साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने १७ एप्रिलला भाजपमधे प्रवेश केला. भोपाळमधून कॉंग्रेसच्या दिग्विजयसिंहांच्या विरोधात लोकसभेची उमेदवारी मिळवली. मात्र आपल्या पहिल्याच सभेत द्वेषाची भाषा केली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाल्याने माझं सुतक संपल्याचं संतापजनक वक्तव्य साध्वीने केलं. पक्षाची कोंडी होत असल्याचं बघून भाजपने आपला या वक्तव्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय.
मालेगाव दहशतवादी हल्ला प्रकरणातल्या आरोपी प्रज्ञा ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिलीय. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कधीकाळी तडीपार असलेला व्यक्ती अध्यक्ष झाल्यावर त्या पक्षाचा उमेदवार दहशतवादी गुन्ह्यातील आरोपी असणं तसं सुसंगतच आहे.
प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्याच जाहीर सभेत, 'पाकिस्तानी अतिरेक्यांनी हेमंत करकरेंना मारून माझं सुतक संपवलं आणि करकरे माझ्या शापानंच मेले' असं संतापजनक वक्तव्य केलं.
#WATCH Pragya Singh Thakur:Maine kaha tera (Mumbai ATS chief late Hemant Karkare) sarvanash hoga.Theek sava mahine mein sutak lagta hai. Jis din main gayi thi us din iske sutak lag gaya tha.Aur theek sava mahine mein jis din atankwadiyon ne isko maara, us din uska anth hua (18.4) pic.twitter.com/COqhEW2Bnc
— ANI (@ANI) April 19, 2019
हेही वाचाः एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?
एकीकडे शहीदांच्या नावावर डोळे ओले करून मोदीजी मतं मागतात. तर दुसरीकडे अशोकचक्र सन्मानित शहीद करकरेंचा अपमान प्रज्ञा ठाकूर आपले डोळे पुसताना करतात. शहीदांचा अपमान करणारे देशद्रोही आहेत, अशी वल्गना करणारे छप्पन इंची छातीचे मोदीजी प्रज्ञा ठाकूर यांच्यासमोर मात्र चिडीचूप आहेत.
हेमंत करकरे हे १९८२ च्या बॅचचे आयपीएस. त्यांनी आपल्या कारकिर्दीतली सहा वर्ष ऑस्ट्रियामधे भारतीय गुप्तचर संस्था रॉचं काम केलं. नंतर ते दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसचे प्रमुख झाले. त्यांच्या काळातच मुंबईवर २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांवर चाल करून गेलेले हेमंत करकरे कामा हॉस्पिटलसमोर शहीद झाले. देशासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल आणि शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर अशोकचक्र प्रदान करण्यात आलं.
हेमंत करकरे यांचा अचानक झालेला मृत्यू, त्यांच्यावर भाजप आणि शिवसेनेनं केलेली चिखलफेक, त्यांच्या शरीरात सापडलेल्या गोळ्यांचा स्रोत अज्ञात असणं, त्यांचं बुलेटप्रुफ जॅकेट गायब असणं या आणि इतर कारणामुळे त्यांच्या पत्नी कविता करकरे यांच्यावर प्रचंड मानसिक आघात झाला.
कविता करकरेंच्या मेंदूत रक्तस्राव झाला. मग करकरेंच्या मुलांनी आपल्या आईच्या म्हणजे कविता करकरे यांच्या दोन्ही किडण्या, लिवर आणि डोळे गरजू रूग्णांना दान केले. यामुळे तीन रूग्णांना जीवनदान मिळालं आणि एकास दृष्टी मिळाली.
हेमंत करकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खरं तर मानवसेवेची आणि परोपकाराची परिसीमाच गाठली. जनसेवा हीच ईश्वरसेवा हा आदर्श त्यांनी सर्वांसमोर मांडला.
हेही वाचाः जोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी
त्याग म्हणजे काय असतो हे कधी हिंदू धर्माच्या नावाखाली दांभिक प्रथांना कुरवाळणाऱ्यांना कधी समजूच शकत नाही. त्यांच्या दृष्टीने घरदार सोडून भगवी वस्त्रं घालून धर्माच्या नावावर द्वेष पसरवणं हीच त्यागाची परिसीमा वाटते.
मानवसेवा हीच ईश्वरसेवा हा खरा धर्माचा मूलमंत्र दांभिक लोक अंगिकारतच नाहीत. भगवे कपडे, रूद्रांक्षाच्या माळा आणि कपाळी भस्म लावणं म्हणजे त्याग नाही, ही दांभिकता आहे. मनात पाप, स्वार्थ, सत्तेची आसक्ती असल्यावर अवतीभोवती असणारा राम दिसणार कसा! अंगावर भगवे कपडे कुणालाही चढवता येतील. पण आत्म्याला भगवे कपडे कोण घालणार?
हेही वाचाः धर्माची नव्यानं व्याख्या करण्याची गरजः सयाजीराव महाराज
मराठीतले लोकप्रिय कवी मंगेश पाडगांवकरांनी एका गीतात हे खूप चपखलपणे मांडलंय,
रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेउन नांगर हाती, पिकविलेस मातीतुन मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासुन जाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी
मानवी कल्याण, समाज सेवा ही मानवी जीवनाची उद्दिष्ट आहेत. धर्मासाठी जीवन समर्पित करून कर्तव्य नाकारणारे आणि गृहस्थी जीवनाचा तिटकारा असणारा विचार मानवद्रोह आहे. मानवी जीवाची निव्वळ धार्मिक उपयुक्तता पाहणाऱ्यांना मानवी जीवाची काहीच किंमत नसते. म्हणून सुतकासारख्या शब्दांचा वापर ते करतात आणि ते संपण्यासाठी कोणाच्या तरी मृत्यूची अभिलाषा मनात बाळगून असतात.
हेही वाचाः मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण
हिंदू धर्मामधे मृत शत्रूचासुद्धा आदर करण्याची परंपरा आहे. इथे तर देशासाठी प्राण दिलेले हुतात्मा आहेत. ‘हिंसेने जो दुखावला जातो तो हिंदू’ अशी सार्थ व्याख्या आचार्य विनोबा भावे यांनी केली. आज प्रज्ञा ठाकूर यांच्या समर्थनासाठी उतरलेले राजकीय पक्ष आणि त्यांच्या समर्थकांची शिवराळ भाषा बघता यांना हिंदू धर्म तरी नीट समजला आहे की नाही असंच वाटतं.
रंजल्या गांजल्यांची सेवा करणाऱ्यासच साधू किंवा संत म्हणावं या तुकोबांच्या उक्तीनुसार हेमंत करकरे आणि कविता करकरे हे दाम्पत्यच खऱ्या अर्थाने साधू आणि संत म्हणून घेण्यास पात्र ठरतात. बाकी निव्वळ नाव साध्वी असून उपयोग नाही.
हेही वाचाः
वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची
प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक
जालियॉंवाला बाग हत्याकांड हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा टर्निंग पॉईंट
(लेखक हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत.)