हार्दिक पंड्या: भावी नेतृत्वाची पायाभरणी

०७ जून २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन टीमला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिकने बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलंय.

अल्पकाळात आपल्या जीवनासाठी आर्थिक तरतूद करणं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत अनेक युवा खेळाडू आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होत असतात. तरीही ही स्पर्धा म्हणजे अनेक युवा खेळाडूंसाठी राष्ट्रीय टीमचं दार ठोठावण्याची उत्तम संधी म्हटली जाते. यंदाची आयपीएल स्पर्धा भारताच्या मर्यादित षटकांच्या टीमचं नेतृत्वपद निश्चित करण्यासाठी असलेलं हुकमी व्यासपीठच होतं. हार्दिक पंड्या याच्यासह तीन-चार खेळाडूंकडे त्याच दृष्टिकोनातून पाहण्यात आलं होतं.

राष्ट्रीय टीम ठरवण्यासाठी पूर्वी ‘रणजी’, ‘दुलीप करंडक’, ‘देवधर करंडक’, ‘इराणी चषक’ या स्पर्धांमधल्या कामगिरीचा प्राधान्याने विचार केला जायचा. जागतिक स्तरावर सततचे दौरे आणि आयपीएलसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमुळे या स्थानिक सामन्यांना दुय्यम महत्त्व प्राप्त झालं.

टीमच्या नेतृत्वासाठी शोधमोहीम

केवळ भारतीय खेळाडू नाही, तर परदेशातले अनेक खेळाडू आयपीएल स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व देत असतात. आपल्या एक-दोन पिढ्यांची आर्थिक बेगमी करण्यासाठी आयपीएल स्पर्धेसारखं दुसरं कोणतंही चलनी नाणं नसतं, असा विचार करत परदेशी खेळाडूही आयपीएलवर अधिक लक्ष केंद्रित करत असतात. भारतीय खेळाडूला एकवेळ आपल्या राज्याच्या टीमकडून खेळता नाही आलं तरी चालेल; पण आयपीएलमधे आपली वर्णी कशी लागेल, याचाच विचार करत असतात.

लागोपाठच्या दौर्‍यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा या भारतीय टीमच्या कर्णधारांच्या कामगिरीत अनेक चढउतार दिसून येऊ लागले आहेत. साहजिकच, भारतीय कसोटी टीमप्रमाणेच मर्यादित षटकांच्या टीमचं नेतृत्व खंबीरपणे सांभाळण्याच्या दृष्टीने योग्य पर्यायांच्या शोधासाठी भारतीय निवड समिती प्रयत्न करत आहे.

अजिंक्य राहणे, के. एल. राहुल या काही पर्यायांचीही चाचपणी केली जातेय. टीमच्या नेतृत्वासाठी शोधमोहीम करण्याची हुकमी जागा म्हणजे आयपीएल स्पर्धा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रीय निवड समितीने वेगवेगळ्या पर्यायांचा गांभीर्याने विचार केला आहे. आयपीएलमधल्या बहुतेक टीमचं कर्णधारपद भारतीय खेळाडूंकडे देण्यात आलं होतं. त्यामागचा हासुद्धा एक हेतू होता.

हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

संयमी हार्दिक पंड्या

भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने या स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी झालेल्या गुजरात टायटन टीमला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिक याने वैयक्तिकरित्याही बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलं.

मागच्यावेळी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पंड्याची कामगिरी अतिशय खराब झाली होती. त्यामुळे त्याला भारतीय टीममधून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर मोठ्या दुखापतीला त्याला सामोरं जावं लागलं होतं. त्याचं बिनधास्त वागणं, महागड्या वस्तूंचं आकर्षण, शंका यावी अशी शारीरिक तंदुरुस्ती अशा अनेक कारणांमुळे त्याच्यावर सातत्याने टीका करण्यात आली होती. त्यामुळे जेव्हा त्याच्याकडे गुजरात टायटन टीमचं नेतृत्व देण्यात आलं त्यावेळीही अनेकांनी त्यांच्या या निर्णयावर टीका केली होती.

लोकांनी कितीही टीका केली तरी, आपण मात्र अतिशय संयमाने आणि स्वतःच्या कामगिरीच्या जोरावर या टीकाकारांना उत्तर द्यायचं, हेच ध्येय हार्दिक याने डोळ्यासमोर ठेवलं होतं. महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली या दिग्गज खेळाडूंबरोबर खेळल्यामुळे त्यांच्याकडून त्याला बरंच काही शिकायला मिळालंय.

भारतीय टीमचा भावी कर्णधार?

आयपीएलमधे सुरवातीला मुंबई इंडियन्स टीमकडून खेळतानाही त्याच्यातल्या क्रिकेट कौशल्यांची व्यवस्थित रितीने बांधणी झाली आहे. मुंबईकडूनच त्याची जडणघडण झाली आहे, असं म्हटलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही.

हार्दिकने गुजरात टायटन टीमचं नेतृत्व म्हणजे आपल्या करिअरमधला सर्वोच्च कसोटीचा क्षण आहे, असे विचार ठेवत सातत्यपूर्ण कामगिरी केली. टीममधला सहकारी ज्येष्ठ असो किंवा कनिष्ठ असो. तो सर्वोत्तमच खेळाडू आहे, असं मानून त्याच्याकडून टीमसाठी चांगली कामगिरी कशी करून घेता येईल याचाच विचार हार्दिक याने केला.

बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण या सर्व आघाड्यांवर आपल्या सहकारी खेळाडूंचे गुणदोष बारकाईने हेरून त्याप्रमाणे त्यांच्याकडून ईप्सित कामगिरी कशी करून घेता येईल, असाच त्याने विचार केला. गुजरातला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर भारतीय टीमचा भावी कर्णधार म्हणूनच अनेक ज्येष्ठ क्रिकेट समीक्षकांनी त्याचं गुणगान केलंय.

हेही वाचा: कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश

नेतृत्वपदाच्या शर्यतीतली नावं

यष्टीरक्षक संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स टीमने आयपीएलच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. त्याने टीममधल्या अनुभवी खेळाडूंकडून प्रभावी आणि सातत्यपूर्ण कामगिरी करून घेतली. अंतिम फेरीत त्याचे आडाखे आणि नियोजन अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरले नाहीत. पण एक कुशल कर्णधार म्हणून त्याचं कौशल्य आठवणीत राहील, असंच आहे. वैयक्तिकरित्याही त्याने सातत्यपूर्ण बॅटिंग केली.

यष्टीरक्षक हा सर्वोत्तम कर्णधार असू शकतो, असं नेहमी म्हटलं जातं कारण त्याला प्रतिस्पर्धी बॅट्समन कसा खेळतो आणि आपले सहकारी बॉलर कसे चेंडू टाकतात, याचा बारकाईने अभ्यास असतो. सॅमसनच्या टीमला विजेतेपद मिळवता आलं नाही तरीही इतर मातब्बर टीमना मागे टाकून अंतिम फेरीपर्यंतची त्यांची मजल ही खूपच बोलकी कामगिरी आहे. तरीही भारतीय टीमचा कर्णधार होण्यापूर्वी स्वतःला हा या टीममधे असं स्थान मिळवता येईल, याचाच त्याने प्राधान्याने विचार करायला पाहिजे.

कर्नाटकचा अनुभवी खेळाडू के. एल. राहुल याने भारतीय टीमचा कर्णधार म्हणून काही वेळेला समर्थपणे जबाबदारी सांभाळली आहे. ही जबाबदारी सांभाळताना त्याने परिपूर्ण आणि मातब्बर सलामीवीर म्हणूनही नावलौकिक मिळवला आहे. केवळ मर्यादित षटकांच्या नाही, तर कसोटी टीमसाठीही तो भारताचा हुकमी एक्का मानला जातो. भारतीय टीमचं नेतृत्व तो करत आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधे तो अव्वल दर्जाचा खेळाडू मानला जातो.

नेतृत्वपदासाठी पंजाब किंगचा मयांक अगरवाल, कोलकाता नाइट रायडर्सचा श्रेयस अय्यर, दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत यांच्याबाबतही चर्चा आहे. पण हे सर्वच खेळाडू स्वतःच्या वैयक्तिक कामगिरीबरोबरच सांघिक कौशल्यामधेही अपयशी ठरले आहेत.

संयमी नेतृत्वाची गरज

काही खेळाडू अक्षम्य चुकीमुळे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात. ऋषभ याने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंचांशी अरेरावी करत अतिशय बेशिस्त वर्तन केलं. या सामन्याचं मिळणारं मानधन त्याला संयोजन समितीकडे दंड म्हणून भरावं लागलं, पण त्याचबरोबर त्याला प्रसारमाध्यमांची कडवट टीकाही सहन करावी लागली. या सामन्यानंतर ऋषभ याने आपल्या टीमला काही सामने जिंकून दिले; मात्र ‘बुँद से गयी व हौद से नही आती’ याप्रमाणेच गेलेली शान त्याला भरून काढता आलेली नाही.

श्रेयस आणि मयांक यांना त्यांच्या टीम खेळाडूंसोबत अपेक्षेइतका सुसंवाद ठेवता आला नाही. एकूणच, आयपीएल स्पर्धेतल्या विविध भारतीय कर्णधारांची कामगिरी लक्षात घेतली तर ‘हार्दिक पंड्या’ हाच भारतीय टीमच्या कर्णधारपदाचा वारसदार मानला जात आहे. अर्थात धोनी, रोहित शर्मा या कर्णधारांची गादी पुढे चालवावयाची असेल तर हार्दिक पंड्या याला स्वतःच्या स्वभावावर नियंत्रण ठेवण्याची, तसंच मैदानावर आणि मैदानाबाहेरही संयमाने वागण्याची गरज आहे.

हेही वाचा: 

लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी