बापूसाहेब काळदाते : तत्त्वांसाठी मंत्रीपद नाकारणारा राजकारणी

१७ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


आपल्या मुल्यांवर ठाम राहून राजकारण करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी खासदार बापूसाहेब काळदाते यांचा आज स्मृतीदिवस. १७ नोव्हेंबर २०११ ला त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक संत राजकारणी गमावला. आज राजकारण हे करिअर असल्याचे धडे दिले जातायत. अशा काळात आपल्या विचारांची, लोकांच्या श्रद्धेची प्रतारणा होऊ नये म्हणून केंद्र सरकारमधे मंत्रीपद नाकारणाऱ्या बापूंचं स्मरण महत्त्वाचं ठरतं.

राजकारणात कोणी संतसंन्यासी नसतो असं राजकारणातील लोकच सांगतात. तरीही नाव विठ्ठल असलेला, वारकरी कुटुंबात जन्मलेला आणि पंढरपुरात शिकलेला इस्थळचा एक तरुण राजकारणात जातो. तिथे वारीत वागतात तसा नेकीने चालतो. वारी संपली की माघारी अनासक्त होऊन राहतो. राजकीय प्रपंचातून मुक्ती घेतो. गंमतच म्हणायची म्हणजे बापू काही संत नाहीत; परंतु संतांची भूमी असं वर्णन जिचं केलं जातं ती मराठवाड्याची माती असा एक विरक्त राजकारणी बघते आहे खरी.

बरं, म्हातारपणीचे सारे मोह सुटले, मोह आटोपले असं काही नाही. चैन, चंगळ, चंदा यांची हाव या माणसाला त्याच्या तारुण्यातही नव्हती. घरचा संस्कार वारकरी पंथाचा, तर तरुण वयातील राजकीय संस्कार गांधीवादी समाजवादाचा. म्हणजे ऐहिक सुखाबद्दल निरिच्छ राहणं आपोआप जमलं. अशा या तरुणाचे राजकारणातील आगमन एखाद्या वीरासारखे झाले. महाराष्ट्राच्या सहकारमंत्र्यालाच त्यानं गारद केलं.
सहकारमंत्र्यांना हरवून थेट विधानसभेत

माणिकराव सोनवणे यांचा पराभव करून विठ्ठल रामचंद्र ऊर्फ बापू काळदाते विधानसभेत धडकले. एकूण १९६७ ते २००८ असा सलग ४० वर्षांचा राजकीय प्रवास मग चढउताराचा झाला. आमदार ते एका राष्ट्रीय पक्षाचा उपाध्यक्ष असा एक एक कळस गाठत तो स्वेच्छेने थांबला. आपला राजकीय विचार आपल्या वर्तनालासुद्धा लागू करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांची पिढी स्वातंत्र्य लढ्यात तयार झाली. बापू त्या पिढीचे शिल्लक राहिलेले एक ढळढळीत उदाहरण.

वर्गीय राजकारण करणाऱ्यांना आपलं खासगी तसंच सार्वजनिक वर्तन आपल्या राजकीय मूल्यांच्या विसंगत करण्याची त्या काळी मोठी शिक्षा मिळे. लोकांकडूनही ती मिळे. स्वपक्षीय आणि समविचारी नेत्या कार्यकर्यांकडून तर मिळेच. प्रामाणिकपणा, सचोटी आणि निष्ठा आतील बाहेरील वेगळी असं ठेवण्याचा तो काळही नव्हता आणि गरजही. त्यामुळे सत्ता मिळो की न मिळो, वागण्याबोलण्यात कधी तफावत कोणामध्ये दिसत नसे.

चंद्रशेखर यांची ऑफर का नाकारली?

१९७७ ते २००८ या काळात बापू ज्या पक्षात होते तो जनता पक्ष, जनता दल, जनता दल (सेक्युलर) कुठं ना कुठं सत्तेत होतेच. बापू त्याचे सरचिटणीस, महाचिटणीस, उपाध्यक्ष अशा पदांवर राहूनही ना पघळले, ना वितळले, ना बहकले. चंद्रशेखर पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांना मंत्रीपदाचे निमंत्रण आवर्जुन आलं. चंद्रशेखर ऊर्फ नेताजींच्या लाडक्या कार्यकर्त्यांपैकी असूनही त्यांनी मंत्रीपद नाकारलं. आपल्या विचारांशी, लोकांच्या श्रद्धेशी ती प्रतारणा ठरेल हे लक्षात ठेवून त्यांनी तो निर्णय केला. अशी प्रलोभनं कितीतरी आली असतील पण बापू अविचलित राहिले.

कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या राजकीय चौकटीत वाढलेल्या असंख्य राजकीय कार्यकर्यांची अशी कहाणी खूप ठिकाणी ऐकायला मिळेल. राजकारणाला ‘करिअर’ सोडा, व्यवसाय म्हणायचीसुद्धा तेव्हा कुणाची शामत नव्हती. आज व्यापार, धंदा हे शब्दही लाजतील इतकं राजकारण बरबटून गेलंय. पक्ष हा आपल्या विचारांचा वाहक असणार आणि पक्षाला मतदान करणाऱ्यांचे वर्गीय हितसंबंध राखणं म्हणजे राजकारण करणं एवढा साधा विचार बापूसारख्या सर्वकाळ कार्यकर्त्यांचा होता.

१२ वर्षे ज्या राज्यसभेत काढली तिथे असं राजकारण आणि राजकीय व्यक्ती आज किती दिसतात? १९९१ नंतर बाजाराधिष्ठित व्यवस्थेचा अंमल जसा भारतात सुरू झाला तसा बापूसारखा कार्यकर्ता राज्यसभेतूनच नाही तर राजकारणामधून घटत चाललाय. त्याचा अर्थ समतेसाठी, सामाजिक न्यायासाठी, स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क यांच्यासाठी दुर्बलांची बाजू घेऊन बोलणारा, भांडणारा राजकारणी अदृश्य होत चाललाय. ही करणी काँग्रेसची आणि काँग्रेससारखी वर्तनशैली आत्मसात करणाच्या राजकीय पक्षांची.

राजकीय पक्षांचा सत्ता हा एकमेव उद्योग

सोव्हिएत समाजवादाचा अस्त झाल्याचा अमेरिकन भांडवलशाहीचा जगभराच्या राजकारणात फैलाव झाल्याचा हा तर नमुना असं कोणी म्हणेल. थोडेफार ते खरंय. पण म्हणून विषमता, अन्याय, शोषण, दारिद्रय याविरुद्ध लढायचे, भांडायचे नाही असं कुणी ठरवलं? भारतीय मध्यमवर्ग बदफैली झाला. त्याने त्याला डोळा मारणाच्या नवभांडवलशाहीचा नाद धरला अन् बघता बघता सगळ्याच राजकीय पक्षांचा सत्ता हा एकमेव उद्योग झाला.

मंडलवाल्या जाती (आणि वर्ग) कधी भाजपला, कधी सेनेला, कधी लालूंना, तर कधी मायावती यांना भाळू लागल्या आणि नवभांडवलशाहीची पालखी विधानसभेत, लोकसभेत सशुल्क पोचवू लागल्या. त्या ब्राम्हण्यग्रस्तही होत चालल्या. ज्यांच्यासाठी आपलं राजकारण पणाला लावलं, त्या जाती आणि वर्ग बापूंच्या डोळ्यादेखत प्रतिगामी, उन्मत पणाला आणि भ्रष्ट होऊ लागल्या. ना आपल्यातील मागासलेल्यांना मदतीचा हात, ना इतरेजनांमधील उपेक्षितांसाठी भांडण!

संसदेमधील, विधिमंडळामधील कामकाज, चर्चा, वाद उधळून लावण्यासाठी खरं तर गेल्या दहाएक वर्षांत लोकप्रतिनिधी झालेल्या राजकारण्यांना दोष का द्यावा? त्यांची निवड, भरती आणि पोषण ज्या लोकशाहीच्या कारणासाठी झालीच नाही तिचा कैवार ते तरी का घेतील? नवभांडवलशाहीला आणि तिच्या वाहक पक्षांना चर्चा, भाषणं, युक्तिवाद मंजूर नाही. तिला इतकी मक्तेदारी हवी आहे की, राजकारणाचा तिला मत्सर वाटू लागला. म्हणून सारा मध्यमवर्ग, त्याची वृत्तपत्रे आणि टीवी, त्याचे साहित्य आणि त्याचे शिक्षण राजकारणाला घाण, उकिरडा ठरवू लागलाय.

समस्यांचं उत्तर लोकांच्याच हातात

बापूसारखा फर्डा वक्ता, तर्कशुद्ध विवेचक आणि प्रभावी प्रचारक अस्वस्थ होत नसेल का? पण बापू सिनिक् किंवा पेसिमिस्ट वाटत नाहीत. जातील हेही दिवस जातील असा सुप्त विश्वास त्यांच्याशी बोलताना जाणवतो. लोकांमध्ये आयुष्य घालवलेला हा माणूस अखेर लोकांवरच समस्यांचा तोडगा सोपवतो. भारतीय माणूस बहुधा कफल्लक , भणंग आणि नागवा आधी होतो, नंतर आपली परिस्थिती सुधारण्याच्या प्रयत्नाला लागतो, हे बापूंना इतक्या वर्षांच्या राजकारणामुळे सत्तेच्या जवळून झालेल्या दर्शनाने कळालंय.

आणीबाणीत तुरुंगवास भोगताना पुढं काय होईल? इंदिरा गांधी हिटलरप्रमाणे विरोधकांचा सर्वनाश करतील का? आपणाला आपले प्रियजन परत बघायला मिळतील का? या प्रश्नांचा विचार न करता ज्यांनी धाडदिशी निर्णय केला, त्यांना भारतीय मनाची घट्ट ओळख झालीच असणार नाही का? समाजवादाच्या प्रगत, परिणत मूल्यांची चुणूक तशी मराठी संतांच्या वागण्या लिहिण्यातून मिळतेच. म्हणून महाराष्ट्रात समाजवाद्यांना, तसंच समाजवादाचा मतलबी अर्थ काढणाऱ्या यशवंतरावांच्या काँग्रेसला (आणि नंतर त्यांच्या अनुयायांना) लोकांनी खूप मान दिला, सत्ता दिली. बापूंनी कर्तव्यभावनेने पराभवही पचवला. समाजवादाच्या पंढरीच्या वाटेवर असे बारीकसारीक काटे टोचणारच, या भावनेने.

सर्वपक्षीय मैत्री म्हणजे तत्त्वनिष्ठ बापू

बापू सच्चे समाजवादी कसं? सरंजामी दरबार भरवून रिकामटेकड्यांशी, खुशमस्कऱ्यांशी, आशाळभुतांशी ते गप्पा छाटत बसल्याचे कधी दिसले नाहीत. नोकरचाकर, चहा, फराळ यांची वाहतूक सतत करीत ‘मतदारराजा’ असून आराम फर्मावत असल्याचे त्यांच्या औरंगाबादच्या आणि दिल्लीतल्या घरीही कधी आढळलं नाही.

अमुक महामंडळ, ढमूक समिती अशा लाभांच्या जागा त्यांनी कधी शोभवल्या नाहीत. चार-दोन विद्वान प्राध्यापक पदरी बाळगून स्वतःचे गौरव ग्रंथ, वाढदिवस सजवले नाहीत. घड्याळाशी अत्यंत इमान, इंग्रजीशी फार चांगली पहचान आणि साधेपणाचा सच्चा सन्मान म्हणजे बापू. कडवे तत्त्वनिष्ठ असूनही ते सर्व पक्षांमधे कमालीचे लोकप्रिय. तंबाखू, बिनसाखरेचा चहा आणि सर्वपक्षीय मैत्री म्हणजे बापू.

भाषणात एखाद्या शाहिरासारखा वरचा आवाज लावता लावता मधेच गदगदून जाणारा वक्ता म्हणजे बापू. निष्कांचन राहणारा म्हणून मुलीचे नाव कांचन ठेवणारा बाप म्हणजे बापू. हजारो रुपये देणग्या देणारा विरागी राजकारणी म्हणजे बापू. पुण्याहून एस.एम.च्या आदेशानंतर आपल्या समाजवादी मित्राला – माझ्या वडिलांना – मराठवाड्यात आणून स्थिरस्थावर करणारा आमचा काका म्हणजे बापू. त्यांच्या वारीत आम्ही थोडं चाललो एवढंच.

(बापू : लोकशाही समाजावादाचा वारकरी या पुस्तकातून साभार)