बॉलीवूडचा आजवरचा सगळ्यात महागडा सिनेमा ‘आदिपुरुष’ पुढच्या वर्षी रिलीज होतोय. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात दिसणारी कथेची मोडतोड आणि वीएफएक्सचं अगदीच अनपेक्षित आणि सुमार प्रदर्शन बघून सिनेमासाठी असलेलं ५०० कोटींचं बजेट नेमकं गेलं कुठे हा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केलीय.
‘बाहुबली’च्या यशानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेला प्रभास हा तेलुगू अभिनेता आता आजवरच्या सर्वात महागड्या बॉलीवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘आदिपुरुष’ नावाचा हा सिनेमा एक मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत बनवतोय. परदेशात भारतीय सिनेमाचा चेहरा असलेल्या आणि हिंदी सिनेमांपुरतं मर्यादित असलेल्या बॉलीवूडमधे या दोघांनी जे स्थान मिळवलंय, ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
पण प्रभास आणि ओम यांच्या गेल्या काही वर्षातल्या कामगिरीवर नजर टाकली तर हे कौतुक फार काळ टिकणार नाही, याची ते दोघेही पुरेपूर खबरदारी घेताना दिसतायत. दिग्दर्शक म्हणून राऊतने ‘लोकमान्य: एक युगपुरुष’ आणि ‘तान्हाजी’मधे इतिहासाची केलेली तोडमोड असेल किंवा अभिनेता म्हणून ‘साहो’, ‘राधेशाम’मधे प्रभासला आलेलं अपयश असेल, एक प्रेक्षक म्हणून हे बरंच खटकणारं आहे.
‘लोकमान्य’ आणि ‘तान्हाजी’ला मिळालेल्या पुरस्कारांमुळे ओमचं आणि ‘बाहुबली’ सिनेमालिकेच्या यशानंतर प्रभासचं देशभरात नाव झालंय. त्यामुळे या दोघांचा सहभाग असलेल्या ‘आदिपुरुष’कडून भारतीय प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. पण ‘टी-सिरीज’च्या यूट्यूब चॅनलवर नुकत्याच रिलीज झालेल्या ‘आदिपुरुष’च्या टीजरने मात्र प्रेक्षकांचा पुरता अपेक्षाभंग केलाय.
जानेवारी २०२०मधे ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी’ रिलीज झाला. या सिनेमाने तिकीटबारीवर बराच गल्ला जमवला. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली ऐतिहासिक तथ्यांची सोयीस्कर मोडतोड या सिनेमात केली गेली होती. या सिनेमाला हिंदुत्ववादी विचारसरणीच्या प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाने हुरळून जाऊन ओमने ऑगस्ट २०२०मधे ‘आदिपुरुष’ या रामायणावर आधारित नव्या सिनेमाची घोषणा केली.
या सिनेमात तेलुगू अभिनेता प्रभास हा ‘राघव’ अर्थात रामाची भूमिका साकारतोय. ‘तान्हाजी’मधे उदयभानाच्या खलनायकी भूमिकेत झळकलेल्या सैफला ‘लंकेश’ म्हणजेच रावणाची भूमिका दिली गेलीय. सीतेच्या भूमिकेसाठी सुरवातीला अनुष्का शेट्टीच्या नावाची बरीच चर्चा होती, कारण तिची आणि प्रभासची जोडी सुपरहिट असल्याचं ‘बाहुबली’ने सिद्ध केलं होतं पण शेवटी क्रिती सेननच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
‘तान्हाजी’मधे सूर्याजी मालुसरेची भूमिका साकारणारा देवदत्त नागे हा मराठी अभिनेता हनुमानाच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘प्यार का पंचनामा २’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’सारख्या सिनेमांमधून झळकलेल्या सनी सिंगची लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. सिनेमाची कथा, पटकथा ओमने तर संवाद ‘तेरी मिट्टी’, ‘तेरे संग यारा’सारखी हिट गाणी देणाऱ्या सुप्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशीरच्या लेखणीतून आलेत.
५०० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमात २५० कोटी तर फक्त वीएफएक्ससाठीच खर्च करणार असल्याचा रिपोर्ट ‘फिल्मफेअर’ने दिला होता. भारतीय समाजमनाच्या अतिशय जवळचं असलेलं रामायणासारखं महाकाव्य महागडं वीएफएक्स घेऊन रुपेरी पडद्यावर झळकणार असल्यामुळे साहजिकच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. पण सिनेमाचा टीजर बघून मात्र फक्त आणि फक्त निराशाच पदरी पडलीय, असं म्हणावं लागेल.
‘वरायटी’ या मनोरंजन वृत्तसंस्थेशी बोलताना, ओमने आपल्यावर १९९३च्या ‘रामायणा: द लिजंड ऑफ प्रिन्स रामा’चा प्रभाव असल्याचं सांगितलं होतं. ‘रामायणा: द लिजंड ऑफ प्रिन्स रामा’ हा जपानी दिग्दर्शक युगो साकी यांचा अॅनिमेशन सिनेमा. या जपानी सिनेमाने त्यावेळी बच्चेकंपनीच्या मनावर गारुड टाकलं होतं. लोकप्रिय ‘रामायण’ मालिकेत राम साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी याच्या हिंदी वर्जनसाठी रामाला आपला आवाज दिला होता.
आजच्या घडीला पस्तिशीच्या उंबरठ्यावर असलेला या सिनेमाचा पहिला प्रेक्षकवर्ग आजही त्या आठवणींत रमताना दिसतो. साहजिकच ओमला या सिनेमात मांडलेलं रामायण आवडलं होतं. जर परदेशी दिग्दर्शक आपल्या मातीतल्या कथेला इतका उत्तम न्याय देऊ शकतो, तर भारतातल्या दिग्दर्शकांनी का मागे राहायचं? हा प्रश्न त्याला पडला होता आणि त्याचं उत्तरही त्याने स्वतःच ‘आदिपुरुष’च्या माध्यमातून शोधलं होतं.
‘आदिपुरुष’ बनवणाऱ्या ओमवर जुन्या अॅनिमेशन सिनेमाचा प्रभाव मान्य केला तरी, ‘आदिपुरुष’ हा काही अॅनिमेशनपट म्हणून घोषित झालाच नव्हता. पण कलाकारांचे फक्त चेहरे खरे आणि बाकी सगळं अॅनिमेटेड असा टीजर पाहिल्यावर मात्र या सिनेमाला अॅनिमेशनपट का म्हणू नये? असा रोकडा सवाल सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. काहींनी तर हा सिनेमा म्हणजे निव्वळ इकडून तिकडून उचललेल्या प्रसंगांची नक्कल असल्याचाही आरोप ‘आदिपुरुष’वर केलाय.
हेही वाचा: आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा
टीजरच्या सुरवातीला रामाच्या भूमिकेतला प्रभास पाण्यात तपश्चर्या करताना दिसतो. असा एक प्रसंग याधीही ‘सेरा नरसिंहा रेड्डी’मधे पाहायला मिळालेला आहे. रामाशी लढत असलेले राक्षस ‘हॅरी पॉटर’मधल्या डिमेंटॉरसारखे दिसतात. रामाची वानरसेना तर गोरिला सेना वाटावी इतकी भयानक आहे. वानरसेनेची कित्येक दृश्ये ‘प्लॅनेट ऑफ एप्स’ची आठवण करून देतात. यातल्या एका प्रसंगासाठी तर थेट ‘टेम्पल रन’ या मोबाईल गेममधला सेटच चोरला गेलाय.
आपल्या अप्रतिम वीएफएक्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘मार्वल स्टुडियो’च्या अॅवेंजर मालिकेतल्या ‘थॉर: रॅग्नॉर्क’, ‘अॅवेंजर एंडगेम’सारख्या काही सिनेमांचा अगदी तंतोतंत प्रभाव या टीजरवर जाणवतो. कैलासात गेलेला रावण हा ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधल्या जॉन स्नोसारखा दिसतो, तर वटवाघळावर बसून उडणाऱ्या रावणाला पाहताना ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ आणि ‘हाऊ टू टीच युवर ड्रॅगन’ची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
काही प्रसंग ‘रामायणा: द लिजंड ऑफ प्रिन्स रामा’ आणि ‘रामायणा: द एपिक’मधल्या प्रसंगांशी बरेचसे मिळतेजुळते आहेत. वीएफएक्सचं श्रेय प्रसाद सुतार यांना दिलं होतं. ते अजय देवगणच्या निर्मितीसंस्थेशी संबंधित असलेल्या ‘एनवायवीएफएक्सवाला’मधे वीएफएक्स सुपरवायजर म्हणून काम पाहतात. समाजमाध्यमांवर टीजर प्रचंड ट्रोल झाल्यानंतर ‘एनवायवीएफएक्सवाला’ने ट्विट करत आपण या टीजरवर काम केलं नसल्याचा खुलासा केला.
फक्त वीएफएक्सच नाही, तर ओमने ‘तान्हाजी’मधली एक संकल्पनाही या सिनेमात पुन्हा एकदा वापरलीय. ते म्हणजे खलनायकाचं इस्लामीकरण! या संकल्पनेमुळे ‘तान्हाजी’ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. कारण सैफने साकारलेला उदयभान हा राजपूत सरदार ओमने मात्र इस्लामी सरदारासारखा दाखवला होता. सैफचं ते रुपही रणवीर सिंगने ‘पद्मावत’मधे साकारलेल्या अल्लाउद्दीन खिल्जीशी मिळतंजुळतं होतं.
मगर खाणाऱ्या, डोळ्यात काजळ भरून, अल्लाहू अल्लाहू म्हणत नाचणाऱ्या उदयभानाला मुसलमान सरदार दाखवून ओमने मूळच्या हिंदू विरुद्ध हिंदू लढाईला जाणीवपूर्वक हिंदू विरुद्ध मुस्लीम असं रंगवलं. बॉक्स ऑफिसवर या चित्रामुळे बक्कळ कमाई तर झाली आणि दुर्दैवाने खोटा आणि सोयीस्कर इतिहास पसरवण्याचा एक प्रयत्नही यशस्वी झाला. 'आदिपुरुष'मधेही पुन्हा तेच घडताना दिसतंय.
यात सैफने साकारलेला रावण हा मुघल प्रशासकांसारखा वावरताना दिसतो. त्याची वीतभर वाढलेली दाढी, जाड काजळ घातलेले डोळे आणि पार्श्वभूमीवर कधी फिकट तर कधी गडद असा निळा रंग कथा-कादंबऱ्यांमधे रंगवलेल्या आक्रमक सुलतानांची आठवण करून देतो. ‘आदिपुरुष’च्या निमित्ताने, हिंदूंच्या आराध्य दैवतांपैकी एक असलेला राम आता ‘मुघली’ रावणाशी दोन हात करत हिंदू-मुस्लीम संघर्षाच्या आगीत तेल ओतताना दिसणार आहे.
हेही वाचा: सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?
‘तान्हाजी’च्या वेळी ओमला डोक्यावर घेणारे हिंदुत्ववादी प्रेक्षकही टीजरवर फारसे खुश नाहीत. अर्थात, त्यांचा थेट आक्षेप रावणाच्या इस्लामीकरणावर नाहीय, कारण ते चित्र त्यांच्या सोयीचंच आहे. त्यांना खटकलाय तो दाढीमिशी ठेवणारा लक्ष्मण, मिशीधारक रामराया आणि त्याचा बिनमिशीचा सेवक मारुतीराया! त्यामुळे रुसलेल्या हिंदुत्ववाद्यांनी पुन्हा एकदा ‘बॉयकॉट बॉलीवूड’च्या वस्तऱ्याला धार लावायचा प्रयत्न सुरू केलाय.
पुराणकथांनुसार, रावण हा वडिलांकडून ब्राम्हण होता. भस्म लावणाऱ्या, शिवभक्त असलेल्या, शिवतांडव स्तोत्र रचणाऱ्या रावणाला वेदांचंही सखोल ज्ञान होतं. त्याने वेदांना चाली लावल्या होत्या म्हणे. त्यामुळे जयपूरच्या सर्व ब्राम्हण महासभासारख्या ब्राम्हण संघटनांनी रावणाच्या इस्लामीकरणावरही आक्षेप घेतल्याचं समोर आलंय. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही हा टीजर म्हणजे पौराणिक पात्रांचा अपमान असल्याचं सांगत ‘आदिपुरुष’च्या टीमवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिलेत.
‘केजीएफ’मधे मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसलेल्या आणि कर्नाटक भाजपच्या प्रवक्त्या अभिनेत्री मालविका अविनाश यांनी एएनआयशी बोलताना रावणाच्या लूकवरून ओमला खडे बोल सुनावलेत. ओमने रामायणाचं कुठलंच वर्जन वाचण्याची साधी तसदीही तसदी घेतलेली नाही. त्याऐवजी त्याने ‘भूकैलासा’, ‘संपूर्ण रामायणम’सारखे गाजलेले कन्नड, तेलुगू सिनेमे जरी पाहिले असते, तरी रावण कसा दिसतो हे त्याला समजलं असतं, असं त्या म्हणतात.
इतिहास ज्या प्रकारे सोयीस्करपणे मांडला जातो, तशी पुराणाची मोडतोड केली जात नाही. महाभारत, रामायणासारखी पौराणिक महाकाव्यं ही फक्त एखाद्या समुदायाचीच कथा मांडत नाहीत. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना यात स्थान दिलं गेलंय. नुसत्या रामायणच्याच वाल्मिकी रामायणाशिवाय आणखी प्रादेशिक, भाषिक आवृत्त्या आहेत. सिनेमा बनवताना ओमने यातलं नक्की कुठलं वाचलं असेल, हाही प्रश्न टीजरमधून समोर येतो.
‘लोकमान्य’ आणि ‘तान्हाजी’मधे ओमने बऱ्याच ऐतिहासिक तथ्यांची आपल्या सोयीने मांडणी केली होती. त्या सिनेमातला इतिहास काल्पनिक असल्याचंही कुणाच्याही लक्षात येणार नाही अशाप्रकारे सांगितलं होतं. त्याचा फायदा सिनेमाला नक्कीच झाला. पण निव्वळ एखादा राजकीय-धार्मिक अजेंडा रेटण्यासाठी पुराणांचीही इतिहासासारखी सोयीस्कर मांडणी करण्याचा ओमचा प्रयत्न यावेळी पुरेपूर फसल्याचं या टीजरवरून दिसून येतं.
रामायण म्हणलं की ‘रामायणा: द लिजंड ऑफ प्रिन्स रामा’ आणि ‘रामायणा: द एपिक’सारखे अॅनिमेशनपट आणि रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका भारतीय प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभी राहते. रामायण ही पौराणिक कमी आणि सत्य कथा जास्त असं मानणारा मोठा समाज भारतात आहे. अशात पौराणिक कथांमधल्या सवयीच्या वातावरणाच्या एकदम विरुद्ध असलेलं ओमने उभं केलेलं हे वेगळं जादुई, आधुनिक विश्व प्रेक्षकांच्या कितपत पचनी पडेल यात शंकाच आहे.
हेही वाचा:
ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?
ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?
इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप
जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा