अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची वेगवेगळ्या वेळी भेट घेतली. त्यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत प्रेस कॉन्फरन्स घेत त्या त्या देशाच्या पत्रकारांना खोचकपणे महान म्हटलं. पण पाकिस्तानच्या पत्रकारांना महान म्हणणं हा त्यांचा अपमान ठरला आणि भारतीय पत्रकारांना महान म्हणणं हा सन्मान. असं झालं कसं?
‘असे पत्रकार तुम्हाला कुठं सापडतात?’ असा प्रश्न डोनल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना विचारला होता. झालं असं की इम्रान खान यांच्यासोबत एका पत्रकार परिषदेत ट्रम्प बोलत होते. तेव्हा पाकिस्तानी पत्रकार त्यांना सतत भारतविरोधी प्रश्न विचारत होते.
काश्मीरमधे होणाऱ्या अत्याचारावर बोलण्याचा त्यांनी एकच सपाटा लावला होता. तेव्हा ‘हे लोक फारच भारी आहेत. तुम्हाला असे पत्रकार मिळतात कुठं?’ असा प्रश्न ट्रम्प यांनी इम्रान खान यांना विचारला. त्यावरून पत्रकार परिषदेत एकच हास्यकल्लोळ झाला. ट्रम्पही आपल्या स्टाईलमधे जोरजोरात हसायला लागले.
दुसरीकडे, पाकिस्तानच्या मीडियाला धुवायची संधी साधत भारतातल्या मीडियाने लगोलग ‘ट्रम्प यांनी पाकिस्तानी पत्रकारांचा अपमान केला’ अशी बातमी चालवली. हे प्रकरण झालं २३ सप्टेंबरला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय बैठक झाली. त्यानंतर दोघांनी पत्रकार परिषद घेतली.
तेव्हा यात भारतीय पत्रकारांनी पाकिस्तान काश्मीरमधल्या दहशतवादाशी कसा संबंधित आहे याविषयी प्रश्न विचारले. तेव्हाही ‘तुमच्याकडे महान पत्रकार आहे. तुम्हाला असे रिपोटर्स कुठं मिळतात?’ असं ट्रम्प यांनी मोदींना विचारलं. या प्रकरणाची बातमी मात्र भारतीय मीडियाने ‘ट्रम्प यांनी भारतीय पत्रकाराचं कौतुक केलं’ अशी दाखवली गेली.
पण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाच्या पत्रकारांबद्दल एकसारखंच वक्तव्य केलं असताना एकाच मीडियाकडून त्याचे दोन वेगवेगळे अर्थ कसे होतील? या सगळ्या प्रकारावर राजकीय विश्लेषक जयदेव डोळे यांनी केलेलं भाष्य इथं देत आहोत.
हेही वाचाः मोदींच्या स्टेजवर ट्रम्पतात्या आले, त्याचा देशाला काय फायदा झाला?
जागतिक राजकारणात धटिंगणपणा करणारा देश म्हणून अमेरिका दुसऱ्या महायुद्धापासूनच कुप्रसिद्ध आहे. अन्य देशांची सरकारं अस्थिर कर, आपल्या पसंतीचे नेते सत्तेवर ठेव, आर्थिक आणि व्यापारी नाकेबंदी करून कोणाला शरण आण, लष्करी कट घडव, अर्थमंत्री म्हणून आपला लाडका माणूस नेम, उजव्यांना कायम लाडाकोडात वाढवं असे असंख्य उपद्व्याप हा देश करत आलेलाय.
यातल्या अनेक बिंगफोडी अमेरिकन पत्रकार, अभ्यासक किंवा कार्यकर्त्यांनीच केलेल्या असतात. पण पत्रकारांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला हाकलून लावण्याचा पराक्रम फक्त एकदाच झाला. एरवी अमेरिकेत माध्यमं आणि सत्ताधारी परस्परजीवी असतात आणि मर्यादा ओलांडत नाहीत. अशा देशाचा राष्ट्राध्यक्ष गेली दोन वर्ष आपल्याच पत्रकारांना खोटारडे, लबाड, पक्षपाती ठरवतोय आणि त्यांच्यांशी जाहीरपणे वैर घेतोय.
अमेरिकेतले पत्रकार आणि त्यांची माध्यमं आपल्या मतदारांच्या कौलाचा अपमान करतात. कारण हे पत्रकार उदारमतवादी, डावे आहेत असा डोनाल्ड ट्रम्प म्हणजे डॉन यांचा दावा आहे. ट्रम्प उघडपणे वंशवादी, वर्चस्ववादी आणि विषमता समर्थक धोरण अंगिकारून सत्तेत आलेत.
कृष्णवर्णीय, गरीब, बेघर, आजारी, अल्पसंख्यांक, स्थलांतरित, तृतीयपंथी, महिला अशांचा कैवार पत्रकार घेतात म्हणून डॉन कायम पत्रकारांची कुचेष्टा, हेटाळणी, अपमान, बदनामी, गळचेपी करत राहतात. भंबेरी उडवू शकणाऱ्या प्रश्नांची पद्धतशीर उपेक्षा ते नेहमीच करतात.
हेही वाचाः ईडीच्या कारवाईचा फायदा पवार उठवणार की फडणवीस?
तशात आधी इम्रान खान यांच्या ताफ्यात आलेल्या 'सरकारी मेहमान' पत्रकारावरून आणि नंतर नरेंद्र मोदी यांच्या विमानामधून आलेल्या चमच्या आणि चापलूस पत्रकारांची त्यांनी या दोन नेत्यांसमक्ष रेवडी उडवली. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या इमानी पत्रकारांचे प्रश्न कश्मीर विषयीच असावेत यावरुनही काही गोष्टी सिद्ध झाल्या.
पहिली गोष्ट अशी की ट्रम्प यांना काश्मीर प्रश्नी मध्यस्थ म्हणून वावरायचंय. दोन्ही नेते आपल्या आपल्या पायाशी झुकावेत असं त्यांना वाटतं. झुलवत ठेवण्याची अमेरिकेची ही जुनीच रीत! दुसरी गोष्ट अशी की मोदी आपल्या कह्यात असल्याचं भान अमेरिकेला आलंय. त्यामुळे भारत हवा तसा वाकू शकतो, आपण फक्त आपलं स्वार्थ साधण्याचं काम करुया, असा या राष्ट्राध्यक्षाचा डाव आहे.
आणि तिसरी गोष्ट अशी की पत्रकारांचे प्रश्न अप्रत्यक्षपणे त्या त्या सरकारांचे असतात हे न कळण्याइतके ट्रम्प बावळट नाहीत. त्यामुळे काश्मीर प्रश्नाबाबतीत आपलं वजन कुणाच्याही पारड्यात पडू नये, याची दक्षता ट्रम्प घेतायत.
हेही वाचाः पीएमसी बँकेपुढे अडीच हजार कोटी रुपये उभे करण्याचं टार्गेट
आता चापलूस, चमचे पत्रकारच असं आपलं थोबाड का रंगवून घेतात, त्याविषयी थोडं बोलू. मोदी नेहमीच त्यांची तारीफ करणाऱ्यांची निवड मुलाखतींसाठी करतात. परदेश दौऱ्यात ते सरकारी पत्रकार नेतात. ज्याने ट्रम्प यांच्याकरवी उपहास आणि खिल्ली सहन केली तो सरकारची तळी उचलणाऱ्या इंडिया टुडे माध्यमसमूहाचा कुणी गौरव सावंत नामक कुणी पत्रकार होता म्हणे. नक्की कुणी माहिती देत नाही.
ट्रम्प यांनी या मुलासोबतच मोदींनाही खजिल केलं. डॉनचा कुजकेपणा समजला नाही असं मोदींबाबतीत कसं म्हणता येईल? आडून आडून त्यांनी मोदींनाही एक चिमटा काढला, चांगले पाळलेले दिसतायत तुम्ही पत्रकार.
तिकडे ट्रम्प यांनी रुपर्ट मरडॉक यांचे फॉक्स टीवी चॅनल आपल्या कामी केव्हापासूनच जुंपलेलंय. मोदींच्या दिमतीला तर कितीतरी चॅनल्स आहेतच. पण ट्रम्प यांनी एकाच पद्धतीने भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या पत्रकारांना बेइज्जत केलंय. हा अपमान त्यांच्या म्हणजे पत्रकारांच्या सेवेचं कडू फळच म्हणावं लागेल. सरकार कोणतंही असू द्या, पत्रकार त्याच्या मांडीवर जास्त बसू लागले की पेकाटात लाथ घालण्याचा अधिकारही सरकारला मिळतो.
हेही वाचाः
ट्रम्पतात्यांनी भारतासोबत खोटारडेपणा का केला?
आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?
पाकिस्तानातूनच नाही, कुठूनही कांदा आयात करणं हा देशद्रोहच
वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण
ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका