ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?

१९ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


वारंवार सूचना देऊनही रशियन खेळाडू उत्तेजकांचं सेवन करतात म्हणून 'वाडा' या डोपिंग विरोधी संस्थेनं रशियावर चार वर्षांची बंदी घातली आहे. ड्रग्स घेऊन खेळणं हे फार पूर्वीपासून चालत आलंय. पदकांसाठी असं काम करताना खेळाडूंना काहीच वाटत नाही. आता तर कंपन्या चाचणीत दोष आढळून येणार नाही अशाप्रकारची औषधं बनवतायत.

वर्ल्ड ऍन्टी - डोपिंग एजन्सी म्हणजे ‘वाडा’ या संस्थेने रशियावर चार वर्षांची बंदी घातलीय. त्यानुसार २०२० मधे होणाऱ्या टोकियो इथल्या ऑलम्पिकला आणि २०२२ मधे कतार येथे होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला रशियाला भाग घेता येणार नाही. महत्वाच्या सर्वच आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी रशिया आता अपात्र ठरला आहे. आतापर्यंत अशा तऱ्हेची नामुष्की कुठल्याही देशावर ओढवली नव्हती.

वाडाच्या क्रेग रिडी यांच्या मते रशियाला अनेकदा संधी देऊनही त्यांनी उत्तेजक सेवनाच्या विरोधात म्हणावी तशी भूमिका घेतली नाही. त्यांना भरपूर संधी देऊनही हेकेखोरपणे आपले खेळाडू उत्तेजक सेवन करत नसल्याचा दावा केला. त्यांच्याकडे होणाऱ्या उत्तेजक चाचण्याही सदोष होत्या. याकडे लक्ष वेधूनही रशियाने ‘वाडा’चे नियम, संहिता याला किंमत दिली नाही. त्यामुळे ही बंदी घालणे भाग पडली आहे तर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी संतप्त प्रतिक्रिया करताना ‘वाडा’चा हा निर्णय राजकीय स्वरूपाचा असल्याचं म्हटलंय.

टेस्टमधे दोष आढळणार नाही अशाप्रकारचे उत्तेजक

काय असेल ते असो पण उत्तेजकांचा विळखा आज क्रीडाक्षेत्राला घट्ट बसलाय आणि तो घातक आहे यात शंका नाही. ऍथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, रोईंग, कनोईंग, पॉवरलिफ्टिंग या काही खेळांमधे खेळाडू सर्रास उत्तेजक घेताना आढळतात. ‘वाडा’कडून कुठले द्रव पदार्थ उत्तेजकांमधे मोडतात याची यादी प्रसिद्ध केली जाते आणि यापैकी कुठल्याही द्रव पदार्थांचा घटक खेळाडूनं सेवन केल्याचं आढळलं तर त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार ‘वाडा’ला आहेत. असं असूनही एका पदकासाठी बरेच खेळाडू जीवावर उदार होऊन अवैध रित्या उत्तेजकं घेतात. बऱ्याचदा त्यांचे प्रशिक्षक याची त्यांना सवय लावतात.

उत्तेजक स्नायू, हाडं यांना बळकटी आणण्यापासून रक्त पुरवठा सुधारण्यापर्यंत अनेक कामी उपयोगी पडतं. हेल्थ सपोर्ट असं गुटगुटीत नाव ठेऊन लहान बाळाला जशी बाळगुटी दिली जाते तसे हे पावडरचे डबे, इंजेक्शन प्रशिक्षकच पुरवतात. चलाख उत्तेजक निर्माते याच्या सेवनानंतर चाचणीत दोष आढळणार नाही अशा तऱ्हेची खबरदारीही घ्यायला लागलेत. यामुळे प्रशिक्षक आणि खेळाडूंना या उत्तेजकांचा मोह होतो. कुणालाही आपली ताकद, दमछाक यात सुधारणा हवी असते. यामुळे त्यांची कामगिरी कमालीची सुधारते आणि प्रतिस्पर्ध्यावर मात करायची उमेद वाढते.

म्हणून उत्तेजक घेणारे सुटतात

अशा तऱ्हेने आपण फसवणूक करतोय आणि क्रीडा चळवळीलाच हरताळ फसतोय याचं सोयर सुतक आताच्या खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना वाटत नाही, ही खेदाची बाब आहे. काहीही करून पदक जिंकायचं हेच ध्येय ठेऊन नीती अनीतीचा विचार न करता उत्तेजकांच्या आहारी ही मंडळी जातात. 

एकदा पदक जिंकले की जो तो मालामाल होतो. एकतर सर्वत्र कौतुक होतं. बक्षिसांचा वर्षाव होतो. नोकरी लाभू शकते. नोकरीवर प्रमोशन मिळतं. प्रसिद्धी लाभते. या सर्व फायद्यांमुळे उत्तेजक घेण्यावरचा भर वाढताना दिसतोय. 

उत्तेजक चाचणी होते तेव्हा लघवीचे सॅम्पल्स तपासले जातात. पण बऱ्याचदा उपलब्ध सॅम्पल्सपैकी सगळेच सॅम्पल्स न तपासता एक दोन सॅम्पल्सच तपासली जातात. त्यामुळे अगदीच दुर्दैवाचा भाग असेल तरच उत्तेजक घेणाऱ्याचं सॅम्पल तपासलं जातं. एरवी घेणारा आणि न घेणारा दोघेही सुटतात.

हेही वाचा :  भारताकडे वेगवान गोलंदाज येण्याचं कारण काय?

आजारपणात घेतलेल्या औषधात होतं उत्तेजक

१९८८ च्या सोल ऑलम्पिकमधे १०० मीटरच्या शर्यतीत बेन जॉन्सन याने कार्ल लुईसला चकवत विक्रमी वेळेत सुवर्णपदक मिळवलं होतं. पण काही तासांतच तो उत्तेजक चाचणीत दोषी असल्याचं सिद्ध झालं आणि एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर उत्तेजकांबाबत जागरूकता निर्माण झाली आणि वाडासारख्या संस्थेची गरज भासू लागली. यानंतर अनेक सुप्रसिद्ध खेळाडूही दोषी आढळले. त्यातल्या अनेकांची पदकं काढून घेतली गेली. अशी अजब सापशिडी आतापर्यंत क्रीडा क्षेत्रात खेळली गेली आहे.

क्रिकेटने ‘वाडा’चा आधार न घ्यायचा प्रयत्न केला होता. पण शेवटी क्रिकेटलासुद्धा जोडलं गेलंच. या टेस्टमधे ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न दोषी आढळला होता. त्याच्यावर एक वर्षाची बंदी आली होती. अगदी अलिकडे मुंबईचा होतकरू पृथ्वी शॉ हाही उत्तेजक चाचणीत सापडला होता. त्याला ८ महिने बंदी सहन करावी लागली होती. 

त्याने आजारी असताना घेतलेल्या औषधात असलेल्या उत्तेजकांचे घटक सापडले होते. त्यामुळे कुणीही या खेळाडूला सहानुभूती व्यक्त करेल. पण ‘वाडा’चे म्हणणं अस की हा त्या खेळाडूचा निष्काळजीपणा झाला. प्रत्येक खेळाडूने औषधं, आरोग्यासाठीची पुरकं घेताना डॉक्टरांशी सल्ला-मसलत करून बंदी असलेले उत्तेजक किंवा त्याचे घटक यात नाही न याची शहानिशा करणं आवश्यक आहे.

रम पिऊन द्विशतक ठोकलं

काही वेळा दुसरीच व्यक्ती आपल्या पेयात उत्तेजक मिसळते. तसं म्हणाल तर पूर्वीचे काही क्रिकेटपटू खुशाल पहाटेपर्यंत मद्यपान करून सामना खेळायचे. आता मद्य हे सुद्धा उत्तेजकच झालंय. पण याबद्दल कधी कुणी आक्षेप घेत नसे. 

एका आंतरराष्ट्रीय सामन्यात तर सर गारफिल्ड सोबर्स चांगली फलंदाजी करत असताना त्याच्या पोटात दुखू लागले म्हणून तो काही क्षण पॅवेलिऑनमधे आला असताना त्याने रमची बाटली घेतली, ती रिचवली आणि तो परत खेळायला उतरला. त्यानं द्विशतक झळकावलं.

आता सोबर्सने उत्तेजक घेतलं म्हणून त्याच्यावर टीका करायची की एवढी दारू पिऊनही त्याने खणखणीत फलंदाजी केली याचं कौतुक करायचे ? हा खरंच गहन प्रश्न आहे.

हेही वाचा : पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?

पदक जिंकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर

चीनमधे काही वर्षांपूर्वी खेळाडूंना उपयुक्त अशी भलतीच उत्तेजकं तयार केली जात होती. एका प्रशिक्षकाने संशोधन करून विशेषतः धावपटूच्या स्टॅमिना वाढवण्यासाठी मगरीचं रक्त, वाघाचं मांस असं काही खेळाडूंना द्यायला सुरुवात केली होती. त्याचा परिणाम खरोखर अचंबित करणारा होता.

या खेळाडूंच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा दिसली होती. अर्थात पदक मिळवण्यासाठी असले अघोरी उपाय आवश्यक आहेत का हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. जर्मनीसारख्या प्रगत देशात तर मुल पदक जिंकण्यासाठी लायक आहे की नाही याची चाचणी लहान वयातच कानाच्या पाळीचं रक्त काढून तपासणी केली जाते. आता बोला!

जोवर आडक हे त्या खेळाडूच्या आणि देशाच्या वैभवाशी निगडीत मानलं जाणार आहे तोवर चोर-शिपायाचा हा खेळ सुरूच रहाणार आहे. रशियाला एकवीस दिवसांत ‘वाडा’च्या निर्णयाविरुद्ध जाण्याची मुभा मिळाली आहे. तेव्हा आता रशिया काय पावलं उचलते ते पहायचं आहे.

हेही वाचा : 

आपली भूमिका इतिहासाची दिशा ठरवणार आहे

कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

मानसिक आरोग्य नीट राहीलं तरच खेळाडू यश मिळवतील

शहरी भागात मोदी लाट असूनही भाजपची चिंता काही संपेना!