अनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर

२८ जानेवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


अवचटांनी घर, सोसायटी, जात, धर्म, पंथांची वेस ओलांडली. निस्वार्थीपणे काम करणाऱ्या वेड्या माणसांना त्यांनी त्यांच्या लेखणीतून जगासमोर आणलं. अवचटांनी पत्रकारिता शिकवणारी संस्था काढली नाही पण त्यांचं सगळं लिखाण हे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तुपाठ राहील. अवचटांच्या अस्सल पत्रकारितेचा मागोवा घेणारी एका तरुण पत्रकाराची ही फेसबूक पोस्ट.

परवा पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. महाडजवळच्या बिरवाडीतल्या प्राथमिक केंद्रात कार्यरत राहून विंचूदंशासंदर्भात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. हिंमतराव बावस्करांच्या यांचं नाव पुरस्कारार्थींच्या यादीत होतं. अनेक वर्षांपूर्वी शाळेत असताना डॉ. बावस्करांविषयी पहिल्यांदा वाचलं होतं. ते लिहिलं होतं अनिल अवचटांनी.

डॉक्टरांच्या कार्याची महती कळण्याचं ते वय नव्हतं. पण ते काहीतरी महत्त्वाचं करत आहेत आणि प्रसिद्धीच्या-पैशाच्या सोसाविना करत आहेत हे जाणवलं. निस्वार्थीपणे काम करणाऱ्या वेड्या माणसांना अवचटांनी त्यांच्या लेखणीतून जगासमोर आणलं. ज्यांचं साहित्यात, पॉपकल्चरमधे काहीही डॉक्युमेंटेशन झालेलं नाही असा एक मोठा वर्ग समाजात आहे. अवचटांनी ती सगळं माणसं, त्यांचं भावविश्व आपल्यासमोर उलगडलं.

पत्रकारितेचा वस्तुपाठ असलेला बखरकार

पत्रकारितेत फिल्डवर जाणारे रिपोर्टर अशी एक संकल्पना असते. खरं तर सगळ्याच पत्रकारांनी लोकांमधे जावं अशी अपेक्षा आहे पण हल्ली तसं नसतं. अवचट हे सदैव फिल्डवर असायचे. बोजड, शब्दबंबाळ लिखाण म्हणजे भारी ही व्यवस्थाच त्यांनी भेदली. सहज साधं पण थेट भिडणारं लिहिलं. अवचटांनी पत्रकारिता शिकवणारी संस्था काढली नाही पण त्यांचं सगळं लिखाण हे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तुपाठ राहील. 

आपण, आपले घरचे, मित्र, नातेवाईक या गोतावळ्यात मश्गुल असतो. आपले चित्रपट, मालिका इश्क-प्रेम-मोहब्बत याभोवती रेंगाळतात. आपले नायक-नायिकाही परीटघडीचे असतात. तिसरी घंटा व्हावी आणि नाटकाचा पडदा उघडावा तसं अवचटांनी लिखाणातून भवताल दाखवला. ‘मी’पणाच्या कोशातून बाहेर यायची, आजूबाजूला बघायची शिकवण दिली आणि तीही कृतीतून.

हजारो-लाखो खर्चून सगळं ठरवून कँडिड गोष्टी सादर केल्या जातात. अवचटांनी पायात चप्पल चढवून, उन्हाळा-पावसाळा याचा विचार न करता माणसं, परिसर, गावं, वस्त्या पिंजून काढलं. वंचित, उपेक्षित हे शब्द आपण ऐकलेले असतात पण म्हणजे नेमकी कोण माणसं तिथे अवचटांनी नेलं. जनगणनेत लोकसंख्या किती, पुरुष-स्त्रिया किती हे कळतं पण त्यांचं जगणं कळत नाही. अवचट यादृष्टीने बखरकार होते. 

आतड्यापासून लिहणारा अवलिया

पुणे स्टेशनवरच्या कष्टकऱ्यांचं जग मांडलं. सिमेंटची पोती मालगाडीत भरणाऱ्या कामगारांचं विश्व सादर केलं. वाघ्यामुरळी समाजाचं चित्रण केलं. काहीही आर्थिक फायदा नाही, कमर्शियल कारण नाही, सरकारी मोजदाद वगैरेचा भाग नाही तरी अवचट अनोळखी लोकांमधे जात राहिले, त्यांना बोलतं करत राहिले. जे अनुभवलं तसं लिहित राहिले. स्वत:च्या न्यूनगंडाबद्दल, फजितींबद्दल, त्रुटींबद्दलही लिहिलं.

सोशल मीडिया आणि स्मार्टफोनमुळे आपण सतत डोकं खुपसून गॅजेटसमोर असतो. अनेकांच्या कानाला मोठाले हेडफोनही असतात आणि त्यात मोठ्या आवाजात काहीतरी सुरूही असतं. यामुळे बाजूने डायनासोर गेला तरी कळणार नाही अशी स्थिती आहे. अवचटांनी घर, सोसायटी, जात, धर्म, पंथांची वेस ओलांडली. गावोगावी जात राहिले. कुणी भेटेल याची शाश्वती नव्हती, कुणी बोलेल असंही काही ठोस नव्हतं. काहीवेळेला तर जीव मुठीत घेऊन पळावंही लागलंय.

सार्वजनिक वाहतूक यंत्रणेतून प्रवास, कम्युनिकेशनची साधनं जवळपास नाहीतच अशा काळात अवचटांनी भ्रमंती केली. लिहिलेलं छापलं जाईल, त्याला मोप पैसे मिळतील असंही काही नव्हतं. पोस्ट टाकली, ७०० लाईक, १३२९ कमेंट असंही काही नव्हतं. काहीही टाका, लाईक करणार असा अनुयायी वर्ग नव्हता. काय प्रेरणा असेल त्यांच्या भटकण्यामागे?

जे बघतो, जे डोक्यात येतं तसं कागदावर उतरणं खूप कठीण आहे. अस्वस्थ करणारं, विषण्ण करणारं, अनुत्तरित करणारं जग पाहिल्यावर पुन्हा आपल्या जगात येऊन नंतर त्यावर लिहिणं कितीतरी कठीण आहे. जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेत तो आतड्यापासून बोलत होता असं वाक्य असतं. अवचटांनी आतड्यापासून लिहिलं आणि म्हणूनच ते आपल्या मनात, मेंदूत ठाशीव राहिलं. 

हेही वाचा : गोड ऊस तोडणाऱ्या कामगाराचं कटू वास्तव मांडणारं पत्र

सम्यक रिपोर्ताज शैलीची देण

वर्णन करणं, गोष्ट सांगणं हे पत्रकाराचं काम. अवचट जे लिहित गेले, त्याचं आता रिपोर्ताज असं नामकरण झालंय. आपण जिथे जातोय तिथल्या माणसांचं, प्राण्यांचं, निसर्गाचं, आवाजांचं, न दिसणाऱ्या पण जाणवणाऱ्या गोष्टी बारीकसारीक तपशीलांसह लिहिणं याला आता प्रमाण मान्यता मिळाली आहे. अवचटांनी जेव्हा असं लिहिलं असेल तेव्हा कदाचित प्रस्थापितांनी थट्टाही केली असेल.

कोल्हापूरात जायचं म्हणजे मंदिरात जायचं, पांढरा-तांबडा रस्सा, कोल्हापुरी चप्पल, कुस्तीचे आखाडे असं आपल्या डोक्यात येतं. अवचटांनी कोल्हापुरात जाऊन पंचगंगेच्या प्रदूषणाचा माग काढला. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर जे सेट केलेलं दृश्य आहे त्याला बाजूला ठेऊन खऱ्या प्रश्नांना भिडायचं काम त्यांनी केलं. पत्रकाराने सगळ्या बाजू मांडाव्यात असं म्हणतात. अवचट एखाद्या मुद्यावर असं सम्यक लिहायचे. प्रो, अँटी, न्यूट्रल सगळ्या मंडळींना भेटायचे. घटनेकडे वेगवेगळ्या चष्म्यातून बघायचं असतं हे त्यांनी शिकवलं.

माणसांची दुखणी मांडणारा डॉक्टर

सोशोलॉजी नावाच्या विषयात समाजातले प्रश्न असा एक चॅप्टर असतो. अवचटांचं लिखाण वाचलं तर ते सोशोलॉजिस्ट होते असं वाटतं. ते अनेक प्रश्नांच्या मुळाशी गेले. तो सगळा विषय आतून-बाहेरून समजून घेऊन लिहिला. त्या विषयावर काम करणाऱ्या माणसांना जगासमोर आणलं. काही प्रश्नांसंदर्भात त्यांनी स्वत: योगदान दिलं.

अवचटांनी पायपीट केली नसती तर कदाचित कचरा गाडीवर काम करणाऱ्या माणसांचं आयुष्य आपल्याला कळलं नसतं. निसर्गाला तुडवत कारखाने उभारणाऱ्या मोठ्या उद्योगसमूहांविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी कळलं नसतं. भवतालातल्या माणसांच्या आयुष्याचं दस्तावेजीकरणाचं खंडप्राय काम अवचटांनी केलं.

ते पेशाने डॉक्टर होते. ठरवलं असतं तर पुण्यात भव्य हॉस्पिटल असतं त्यांचं. पण या डॉक्टरांनी माणसं वाचली. त्यांच्या आजारांवर उपचार करण्यापेक्षा त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करत त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी कमी करण्यासाठी काम केलं.

हेही वाचा: ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

वेगळेपणाची व्याख्या सांगणारी पुस्तकं

बिहारवर त्यांनी ‘पूर्णिया’ पुस्तकात लिहलंय. ते वाचताना भीषण वाटतं. पण ते खरंय. आजही बिहार लार्जली तसाच आहे. ‘धागे उभे आडवे’ वाचताना असं लक्षात येतं की हे जग आपल्याला माहितीच नाही. यांना कसं दिसलं? ते अमेरिकेत गेले. त्यांच्या नजरेतून वेगळीच अमेरिका कळली. ‘रिर्पोटिंगचे दिवस’मधे त्यांनी पत्रकाराने बातमी कशी टिपावी, मिळवावी याबाबत मार्गदर्शन ठरेल असं लिहिलंय.

काही वर्षांपूर्वी त्यांनी सुमित्रा भावेंवर लिहिलं. तो एक लेख वाचला तर तुम्हाला सुमित्रा भावे, त्यांचं आयुष्य, कार्यपद्धती, चित्रपटांमागचा विचार हे सगळं कळतं. मॅक्रो ते मायक्रो हे त्यांच्या लिखाणातलं स्थित्यंतर अनोखं होतं. त्यांनी स्वत:च्या छंदांविषयी लिहलं. लहान मुलांसाठी लिहलं. गेली अनेक वर्ष दिवाळी अंकातले अवचटांचे लेख वाचणं हे दरवर्षीचं आन्हिक आहे. ‘माणसं’, ‘कार्यरत’ आणि ‘प्रश्न आणि प्रश्न’ या त्यांच्या पुस्तकांचं मराठी कळणाऱ्या प्रत्येकाने पारायण करायला हवं.

काही गावी गेलं किंवा एखाद्या वास्तूत शिरलं की मन: शांती मिळते. तसं अवचटांचं वाचलं की तुमचे कान, नाक, डोळे सदैव उघडे राहतात. तुमची झापडं सुटतात, तुम्ही कोशात जात नाही. तुमची जिज्ञासा, कुतुहूल जागृत होत राहते. अवचट वाचल्यानंतर भारलेपण येतं. नकळत तुमच्यावर त्यांच्या शैलीचा प्रभाव होतो. अवचट वाचल्यानंतर समाजातले कथित नायक महाभंपक वाटू लागतात. त्यांच्या लिखाणामुळे आपल्याला जे भारी वाटतात त्यांचं खुजेपण लक्षात येतं आणि खरी मोठी माणसं कोण हे समजतं.

पत्रकारितेचा अलिखित मूलमंत्र

ब्रँडेड गाडी, ५ प्रायोजकांचं पाठबळ, १ स्टँडी, ३ कॅमेरे असा सेटअप घेऊन हल्ली पत्रकार मंडळी निवडणुकीच्या कव्हरेजला जातात. अवचटांकडे यातलं काही नव्हतं. पण म्हणूनच त्यांच्यासमोर गोष्टी जशा आहेत तशा येत. अवचटांचा जनसंग्रह अफाट आहे. पण अवचटांना कधीही न भेटलेली पण तरीही त्यांना जाणणारी हजारो माणसं आहेत. आपलं काम बोललं पाहिजे हे त्यांच्या लेखणीने सतत ठसवलं. हिंडा-फिरा-बघा-शोधा-उकरा-लिहा हा त्यांनी दिलेला अलिखित मंत्र मोलाचा आहे.

पायी चालणं, बेसिक शर्टपँट आणि झोळी हा पोशाख, सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणं, अनोळखी माणसात जाणं, लिहिणं हे सगळंच आता दुर्देवाने कालबाह्य गणलं जाऊ लागलंय आणि असं वागणाऱ्यांची खिल्ली उडवली जाते. अवचटांनी टीकाकारांचा मत्सर केला नाही. त्यांनी तत्व-जीवनशैली सोडली नाही. वेगवान आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेतही त्यांचं असणं उमेद, ऊर्जा आणि प्रेरणा देणारं होतं. ‘माणसां’ची साथ सोडण्याची अवचट गुरुजींची ही पहिली आणि शेवटची वेळ असावी..

हेही वाचा:

आर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफिर

कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

राजन गवसः जगण्यातूनच आली लिहण्याची भूमिका

तर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित