अनिता पगारे : ‘मिडास टच’ देणाऱ्या मेंटॉर कार्यकर्त्या

०४ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्या अनिता पगारे यांचं कोरोनामुळे २८ मार्चला निधन झालं. स्त्रीमुक्ती चळवळ, नर्मदा बचाव अभियानातही त्यांचा मोलाचा वाटा होता. लॉकडाऊनमधे स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवरही त्यांनी लढा उभारला. एखाद्याच्या आयुष्याला स्पर्श केला तर त्याचं सोनं होईल असा ‘मिडास टच’ त्यांच्याकडे होता. त्यांच्या आठवणी सांगणारा ‘पुन्हा स्त्री उवाच’ च्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेला हा लेख.

साधारण २००० ची गोष्ट असेल. आम्ही इंग्लिश डिपार्टमेंटच्या विद्यार्थिनी कॉलेजच्या मासिकात लेख देण्यासाठी माहिती गोळा करत होतो. विषय होता नाशिक भागातल्या वेगवेगळ्या चळवळीतून काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घ्यायच्या आणि त्या मुलाखती एकत्र करून माहितीपर लेख तयार करायचे.

मार्गदर्शन करणाऱ्या प्रोफेसरने बरीच नावं सुचवली. त्यात अनिता पगारे यांच्या कामानं प्रभावित होऊन त्यांना भेटायचं ठरलं. ती पहिलीच भेट होती. तरी अतिशय आपुलकीने, ओघवत्या भाषेत, त्यांच्या खुमासदार शैलीत त्यांनी आपल्या कामाबद्दल आम्हाला माहिती दिली. आमच्यासारख्या समाजकार्याने प्रभावित झालेल्या विद्यार्थिनींना त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं.

यानंतर बराच काळ लोटला. जवळ संभाषणाची काही साधनं नव्हती. अनिता मॅडम एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत, एवढीच तोपर्यंत ओळख होती. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा फेसबुकवरून मॅडमशी कनेक्ट झाले. त्यांची भेट होईल आणि परत वैचारिक गप्पा होतील या भावनेनं खूपच आनंद झाला.

हेही वाचा :  कष्टकऱ्यांच्या पोरापोरींनी आयएएस बनणं कुणाला खुपतंय का?

तोपर्यंत त्यांचं काम खूपच पुढं गेलं होतं. त्याबद्दल बऱ्याच ठिकाणी वाचलंही होतं. एकूणच त्यांच्या कामाचा आवाका पाहून मी अवाक झाले होते. अनिता मॅडम आता खूप मोठ्या कार्यकर्त्या झाल्यात, हे लक्षात आलं. त्यांना कामंही खूप आहेत, याची कल्पना होती. त्यांचा फोन नंबर मिळवला. पण त्या वेळ देतील की नाही या संभ्रमात होते.

त्यावेळी नाशिकला गेल्यावर पहिल्यांदा मॅडमना फोन लावला आणि त्यांनी लगेच ‘उद्या ये’ म्हणून सांगितलं. मला विश्वासच बसत नव्हता की आज स्वतःच्या कामात इतक्या व्यस्त असलेल्या आणि मोठ्या झालेल्या व्यक्तीनं माझी काहीही ओळख नसताना माझ्यासाठी वेळ राखून ठेवला आणि मनापासून मला मार्गदर्शन केलं.

माझं पीएचडीचं संशोधन स्त्रीवादी कादंबऱ्यांवर होतं. मॅडम स्वतः स्त्रीवादी चळवळीत होत्या. तर मला माझ्या संशोधनाला आजच्या परिस्थितीशी जोडून हायपोथेसिस टेस्ट करता येईल का हे बघायचं होतं. या कामात अनिता मॅडमच्या अनुभवाची आणि एकूणच त्यांच्या कामाची खूपच मदत झाली. परत एकदा समोरचा कितीही अनोळखी असू देत त्याला आपलंसं करून संभाषण करणं आणि त्यांना सर्वतोपरी मदत करणं हा त्यांचा स्वभाव खूप भावला.

आज त्यांच्याबद्दल जे काही आठवतं त्यामधे सगळ्यात पहिली हीच गोष्ट सांगावीशी वाटते, की चळवळीत असू देत, मैत्रिणींमधे असू देत किंवा लिखाणात असू देत त्यांच्या विचारांची स्पष्टता आणि स्वभावातला पारदर्शकपणा नेहमीच लक्षात राहण्याजोगा आणि नमूद करण्याजोगा आहे.

हेही वाचा : आंदोलन मोडण्याचे मोडीत निघालेले हाथखंडे मोदी सरकारला का हवेत?

या भेटीमधे मी दिशा शेख यांच्या कामाचा उल्लेख केला आणि त्यांनी लगेच मला दिशाबरोबर जोडून दिलं. ज्या दिवशी भेटलो त्याच दिवशी संध्याकाळी अचानक दिशा त्यांच्या घरी आली. तर त्यांनी स्वतःहून लक्षात ठेवून मला फोन केला आणि परत एकदा आम्ही भेटलो. खूप गप्पा, वेगवेगळे विचारप्रवाह आणि सामाजिक जाणिवा घेऊन मी मुंबईला परतले.

मग कधीही फोन व्हायचा तेव्हा विचारांचं, प्रश्नांचं आदान-प्रदान होत राहिलं. पुढे वंदना खरे यांनी माझ्या कामाची दखल घेऊन ‘पुन्हा स्त्री उवाच’ च्या संपादक मंडळांमधे मला स्थान दिलं. तिथं परत अनिता मॅडम संपादक ग्रुपमधे भेटल्या तर कोण आनंद झाला! कारण तिथं प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर वैचारिक देवाणघेवाण होणार होती, त्यांचे विचार, त्यांचं कार्य अजून जवळून बघायला, ऐकायला मिळणार होतं.

कोणत्याही प्रसंगावरचे, कार्यक्रमातले त्यांचे विचार ऐकताना भारावून गेल्यासारखं व्हायचं. एखाद्या विशिष्ट घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून आणि अभ्यासातून त्या पाहायच्या. फक्त प्रश्न उपस्थित करणं हेच एका कार्यकर्त्याचं काम नसून त्यासाठी मदत शोधून त्यातून मार्ग काढणं हे काम किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी नेहमी पटवून दिलं.

त्यांच्या नेटवर्कमधे कोणत्याही कार्यकर्त्यांचं काम आवडलं किंवा त्यातून प्रेरणा मिळाली आणि त्यांना त्या संदर्भात विचारलं तर अशा सगळ्या मित्र-मैत्रिणींबरोबर त्या लगेच जोडून देत. त्यांच्या स्वभावातली ही पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा क्वचितच कुठे पहायला मिळतो. 

अगदी जानेवारी २०२१ मधे एका महाविद्यालयात व्याख्याता म्हणून जायचं होतं. तेव्हाही त्यांच्या 'सावित्रीच्या लेकी' या चळवळीचा दाखला देऊ केला. त्यांना त्याबद्दल विचारलं तेव्हा माझ्या भाषणाच्या संहितेत अतिशय पुरोगामी मुद्दे सांगून एकूणच माझा कार्यक्रम एनरिचिंग आणि आयओपनर असा बनवून टाकला. अशा अनिता मॅडम ज्याच्या आयुष्याला स्पर्श करतील त्याचे विचार खरोखरच चकचकीत करून टाकत.

हेही वाचा : अनिश महाजन : सगळ्यांसाठी आरोग्याचं स्वप्न पाहणारे टायगर वूड्सचे डॉक्टर

असा 'मिडास टच' मेंटॉर तुमच्या आयुष्यातून अचानक निघून जातो तेव्हा लक्षात येतं - खूप काही सांगायचं, खूप काही बोलायचं आणि खूप काही करायचं राहून गेलं. ‘मिडास टच’ म्हणजे मराठीत सांगायचं तर हात लावेल त्याचं सोनं करणाऱ्या त्या मार्गदर्शक होत्या. 

आजपर्यंत सगळ्यांनी त्यांच्या आठवणीत त्या कोणकोणत्या क्षेत्रात काम करत होत्या, वेगवेगळ्या चळवळीतलं त्यांचं योगदान, शोषितांसाठी, गरिबांसाठी, स्त्रियांसाठी, आदिवासी जमातीसाठी, नर्मदा बचाव आंदोलनासाठी, तरुणांसाठी, कष्टकरी जनतेसाठी, मदत आणि मार्गदर्शन दोन्ही आघाड्यांवर किती धडाडीने आणि हिरिरीने काम केलं याबद्दल लिहिलंय.

पण माझे हे आजचे शब्द म्हणजे आठवणींची ती फुलं आहेत ज्यांनी माझं आयुष्य आणि विचार सुगंधित केले, कणखर केले. म्हणूनच अनिता मॅडम आता हाकेच्या अंतरावर फोनच्या अंतरावर किंवा नाशिकला घरी गेल्यावर घरात नाहीत हे सत्य मन मानायला तयार नाही.

हेही वाचा : 

तर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित

स्त्रिया कोर्टाचा अपमान करतात की कोर्ट स्त्रियांचा?

बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?

महिला दिन विशेष : आईंना हमे देखके हैरान सा क्यूँ हैं?

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया

(लेखिका पुन्हा स्त्री उवाचच्या संपादक मंडळाच्या सदस्य आहेत.)