समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल, असं खोडसाळ वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतंच औरंगाबादमधे केलं. हे अत्यंत खोडसाळ असं वक्तव्य शिवरायांची बदनामी करणारं आहे. त्याची चिरफाड करणारा हा लेख अकोल्याच्या 'दैनिक अजिंक्य भारत'मधून साभार.
औरंगाबाद इथल्या समर्थ साहित्य संमेलनाचे उद्घाटक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असं खोडसाळपणाचं वक्तव्य केलंय. वास्तविक पाहता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि राजभाषा मराठी दिनाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं.
राज्यपालांनी रामदासांच्या साहित्यावर, मराठी भाषेवर, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवावर न बोलता शिवरायांची बदनामी करण्याच्या हेतूने केलेल्या वक्तव्याची चिकित्सा झाली पाहिजे. वक्तव्याचं आश्चर्य यासाठी वाटत नाही कारण राज्यपाल जी टोपी घालतात त्या खालचा मेंदू गहाण असतो हे जगजाहीर आहे. समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारतो या वाक्यात सुद्धा रामदासांचा सन्मानाने तर शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. यातच सगळं आलं.
रामदास हे १६ व्या शतकातले एक गोसावी होते. त्यांना संत विशेषण आपण लावू शकत नाही कारण ते विषमतावादी होते. संत हे समतावादी असतात. संत हे जाती-धर्म-पंथाच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांच्या ठायी कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. पण रामदासांनी लिहून ठेवलंय,
गुरु तो सकळांसी ब्राम्हण| जरी तो जाला क्रियाहीन||
ब्राम्हण वेद मूर्तिमंत| ब्राम्हण तोचि भगवंत||
असो ब्राह्मणा सुरवर वंदिती| तेथे मानव बापुडे किती||
जरी ब्राम्हण मूढमती| तरी तो जगद्वंद्य||
अर्थात ब्राह्मणांपेक्षा कुणी श्रेष्ठ असूच शकत नाही. ब्राह्मणच भगवंत आहे. ब्राह्मणाला देवसुद्धा वंदन करतात. ब्राम्हण हा मूर्ख जरी असला तरी जगाने त्याला वंदन करावं. आता मला एक असा संत सांगा ज्याने एकाच जातीचं श्रेष्ठत्व सांगितलं आणि मान्य केलं.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी कधी म्हटलं की, कुणबीच सर्वात श्रेष्ठ असतात बाकी सगळे कनिष्ठ असतात म्हणून? संत रविदास महाराजांनी कधी म्हटलं की, चर्मकार हेच सर्वश्रेष्ठ असतात बाकी सगळे दुय्यम असतात म्हणून? संत सावता माळी, संत गोरोबा कुंभार यांनी कधी म्हटलं का की, माळी जातीचे लोकच सर्वात श्रेष्ठ? कुंभार समाजाचे लोकच सर्वात उच्चवर्णीय असतात म्हणून?
या संतांनी समानता आणली. विश्वबंधुतेला मान्यता दिली. प्रत्येकाकडे फक्त माणूस म्हणून पाहिलं म्हणून हे सगळे समतावादी खरे संत ठरतात तर 'जरी ब्राम्हण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ' असं म्हणणारे विषमतावादी रामदास हे संत ठरत नाहीत.
छत्रपती शिवरायांचा जन्म झाला १९ फेब्रुवारी १६३०चा. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ला रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिवरायांनी अफजल खानाचा वध केला १० नोव्हेंबर १६५९ला. शाहिस्तेखानाची बोटं कापली ५ एप्रिल १६६३ला. पुरंदरचा तह झाला ११ जून १६६५मधे.
शिवरायांनी औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून सुटका करून घेतली १८ ऑगस्ट १६६६ला. त्यानंतर त्यांनी तहात गमावलेले किल्ले पुन्हा स्वराज्यात आणले. आणि राज्याभिषेकाची तयारी सुरु केली. हे सर्व पराक्रम १६६६च्या अगोदर शिवरायांनी गाजवले होते, माँसाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनातच शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली होती. जिजाऊंनीच दोन्ही छत्रपती घडवले.
आता रामदास आणि शिवाजी महाराजांच्या भेटीविषयी बघुयात. खुद्द रामदासांच्या केशव गोसावी नावाच्या एका शिष्याने, दिवाकर गोसावी नावाच्या दुसऱ्या एका शिष्याला ४ एप्रिल १६७२ला एक पत्र लिहिलंय. त्याचा मजकूर असा की, 'आपण पत्र पाठविले ते पावले. मजकूर समजला. राजेश्री शिवाजी राजे भोसले हे समर्थांचे भेटीस येणार म्हणोन लिहिले, ते समजले. राजे यांची पहिलीच भेट आहे.' ४ एप्रिल १६७२च्या अगोदर रामदासांची आणि शिवरायांची भेट झाली नव्हती. हा पुरावा रामदास संप्रदायातल्या अस्सल कागदपत्रात आहे. खुद्द रामदासांच्या शिष्यानेच तो दिलाय.
हेही वाचा : लोकशाही मुल्यांमुळेच रयतेला शिवशाही हवीहवीशी
आता शिवाजी महाराजांचे गुरु म्हणवल्यानंतर बालपणापासून त्यांच्यावर संस्कार करणं, त्यांना विविध युद्धकलांचं प्रशिक्षण देणं, त्यांना राजकारणाचे धडे देणं त्यासाठी वारंवार भेटी घेणं हे सर्व अपेक्षित आहे. पण १६७२ला पहिली भेट होणार म्हणून पुरावा आहे. भेट झाली म्हणून पुरावा नाही. १६७२ पर्यंत छत्रपती शिवरायांनी पूर्णपणे स्वराज्याची स्थापना केली होती.
१६७४ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाला रामदासांना शिवरायांनी बोलावलं नाही. रामदास सुद्धा स्वतः हजर राहिले नाही. हा राज्याभिषेक करण्यासाठी कुणीही ब्राम्हण तयार नसताना रामदासांनी का राज्याभिषेकाला ब्राम्हण पुरवले नाही? का स्वतःहून हजर राहून स्वतः राज्याभिषेक केला नाही? का राज्याभिषेकासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकही ब्राम्हण भेटला नाही? का हजारो किलोमीटर दुरून गागाभट्टाला पाचारण करावं लागलं?
मिर्झा राजा जयसिंग, दिलेरखान म्हणजेच पर्यायाने औरंगजेब जिंकावा आणि शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा यासाठी ४०० ब्राह्मण कोटीचंडी यज्ञाच्या अनुष्ठानास बसले. त्यासाठी दिलेरखानाकडून मोठी रक्कम त्यांनी घेतली. मग या ४०० ब्राम्हणांना रामदासांनी का अडवलं नाही? का सांगितलं नाही की, शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीत अडथडा निर्माण करू नका?
छत्रपती शिवरायांच्या काळातल्या इतिहासाच्या अभ्यासाची विश्वसनीय आणि महत्वपूर्ण साधनं-ग्रंथ म्हणजे परमानंदाचं शिवभारत, जेधे शकावली आणि राधामाधवविलासचंपू हे आहेत. सर्वात विश्वसनीय बखर म्हणजे सभासदाची बखरही आहे. हे सर्व ग्रंथ विश्वसनीय समजले जातात कारण हे शिवाजी महाराजांच्या काळात लिहिले गेलेत. पण यापैकी एकही ग्रंथात रामदासांच्या नावाचा साधा उल्लेख देखील नाही.
रामदासकाळात किंवा त्यानंतर लगेच लिहिले गेलेले रामदासी संप्रदायाचे ग्रंथ जसे दिनकर स्वामीचा 'स्वानुभाव दिनकर', मेरुस्वामींचा 'रामसोहळा' यामधे छत्रपती शिवरायांचा उल्लेखही नाही. यावरून हे सिद्ध होतं की हा गुरु शिष्य संबंध खोटा आहे. मग हे संबंध जोडले कधी गेले? तर छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर १०० ते १२५ वर्षानंतर म्हणजेच पेशवे काळात लिहिलेल्या रामदासी बखर आणि त्याच काळात लिहिल्या गेलेल्या इतर मराठी बखरींमधून हा काल्पनिक संबंध जोडला गेला आहे.
शिवरायांच्या काळात लिहिल्या गेलेल्या बखरी खऱ्या की त्यांच्या मृत्यूनंतर १२५ वर्षांनी लिहिल्या गेलेल्या खऱ्या? सभासदाची बखर ही १६ मार्च १६९४ ते १३ मार्च १६९७ दरम्यान राजाराम महाराजांच्याच काळात लिहून पूर्ण झालेली आहे. कृष्णाजी अनंत सभासदाने ही बखर राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार लिहिली आहे. रामदास आणि शिवरायांचे संबंध असते तर ते राजाराम महाराजांना नक्कीच माहिती असतं आणि त्या संबंधांचा उल्लेख सभासद बखरीत आला असता. पण तसं झालं नाही.
हेही वाचा : महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही
रामदासांनी ३ एप्रिल १६७२ला छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिलं. त्यात शिवरायांच्या कार्याची स्तुती केली आहे. या पत्रात रामदास लिहितात,
या भूमंडळाचे ठायी| धर्मरक्षी ऐसा नाही||
महाराष्ट्र धर्म राहिला काही| तुम्हा कारणे||
म्हणजे महाराष्ट्र धर्म या पृथ्वीवर फक्त तुमच्यामुळे राहिला आहे हे रामदास स्वतः कबूल करतात. शिवरायांचं सामर्थ्य कबूल करतात. यातच ते पुढे लिहितात,
तुमचे देशी वास्तव्य केले| परंतु वर्तमान नाही घेतले||
ऋणानुबंधे विस्मरण झाले| काय नेणू||
म्हणजे तुमच्या राज्याच्या क्षेत्रात वास्तव्य केलं. पण तुम्ही आमची विचारपूसही केली नाही अशी तक्रार ते करतात. यावरून रामदासांची शिवरायांच्या लेखी काय किंमत होती हे सिद्ध होतं. याच पत्रात ते शेवटी लिहितात,
उदंड राजकारण तटले| तेणे चित्त विभागले||
प्रसंग नसता लिहिले| क्षमा केली पाहिजे||
म्हणजेच खूप कामं बाकी असल्यामुळे आणि द्विधा मनस्थितीत असून प्रसंग नसताना हे पत्र लिहिल्याबद्दल रामदास छत्रपती शिवरायांची माफी मागतात. क्षमायाचना करतात. कोणता गुरु आपल्या शिष्याला पत्र लिहिल्याबद्दल क्षमा मागतो? यावरून रामदासांना छत्रपती शिवरायांचा किती आदरयुक्त दरारा होता हे लक्षात येतं.
छत्रपती शिवरायांनी कधीही आपल्या बोलण्यातून किंवा पत्रातून रामदास माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्य असा उल्लेख केला नाही. रामदासांनी संपूर्ण आयुष्यात आपल्या वाङ्मयातून कधीच शिवाजी महाराज माझे शिष्य आहेत आणि मी त्यांचा गुरु आहे असा उल्लेख केला नाही. खुद्द शिवरायांना आणि रामदासांना हा संबंध माहीत नाही मग यांचे संबंध जबरदस्तीने जोडणारे कोण? दासबोधात रामदास म्हणतात,
सांडूनियां श्रीपती| जो करी नरस्तुती||
कां दृष्टी पडिल्यांची वर्णी कीर्ती| तो एक पढतमूर्ख||
म्हणजे ईश्वराला सोडून एखाद्या माणसाची स्तुती करणारा हा मोठा मूर्ख असतो. मग रामदासांनी शिवरायांची इतकी स्तुती करणं याचा अर्थ काय समजावा? रामदास शिवरायांना ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ मानत होते हेच यावरून स्पष्ट होतं.
रामदासांचे अभ्यासक भाटे म्हणतात की, 'समर्थांचे दैवत शिवराय हे होते.' सदाशिव खंडो आळतेकर समर्थचरित्रात म्हणतात, 'आयुष्याच्या अखेर समर्थ राजकारणावर उपदेश करू लागले, हे शिवाजीराजांच्या त्यांच्यावरच्या प्रभावाचंच द्योतक मानावं लागेल.'
हेही वाचा : शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी
विजापूर पातशाहीचे दोन मोठे अंमलदार मुरार जगदेव आणि बाजी घोरपडे हे छत्रपती शिवरायांचे शत्रू. या शिवरायांच्या शत्रूंनीच रामदासांच्या नव्या देवस्थानांला काही स्वतःच्या जमिनी आणि काही जमिनी विजापूरच्या दरबारामार्फत इनाम दिल्या आहेत.
रामदास जर शिवरायांचे गुरु असते तर शिवरायांच्या शत्रूंनी आणि आदिलशाहीने रामदासांना जमिनी दिल्या असत्या? रामदासांनी त्या घेतल्या असत्या? रामदास शिवरायांच्या शत्रूकडे आश्रित म्हणून राहिले असते? त्यांना मदत मागितली असती का? रामदासांनी रामाचं पहिलं मंदिर आदिलशाहीत बांधलं असतं की शिवशाहीत? हासुद्धा विचार आपण करायला पाहिजे.
मुधोळचे बाजी घोरपडे हे आदिलशाहाचे आश्रित आणि रामदास हे बाजी घोरपडेचे आश्रित. बाजी घोरपडेला शिवरायांनी कापून काढल्यानंतर मुधोळची जहागीर स्वराज्यात सामील झाली. त्यानंतर आता आपली जमीन-देवस्थान स्वराज्यात आलं म्हणून रामदासाने शिवाजी महाराजांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
रामदास जर मुघलांविरोधात लढण्याकरता आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देऊ शकतात तर ज्या बाजी घोरपडेचे ते आश्रित होते त्या बाजी घोरपडेला त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा का दिली नाही? किंवा स्वतः स्वराज्य स्थापना का केली नाही?
रामदास हे रामाचे भक्त तर छत्रपती शिवराय हे हर हर महादेव म्हणणारे. रामदासांचं गंध उभं तर शिवरायांचं आडवं. शिवरायांचं राजमुद्रा असलेलं पहिलं पत्र १६४६चं आहे तर रामदासी पंथाची स्थापना १६४९ची आहे. परस्त्री मातेसमान मानणारे छत्रपती शिवराय कुठे आणि मोठे इतिहास संशोधक प्रा. न. र.फाटकांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याच शिष्यीणींबरोबर अनैतिक संबंध ठेवणारे रामदास कुठे?
'जरी ब्राम्हण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ' असे म्हणणारे आणि मानणारे रामदास कुठे? आणि अफजलखानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीला ब्राम्हण आहे म्हणून मुलाहिजा न ठेवता त्याची गर्दन उडवणारे शिवराय कुठे? एकाच जातीचे श्रेष्ठत्व सांगणारे विषमतावादी रामदास कुठे तर अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणारे समतावादी शिवराय कुठे? काहीच संबंध नाही.
छत्रपतींचा असा जाहीर अपमान होत असताना स्वयंघोषित शिवप्रेमी आपल्या पक्षाच्या आणि नेत्यांच्या दबावाखाली मूग गिळून गप्प बसतात हे अत्यंत संतापजनक आहे. अजून कितीवेळा छत्रपतींपेक्षा आपल्या नेत्यांना मोठे सिद्ध करणार आहात? एकतर वेळोवेळी शिवरायांचं नाव घेणं तरी बंद करा.
आजपर्यंत रामदासांना खोट्या प्रचारामुळे का होईना पण छत्रपती शिवरायांमुळे समाजात ओळख मिळाली. महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवरायांचा पराक्रम सांगताना, मोठेपण सांगताना कुठेही कधीच रामदासांचं नाव घ्यावं लागत नाही. पण रामदासांचा मोठेपणा सांगण्यासाठी प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव घ्यावं लागतं. शिवरायांच्या नावाचाच आधार घ्यावा लागतो.
हेही वाचा :
शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश
राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड