अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत: उजेड पेरणाऱ्या कविता

२५ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ७ मिनिटं


कविता ही एकांतात जन्माला येते तशीच ती एकांतातच अनुभवायची असते. रमजान मुल्ला यांचा 'अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत' हा कवितासंग्रह याचा अनुभव देतो. रमजान यांच्या कवितांमधे नवे शब्द, नवा विचार दिसतो. यातल्या कविता तुमच्या मेंदूला हादरे देतात. या कवितासंग्रहावरची प्रतीक पुरी यांची ही फेसबुक पोस्ट.

कवी आणि कविता हे विषय मला आता फारसे आवडत नाहीत. या कवींनी स्वतःचीच पातळी इतक्या रसातळाला नेऊन ठेऊन ठेवली आहे की आता कविताही मला भावत नाही. परवा पेपरात एक कन्फर्म न्यूज वाचली. कवीनेच कवितेवर अत्याचार केल्याची. या ओळींसारखीच सध्याची अवस्था आहे. पण या कवितेच्या ओळी आहेत. याचा अर्थ असा की अजूनही सारं काही नष्ट झालेलं नाही.

अजूनही कविता जीवंत आहे आणि जीवंत कवीही आहेत. जे कविता जगतात आणि ज्यांच्या कविता इतरांना जगवतात. पण हे फक्त अपवाद आहेत. या अपवादात रमजान मुल्ला येतात. वरच्या ओळी रमजानच्याच आहेत. रमजान बरीच वर्ष झाली कविता लिहितोय, ऐकवतोय आणि मुख्य म्हणजे जगतोय. तो चांगला कवी आहे आणि त्याच्या कविता चांगल्या आहेत यासाठी माझ्या प्रमाणपत्राची गरज नाही. पण तसं सांगावं लागतं कारण वर म्हटल्याप्रमाणे सध्या कवींची आणि कवितेची असलेली अधोवस्था.

रमजान कवी म्हणून सुपरिचीत आहे. पण त्याचा कवितासंग्रह मात्र फार उशीरा निघाला आहे. एरवी सकाळी कविता झाल्यावर दुपारी ती छापून, संध्याकाळी कवितासंग्रह प्रकाशित करण्याची धमक बाळगणारे कवी आपल्याकडे आता निर्माण झाले आहेत. हे कवितासूर माजले असताना रमजानसारखे कवी मात्र आपल्या एकांतात कवितेचा निखळ सूर आळवण्यात मग्न असतात. पण तो सूर सच्चा असतो त्यामुळे ऐकणारे दर्दी लोक आपसूकच त्याकडे ओढले जातात.

रमजानने एकही कवितासंग्रह प्रकाशित नसतानाही उत्तम कवी असण्याचा लौकीक याच बळावर मिळवला आहे. त्यामुळे त्याचा कवितासंग्रह यावा अशी इच्छा होती जी आता पूर्ण झाली आहे. ‘अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत’ हे त्याच्या कवितासंग्रहाचं नाव आहे. गोल्डन पेज पब्लिकेशन्सच्या प्रदीप खेतमर या कलेची उत्तम समज असलेल्या रसिक प्रकाशकाने आपुलकीनं याचं प्रकाशन केलं आहे. त्याचं मुखपृष्ठही प्रदीपचंच आहे. खलील जिब्रानच्या चित्रांची त्यातून आठवण येते.

रमजाननं या कविता का लिहिल्या याविषयी तो म्हणतो, 'क्रांति व्हावी म्हणून जिवाचं रान करणारे फासावर लटकवले गेले, तेव्हाही लोक थंडच होते. फक्त लोकांनी बंड करावं म्हणून किती करायची यातायात अजून? मेलं नाहीये कुणीच अजून पण मेल्यात जमा धरायला हरकत नाही, असंच कलुषित झालेय वातावरण. माझ्यातला कवी मरण्याआधी लोक जागे व्हावेत म्हणूनच हा शब्दप्रपंच!'

हेही वाचा: गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह

पुढे कवितेला उद्देशून तो म्हणतो की,

मी तुझा गुलाम आहे
मला जुंप घाण्याला
हवे तर
काढून घे माझ्या रक्तापासून तेल
अत्तर होऊन जाऊ दे तुझ्यासाठी माझ्या घामाचे

आपलं तेल काढून घेण्याची तयारी असलेला हा कवी आहे. फुलाफुलांची जाकीटं घालून त्यावर अत्तरांचे हंडे ओतून मिरवणारा हा कवी नाही. त्याला घामाचा सुगंध जास्त मोलाचा वाटतो. कवीची ओळख त्याच्या कवितेतून व्हायला हवी म्हणून त्याच्या काही कवितांच्या ओळी मी खाली देतोय. भाष्य त्यावरच केलं तर करणार आहे.

मला फक्त इतकंच वाटतं...
युद्धाचा बिगूल वाजवण्याआधी
लेखणीने
त्यांच्यातला बुद्ध, गांधी आणि भगतसिंग
यांचा योग्य क्रम लावायला हवा

रमजान अत्यंत चूकीच्या काळात जन्माला आला आहे. कारण तो माणूसकी मानतो. धर्मापेक्षाही जास्त. माणूसकी मानणारे आपण सर्वच चूकलेली माणसं आहोत. एखाद्या कवीची जातपात काढण्याची हौस आम्हाला होतीच. आता त्याचा धर्मही आम्ही काढू लागतो आहोत. संघ-भाजपाला त्यासाठी धन्यवाद. आणि त्या सर्व गाढवांनाही ज्यांनी या गोष्टी विनातक्रार मान्य केल्या आहेत. तर रमजान मुस्लिम आहे. मग रमजानच्या कवितेत काय आहे याचा विचार आम्हाला पडतोच.

हेही वाचा: माणसाच्या उत्पत्तीची सोपी गोष्ट सांगणारं ‘ओरिजिन्स’!

भूकेची जाणीव होते काही वेळाने
....आणि
मी ठेवतो गुंडाळून बासनात कुराण
जीव होतोय कासावीस
धर्मापेक्षा भूक मोठी असते हेच खरंय

रमजानला धर्मापेक्षा भूक मोठी वाटते. तिथं कुराण कामी येत नाही. रमजानच्या कवितेतून मुस्लिम धर्माच्या गोष्टी येतात. पण त्या काही परकीय गोष्टी नाहीत. त्या त्याच गोष्टी आहेत ज्याचा आपल्या आणि त्याच्याही संतांनी उद्घोष केला आहे. त्या मूळातूनच वाचायला हव्यात. रमजाननं त्या अर्थी सर्वच कट्टर मुस्लिमांची निराशा करण्याचा धोका पत्करला आहे. सोबतच त्यानं आपल्या धर्माची भलावन न केल्यानं हिंदूंचीही मोठीच अडचण झाली आहे. उलट त्यानं स्वतःलाच धोक्याच्या लालक्षेत्रांत आणून उभं केलं आहे. आणि त्यातून तो कवी आहे. हे हिरव्या मिरचीच्या वरणासोबत लाल मिरच्यांचा ठेचा खाल्ल्यासारखं आहे.

अशा अस्थिर वेळी
हाताची बोटे छाटली गेलेली कवी
आणि पुरस्कारांच्या ओझ्याने वाकलेलेही
मृत्युगीतासारखे हे काय पुटपुटत आहेत ओठातल्या ओठांत?
हळूहळू त्यांच्या लेखनावर अत्याचार होतोय
हे कळले कसे नाही त्यांना?
नाही कळत. म्हणूनच ते टिकून आहेत. रमजानला
कळलं म्हणूनच त्याला इतका उशीर होतोय
आपल्यासमोर येतांना. यापुढेही त्याचं अस्तित्व हे
लुप्त होणाऱ्या प्रजातींमध्येच गणलं जाणार आहे.
कारण,
दुःखाच्या कातरवेळी
कृष्णाला नाही सुदामा

हे रमजानचे शब्द आहेत. दुःखाच्या कातरवेळी, कृष्णाला नाही सुदाम. याहून जीवंत शब्द काय असू शकतील? मला इथं ग्रेसांच्या ओळी आठवतात, भय इथले संपत नाही. रमजाननं त्याच्या पुढची अवस्था नोंदवलेली आहे. हिंदू धर्मियांना जर याचा आनंद होत असेल तर जरा थांबा. तो पुढे काय म्हणतो तेही वाचा, 

एकमेकांनी उद्धरल्या आया, वाल्मिकीचा झाला वाल्या
कमरेवरचे हात काढून तू माझे काळीज वाच
आता तुझ्या पंढरीतला विठू थांबव नंगानाच

रमजानसारखा अस्सल कवीच लिहू शकतो असं. त्याला जाणीव आहे का की त्याचं काय होऊ शकतं? आहे. पूर्ण जाणीव आहे. पण त्याला भीती नाही. कारण त्याला महंमद जितका जवळचा आहे तितकाच विठ्ठलही जवळचा आहे. म्हणूनच विठ्ठलाला तो अशी आवळणी करू शकतो जी कधी काळी तुकोबांनी केली होती, चोखोबाने केली होती. पण रमजान इथंच थांबत नाही.

हेही वाचा: ‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

माझी अखेरची इच्छा विचाराल
तर मात्र
तुमचे अस्तित्व संपवणारी
शेवटची ओळ मीच लिहीन

मी जर एखादा सम्राट असतो तर वरच्या ओळींसाठी रमजानला दहाबार गावं इनाम म्हणून देऊन टाकली असती. हा कसला आत्मविश्वास आहे याला? याला माज म्हणतात. अस्सल कवीलाच तो शोभून दिसतो. बाकीच्यांची केवळ खाज असते. रमजानच्या कविता तुमच्या मेंदूला हादरे देतातच. पण तो कवी आहे मूळात आणि कविता ही मनासाठी असते, मेंदूसाठी नाही. गणित या कवितेत तो म्हणतो,

आमचे नेहमीच गणित चुकते
बाकी काही उरत नाही

कोणत्याही सज्जन माणसाची कोणत्याही काळात हीच अवस्था झालेली आहे. पण पुढे तो जे लिहितो ते या अवस्थेतूनही जगण्याचं बळ देणारं असतं. याच कवितेतली ही स्वतंत्र कविता वाटते मला.
मुलगा मला विचारतो,

'बाबा, नवी सायकल कधी घेऊ?'
मी म्हणतो,
'माझी जुनीच सायकल..थोडीशी आणखी दुरुस्त करू.'
काटकसरीच्या नावाने माझा पोटाला असतो चिमटा.

ही आमच्या मध्यमवर्गाची अवस्था होती. आम्ही ती अनुभवली आहे. आमच्या आईवडलांनी ती अनुभवली आहे. तो काळ गरीबीचा होता पण त्याचवेळी तो आनंदाचा होता, कारण एकमेकांना बळ देत जगवण्याची उमेदही त्या काळात जीवंत होती. ते सारं आता संपलं आहे. आम्ही आता केवळ पैशानेच नाही तर भावनेनंही गरीब झालो आहोत. कारण पैसा आणि धर्म याच गोष्टी आता मोठ्या झाल्या आहेत. माणूसकी, प्रेम याला आता कोणी रेशन कार्डावरही विकत घेऊ शकत नाही. याच कवितेच्या खालील ओळी पुन्हा एकदा स्वतंत्रपणे प्रेमकविता म्हणून ओळखली जाऊ शकते.

तू फार उपवास करतेस म्हणून मी बायकोशी करतो तंटा
तिचे सोळा सोमवार आणि अठरा मंगळागौर
सरत कधीच नाहीत

हेही वाचा: आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

रमजानचं कवित्त्व म्हणूनच मला इथं फार मोलाचं वाटतं. पण त्याची दुहेरी भीती आहे. तो केवळ एक मध्यमवर्गीय पिचलेला माणूस नाही तर मुस्लिम माणूस आहे. त्याचा विसर त्याला ना त्याचे लोक पडू देत ना आपले लोक पडू देत. म्हणूनच या कविलाही स्वतःची जपणूक करण्यासाठी आपली बाजू मांडावी लागतेच.

एक नासका आंबा आढी नासवतो
म्हणून
गव्हासोबत किडा रगडणे
इष्ट आहे काय?
पण रमजानच्या प्रश्नाला उत्तर मिळणार नाही. म्हणून तोच स्वतः त्याचं उत्तर देतो.
समजून घ्यायला हवंच आता
संयमाने सुटतात प्रश्न.. प्रेमानं सुटतं वैर
आपलाही जन्म लागावा सार्थकी, यात काय गैर?
हे उत्तर आम्ही मान्य करणार आहोत का? असो. 

रमजानच्या कवितेत जे काही हिरे-मोती आहेत. त्याचीही एक झलक दाखवतो.

किती सोसावं मातीनं
किती कसावं मातेनं
माणसाच्या जुलुमानं
किती नासावं शेतीनं
आणि,
कारण त्याला माहितच नाही
जास्त खाल्ले की ओकारी येते
मग ते सुखही का असेना..

हेही वाचा: युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता

रमजानचा संबंध बाबासाहेबांशीही आहे. तो प्रत्येकच माणसाचा असतो जो माणूस होण्यासाठी धडपडत असतो. पण या लोकांचही आता बाबाभक्तांमधे रुपांतर झालं आहे. त्यांनी बाबांचा देव केला आहे. त्यामुळे रमजान कळवळून प्रार्थना करतोय,

आता एक दिवस असा उगवेल
तुझ्या नावावर बळी दिला जाईल
तेव्हा तू फक्त इतकंच कर
तू कुणाला पावू-बिवू नकोस
नाहीतर
देवांच्या संख्येत एका अंकाने आणखी भर पडेल...

रमजानचा ही हताशा आपण सारेच अनुभवत आहोत. ती खोटी ठरण्याचं समाधान मात्र मिळेल असं काही वाटत नाही. असो. रमजानच्या, हताशपण, आनंदी माणसाचं घर, वारी, पूर, कारण, गणित, शालूः वेदनेचे आदिम आगार, हे महापुरुषा, अंतिम सत्य या कविता म्हणजे या कवीची ताकद काय आहे आणि कवितेची ताकद काय असते ते दाखवणाऱ्या आहेत.

मला कोणत्याही कवी-लेखकाने आपल्या लिखाणातून काही नवीन प्रयोग केले आहेत का, शब्द तयार केले आहेत का, नवा विचार मांडला आहे का याची उत्सुकता असते. रमजानच्या कवितांमधे हे सारं आहे. लिंगमजुरणी, दातलून, खारीकवजा, वासेकुजल्या असे काही नवे शब्द मी प्रथमच पाहिलेत. यातला लिंगमजुरणी हा शब्द तर अफलातूनच आहे.

रमजानविषयी रंगनाथ पठारे सरांनी त्यांच्या प्रस्तावनेत चांगली मांडणी केली आहे. ती वाचण्यासारखी आहे. मला फक्त एकच खंत आहे की त्यानं दखनी बोलीतल्या फार कविता घेतल्या नाहीत. पुढच्या वेळी ती उणीव दूर होईल अशी आहे. रमजाननं त्याच्या जिहाद कवितेत जी आशा व्यक्त केली आहे त्याप्रमाणे,

याs अल्लाह
अशा हर एक ‘बी’चे झाड उगवू दे
अन् त्याच झाडाच्या सावलीत
या ‘इन्सानियत’साठी
एकदा खरा ‘जिहाद’ होऊ दे
आsमीन
सुम्म आमीनss

होईल अशी आशा आपणही ठेवूयात. बरंच काही लिहिण्यासारखं आहे पण सध्या इतकंच. कारण कविता जशी एकांतात जन्माला येते तशीच ती एकांतातच अनुभवायची असते. हा कवितासंग्रह तुमच्या घरी असणं ही तुम्ही रसिक जाणते वाचक असल्याची खूण आहे. त्यामुळे तो नक्कीच विकत घ्या. रमजानच्या कविता तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी मी कदाचित कमी पडलो असेन, त्यामुळे तुम्ही स्वतःच त्या वाचून तुमचा अभिप्राय ठरवा.

हेही वाचा:

थोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ

अपना बाजारची गोष्टीः सक्सेसफूल सहकार मॉडेलची कहाणी

एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं