अडचणीच्या कालखंडात भूलथापांना बळी पडण्याची जी मानवाची अंगभूत प्रवृत्ती आहे, त्याचा गैरफायदा बेजान दारूवाला यांच्यासारखे ज्योतिषी घेतात. एवढेच नव्हे, तर मार्केटिंगचे उत्तम तंत्र वापरून मोठा व्यवसाय उभा करतात. त्यांच्या पश्चातदेखील शेकडो ज्योतिषी त्यांच्या ‘गणेशा स्पीक’ या माध्यमातून ज्योतिषाचा व्यवसाय आणि त्यामार्गे होणारी लोकांची फसवणूक चालूच ठेवतात. जगभरातील ज्योतिषाची बाजारपेठ शेकडो कोटींची असल्याचे सांगितले जाते.
बेजान दारूवाला या प्रसिद्ध ज्योतिषांचे २९ मे २०२० रोजी दु:खद निधन झाले. दीर्घ आयुष्य आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कृतिमग्न राहण्याची संधी त्यांना मिळाली. ऐहिक दृष्ट्या समृद्ध असे आयुष्य जगून नव्वदाव्या वर्षी ते आपल्यातून गेले. त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय तसेच मराठीतील बहुतेक माध्यमांनी त्यांची दखल घेतली. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्याविषयी चांगले बोलावे, या पद्धतीला जागून यामधील बहुतेक वार्तांकने ही सकारात्मक होती.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दिलखुलासपणा, सर्वधर्मीय लोकांमधे जिव्हाळ्याचे संबंध या आजच्या जगात विरळ होत चाललेल्या गुणांची योग्य दखल घेतली आहे. प्रस्तुत लेखकदेखील त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात सहभागी आहे. यामधील वियोगाचा आवेग ओसरल्यावर मात्र आपण सर्वांनी त्याकडे थोड्या तटस्थतेने पाहायला पाहिजे, असे वाटते.
हेही वाचा : गोविंद पानसरे: डोंगराला भिडणारा म्हातारा
युरोप आणि अमेरिकेत मृत व्यक्तीवर शोकलेख लिहितानादेखील शक्य तेवढा तटस्थपणा ठेवून त्या व्यक्तीच्या चांगल्या आणि तितक्याश्या चांगल्या नसलेल्या गोष्टींचीदेखील मीमांसा भाषेची सर्व पथ्ये पाळून केली जाते. एकूण समाज म्हणून भावनातिरेकाने निर्णय घेण्याऐवजी अधिक समतोल विचार करून आपल्याला निर्णय घेता यावेत, म्हणून ही सवय महत्त्वाची आहे.
त्या निमित्ताने बेजान दारूवाला यांनी ज्या गोष्टीचा आयुष्यभर प्रचार केला आणि त्यासाठी त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला गेला, त्या ज्योतिषाची आणि त्यांच्या भाकीत करण्याच्या पद्धतीची चिकित्सा होणे आवश्यक वाटते. अन्यथा, आपला उद्देश कितीही चांगला असला तरी त्यामधून लोकांची दिशाभूल होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच बेजान दारूवाला यांच्याविषयीच्या लिखाणामुळे ज्योतिष या कुठलाही शास्त्रीय आधार नसलेल्या गोष्टीची समाजमान्यता वाढते, म्हणून त्याविषयी लिहिणे हे क्रमप्राप्त आहे.
फलज्योतिष आणि खगोलशास्त्र या दोन संपूर्ण वेगळ्या संकल्पना आहेत, हे आपण यानिमित्ताने समजून घेतले पाहिजे. फलज्योतिषामधे मूळ गृहीतक असे समजले जाते की - आकाशातील ग्रहगोल, तारे यांचा मानवी जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींवर परिणाम होत असतो. तसेच त्यांचा अभ्यास करून मानवी जीवनात भविष्यात काय घडणार हे सांगता येते. एवढे सांगून फलज्योतिष थांबत नाही, तर त्या ग्रहगोल-ताऱ्यांचा मानवी जीवनावर परिणाम होऊ नये, म्हणून काही उपायदेखील ते सुचवते.
छद्मविज्ञान म्हणजेच विज्ञानाचा केवळ पेहराव केलेले, पण विज्ञानाची कोणतीही कार्यपद्धती न पाळणारे आहे. पण दुसऱ्या बाजूला खगोलशास्त्रही ग्रह आणि ताऱ्यांचा- एकूणातच आपल्या विश्वाचा शास्त्रीय अभ्यास करणारी कार्यपद्धती आहे. यामधे विज्ञानात वापरले जाणारे तर्क, निरीक्षण, प्रयोग आणि अनुमान या कार्यपद्धतीचा वापर केला जातो. खगोलशास्त्रामधे वापरली जाणारी सर्व गृहीतके ही तपासण्यासाठी आणि त्यामधे चूक दिसून आली तर, त्यामधे दुरुस्ती करण्यासाठी कायम तयार असते.
चंद्रावर जेव्हा राकेश शर्मा हा पहिला भारतीय अंतराळवीर उतरला, तेव्हा त्या मोहिमेत खगोलशास्त्राचा वापर केला होता. आजच्या युगात जेव्हा मंगळ या ग्रहावर भारत आपले यान पाठवण्याची मोहीम आखतो आहे, तेव्हादेखील खगोलशास्त्रातील विज्ञानाचा वापर करावा लागतो. फलज्योतिषाचा तिथे काहीही उपयोग नाही. खेदाची बाब अशी आहे की, जरी हा देश मंगळावर यान पाठवत असला तरी अजूनही येथील मुलींच्या पत्रिकेतला मंगळाचा प्रभाव काही कमी होत नाही.
हेही वाचा : अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव
उदाहरण म्हणून बेजान दारूवाला यांनी केलेले कोरोनाविषयीचे भविष्य पाहू या. त्यांचा वीडियो युट्यूबवर उपलब्ध आहे. यामधे ते असे म्हणतात की, ‘15 मे रोजी भारतातील कोरोनाची साथ आटोक्यात येईल.’ हे तर स्पष्टच आहे की, प्रत्यक्षात असे काही झालेले नाही. कोरोनाची साथ मे महिन्यात आटोक्यात येईल हे भाकीत करण्यासाठी त्यांनी जे तर्क वापरले आहेत, ते देखील तपासून पाहू या.
यामधे ते म्हणतात की, सध्याचा काळ हा गुरू आणि प्लुटो या ग्रहांच्या युतीचा आहे. प्लुटो हा अत्यंत ताकदवान ग्रह आहे, तर गुरू हा शांतीचा ग्रह आहे. त्या दोघांच्या युतीने हा कालखंड कोरोनाच्या निवारणासाठी अनुकूल आहे! ताऱ्यांना स्वत:चे म्हणून काही स्वभाव आणि मानसिक गुणविशेष असतात, हीच बाब पूर्णपणे अशास्त्रीय आहे. त्यापुढे जाऊन त्यांचा प्रभाव पृथ्वीवरील घटनांवर पडतो, हे आणखीच अशास्त्रीय आहे.
प्रत्यक्षात प्लुटो या ग्रहावर पृथ्वीवरून पोहोचण्यास वायेजर या यानाला बारा वर्षे लागली होती आणि शनीवर पोहोचायला अंतराळ यानाला तीन वर्षे लागू शकतात. म्हणजे आज पृथ्वीवरून एखादी बातमी प्लुटोवर पोचवायची म्हटली तरी कमीत कमी बारा वर्षे लागतील. त्यामुळे पृथ्वीवर कोरोना नावाचा आजार आला आहे, ही बातमी प्लुटोवर पोचायला बारा वर्षे लागतील आणि तिथून परत पृथ्वीवर संदेश येण्यासाठी परत बारा वर्षे लागतील.
या पार्श्वभूमीवर फलज्योतिषाचे हे सर्व दावे हास्यास्पद वाटू लागतात. न्यूमरॉलॉजी म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ठरावीक संख्येला महत्त्व असते आणि त्यावरून त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक गोष्टी ठरत असतात. याला कुठलाही शास्त्रीय आधार नसलेल्या छद्म विज्ञानाच्या पद्धतीचादेखील ते पुरस्कार करीत असत.
बहुतांश ज्योतिषी हे कोणते ना कोणते सिनेनट, बडे खेळाडू किंवा राजकारणी यांना हाताशी धरून स्वत:ची जाहिरात करत असतात. बेजान दारूवाला यांनी तर त्यांच्या वेबसाईटवर नरेंद्र मोदी, अटलबिहारी वाजपेयी आणि मोरारजी देसाई असे तीन पंतप्रधान होण्याविषयी केलेले भाकीत खरे झाल्याचा दावा केला आहे.
दर निवडणुकीच्या आधी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात सामान्य जनतादेखील अशी भाकिते करते आणि पैजा लावते. वरील लोकांच्या पंतप्रधान होण्याविषयी भारतात काही लाख लोकांनी वर्तवलेला अंदाज बरोबर आला असेल. बेजान दारूवालांची कसोटी लावायची, तर यामधील बहुतांश लोकांना भविष्यवेत्ते म्हणावे लागेल. प्रत्यक्षात त्यांनी असे भाकीत केले होते का? नक्की कधी केले होते? त्यामागची कारणमीमांसा काय होती? असे प्रश्न ज्योतिषाला कुणीही विचारायला जात नाही, म्हणून त्यांचे फावते.
बेजान दारूवाला यांच्या वेबसाईटवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रख्यात सिनेस्टार सलमान खान, सचिन तेंडुलकर, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे त्यांच्याबरोबरचे फोटो आहेत. सर्वपक्षीय नेतेमंडळी, बडे सिनेस्टार आणि खेळाडू हे त्यांचे ग्राहक असल्याने सामान्य माणसाला या गोष्टीचे पटकन आकर्षण वाटते.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, सामान्य माणसाचे जीवन अत्यंत अनिश्चिततेच्या वातावरणाने भरलेले असते. त्यामुळे असा कोणता तरी आधार ते शोधतात. यामधून फलज्योतिषाचा वैज्ञानिक आधार न वाढता या सर्व लोकांची पराधीन मानसिकता आपल्या लक्षात येते. जर यांच्यामधील कोणीही बेजान दारूवाला यांचा सल्ला घेतला नसेल आणि त्यांच्या परवानगीशिवाय हे फोटो वापरले जात असतील, तर या व्यक्तींनी कमीत कमी तसे जाहीर केले पाहिजे; अन्यथा त्यांच्या नावाचा फायदा घेऊन लोकांना फसवले जाते आहे आणि ते काहीही करीत नाहीत, असा त्याचा अर्थ होईल.
फलज्योतिषामधील सगळ्यात आक्षेपार्ह बाब कोणती असेल तर, यामधून होणारे सामान्य माणसाचे शोषण आणि दिशाभूल. कोणताही ज्योतिषी केवळ भविष्य सांगून थांबत नाही. तर त्यांच्या तथाकथित परिणामांवरती उतारा म्हणून काही उपायदेखील सांगतात.
कुठल्याही ज्योतिषाच्या वेबसाईटला आपण भेट दिली तर तिथे कुटुंबकलहापासून ते शारीरिक आजारापर्यंत आणि व्यावसायिक अपयशापासून ते प्रेमातील अडचणींपर्यंत सगळ्या गोष्टींचे उपचार सांगितले जातात. खेदाची बाब अशी की, बेजान दारूवाला याला अपवाद नव्हते. त्यांच्या वेबसाईटवर तर ‘करणी उतरवण्यासाठीदेखील उपाय केले जातील’ अशी जाहिरात आहे.
बेजान दारूवाला यांनी अनेक ठिकाणी आपल्याला गणेशाचे वरदान आहे, अशी वक्तव्ये केली आहेत. ‘गणेशाच्या कृपेमुळे माझ्याकडे विशेष शक्ती आली आहे. त्या माध्यमातून मला तुमचे प्रश्न कळतात आणि त्यांची उत्तरेदेखील मी सांगू शकतो’ असे म्हटले आहे. स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणे आणि त्यामधून लोकांची फसवणूक करणे, हा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधे जादूटोणाविरोधी कायद्याने गुन्हा आहे, हेदेखील इथे नमूद करणे आवश्यक आहे.
ज्योतिषासारख्या गोष्टींना केवळ भारतातील भोळी-भाबडी जनता फसते, असे आपल्या वाटत असेल, तर तो गैरसमज बेजान दारूवाला यांनी दूर केला. अमेरिका आणि युरोपमधेही त्यांचे भविष्य ऐकायला मोठा समुदाय आतुर होता! वेस्टर्न, चायनीज आणि भारतीय अशा पद्धती एकत्र करून भविष्य सांगत असल्याचा त्यांचा दावा होता.
समाजात शिक्षणाचे प्रमाण जितके वाढेल तितक्या वैज्ञानिक आधार नसलेल्या गोष्टी कमी होतील, अशी एक मांडणी केली जाते. प्रत्यक्षात मात्र विद्यमान शिक्षणपद्धती वैज्ञानिक दृष्टीने चिकित्सा करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या दृष्टीने अत्यंत अपुरी पडती आहे, असा या सर्वांचा अर्थ निघतो.
एखादी गोष्ट सिद्ध होण्यासाठी केवळ मला त्याचा अनुभव आला, अथवा कोणा प्रसिद्ध व्यक्तीला त्याचा अनुभव आला एवढेच पुरसे नसते. त्यासाठी तर्क, गृहीतक, प्रयोग आणि अनुमान या शास्त्रीय चिकित्सापद्धतीतून जावे लागते. या पद्धतीचे जीवनाभिमुख शिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमांची किती गरज आहे, हे वास्तव या सर्व उदाहरणातून स्पष्टपणे समोर येते.
हेही वाचा : हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार होईल का?
‘इंडियन एक्स्प्रेस’ हे राष्ट्रीय पातळीवर परखड आणि चिकित्सक भूमिका घेण्यासाठी नावाजलेले वृत्तपत्र आहे. त्यांनीदेखील बेजान दारूवाला यांच्याविषयी संपादकीय लिहिले होते. यामधे बेजान दारूवाला यांना भविष्यवेत्ता म्हटले होते. त्यांनी त्यांच्या ज्योतिषामधे सर्व धर्म, पंथ आणि जातींचा समवेश केला होता - याला भारतातील सर्वधर्मसमभावाचे उदाहरण म्हटले होते! समाजमनाचे प्रबोधन करणारी प्रमुख वृत्तपत्रे जर याला बळी पडत असतील, तर सामान्य माणसांची काय अवस्था, असा विचार मनात येऊन जातो.
अडचणीच्या कालखंडात भूलथापांना बळी पडण्याची जी मानवाची अंगभूत प्रवृत्ती आहे, त्याचा गैरफायदा बेजान दारूवाला यांच्यासारखे ज्योतिषी घेतात. एवढेच नव्हे, तर मार्केटिंगचे उत्तम तंत्र वापरून मोठा व्यवसाय उभा करतात. त्यांच्या पश्चातदेखील शेकडो ज्योतिषी त्यांच्या ‘गणेशा स्पीक’ या माध्यमातून ज्योतिषाचा व्यवसाय आणि त्यामार्गे होणारी लोकांची फसवणूक चालूच ठेवतात. जगभरातील ज्योतिषाची बाजारपेठ शेकडो कोटींची असल्याचे सांगितले जाते.
जादूटोणाविरोधी कायद्यामधे फसवणुकीच्या प्रकारांमधे ज्योतिषाचा समावेश करण्याचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे सर्व प्रयत्न टोकाचा विरोध करून शासनाने अयशस्वी केले. ज्योतिषाच्या विरोधात विज्ञानाच्या बाजूला सर्व पुरावे असले, तरी समाजमन मात्र अजून त्या पुराव्यांची भाषा बोलूच इच्छित नाही. या पार्श्वभूमीवर कितीही अवघड वाटली, तरी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार करू इच्छिणाऱ्या समाजाला याविषयी जनमत तयार करण्याची लढाई सातत्याने लढावीच लागेल.
ग्राहकाला आवडतील, अशाच गोष्टी सामान्य ज्योतिषी सांगतात, असा एक आक्षेप असतो. बेजान दारूवाला यांची अशी ख्याती होती की, ते कितीही वाईट असले तरी त्यांना वाटणारे भविष्य आपल्या ग्राहकाला सांगायचे. त्यांच्या स्मृतीला स्मरताना आपणदेखील त्यांच्या या गुणाला विसरता कामा नये, असे वाटते.
हेही वाचा :
बरा झाला. नायतर माझ्या विठूक कोरोना जायत
चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी
दीपिका सांगतेय, लॉकडाऊनमधे मानसिक आरोग्य सांभाळण्याच्या १५ टिप्स
(हा लेख साधना साप्ताहिकात २० जून २०२० च्या ताज्या अंकात प्रकाशित झालाय.)