शक्तिरूप पार्वती, माणदेशाच्या दुष्काळी म्हसवड गावात यशस्वी अशी महिला बँक उभ्या करणाऱ्या चेतना सिन्हांचं विधायक रूप, ‘बामनी फेमिनिझम’मधलं स्त्रीविचारांचं संकुचित रूप जसं इथं पाहायला मिळतं तसंच इथं घरेलू नर्तिकांसह आजी आणि भाना फुफ्फूचं घरगुती रूपही पाहायला मिळतं.

या लेखिकेनं या संग्रहाच्या अनेक लेखांमधून स्त्रीत्वाचा, स्त्रीप्रश्नांचा आणि स्त्रीसमस्यांचा अत्यंत बारकाईनं वेध घेतलाय. पितृसत्ताक व्यवस्थेनं ‘चांगली बाई-वाईट बाई’ या विचारसूत्राचं हत्यार बनवून बाईला नेहमीच आपल्या ताब्यात ठेवलंय. ‘चांगल्या बाईचं नेहमी चांगलंच आणि वाईट बाईचं नेहमी वाईटच होणार, पती हाच परमेश्वर, बाईचा संसार हेच बाईचं सौभाग्य,पतिव्रता धर्म हाच श्रेष्ठ धर्म आहे.’

असे विचार सतत स्त्रियांच्या मनावर बिंबवून जातिव्यवस्थेनं स्त्रियांच्या गुलामगिरीला धर्माचं अधिष्ठान प्राप्त करून दिलंय. म्हणून म. फुले पती-पत्नींनी १८५०मधे विधवांची बाळंतपणं करून बायकांना गुन्हेगार ठरवणाऱ्या नीतिमत्तेला टक्कर दिली. पण आपल्याला हा नवा लैंगिक मूल्यव्यवस्थेचा अध्याय पचला नाही. म्हणून तर आज नवरा नसलेली तरुण स्त्री मातृत्वाचा आनंद घेऊ शकत नाही.

बलात्काराची संस्कृती

इथं बलात्काराची केस नामुष्कीच्या भीतीमुळे सहसा केलीच जात नाही. आणि केलीच तर ती निकाली निघता निघत नाही. या पुरुषप्रधान व्यवस्थेत हिमतीनं कायद्यांवर विश्वास ठेवून जर कुण्या बलात्कार झालेल्या स्त्रीनं बलात्काराची केस केलीच तर त्यात येणाऱ्या अडथळ्यांचा जो दीर्घ पाढा इथं लेखिकेनं वाचलाय तो वाचून आपण थक्क होऊन जातो. निष्कर्षात लेखिका म्हणते, बलात्कारी खालच्या जातवर्णाचे असतील तर शिक्षा होते आणि उच्च जातवर्णाचे असतील तर शिक्षाच होत नाही.

जसं भवरीदेवीवर सामूहिक बलात्कारानंतरही शिक्षा झालेली नाही, खैरलांजी आरोपींनाही शिक्षा झाली नाही. गुजरात २००२मधे बलात्कार, नग्न धिंड काढणाऱ्या आरोपींनाही शिक्षा झाली नाही. एवढंच नाही तर स्त्रियांवरचे सैन्याचे भीषण अत्याचार समोर यावेत म्हणून मणिपुरी आसाम रायफलसमोर स्त्रियांनी विवस्त्र मोर्चा काढला, हे वाचून तर आपण थरारून हैराण होत अवाक होत जातो.

आपण पुरुष असल्याची आपलीच आपल्याला लाज वाटते. त्यामुळे स्त्री अभ्यासक प्रतीक्षा बक्षी याला ‘भारतातली बलात्कारी संस्कृती’ म्हणतात. तरीही आपण आपली संस्कृती सर्वांत महान असल्याचं अजून किती दिवस सांगत बसणार आहोत? आपल्या महानतेबरोबर आपलं क्रूरपणही सांगायला हवं ना?

इंग्रजी अमदानीत ब्रिटिश लोक आपल्याला बोल लावायचे की तुम्ही तुमच्या स्त्रियांना जनावरांसारखं वागवता. त्यांना लिहायला वाचायला शिकवत नाही. तिला नवऱ्याबरोबर बसून जेवायची, बोलायची मोकळीक नाही. असे रानटी लोक तुम्ही स्वयंशासन करण्यास लायकच नाही आहात. असं ऐकून घेण्याची पाळी आपल्यातल्या पुरुषप्रधानता, स्त्रीदास्य, जातिवर्चस्व, धार्मिक आंधळेपणा आणि आपल्या अन्यायी संकल्पना आणि चालीरीतींमुळे येत होती. 

हेही वाचा: एकाचवेळी आत्ममग्न आणि वैश्विक असते इंदिरा संत यांची कविता

स्त्रियांच्या लैंगिक समस्या

समीना दलवाई यांनी स्त्रीसमस्यांचा तर अगदी खोलात जाऊन विचार केलाय. ज्यामुळे वाचकही विचार करायला प्रवृत्त होत जातो. आपण बाईच्या जिवाची काळजी कमी पण तिच्या गर्भाशयाची काळजी जास्त घेत असतो. कारण स्त्रीचं गर्भाशय स्त्रीचं असलं तरी ते तिच्या नवऱ्याच्या मालकीचं समजत असतो. आरोग्याच्या दृष्टीनं जेव्हा गर्भाशय स्त्रीजीवाच्या आड येऊ लागतं तेव्हा गर्भाशयाचे तुकडे करायचे की नाही? याविषयी डॉक्टर स्त्रीच्या नवऱ्याला विचारणार.

कारण स्त्रीचं शरीर, स्त्रीचा जीव स्त्रीच्या मालकीचा नाही. स्त्री आपल्या जिवाचा निर्णय स्वतंत्रपणे आजही करू शकत नाही. ही स्त्रीची सर्वांत मोठी समस्या आहे. स्त्रीची दुसरी समस्या अशी की नवरात्रीच्या काळानंतर गर्भपात करत बसण्यापेक्षा सर्वांनी कंडोम वापरला तर गर्भपाताची वेळच येणार नाही. तसं तर सेक्स आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं असतं, स्ट्रेस कमी होतो, आपोआप व्यायाम होतो, त्वचेला झळाळी चढते, हे अगदी सिगरेटच्या उलट आहे.

स्त्रीची तिसरी समस्या सिव्हिल मॅरेज आहे. कारण धार्मिक लग्नापेक्षा हे सिव्हिल मॅरेज करणे अतिशय बिकट काम असल्याचं सोदाहरण पण अतिशय बारकाईनं मांडलंय. अशा अवस्थेत लग्नच करू नये, नुसतं एकत्र राहावं असं वाटलं तर त्यात नवल नाही.

चौथी समस्या अविवाहित तरुण स्त्रियांच्या लैंगिक अधिकाराविषयी मागण्यांची आहे. स्त्रीरोग तज्ञांनी नैतिकतेचे धडे न देता आदरानं आणि व्यावसायिक पद्धतीनं वागवावं. तसंच सज्ञान तरुणीच्या लैंगिक आरोग्याची माहिती इतरांना देऊ नये. तिला गोपनीयतेचा अधिकार असायला हवा.

सौंदर्य आणि योनिशुचिता

वर्ल्ड चॅम्पियन सेरेनाने स्वतःच्या गर्भारपणातला न्यूड फोटो एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी दिल्याच्या निमित्तानं खरं सौंदर्य काळं की गोरं? हा प्रश्न उपस्थित करून स्त्रियांची ही पाचवी समस्या असल्याचं सांगितलंय. गोरी त्वचा, निळे डोळे, सोनेरी केस म्हणजेच सौंदर्य म्हणण्यापेक्षा ‘ब्लॅक इज ब्युटिफुल’ असू शकतं.

कारण काळी शरीरं मरमर कामासाठी वापरायची, ती वासनेसाठी ओरबाडायची आणि वर ती तुच्छ समजायची, हे काही योग्य आहे असं वाटत नाही. याशिवाय सेरेनाच्या न्यूड फोटोतील कमावलेलं शरीर, पीळदार दंड, उंच मोठे नितंब, गरोदरपणात बेढब झालेत असं न मानता खुशीने, गर्वानं स्वतःकडे पाहणे लेखिकेला स्त्री म्हणून आवडलंय. सौंदर्य तर काळ्यातही आहे आणि गोऱ्यातही आहे.

स्त्रीची सहावी समस्या बलात्कार ही आहे. योनिशुचितेला अतिरेकी महत्त्व दिल्यानं इथं बलात्कार म्हणजे जिंदा लाशच अथवा प्रत्यक्ष मृत्यूच आहे असं समजलं जातं. ही बलात्कारी आणि स्त्रीविषयी शिकारी असलेली व्यवस्था बदलायला हवी. आई-बाबाला कळू नये म्हणून मुली सतत बलात्काराला सामोऱ्या जात असतील तर मग हा कसला देश आहे? असंच म्हणावं लागेल. ‘भटकभवानी’या संग्रहातल्या मला भावलेल्या विचारांचा हा आशय चिंतनीय आणि मननीय आहे.

लेखसंग्रह: भटकभवानी
लेखिका: समीना दलवाई
प्रकाशन: हरिती पब्लिकेशन, पुणे
पृष्ठे: १७६
किंमत: २५० रुपये

हेही वाचा: 

तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

(लेख साधना साप्ताहिकातून साभार)