वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन

११ जुलै २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


मानवी जीवनातलं परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, शेअर करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन आहे. पंढरपूरला जायचं ते एकट्याने नाही आणि गूपचूपही नाही. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशाप्रकारे गात नाचत पंढरीची वारी करणं म्हणजे ईश्‍वरी प्रेमाचे अधिकारी आणि वाटेकरी होणं. वारीचं वैशिष्ट्य सांगणारा हा लेख.

वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असलेला परमार्थ हा सामूहिक आहे. जप, तप, ध्यान, धारणा या साधना वैयक्तिक आहेत. वारी ही गोष्ट अनेकांनी मिळून करायची आहे. ‘एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ।।’ असा हा मामला आहे. म्हणून तर तुकाराम महाराज ‘स्वल्प वाटे चला जाऊ। वाचे गाऊ विठ्ठल।। तुम्ही आम्ही खेळमेळी। गदारोळी आनंदे।।’ असे आवाहन सर्वांनाच करतात. या आवाहनातील खेळीमेळी, गदारोळी, आनंदे हे शब्द लक्षणीय आहेत. वैयक्तिक पद्धतीने साधना करणारे साधक असे शब्दप्रयोग करू शकत नाहीत.

पूर्वीच्या विचारांनुसार मोक्ष किंवा मुक्ती म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून परत या लोकांत न येणं हेच मानवी जीवनाचं ध्येय किंवा इतिकर्तव्यता होती. परम पुरुषार्थ होता. या उलट इहलोकात परमात्मसुख भोगण्यासाठी वारंवार जन्म घ्यावा. या सुखापुढे जन्म मरणाचं दुःख काहीच नाही. सृष्टी अज्ञानाची किंवा अविद्येतून निर्माण झालेली नसून, परमेश्‍वराच्या इच्छेतूनच निर्माण झालीय. ती परमेश्‍वराचंच स्फुरण किंवा स्फूर्ती आहे. ती माणसाला हवी असो अथवा नसो, परमेश्‍वरालाच हवीय.

हेही वाचाबुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?

याचाच अर्थ ती नाकारणं म्हणजे परमेश्‍वराच्या इच्छेविरुद्ध जाणं. वारकऱ्यांच्या प्रत्येक कीर्तनाचा आणि भजनाचा समारोप ज्या मागण्याच्या अभंगाने होतो, तो सर्व प्रसिद्ध आहे.

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।
गुण गाईन आवडी । हीच माझी सर्व जोडी ।
न लगे मुक्ती आणि संपदा । संतसंग देई सदा ।
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।

हा तो अभंग आहे. अर्थ स्पष्ट आहे. मनुष्य जन्माची महती सांगत तो वारंवार हवा असल्याचं सांगणारा हा वारकरी संप्रदाय आहे.

आवडी न पुरे सेविता न सरे।
पडियेली धुरेसवे गाठी।।
न पुरे हा जन्म हे सुख सेविता।
पुढती ही आता हेचि मागो।।

अशी त्याची बैठक आहे.

हेही वाचाआषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट

हे परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, ‘शेअर’ करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव किंवा ‘सेलिब्रेशन’ आहे. पंढरपूरला जायचं ते एकट्याने नाही आणि गूपचूपही नाही. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशाप्रकारे गात नाचत पंढरीची वारी करणं म्हणजे ईश्‍वरी प्रेमाचे अधिकारी आणि वाटेकरी होणं. नि ‘मृदंग श्रुती टाळ घोष। सेवू ब्रह्मरस आवडीने।।’ हा तुकोबांचाच अभंग आहे.

शरीराला क्‍लेशही द्यायचे नाहीत आणि लाड करून भोगही द्यायचे नाहीत, हा त्यांचा मध्यम मार्ग आहे. तुकोबांनी या दोन्हीही टोकांचे वर्णन करून ती टाळावीत असं सांगितलंय.

शरीरा सुख न द्यावा भोग।
न द्यावे दुःख न करावा त्याग।
शरीर बोखटे ना चांग।
तुका म्हणे वेग करा हरिभजनी।।

या संपूर्ण भूमिकेचे वारी हे जणू महाप्रतीक आहे. म्हणून तर पंढरीला कसं जायचं, तर

‘नाचत जाऊ याच्या गावा रे खेळिया। सुख देईल विसावा रे।’ विठ्ठलाचं हे गाव म्हणजे अर्थातच पंढरपूर. तिथे कसं जायचं, तर खेळगड्यांसह गात, नाचत आणि खेळ खेळत!

हेही वाचावारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

वारकऱ्यांच्या हातातल्या पताका जणू विजयध्वजच आहेत. दीन आणि दुःखी मानल्या गेलेल्या संसारावरील विजयाच्या त्या प्रतीक होत. ज्ञानेश्‍वरांचे शब्द वापरून सांगायचं झाल्यास ‘अवघाचि संसार सुखाचा’ करण्याचा, ‘विश्‍व ब्रह्म’ करण्याचा तो मार्ग आहे. तो

तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार।
होऊनि किंकर विठोबाचे।।

पण विठोबाचे हे किंकर साधेसुधे सेवक नसून, सैनिक म्हणजे पाईक आहेत. संसारावर विजय मिळवून त्याच्या विजयपताका फडकवत आता ते जणू पंढरपूर नावाचं नगर सर करायला चाललेत. त्यांना तसा आदेशच देणारा तुकोबारायांचा अभंग प्रसिद्ध आहे.

वेढा वेढा रे पंढरी।
मोर्चे लावा भीमा तीरी।।

तुम्ही पंढरीला वेढा घाला. चंद्रभागेच्या तीरावर मोर्चेबांधणी करा. विठ्ठलाला आत कोंडून टाका. त्याच्याकडून प्रेमरूपी खंडणी वसूल करा.

हेही वाचा

साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?

जगातल्या पहिल्या संत कान्होपात्रा स्मारकाची संघर्षकथा

आपापल्या प्रबोधनाची एकादशी