कुठलाही खेळाडू जेव्हा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देशासाठी खेळत असतो तेव्हा तो स्वतःच्या वैयक्तिक दुखापती, वेदना, भावना विसरतो आणि फक्त आपल्या सर्वोच्च कामगिरीकडे लक्ष देतो. असे खेळाडू देशाला नेहमीच मेडलची लयलूट करून देतात. भारताच्या कुस्ती क्षेत्रातले आदर्श असलेले बजरंग पुनिया आणि विनेश फोगट हे याच खेळाडूंच्या मालिकेतले खेळाडू म्हणून ओळखले जातात.
बजरंग पुनिया आणि विनेश फोगट या खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझ मेडलवर नाव कोरलं आणि ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत चार वेळा मेडल मिळवणारा बजरंग हा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. एक सिल्वर आणि तीन ब्राँझ मेडल अशी लक्षणीय कामगिरी त्यानं केलीय.
या स्पर्धेत यापूर्वी ब्राँझ मेडल मिळवणार्या विनेशनं आणखी एका ब्राँझ मेडलची किमया केली. या दोन्ही खेळाडूंनी जागतिक कुस्तीच्या दृष्टीनं शंभर टक्के तंदुरुस्त नसतानाही विक्रमी यश मिळवलंय आणि खर्या अर्थानं या युवा खेळाडूंनी आदर्श निर्माण केला.
कुस्तीमधे शैलीदार कौशल्याबरोबरच आक्रमकताही सातत्यानं दिसून येतेय. विशेषतः परदेशी खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धांमधे भारतीय खेळाडूंविरुद्ध खेळताना बर्याच वेळेला आक्रमक तंत्राचा उपयोग करत असतात. आशियाई किंवा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांसारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धांपूर्वी सराव म्हणून काही निमंत्रित स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जातात.
अशा स्पर्धांमधे परदेशी खेळाडूंच्या खोडसाळ वृत्तीमुळे भारताच्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना अनेक वेळेला मोठ्या दुखापतींना सामोरं जावं लागलंय. अशा दुखापतींमुळे आशियाई किंवा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमधल्या या भारतीय खेळाडूंच्या सहभागाबाबत साशंकता निर्माण होण्याच्या घटना अनेक वेळेला घडल्यात. अर्थात भारतीय खेळाडू अशा दुखापतींकडे दुर्लक्ष करत वेळप्रसंगी स्वतःचं करियर पणाला लावून देशासाठी खेळलेत.
हेही वाचा: ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?
बजरंग या हुकमी पैलवानाला अशा प्रसंगाला तीन-चार वेळा सामोरं जावं लागलंय. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी रशियात आंतरराष्ट्रीय निमंत्रित स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतल्या एका फेरीत त्याच्या उजव्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली. ही दुखापत एवढी मोठी गंभीर होती की तो व्यवस्थितपणे उभाही राहू शकत नव्हता.
त्याच्यावर तात्पुरते उपचार केले गेले. तिथल्या वैद्यकीय तज्ञानं त्याला मायदेशी परतण्याचा सल्ला दिला. तसंच तीन-चार महिने तरी स्पर्धांमधे सहभागी होऊ नको असा सल्ला दिला. ऑलिंपिकपूर्वी जेमतेम दीड-दोन महिने अगोदर झालेल्या या दुखापतीमुळे बजरंगचा ऑलिंपिकमधला सहभाग धोक्यात आला होता.
ऑलिंपिकची संधी फारच क्वचित मिळत असते. हे लक्षात घेऊनच बजरंगनं तिथल्या वैद्यकीय तज्ञाचा सल्ला न मानता रशियामधेच सराव सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. गुडघा तंदुरुस्त होण्यासाठी जे काही पूरक व्यायाम प्रकार आहेत, ते सर्व करण्याची आपली तयारी आहे असं त्यानं आग्रहानं सांगितलं. त्यामुळे शाको बेंटिनिडीस या त्याच्या वैयक्तिक प्रशिक्षकांनाही त्याचा हट्ट मान्य करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता.
या वैयक्तिक प्रशिक्षकांबरोबरच बजरंग याला फिजिओ, मसाजिस्ट अशा सपोर्ट स्टाफचं भरपूर सहकार्य मिळालं. इच्छाशक्ती खूप मोठी प्रबळ असेल तर आपोआपच तुम्ही आजारातून लवकर तंदुरुस्त होऊ शकता हे बजरंगनं ओळखलं होतं. दिवसातून तीन-चार वेळा पूरक व्यायाम आणि पोषक आहार ठेवत त्यानं दुखापतीवर जवळ जवळ शंभर टक्के मात केली.
हेही वाचा: पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?
ऑलिंपिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी उच्च दर्जाची तंदुरुस्ती त्याच्याकडे नव्हती. पण प्रबळ इच्छाशक्ती, कमालीची जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यानं ऑलिंपिकमधे ब्राँझ मेडल पटकावलं. आपण जर पूर्णपणे तंदुरुस्त असतो तर गोल्ड मेडलही मिळवता आलं असतं याची खंत त्याला नेहमीच वाटलीय. तरीही हे ब्राँझ मेडल त्याच्यासाठी आणि अर्थात भारतासाठीही महत्त्वपूर्ण होतं.
इंग्लंडमधे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यानं गोल्ड मेडल जिंकून जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या होत्या. अर्थात इथंही दुर्दैवानं आणि दुखापतीनं त्याची पाठ सोडली नाही. त्याला पहिल्याच फेरीत मोठ्या दुखापतीला सामोरं जावं लागलं. लेजांद्रो एनरीकच्या विरुद्धच्या लढतीत त्याच्या कवटीला मोठी दुखापत झाली.
वैद्यकीय तज्ञांनी त्याला टाके घालण्याचा सल्ला दिला. त्याचे प्रशिक्षक सुजित मान यांनीही या सल्ल्याला दुजोरा दिला. पण टाके घातले तर नंतरच्या लढतीमधे हे टाके तुटतील आणि पुन्हा गंभीर जखम होऊ शकेल असा विचार करत बजरंगनं बँडेज बांधायला प्राधान्य दिलं. ब्राँझ मेडलच्या लढतीपूर्वी त्याला दोन वेळा हे बँडेज बदलायला लागलं.
कितीही वेदना झाल्या तरी चालतील पण त्या निमुटपणे सहन करण्याची वृत्ती बजरंगकडे दिसली. ब्राँझ मेडलच्या लढतीतही त्याच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीची परीक्षा पाहिली गेली पण ऑलिंपिकप्रमाणेच इथंही तो या परीक्षेत यशस्वी ठरला आणि त्याच्याकडून पुन्हा एकदा ऐतिहासिक पराक्रम नोंदवला गेला.
बजरंगबरोबरच या स्पर्धेत विनेशनेही नेत्रदीपक यश संपादन केलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या सोनेरी कामगिरीनंतर जागतिक स्पर्धेतही तिच्याकडून त्याच कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित होती. विशेषतः तिच्या गटातल्या गोल्ड मेडलची हुकमी दावेदार असलेल्या अकारी फुजीनामी या जपानच्या खेळाडूनं माघार घेतली होती.
त्यामुळे विनेशला गोल्ड मेडल जिंकण्यात अडचण येणार नाही अशीच सर्वांची अपेक्षा होती. पण पहिल्याच फेरीत मंगोलियाच्या खुलान बटखुयागकडून ती एकतर्फी पराभूत झाली. त्यामुळे निराश झालेल्या चाहत्यांनी आणि प्रसारमाध्यमांनी विनेशवर कडाडून टीका केली. या टीकेला विनेशनं ऐतिहासिक ब्राँझ मेडल जिंकूनच उत्तर दिलं.
हेही वाचा: दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं
विनेशला यंदाच्या मोसमात दोन-तीन वेळा दुखापतीच्या समस्यांनी ग्रासलं होतं. जागतिक स्पर्धेसाठी अपेक्षित तंदुरुस्ती तिच्याकडे नव्हती. या स्पर्धेसाठी वजन कमी करताना तिला नैसर्गिक आजाराला तोंड द्यावं लागलं. त्याचाच परिणाम तिला या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भोगावा लागला. अर्थात विनेशचं जागतिक स्पर्धेतलं हे दुसरं मेडल आहे.
ज्या पार्श्वभूमीवर तिनं कुस्तीत करियर केलंय ते लक्षात घेता तिची ही झेप खरोखरच उत्तुंग आहे. जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात भारतीय महिलांनी नावलौकिक मिळवला असला तरी अजूनही ग्रामीण भागात महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात करियर करण्यासाठी अपेक्षेइतकं प्रोत्साहन मिळत नाही.
तिचे वडील राजपाल हे स्वतः कुस्तीगीर असल्यामुळे आणि तिच्या चुलत बहिणी गीता आणि बबीता यांनी कुस्तीमधे आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशामुळे तिच्या घरच्यांकडून संपूर्णपणे पाठिंबा मिळाला. पण सुरवातीच्या काळात त्यांच्या खेडेगावातल्या संकुचित वृत्तीच्या लोकांनी अनेक वेळेला टीका आणि टोमणेगिरी केलीय. त्याकडे दुर्लक्ष करत आणि अनेक अडचणींवर मात करीत फोगट बहिणींनी कुस्तीसारख्या ताकदीच्या खेळात आपल्या देशाची मान उंचावलीय.
बजरंग आणि विनेश या दोन्ही खेळाडूंकडून आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २०२४मधे होणारी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा या दोन्ही स्पर्धांमधे मेडलची अपेक्षा आहे. या स्पर्धांसाठी वजन कमी करण्यासाठी, स्पर्धात्मक सराव आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल परिपूर्ण होण्याच्या दृष्टीनं भरपूर वेळ आहे. त्या दृष्टीनं त्यांनी आत्तापासूनच नियोजन केलं पाहिजे.
महत्त्वाच्या स्पर्धांपूर्वी होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे दुखापती कशा टाळता येतील याबद्दल या खेळाडूंबरोबरच इतर भारतीय खेळाडूंनीही योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. मुळातच भारताचे मोजके खेळाडूच ऑलिंपिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्रता निकष पूर्ण करतात. त्यामुळे अशा दुर्मिळ संधीचं सोनं कसं करता येईल याचा गांभीर्यानं विचार त्यांनी केला पाहिजे.
या दोन्ही खेळाडूंनी केलेली कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. भारत हा ‘कुस्ती’प्रधान देश आहे. आपल्या पारंपारिक खेळाचा सन्मान राखण्यासाठी युवा खेळाडूंनी बजरंग, विनेश यांचे वारसदार होण्याची आवश्यकता आहे.
पूर्वीच्या खेळाडूंच्या तुलनेत आता खेळाडूंना शासनाकडून भरघोस मदत, चांगल्या पगाराच्या नोकरीची हमी अशा सुविधा आणि सवलती मिळत असताना त्यांनी मर्यादित यश मिळवण्याची वृत्ती न ठेवता ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धेतल्या मेडलकडे नजर ठेवली पाहिजे तरच भारताची पताका उंचावली जाईल.
हेही वाचा:
कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी
सौरव गांगुली बीसीसीआयमधे दादागिरी करू शकेल काय?
फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन
महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?