भानू अथैय्या : भारताला पहिला ऑस्कर जिंकून देणारी कोल्हापूरची मुलगी

१६ ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


१९८३ उच्चारल्यावर भारताने वर्ल्डकप जिंकल्याचं आठवतं. पण त्याचवर्षी भानू अथैय्या या मराठी मुलीनं गांधी सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकला. त्या बेस्ट कॉश्च्युम डिझायनर ठरल्या. आपल्या कलेला त्यांनी पुढे नेत ऑस्करपर्यंत मजल मारली. काल १५ ऑक्टोबरला रात्री त्यांचं निधन झालं. कोल्हापूर ते ऑस्कर हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

ऑस्कर हा सिनेक्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार सर्वप्रथम भारताला वेशभूषाकार भानू अथ्थैया यांनी मिळवून दिला. १९८३ मधे त्यांना हा अवॉर्ड मिळाला. त्यानंतर २६ वर्षांनी स्लमडॉग मिलेनियर सिनेमाच्या निमित्ताने ए. आर. रेहमान, रसुल पुक्कुटी आणि गुलजार यांनी ऑस्कर मिळवला.

यादरम्यान १९९२ला सत्यजित राय यांना सिनेमातल्या योगदानाबद्दल लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात आला. एवढी यादी असली तरी भानू अथैय्या आजही ऑस्कर अवॉर्ड मिळवणाऱ्या एकमेव भारतीय महिला आहेत. काल १५ ऑक्टोबरला रात्री त्यांचं निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. 

हेही वाचा : ऑस्करच्या आयचा घो!

वडिलांचा चित्रकलेचा वारसा ते सिनेमा

या मराठमोळ्या मुलीचा जन्म २८ एप्रिला १९२९ला कोल्हापुरात झाला. त्यांचं नाव भानुमती राजोपाध्ये. त्यांना ६ भावंडं होती. त्यांचं कुटुंब कर्मठ परंपरावादी होतं. मात्र त्यांच्या बाबांनी परंपरा मोडत चित्रकलेत करिअर केलं.

टेलिग्राफ पेपराला २००८मधे दिलेल्या मुलाखतीत अथैय्या म्हणाल्या, ‘बाबा त्यांचं चित्र पूर्ण झालं की रंग, ब्रशची सफाई करण्यासाठी मला बोलवत. मी ते काम मनापासून करत होते. काही दिवसांनी बाबांना माझी चित्र कलेची आवड ओळखून चित्रकलेसाठी घरीच विशेष क्लास लावले. त्या काळात मुलींना वेगळ्या विषयातलं बाहेर जाऊन शिकता येत नव्हतं किंवा तसं वातावरणही तयार झालेलं नव्हतं.’ त्यानंतर भानू यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून फाईन आर्ट्समधे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यांना गोल्ड मेडल आणि फेलोशिप मिळाली.

शिक्षण घेत असताना त्या मॉडर्न पेंटर म्हणून अनेक प्रदर्शनं भरवत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर पण त्यांनी काही प्रदर्शन केली. नंतर त्यांनी एवाज् मॅगझिनमधे इंडियन हेरीटेजवरुन फॅशन इलस्ट्रेशन काढण्यास सुरवात केली. मग त्यानंतर बुटिकमधे काम करणं सुरु केलं.

‘बुटिकमधे सिनेमा, टीवी क्षेत्रातली मंडळी येत. त्यांच्यातल्या कामिनी कौशल यांनी मला स्वतंत्र कॉश्च्युम डिझायनिंगचा पहिला प्रोजेक्ट दिला. मी सुरवातीला त्यांचे पर्सनल कपडे डिझाइन करत होते. मग हळूहळू सिनेमांमधे काम मिळू लागलं,’ असं  त्यांनी यूएस ऑस्कर मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय.

हेही वाचा : अंधाधूनसारखा सिनेमा चीनमधे अंधाधुंद कमाई का करतो?

चुडीदार, टाईट कुर्ता हे स्टाईल स्टेटमेंट

गुरु दत्त यांच्या १९५६ला आलेल्या सीआयडी सिनेमानंतर त्यांना अनेक हिंदी सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. कागज के फूल, चौदहवी का चांद, प्यासा, साहब बिबी और गुलाम, वक्त, तिसरी मंजिल, गाईड, लीडर, गंगा जमुना, जॉनी मेरा नाम, खिलौना सारखे सिनेमे माईलस्टोन सिनेमे मिळाले.

बी. आर. चोप्रांच्या वक्त सिनेमातले अथ्थैयांनी डिझाइन केलेले कपडे लोकप्रिय ठरले. त्यात साधनाने घातलेले टाईट चुडीदार आणि टाईट कुर्ता हा ड्रेस खूप प्रसिद्ध झाला. मुगलांकडून भारतीय पेहरावात आलेल्या चुडीदारला फॅशनमधे आणत त्यावर त्यांनी काही लुज ट्युनिक देण्याऐवजी टाईट कुर्ता दिला. पुढे ही फॅशन ६० आणि ७० च्या दशकात खूप चालली. प्रत्येकजण टेलरकडे जाऊन साधना ड्रेस शिवून घेत होते. तसंच सिनेमांमधे आशा पारेख, वैजयंतीमाला, मुमताज अशा सर्वच हिरोईन्सनीही हीच फॅशन कॅरी केली. 

हेही वाचा : मराठमोळी पूजा सावंत बॉलीवूडमधे एंट्रीसाठी रेडी

असा मिळाला गांधी सिनेमा

ब्रिटीश दिग्दर्शन रिचर्ड अॅटनबरो यांनी १९८०मधे महात्मा गांधींवर सिनेमा करण्याच ठरवलं. त्यांना वाटलं की भारतात सिनेमाची निर्मिती करणं सोपं नाही. इथलं कल्चर, कास्ट, रिलिजन, कम्युनिटी हे खूप कॉम्पेक्स असल्यामुळे त्यांनी भारतीय कॉश्च्युम डिझायनर घेण्याचं ठरवलं.

तोपर्यंत अथ्थैयांना हिंदी सिनेक्षेत्रात काम करून २५ वर्षं झाली होती. यादरम्यान त्यांनी सिद्धार्थ हा इंग्रजी सिनेमा केला होता. मग रिचर्ड यांच्या सांगण्यानुसार मुंबईतल्या कास्टिंग डिरेक्टरने कॉश्च्युम डिझायनरचा शोध सुरु झाला. सिमी गरेवालला हे समजलं. सिमी आणि अथ्थैया यांच्यात चांगली मैत्री होती. त्यांनी अथैय्यांना ही गोष्ट सांगितली आणि त्या कामाचं महत्त्व पटवलं. त्यामुळे अथ्थैया इंटरव्यूसाठी गेल्या.

१५ मिनिटांच्या इंटर्व्यूमधे अटनबरोंना अथैय्यांची भारत आणि भारतीय जीवनाबद्दल असलेली समज लक्षात आली आणि त्यांचं सिलेक्शन झालं.

हेही वाचा : शाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला

आणि ऑस्करपर्यंत झेप घेतली

गांधी सिनेमाची स्क्रिप्ट वाचून त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं. इतर प्रोजेक्ट आटपून त्यांनी तीन महिने या सिनेमाचं काम केलं. कॉश्च्युम विभागात इतर असिस्टंट होते. मात्र संपूर्ण जबाबदारी अथ्थैयांवर होती. इंडो ब्रिटीश को प्रोडक्शनचा हा महत्त्वपूर्ण सिनेमा होता. त्यामुळे प्रत्येकजण बारकाईने काम करत होते.

यात त्यांना गांधी आणि कस्तुरबांच्या जीवनात कपड्यांच ट्रान्सफॉर्मेशनही दाखवायचं होतं. त्यासाठी कपडा कोणता, त्यावरची कलाकुसर, मेकअप, दागिनेही बघावं लागत होतं. सिनेमा ३० नोव्हेंबर १९८२ला जगभरात इंग्रजी आणि हिंदीत रीलिज झाला. त्या सिनेमाने इतिहास घडवला, असं भानू अथैय्यांनी द आर्ट ऑफ कॉश्च्युम डिझायनिंग या २०१०ला प्रकाशित झालेल्या पुस्तकात नोंदवून ठेवलंय.

हेही वाचा : सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट? 

१९८३चा ऑस्कर अकॅडमी अवॉर्ड फॉर बेस्ट कॉश्च्युम डिझायनिंगचा भानू अथैय्यांना मिळाला. यानंतर त्यांचं जगभरात कौतुक झालं. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर पुरस्कारांनी सन्मानित केलं. प्यासा, गांधी, लगान आणि स्वदेस इत्यादी सिनेमे त्यांच्या करिअरमधे मैलाचा दगड ठरले. त्यांनी २००४ला स्वदेस केल्यानंतर काम करणं थांबवलं.

५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी १०० सिनेमांसाठी कॉश्च्युम डिझायनिंगचं काम केलं. आजही त्या मालिका आणि सिनेमांसाठी कॉश्च्युम डिझायनर कन्सल्टंट म्हणून काम करतात. त्यांच्यामुळे अनेकांना या क्षेत्रात करिअर बनवण्याची प्रेरणा मिळाली. कॉश्च्युम डिझायनिंगला आर्टचा दर्जा मिळाला. आज हे स्वतंत्र क्षेत्र म्हणून देशाच्या अर्थकारणात खूप मोठा हातभार लावत आहे. त्यात भानू अथैय्यांचं मोठं योगदान आहे.

हेही वाचा : 

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

लॅक्मेचा फॅशन वीक किती दिवस बघायचा, आता आपणही उतरलं पाहिजे