भारतीय वंशाचे बंगा, वर्ल्ड बँकेत डंका

०१ मार्च २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन वंशाच्या अजयसिंग बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केलीय. बंगा यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण भारतात झालंय. इथंच मॅनेजमेंटचे धडे घेत त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे आपली छाप पाडली. हवामान बदलासंदर्भात जागतिक बँकेनं पुढाकार घ्यावा म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीनं बंगांचं अध्यक्ष होणं फायद्याचं ठरेल.

१८९ देशांचं नेतृत्व करणारी जागतिक बँक ही महत्वाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. एखादा देश आर्थिक अडचणीत असला की, तो जागतिक बँकेची मदत हमखास घेतोच घेतो. विकसनशील आणि विकसित देशांना कर्जपुरवठा करणं आणि जगभरातल्या देशांमधली गरिबी दूर करणं हा जागतिक बँकेचा महत्वाचा उद्देश.

तर याच जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेनं भारतीय वंशाच्या अजय बंगा यांची शिफारस केलीय. अमेरिका मोठ्या प्रमाणात जागतिक बँकेला आर्थिक पाठबळ देत आलीय. त्यामुळे बंगांची नेमणूक ही केवळ औपचारिकता मानली जातेय. त्यातलं भारतीय कनेक्शन फार महत्त्वाचं आहे.

असं आहे भारतीय कनेक्शन

बंगा हे मूळचं पंजाबच्या जालंधरमधलं शीख कुटुंब. याच कुटुंबातले हरभजनसिंग बंगा हे भारतीय सैन्यात होते. पुढे ते लेफ्टनंट जनरल म्हणून रिटायर झाले. याच हरभजनसिंग यांचं नोकरीनिमित्त लष्करी छावणी असलेल्या पुण्याच्या खडकी इथं वास्तव्य होतं. इथंच १० नोव्हेंबर १९५९ला अजयसिंग बंगा यांचा जन्म झाला.

अजय यांचे वडील भारतीय सैन्यात असल्यामुळे त्यांची कायमच बदली व्हायची. त्यामुळे कधी शिमला, हैद्राबाद तर कधी दिल्ली अशा शहरांमधे अजय यांचं शिक्षण झालं. दिल्लीच्या सेंट स्टीफेंस कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली. पुढे अहमदाबादच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेतून मॅनेजमेंटचे धडे घेतले. इथल्या शिक्षणाचा त्यांना पुढच्या व्यावसायिक करिअरमधे खूप फायदा झाला.

अजय बंगा यांचा मोठा भाऊ मनविंदर बंगा यांचंही उद्योग क्षेत्रात मोठं नाव आहे. ग्राहकोपयोगी वस्तू बनवणाऱ्या इंग्लंडच्या युनिलिवर कंपनीत त्यांनी ३३ वर्ष काम केलं होतं. त्यानंतर याचीच भारतीय आवृत्ती असलेल्या हिंदुस्थान युनिलिवरचं अध्यक्ष आणि सीईओ म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यामुळे अजयसिंग यांना हे बाळकडू घरात मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

१९८१मधे त्यांनी जगातली एक महत्वाची खाद्य कंपनी असलेल्या नेस्लेसोबत काम करायला सुरवात केली. नेस्ले कंपनीत त्यांनी जवळपास १३ वर्ष विक्री, जाहिरात आणि व्यवस्थापनाचं काम पाहिलं. त्यांच्या व्यवासायिक कारकिर्दीची ही सुरवात होती. पुढे अमेरिकन कंपनी असलेल्या पेप्सीकोमधेही अशाच स्वरूपाचं काम करायची संधी त्यांना मिळाली.

हेही वाचा: लोकांनी सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय?

बँकिंग क्षेत्रात एण्ट्री

भारतातला १९९०-९१चा काळ. उदारीकरणाचे वारे वाहिलेले होते. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात येऊ घातल्या होत्या. येत होत्या. त्यातच अमेरिकेच्या पिज्जा हट आणि केएफजी या आंतरराष्ट्रीय फास्ट फूड कंपन्यांनी भारतात एण्ट्री केली. अजय बंगा यांनी या कंपन्यांना भारतात घेऊन येण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर अशा अनेक कंपन्यांनी भारतात एण्ट्री झाली.

१९९६चं वर्ष उजाडलं. अजय बंगा यांच्या दृष्टीने हे वर्ष महत्वाचं होतं. एव्हाना कंपन्यांच्या उत्पादनाची विक्री, जाहिरात आणि व्यवस्थापनाचं सूत्र त्यांना गवसलेलं होतं. अशातच अमेरिकन बँकिंग क्षेत्रातली एक अग्रगण्य संस्था असलेला 'सिटीग्रुप' त्यांनी जॉईन केला. त्यावेळी जगभरातल्या गुंतवणूक बँकांमधलं सिटीग्रुप हे मोठं नाव होतं. इथं काम करायला मिळणं अजय बंगा यांच्यासाठी मोठी सुवर्णसंधी होती.

त्यांच्या कामानं सिटीग्रुपचे वरिष्ठ अधिकारी प्रभावित झाले होते. अर्थशास्त्र आणि मॅनेजमेंट या दोन्हींमधलं ज्ञान त्यांच्यासाठी इथं फायद्याचं ठरलं. त्यामुळेच सिटीग्रुपच्या आशियायी भागाचं नेतृत्व अजय बंगा यांना देण्यात आलं. त्याचवेळी मायक्रोफायनान्स सेवांना प्राधान्य देत त्यांनी २००५ ते २००९या काळात सिटीग्रुपला जगभरात वेगळी ओळख निर्माण करून दिली.

एका क्रेडिट कंपनीची भरारी

२००९पूर्वी ज्या काही कंपन्यांसोबत त्यांनी काम केलं त्या सगळ्याच कंपन्या या प्रामुख्याने अमेरिकन होत्या. अशातच २००७ला त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेतलं. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधला त्यांचा वावरही वाढत होता. त्यातच जुलै २०१०ला त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी आली. त्यांना जगातली आघाडीची क्रेडिट कंपनी असलेल्या मास्टरकार्डचं सीईओ बनवण्यात आलं. त्यांना कंपनीच्या संचालक मंडळावरही घेण्यात आलं.

अजय बंगा यांनी जबाबदारी घेण्याआधी मास्टरकार्डचा पसारा फार काही वाढलेला नव्हता. पण बंगांनी जबाबदारी घेताच अल्पावधीतच मास्टरकार्डचा महसूल तीनपट वाढला. कंपनीच्या दृष्टीनं ही मोठी गोष्ट होती. शिवाय उत्पन्नही सहा पटीने वाढलं होतं. तर ३० बिलियन डॉलर असलेलं बाजार भांडवल हे ३०० बिलियन डॉलरवर पोचलं. कंपनीला इतकं मोठं यश मिळणं ही बंगा यांच्या धाडसी निर्णयांची कमाल होती.

एवढ्यावरच ते थांबले नाहीत. आपल्या सीईओपदाच्या कार्यकाळातच २०२०ला त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या जगभरातल्या १०० कंपन्यांना एकत्र आणलं. १०० मिलियन झाडं लावायची शपथ घेतली. पर्यावरणाबद्दलची ओढ त्यामागचं खरं कारण होतं. पुढच्याच वर्षी म्हणजे २०२१ला त्यांनी मास्टरकार्डमधून रिटायरमेंट घेतली.

हेही वाचा: कोरोनानं कांद्याचा बाजार बंद झाला, मग शेअर बाजार बंद का होत नाही?

अमेरिकन सरकारसोबतही काम

पण रिटायरमेंट त्यांना काही स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच त्यांच्याकडे अमेरिकन खासगी इक्विटी कंपनी असलेल्या जनरल अटलांटिकचं उपाध्यक्षपद आलं. याच कंपनीच्या सल्लागार मंडळातही त्यांनी काम केलं. हवामान बदलासाठी म्हणून या कंपनीनं ३.५ बिलियन डॉलर इतका निधी उभा केला होता. त्याच्या उभारणीत अजय बंगा यांनी महत्वाची भूमिका निभावली होती.

कंपन्यांसोबत सार्वजनिक क्षेत्रातला त्यांचा वावरही वाढत होतात. त्यातून २०१५ला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या व्यापार धोरणसंबंधीच्या अध्यक्षीय सल्लागार समितीचं सदस्यत्व त्यांच्याकडे आलं. २०२०ला अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या व्यावसायिक ग्रुपचे सल्लागार म्हणूनही त्यांची नेमणूक करण्यात आली होती. याच काळात मध्य अमेरिकेतली खासगी क्षेत्रातली भागीदारी वाढावी म्हणून काम करणाऱ्या 'पार्टनरशिप फॉर सेंट्रल अमेरिका' या संस्थेचंही त्यांनी काम पाहिलं. ही संस्था व्हाइट हाऊसशी जोडली गेली होती.

आता तर थेट अमेरिकचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केलीय. भारतासाठी ही आनंदाची गोष्ट आहे कारण २०१६ला भारताने त्यांच्या कामाची दखल घेत 'पद्मश्री' या नागरी सन्मानानं त्यांचा गौरव केला होता. त्यामुळे भारताशी घट्ट मूळ जोडलेल्या अजय बंगा यांची निवड आपल्या दृष्टीनंही फार महत्वाची आहे.

बंगांना विरोध, समर्थन

याआधी जागतिक बँकेचे अध्यक्ष असलेले डेविड माल्पस अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मर्जीतले म्हणून ओळखले जायचे. ट्रम्प यांच्या शिफारशीमुळेच त्यांची बँकेच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली होती. ट्रम्प यांच्या धोरणांचा प्रभाव असलेले माल्पस जो बायडेन यांच्यासाठी अडचणीचे ठरत होते. त्यांची हवामान बदल, पर्यावरण यासंबंधीची मतंही जुनाट आणि एकांगी होती. त्यामुळेच आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच त्यांना पायउतार व्हावं लागतंय.

आंतरराष्ट्रीय संस्थांवर कायम टीकेची झोड उठवणाऱ्या अमेरिकेतल्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी आता बंगा यांच्यावर टीका करायला सुरवात केलीय. त्यांच्याकडे अनुभव नसल्याचा मुद्दा पुढे केला जातोय. जागतिक बँकेची जी काही महत्वाची उद्दिष्टं आहेत त्यातलं एक महत्वाचं उद्दिष्टं म्हणजे जगभरातल्या सरकारांचं सबलीकरण. याच मुद्यावरून बंगा यांना घेरायचा प्रयत्न रिपब्लिकन करतायत. त्यासाठी बंगा यांनी याआधी कोणत्याही सरकारी पदावर काम केलं नसल्याच्या आक्षेपाचं कारण त्यांना मिळालंय.

मुळातच बंगा यांचं जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी येणं आता केवळ औपचारिकता राहिलीय असं म्हटलं जातंय. जागतिक बँकेच्या संचालक मंडळाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं की त्यांच्या निवडीची अधिकृतपणे घोषणा होईल. या शिफारशीचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस, ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट एलन यांनी कौतुक केलंय. तसंच कौतुक भारतातूनही होताना दिसतंय.

हेही वाचा: 

पंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे

जगातले १६ देश, जिथे रिटायरमेंटचं वय सगळ्यात जास्त आहे

कर्ज खिरापतीनं २००८ मधे जगाला आर्थिक संकटात ढकललं, त्याची गोष्ट

१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय