सदा डुम्बरे : चेहरा असलेला संपादक

२७ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


पत्रकार सदा डुम्बरे यांचं २५ फेब्रुवारीला निधन झालं. पत्रकार ते संपादक असा ३५ ते ३६ वर्षांचा अनुभव. त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला.

गेल्या काही वर्षांत न्यूजपेपरचं क्षेत्र झपाट्याने बदलून गेलंय. संपादकाला काही एक चेहरा असला पाहिजे. चेहरा म्हणजे त्याचं दिसणं किंवा व्यक्तिगत असणं नाही. तर त्याची भूमिका, चिंतनशीलता, वैचारिक नेतृत्वाची क्षमता हे आणि यासारखे काही गूण तो ज्या न्यूजपेपरचं प्रतिनिधीत्व करतो त्यातून, त्याच्या साप्ताहिकातून, मासिकातून व्यक्त होत असतात. 

आता अशा संपादकांची फळी मीडियातून जवळपास कालबाह्य झालीय. त्यांची जागा कणाहीन, मार्केटकेंद्री अशा व्यवस्थापक कम संपादकांनी घेतली. काळाचा हा बदल मान्य, अमान्य करण्याचा प्रश्नच नाही. मीडियातल्या बहुतेकांनी हे स्विकारलंय. सदा डुम्बरे हे दुर्मिळ होत गेलेल्या संपादकांच्या पिढीतले होेते. ज्यांच्याकडे पाहून आदरभाव  निर्माण व्हावा अशापैकी ते एक होते.

भेटीगाठी वैचारिक समृद्धीचा भाग

सदा डुम्बरे ज्या सकाळच्या परंपरेत वाढले, त्याच संस्थेत काही उमेदीची वर्ष काढल्यानं हा आदरभाव शब्दात मांडणं गरजेचं वाटतं. क्लासिक अभिरुचीसंपन्न जगणारे आणि रस्त्यावरल्या गर्दीत उतरून संपादकपद मिरवणारे असे दोन्ही प्रकारचे संपादक मीडियातून आपल्याला दिसत असतात. सदा डुम्बरे हे पहिल्या प्रतीचे होते.

त्यांच्यासोबत सहकारी म्हणून काम करण्याची संधी कधी मिळाली नाही. दशरथ पारेकर आणि राजन गवस हे त्यांचे जवळचे सहकारी मित्र. त्यांच्या माध्यमातून सदा डुम्बरे ओळखीचे होत गेले. त्यांच्या सांगण्यावरून साप्ताहिक सकाळसाठी काहीवेळा प्रासंगिक लेखन केलं होतं. पण तरी त्यापलिकडं जाऊन साहित्य क्षेत्रातल्या माझ्या लेखनाविषयी सातत्यानं आपुलकीनं विचारणा करणारे, त्यावर नजर ठेऊन असणारे ते एक होते.

दिवाळी अंकातली माझी कथा वाचल्यानंतरची त्यांची एका वाक्याची प्रतिक्रियासुद्धा उत्साह वाढवणारी असायची. त्यांना भेटणं, त्यांच्याशी अनैपचारिक गप्पा मारणं हा आनंदाइतकाच वैचारिक समृद्धीचा भाग होता.

हेही वाचा : मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे

पत्रकार ते संपादक

व्यावसायिक पत्रकारितेच्या मर्यादेत राहून एखादा संपादक किती उत्तम प्रकारचं योगदान देऊ शकतो हे डुम्बरे यांच्या एकूण कामाकडे पाहिल्यावर लक्षात येतं. एका अर्थाने डुम्बरे हे भाग्यवान संपादकच म्हटले पाहिजेत. एकाच पेपरातला पत्रकार ते संपादक सलग ३५ ते ३६ वर्ष काम करायला मिळणं आजच्या परिस्थितीत अशक्यच आहे.

नानासाहेब परुळेकरांच्या सकाळमधे मुणगेकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची जडणघडण झाली हेच खूप काही सांगून जाणारं आहे. नंतरच्या काळात ज्यांनी त्यांना संपादक म्हणून काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं ते प्रतापराव पवार यांच्यासाऱखे मालक मिळाले हे पण महत्त्वाचंच.

प्रवाहाविरुद्ध जात राहिले

त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला.

बहुतेक संपादकांना सत्तेच्या पदाचा लोभ असतो किंवा निर्माण होतो. डुम्बरेनांही तशा संधी कदाचित आल्या असतील. पण ते त्या मार्गाने गेले नाहीत. प्रवाहाबरोबर कुठंपर्यंत वहात जायचं आणि कुठे थांबायचं हे फार थोड्यांना कळतं. ते त्यांना कळलं असावं.

स्पर्धेपासून कायमच वेगळे

पुणे जिल्ह्यातल्या ओतूरसारख्या गावात डुम्बरे यांचा जन्म झाला. हे गाव महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा बालेकिल्ला होतं. त्या गावच्या हवेनेच त्यांचं वैचारिक भरणपोषण झालं. डुम्बरे यांनीच ते एका भाषणात सांगितलं होतं. फर्ग्युसन कॉलेज, रानडे इस्टिट्युट या पुण्यातल्या उत्तम परंपरा असणार्‍या संस्थामधे ते शिकले. त्यापेक्षा या संस्थातून त्यांना तत्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ शिक्षक मिळाले.

डुम्बरे यांची क्षमता, पात्रता सकाळचे मुख्य संपादक होण्याची नक्कीच होती. त्यासाठी त्यांनी कितपत  प्रयत्न केले होते हे माहीत नाही. पण अशी एक शक्यता वाटते की अशा पदासाठी राजकीय कौशल्य, चतुरपणा पणाला लावावा लागतो. त्या स्पर्धेतून त्यांनी स्वतःला वेगळं राखलं असावं. किंवा ते आपल्याला जमणार नाही हे ओळखून ते बाजूला राहिले असतील.

त्यांनी सकाळमधून बाहेर पडावं किंवा साप्ताहिक सकाळचं संपादकपद त्यांच्याकडे राहू नये यासाठीही काही प्रयत्न झाले असावेत. एक चर्चा अशीही होती की खुद्द प्रतापराव पवार त्यांच्यामागे असल्याने ते टिकून राहिले.

हेही वाचा : बाळशास्त्री जांभेकर : पत्रकारितेच्या पलिकडचे पत्रकार

उगीचंच भरमसाठ लिहिलं नाही

मराठी साहित्यातली किमान पन्नासहून अधिक पुस्तकं अशी आहेत, ज्यांचं लेखन साप्ताहिक सकाळमधून पहिल्यांदा प्रसिद्ध झालं. डॉ. सदानंद मोरे यांचं तुकाराम दर्शन, लोकमान्य ते महात्मा ही दोन पुस्तकं महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक दस्तऐवज मानली जातात.

डुम्बरे यांच्या काळात स्तंभलेखनाच्या स्वरुपात कित्येक वर्ष हे लेखन साप्ताहिक सकाळमधून प्रसिद्ध होत व्हायचं. कर के देखो हे समकालीन प्रकाशनचं पुस्तक म्हणजे साप्ताहिक सकाळच्या वर्धापनदिवसाला काही मान्यवरांनी केलेल्या भाषणांचं संकलन आहे.

रामचंद्र गुहा, पी. साईनाथ, अभय बंग, जावेद अख्तर, योगेंद्र यादव, यू.आर. अनंतमूर्ती, वंदना शिवा, राजा रामण्णा, सुनिता नारायण ही नावंच खूप काही सांगून जातात. स्वतः डुम्बरे यांनी माध्यम हाताशी आहे म्हणून उगीचच भरमसाट असं लिहिलं नाही.

त्यांच्या आस्थेचे, अभ्यासाचे जे विषय होते त्यावर मात्र त्यांनी सविस्तर, सखोल लेखन केलं. त्यामुळे त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांची संख्या कमी असली तरी त्याला गुणवत्ता आहे. न्यूजपेपर क्षेत्रातल्या या सुसंस्कृत, अभिजात आस्वादक  संपादकाला श्रद्धांजली!

हेही वाचा : 

रवीश कुमारः नजर पैदा करणारा पत्रकार

नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?

प्रबोधनकारांच्या पत्रकारितेविषयी आपल्याला काय माहितीय?

पहिल्या वृत्तपत्रापासूनच मीडियाचा स्वातंत्र्यासाठी संघर्ष आजही सुरूच