कथाः पिकलेल्या आंब्याची उगवलेली झाडं

०९ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : १८ मिनिटं


गाव. आंबा उगवतीचा काळ. पोरं घडतात तसा आंबाही घडतो. तो पिकवाणात दडवून ‘घडवावा’ लागतो. या पिकवाणाच्या खेळात पोरं मन लावून, खेळकर स्पर्धा करत सहभागी होतात. आणि त्यातून तीही घडत जातात. उगवत्या मुलांच्या मनाची आंब्याच्या अवतीभोवती फिरणारी बहारदार गोष्ट!

ज्ञानूच्या शेतात बांध घालणी चालू आहे. आमची आई नि ज्ञानूची आई दोघी मिळून बांध घालतात. दिवसच्या दिवस. त्यांचं झालं की आमच्या शेतात. त्या दोघींचं असं चालू असतं प्रत्येक वर्षी. दोघींच्या शेतात बांध घालून झाले की, त्या रोजगारानं इतरांच्या शेतात बांध घालाय जातात. रोजगारानं लवकर जायाला मिळंल म्हणून त्या दोघी दिस उगवायच्या अगोदर शेतात येतात. त्यांचं हे बांध घालणं दिस बुडाला तरी चालूच असतं. एकमेकीला त्या म्हणतात,

बाईसाब आठ रोजाचं हे काम चार रोजात आटपायचं म्हंजी तेवढाच चार रोज रोजगाराला जायाला गावंल.

ही त्यावेळची गोष्ट आहे. रेशनवर धान्य फारसं मिळत नव्हतं. गरिबी हटाव’ची घोषणा आली नव्हती. दादा शिमग्याला दोन दिवस गुऱ्हाळ बंद होतं म्हणून आलेले. त्यावेळी आईनं त्यांना उत्र्याला लोहाराकडं कुजळी पाजवाय पाठवलेलं. ज्ञानूच्या आईची कुदळ मला त्याच्या घरातनं आणाय लावलेली. आमच्या कुदळीसंग त्यांचीही कुदळ पाजवून आणलेली. नंतर हाच लोहाराचा मुलगा बनावट बंदुकी बनवून विकत होता आणि जेलमध्ये जाऊनही आला होता. कधी कधी शालूची आईपण असते या दोघींच्याबरोबर. मग शालूपण येते आईसंगं. मग माझा, ज्ञानूचा नि तिचा दिवसभर शेतातच खेळ रंगतो. दिवस बुडाला तरी कळत नाही.

ज्ञानूची आई ज्ञानूला, ‘पाणी संपलय मोग्यातलं आण जा म्हणते. तेव्हा तिचा राग येतो. मग तो, ‘ल्याला नि शालूलाही माझ्यासंगं पाठव म्हणतो. ज्ञानूची आई, ‘सगळ्यांची वरात लागती तुला म्हणते. मग आमची आई, ‘जावा सगळीच, खरं वाटंलाच खेळत बसचिला नि मोग्याची वाट लावचीला म्हणते.

शालूच्या काखंत मोगा देऊन आम्ही पाणी आणायला जातो. ज्ञानूची आई, ‘पोरीकडं मोगा देऊन निगालंत बगा लडदू. लगीच याचं नाहीतर आस्मानी याला लावचीला म्हणते.

शालूची आई, ‘देवू द्यात पोरीला सवय व्हायला पायजे. बाईसाब पाणीकांजी म्हणा नाईतर कुठल्याबी कामाची म्हणते.

मग आम्ही शालूला वाटंनं तेच म्हणतो तिला. तर ती आम्हांला लडदू म्हणते आणि सरदाऱ्याला सांगणार म्हणते. त्याला सांगितलं की ते गावभर लडदू बल्या, लडदू ज्ञान्या’, असं सादवत राहणार म्हंजे राहणार. आणि आम्ही दिसल्यावर लरपडदू म्हणून हमखास बोलणार.

मग मी ज्ञानूला म्हणतो, ‘तुझ्या आईला काय कळत नाही. त्याला राग येतो. तो शालूच्या काखेतला मोगा मागतो. शालू देत नाही. मी, ‘आमचा मोगा आहे. शालू देऊ नगोस म्हणतो. ज्ञानू, ‘आमच्या शेतात पाणी नेणार हाय नि तू याचं नाईस म्हणतो. तो मोगा हिसकावतो. मोगा शालूच्या काखंतला मी. शालूला पळ म्हणतो. त्याला धरतो. आणि शालू पळताना आमची आई म्हणालेली तेच घडतं. वाटंला मोग्याची वाट लागते. तिघंही फुटक्या मोग्याची खापरं, खापरागत तोंड करून बघत राहतो.

शालू मोठ्यानं रडाय लागते. आणि तशीच घराकडं जाते. तिला तिच्या आईची खूप भीती वाटते. आमची आई मला फोडणार, हे आता फुटक्या मोग्याइतकं माझ्या डोळ्यांत चित्रं मोगा फुटला तेव्हाच दिसाय लागलं आहे. ते चांगलंच रंगत निगालेलं आहेच. शेताकडं पानी न्याह्याचं कशातनं?

ज्ञानूच्या घरात आलो. पाणी त्यांच्यातल्या भांड्यातनं घेऊन गेलो. आमच्या आईनं, ‘इतका वाढूळ नि शालू कुठाए नि मोगा रं म्हणून विचारलं तर मी रडायलाच लागलो. तशी आई रागानंच माझ्याकडं आली. मी रडत होतो नि ती मला काय काय विचारत होती. ज्ञानू वांझ आंब्यावर ढेकळ मारत होता. त्याची आई त्याला शिव्या देत होती. शालूची आई शालू नव्हती तरी शालूला. मग तिघीही पाणी पिऊन बसल्या. आई, ‘कसला ग्वाड मोगा हुता. लयगार पाणी व्हायचं म्हणत राहिली दिवसभर.

ज्ञानू शेजारच्या शेतात आंब्याला दगडं मारतोय. त्याची आई त्याला ओरडते. तरी तो, ‘बल्या आरं ह्यो आंबा पाडाला आलाय बग म्हणत नेम धरतो. त्याचा नेम चांगला आहे. पण कधी कधी माझा त्याच्यापेक्षा चांगला आहे आहे. पण नेम आसला नसला तरी दगडं मारतोच कुठलंही झाड आसलं तरी. आणि आंब्याच्या झाडावर इतकं आंबं,

त्यातला एकतरी आंबा सापडतोच दगडाच्या तडाख्यात हमखास. मग कळत नाही नेम धरलेला न पडता हा दुसरा कसा काय नेमानं पडला. कधी कधी ज्ञानू नि मी एकदम संगं म्हंजे संगं दगड मारतो. एकच आंबा पडला तर माझं नि त्याचं त्याचं एकदम त्या एका आंब्यासाठी माझ्या दगडानं पडलाय म्हणून भांडण लागतं. मग मी ज्ञानूला म्हणतो, ‘पिपरंपाड्या तुला कुठला आंबा पडतोय?’, तर तो, ‘तू पाडलेली ही काय ढोपरं?’, म्हणतो.

आमचं दोघांचं ‘पिंपरपांड्या’, ‘ढोपरपाड्या’ असं एकमेकाला राग येईपर्यंत चिडवणं चालू झालं. दिवसभर अशीच हाक मारत होतो एकमेकाला.

आमच्या सगळ्यात सरदाऱ्याचा नेम दांडगा आहे. त्याचा हात कोण धरणार नाही गावात आमच्या. टाप नाही म्हणतो तो कुणाची. मग दहावीतल्या सदालाही तो आसंच म्हणतो, ‘शेंड्याचा आंबा एका दगडात तू तरी पाड नाही तर मी तरी पाडतो.’ आणि राजाचा नेम बुळगा हाय म्हणतो. त्याचं चालणं, बोलणंबी बुळगं हाय म्हणतो.

तेव्हा त्यांची भांडणं लागतात. मग सरदाऱ्या, ‘तुझा नेम, चालणं, बोलणंच नाही तर तूच बुळगं हायस म्हणतो. राजा रडाय लागला तरी, ‘रारपजा बुरपळगंसं त्याचं जोरात चालतं. राजा रडत जाऊन आईला घेऊन आला तरी सरदाऱ्या म्हणतो, ‘मी तुमच्या राजाला कुठं म्हंतोय. पिरतीमीत काय तुमचाच राजा हाय?’ मग राजाची आई राजाला शिव्या देत जाते. राजा तिच्यामागनं रडत. सरदाऱ्या हसत त्यांच्याकडं बघत, ‘बूरपळगरं.. बूरपळगं..’ म्हणत राहतो.

आई म्हणते, ‘सरदाऱ्याला तेवढी देख काखवू नगो आपल्या आंब्याची.

आता आईला कोण सांगणार. तेच मला सांगत आलं होतं, ‘बल्या तुमचा आंबा यावर्सी लय म्हंजी लय लदाडलाय. ते कवा तरी येणार म्हंजे येणार आईचाच काय माझा डोळा चुकवून आमच्या आंब्यावर. आणि आम्ही काय कुणाला सांगून जातोय, तुमच्या आंब्याचं आंबं काढायला, पाडायला जातोय म्हणून.

आईला हे कसं सांगायचं ते मला कळत नाही. शिवारात कुणाचा आंबा कोणत्या चवीचा ते आम्हा सगळ्या पोरांना ठाव आहे. आता बुळग्या राजांचा आंबा कुठं सगळ्या गावाचा शिवार संपल्याव पार खाली जंगल खात्याची हद्द लागते तिथं डागाडाला, तरी तो एकदम खोबऱ्यागत चवीला लागतोय. हे सगळ्या पोरांना देख दाखवाय नि सपान पडाय लागाय कशाला लागतं?

कालच भाकरी खाताना आमच्या आंब्याखाली मी नि ज्ञानून फोडून दिला होता आईला नि ज्ञानूच्या आईला. तवाच त्या म्हणालेल्या, ‘जरा सुदीक आंबाट नाई. कुनाच्या आंब्याचा रं पोरानु.

तर आम्ही राजाच्या आंब्याचं घोळणाभर आंबं आणलेलं होतं. आई आंब्याकडं बघतच म्हणाली, ‘कवातरी धोंड्यानं तुमास्नी ठेचतील. मग बसचीला वरडत. कुणाच्याबी झाडावर दगडं मारायचं कळंल मग. भाड्यानू राजाचा बा केवढा खवाट हाय ठावं नसंल. न्हील धरून नि चाबकानं फोडील. त्येला मानसाची वसप सोसत न्हाई नि आंब न्हेल्यालं सोसंल?’

आईनं आंबा आणखी मागितल्यावर ज्ञानू लगेच मला म्हणाला, ‘तुज्यातला दे कीमग मी आईला आंबा दिला. आम्ही मोजून, वाटून आंबं घेतलं होतं.

मी दिलेला आंबा आईनं फोडून अर्धा ज्ञानूच्या आईला दिला.

मग मी ज्ञानूला म्हणालो, ‘मला तुझ्या आंब्यातला आर्धा आंबा द्याला पायजेस.

पण त्यानं टावेलात आंबं बांधून ठेवलेलं. तो गठळं सोडाय तयार नव्हता आणि मला माझ्याकडं त्याच्यापेक्षा एक आंबा कमी हे लागलेलं जात नव्हतं.

आई नि ज्ञानूची आई बांध घालाय लगेच जेवल्या त्या उठलेल्या आमचं एका आंब्यासाठी लागलेलं ते आणखी वाढलेलं.

मी राजाच्या खवाट बा ला नाही सांगितलं, तर कमीत कमी त्याच्या आईला तरी तुझं नाव सांगणार’, असं ज्ञानूला म्हणालो.

तर तो, ‘तुझ्या आदीच मी राजाच्या खवाट बा लाच तुझं नाव सांगणार म्हणत आंब्याचं गठळं घेऊन पळाय लागला. मी माझं गठळं घेऊन त्याच्या मागनं या बांधावरनं त्या कुणग्यात. त्या कुणग्यातलं या बांधावर असं आमचं चालू झालं. उड्या नि ढेकळं फेकत. मी ढेकूळ मारला की तो पळायचा. त्यानं मारला की मी. ढेकूळ चुकला की, ‘त्यो काय आंबा हाय व्हय नेम लागायम्हणायचो. हा खेळच आमचा जोरात हासत खिदळत चालू झालेला.

मला त्याचा ढेकूळ लागल्यावर जोरात कळ आली नि जोरात त्याच्या मागं लागलो. बांधाकडं लक्षच नाही. ज्ञानू एका बांधावरून घसरला नि सगळा बांध रचलेला घसरला. मी मोठ्यानं ओरडलो, ‘आय्ये ज्ञानूनं सगळं बांध पाडलंम्हणून. तशी बांध रचलेली ज्ञानूची नि आमची आई थांबल्या. ज्ञानूची आई तिथनंच, ‘ह्ये तुला फोड उठला तुला, आमच्या कंबरा मोडल्या की रं. बांध रचून. तू टाक सगळं पाडून. तू काय ढ्वार हायस का बांधावरनं पळतोयस ते? माप वाटा हायता की. ये वाईच उकर ये, जिरंल खाल्ल्यालं आंबं नि भाकरी

ज्ञानू माझ्याकडं बघत थांबला होता. मी हसत उभा आहे तरी. मी म्हणालो, ‘जा जा उकर जा नि ढेकळं काढ जा.. नि जिरीव जा. ढेकळं मारतयस नि बांध पाडतस. काय आता का थांबलायस?

ज्ञानूची आई त्याला जोरात रागवत होती, ती अजून थांबली नव्हती.

ज्ञानूला राग आलेला. तो म्हणू लागला, ‘ह्यो माज्या मागं लागलाय. मला ढेकळं मारतोय. ते तुला दिसत नाई. मग मी काय करू. हासतोय बग आता कसा. बल्या तुला मी मारणार बग’

आमच्या आईला रानंच मोकळं गावलं. तिनं हातातली कुदळ तिथंच टाकली नि म्हणतच आली, ‘थांबा बाईसाब आमच्या पोराच्या अंगा खोड हाय, त्येचीच खोड मोडतो पयली’

हातात ढेकूळ घेऊन आली. माझ्या मागंच लागली, ‘इथं आमचं रगात आटतंय नि तुमास्नी खेळायचं मैदान आसल्यागत उड्या माराय सुचतय व्हय?’ म्हणत तिचं मला ढेकळ मारणं चालू आहे. पण मी लांब पळाल्यामुळं तिचा फेकलेला ढेकळ मला एकही लागलेला नाही. तिला राग आलेला. ती म्हणाय लागली,

‘ये तुला तुकडाच वाढतो का बग’

ज्ञानू हसत, ‘आता कसं वाटतंय?’ म्हणत उभा होता तिथंच आहे.

तरी आई मलाच, ‘खोडील भाड्या ये सांजला घरात तुला दावतो बांध पाडायचं नि उड्या मारायचं?’ म्हणत उभी आहेच.

‘आता का पळतंयस?’ ज्ञानूचं चालूच होतं.

‘मी बांध पाडलाच नाई. ज्ञानूनच पाडलाय, तरी तू मलाच बोलतीस’ असं मी तिला सांगतोय; पण तिचा राग थांबलेला नाहीच.

ज्ञानू हसलेला बघून ज्ञानूची आई म्हणाली, ‘बाईसाब हाणा आमच्याला आदी त्येच्या अंगात काय कमी नारा नाई. हसतंय बगा कसं?’

हे ऐकून ज्ञानू पळत माझ्याजवळ आला आहे. तरी त्याला त्याची आई नि मला माझी आई बडबडत होत्याच. पाडलेला बांध हातातला बांध घालणं सोडून परत रचत होत्या. त्याचं मला कसंतरीच वाटत होतं. मग मी नि ज्ञानू गेलो. त्यांना मदत करू लागलो. त्यांचा राग कुठं गेला होता. ते कळलंच नाही.

मग त्यांच्या हातातल्या कुदळी घेऊन आडास उकरू लागलो. वावभर उकरलं तर दमलो. वरच्यावर ठेपलून भागलं? खॉल उकर म्हणाली आई. मी हाताचं फोड दाखवू लागलो. आई म्हणाली, ‘आसं फोड उठून बसलं आमच्या हाताचं. त्याचं घट्टं पडलं बाळा. आणिक उकर फोड जातोय बग कुठल्याकुठं. बांध ढासळतासा तवा काय वाटत आसंल बाळा’ आणि तिनं माझ्या हातातली कुदळ घेतली. तिचं हात खरबरीत काटं लागल्यागत लागतात ते या कामांनी तिच्या हाताला घट्टं पडल्यामुळंच!

आता आम्ही करवंद आणायला गेलो आहे. बोरंपण आणली. आई नि ज्ञानूची आई तेवढीच बोरं, करवंद खाण्यापुरत्या थोडावेळ कुदळ थांबवून बसल्या आहेत. परत त्यांची कुदळ चालू झाली. दिवस बुडला तरी. मी नि ज्ञानू त्यांच्या मागनं फिरून दमलो तरी त्या दिसायचं बंद झाल्यावरच उठल्या.

‘आंबं पाडाला आल्यात. माणसं नदार ठेवत्यात. कुणाच्यातरी झाडाला हात लावचीला. दगडं मारचीला. भांडणाला कार करचीला.’ आई सांगतेच हे सारखं सारखं. बसता. उठता.

माणसांपेक्षा आम्हा पोरांची नदार सगळ्या शिवारभर फिरते हे आईला मी सांगायचं म्हणतोय; पण आई रागावणार म्हंजे रागावणार आणि आक्का सगळ्या पोरातनी आंब्यासाठी शिवार फिरायचा नाही, असं सांगणार म्हंजी सांगणार आणि तिचं नेहमीच, भंगिस्टासारखं कशाला फिरायचं, हे एक ऐकावं लागणार.

हे आईनं कितीवेळा सांगितलंय, ते मोजण्यापेक्षा आमचं आंबं मोजून पिकवाण घालायचं चालू आहेच. बांधात, पिंजराच्या व्हळीत, गवताच्या गंजीत, आणखी कुठंकुठं. पण हे इतरांना माहीत होऊन चालत नाही. नाहीतर पिकवाण कधीही चालत दुसऱ्या जागेवर गेलंच म्हणून समजा.

ज्ञानूचं पिकवाण त्याच्या शेताच्या बांधात त्यानं घातलेलं मला माहीत होतं. राजाच्या आंब्याचंच आंबं आहेत. त्याला मी पिकवाण घालतानाच पकडला होता, तर तो आपल्या आंब्याचं आंबं आहेत आणि ते आंबाट पकडला होता, तर तो आपल्या आंब्याचं आंबं आहेत आणि ते आंबाट आहेत, असं सांगत होता. त्याच्या आंब्याचं आंबं आंबाट आहेत, हे त्याचं एकदम खरं आहे. पण हे पिकवाण घातलेलं आंबं त्याच्या आंब्याचं आहेत, हे मात्र एकदम खोटं आहे. ते राजाच्या आंब्याचं आहेत, हे आमच्यातल्या कोणालाही एक आंबा बगीतल्यावर सांगता येईल.

राजाच्या आंब्याची चव आमच्या सगळ्या पोरांच्या जिभेवर आहेच. त्यामुळंच त्यांनी कितीही राखण केली तरी प्रत्येकजण एकमेकांवर नदार राखून थोडं तरी आंबं त्या आंब्याचं आणतोच.

सरदाऱ्या एकदा शेंड्यावरच होतं अंधार पडेपर्यंत. राजाचा खवाट बाप आलेला. सरदाऱ्या आंब्यावर चढल्याव मग काय तिथंच बसलं ते. तरी त्यानं मोठी पिशवी भरून आंबं आणलंच तेव्हा. राजा बाप आंब्याखालनं गेल्याव बसून बसून.

ज्ञानूचं आंबं राजाच्या आंब्याच आहेत, हे मी शालूला सांगितलं. शालूच्या घराजवळ राजाचं घर ती राजाला सांगणार का नाही, माहीत नाही. पण ती मला म्हणाली, ‘आपणच ज्ञानूला न समजता आंबं पिकल्यात का ते बगायचं. नाहीतर तुला ठावं हायतंच. तिथनं काढून दुसऱ्या बांधात घालायचं त्येला. खाल्यावरच ठावं होऊ द्याचं.’

शालूचं मला हे पटलं आहे. मग ज्ञानू बसंल बांध उकरीत. नि त्याची आई त्याला बांध उकरलंस म्हणून बसंल शिव्या देत.

पण ज्ञानू मला पिकवाण घातल्यापासून एकट्याला असा सोडतच नाही. त्याच्यासंगं भांडलो तरी. शेताकडं तर मी गेलो रं गेलो की धुम पळतच येतो. मला गाठतो.

शालूला सांगितलं तर ती एकटी जाणार नाही म्हणते बांध उकराय. आणि ज्ञानूच्या आईला समजलं तर बांधासाठी ती शालूच्या आईला न विचारता शालूच्या झिंज्या धरून शालूच्या आई म्होरं उभा करील तेव्हा शालूची आईच शालूला थोबडील, हे मला ती म्हणते ते एकदम दिसायलाच लागलं डोळ्यात. आणि ज्ञानू आंबं पिकवल्यावर खात बसणार म्हंजे बसणारचलय गुळमाट, लय गुळमाटम्हणत राहणारच, मागितल्यावर आंबा नाहीच एक फोडही देणार नाही, हे चित्र ज्ञानूनं आंबं पिकत घातल्यापासून दिसतंय ते दिसतंयच.

शालूला म्हणालो, ‘राजाच्या बाला सांगायला पायजेच.’

तर शालू सांगाय लागली, ‘राजाचा बा चांगला नाई. तो आपल्यास्नी घेनच ज्ञानूचं पिकवाण उकरून काढील. ज्ञानूच्या कानाचा गड्डा पिकवील ते वेगळंच. मग आपल्या आंब्याचा आंबा घेऊन पिकवाणातला आंबा पारकून निरकून बगील. आणि आपल्या सगळ्यांसकट ज्ञानूच्या दारात उभा राही. ज्ञानूच्या आईला शिव्या देत. त्याला गडीबाई बोलताना कळत नाई असं आई म्हणती. मग ज्ञानू तुझं नाव सांगणार त्येच्या आईला. मग तुझी आई तुझ्या मागं लागणार.’

आणि शालूचं मत, ‘ज्ञानूचं नि तुमचं सगळं बांध पाडून दाखवा म्हणील तो राजाचा बा. मग हे केवढ्याला पडायचं. सगळं गाव पिकवील राजाचा बा.’

मला बांध घालत असणाऱ्या ज्ञानूच्या नि आमच्या आईचं चेहरं आता दिसू लागलं आहेत. तरी ज्ञानूचं पिकवाण नि तो एकही आंबा देणार नाही हे दिसायचं बंद होत नाहीच. मग ज्ञानूचं पिकवाण हलवायचं ठरलंच. ते मात्र थांलं नाहीच. शालूनं ज्ञानूला सांगायचं नाहीच. मात्र इतर कोणालाही हे कळू द्यायचं नाही. सरदाऱ्याला तर जरा देखील. नाहीतर ते ज्ञानूचं आंबंच नाहीतर माझंही लंपास करून राजाच्या बाच्या नसलं तर आईच्या कानावर हे पिकवाण पिकवून त्याच आंब्याच्या कुया दाखवीत राहील.

गेल्या वर्षी आमच्या परड्यातल्या गावताच्या गंजीतलं पिकवाण सरदाऱ्यानं आसंच लंपास केलं नि चार दिवस आमच्या गल्लीत दिसलंच नाही. आक्का ते दिसायचीच वाट बघत होती. मी त्याला दोन चार वेळा बोलवाय गेलो नि म्हणालो तर त्याची आई मलाच बोलली.

मग आमच्या आईचं नेहमीगततू कशाला देख दावलीस? माप हायत सरदाऱ्याच कशाला पायजे आंबं न्याला?’ आईला सरदाऱ्याला देख दाखवाय कोण लागत नाही, हे कसं सांगायचं हे मला समजत नाही. तरी आक्कानं नंतर विचारलंच त्याला तर तो गुरगुरत पळाला. हे त्यानं आंबं न्हेल्यालं स्वतःच्या डोळ्यानं बघणारी भागूबाई आक्काला सांगत आलेली मी स्वतःच्या कानानं ऐकलेलं. आणि रडाय लागल्यावर आक्का मला, ‘बायकागतीनं लगीच का रडतोसम्हणल्यावर एकदम म्हंजे एकदम डोळं पुसलेलं मला आता दिसाय लागलं आहे.

सरदाऱ्या एवढा ज्ञानू बिलंदर नाही. त्याची आईपण आमच्या आईला विसरत नाही. आमची आई पण तिला.

ज्ञानू पिकवाण घातल्यापासून दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत मला सोडत नाही. जेवणाचं ताट वाढून आमच्यात येतो. नाहीतर मला तरी ताट घेऊन आपल्या घरात जातो.

आता शालूच्या घरात खेळता खेळता मी दडून बसायचं नि त्यानं हुडकायचं. शालूनं त्याला लगेच गावायचं नि बल्ल्याला हुडीक म्हणत तिथंच थांबवायचं नि मी पळत जान ज्ञानूनं घातलेलं पिकवाण आमच्या बांधात घालून पळत परत यायचं असं शालूचं नि माझं ठरलं.

हे एकदम म्हंजे एकदम हुडका-माडकीचं लयभारी म्हणाली शालू. आम्ही घरात हाच खेळ खेळतो. शालूच्याच घरात हुडका-माडकी खेळण्यात लय मज्जा येते. आहेच तेवढं तिचं घर मोठ्ठं. एकदा तर शालू सापडेना म्हणून मी रडकुंडीला आलो तर ती टोपल्यात जाऊन बसलेली. त्यांच्या घरात मोठी टोपली आहेत. ती त्यात कशी चली तर ज्ञानूच्या पाठीवर चढून. राजा आत उतरलेलं त्याच्या खांद्यावरनं आत उतरली. मग राजा बाहेर. ती एवढ्या मोठ्या टोपल्यात शक्यच नाही म्हणून मी टोपल्यात हुडीकलीच नाही. शेवटी तीच हसत, ‘मला टोपल्यातनं बाहेर काढाम्हणल्यावर परत माझ्यावर डाव आला.

आता माझ्याशिवाय कोणालाच पिकवाण कुठं आहे, हे माहीत नाही. आणि कधीच ठावं होणार नाही. मी म्हणालो शालूला, ‘किरपतीबी हुरपडकलं तरपरीबी नारपही गारपवणार.’

मला घेऊन ज्ञानू रोज एक दोन फेऱ्या मारतोच पिकवाणाच्या बांधाकडं. माती हालली काय ते बघून येतो. सरदाऱ्या कुठनं तरी टुम काढील, ही त्याला चिंता आहे. त्यापेक्षा ते राजाच्या बाला सांगील, ही जास्त भीती आहे. त्याला आंबं एकदा कधी पिकतील नि खाऊन कधी संपतील, असं झालं आहे.

आमचा हुडका-माडकीचा डाव झाल्यावर तो जेवण घेऊन आमच्या घरात आला आहे. मला तो येऊने असं वाटाय लागलं होतं एकदम त्याचं पिकवाण आमच्या बांधात घातल्यापासून. तरी तो आलाच. आता जेवल्याजेवल्या ओला हात शर्टाला पुसीत मला म्हणाला, खांद्यावर हात टाकून चल राजाआमच्या मागनं यायला लागला तर त्याला म्हणाला, ‘तुझी आई लगीच गावभर हुडीकती नि आमास्नी शिव्या देती तू येऊ नगोस, आमी लय लांब जाणार हाय.’

पिकवाण घालायच्या आदी राजा आमच्यासंगं दिवसभर असायचा. ज्ञानूनं त्येच्या आंब्याचं आंबं काढून आणल्यापासून ज्ञानू त्याला गावात, घरात खेळतानाच फक्त घेत होता. शेताकडं जाताना तर एकदम म्हंजे एकदम टाळत होता.

राजाला तो तसा म्हणाला नि मी पण त्याला येणार नाहीम्हणालो. त्याला राग आला. ‘बरपल्या बरपघतो हारपडंग्या रारपज्यासंगं खेरपळतोस.’ मग मी बोलायच्या अगोदर राजाच त्याला आमच्या आईला सांगणार तुझं नाव म्हणाय लागला. तो पळत गेलेला मला नि राजाला दिसायचा बंद झाला.

मला आपण ज्ञानूच्या उकरलेल्या बांधाची माती नि आंब्याचं आमच्या बांधात घातलेलं त्याचं पिकवाण जास्तच दिसाय लागलं. ज्ञानू पळतच घामानं भिजून आलेला. राजा असल्यामुळं तो काहीच बोलला नाही. राजाला मी सोडलाच नाही. ज्ञानू सारख्या शेताकडं फेऱ्या मारत होता. पळत होता, आम्हाला दिसत होता.

राजा गेल्यावर तो पळत आमच्या घरात आला. मी दडून बसलेलो. आक्काला सांगून तर त्यानं विचारल्यावर आई म्हणाली, ‘आसंल कुठंतरी दिवसभर हुडका माडकी शिवाय काय चालतंय तुमचं बघ जा कोनात.’

मग तो थेट कोनातच आला मी त्याला दिसत नव्हतो. तो मला दिसत होता. थोडावेळ तो थांबला आणि आम्ही बाहेर आलो. आईला मी बोलू लागलो. ती मला काय ठावं तवाम्हणाली. मला तो पिकवाणांचं विचारू लागला. ‘तुलाच ठावं होती जागा. कुणाचा बा आला आसता तरी पिकवाण गावलं नसतंम्हणू लागला. मी, ‘मला काय ठावंम्हणू लागलो. तर माझं पिकवाण आणखी एक हाय त्यातलं तुला आंबं देतोम्हणू लागला. ‘माझी बी माप पिकवाण हायत’, मी म्हणू लागलो.

ज्ञानूला दम निगंना. त्यानं शालूला सांगितलं.

शालूनं माझं नाव सोडून अनेकांची नावं घेतली. पण त्यांना विचारायचं कसं? राजांचा आंबा आपण आणलेला सगळ्यांना माहिती होणार. त्यानं माझीच पाठ घेतली. मी त्याला म्हणालो, ‘मी तुझ्या संगंच हायतर त्यानं मला माझं पिकवाण दाखवून म्हणाला, ‘बल्या मी ह्या पिकवाणातलं निम्मं आंबं नेल्यात. आता सांग माझं पिकवाण कुठाए?’ त्यानं माझं स्वतःच एक पिकवाण मोडलेलं. त्याची नि माझी कुस्तीच लागली. मी चिडलो. ‘तू माझं पिकवाण का मोडलंस’, म्हणत त्याला खाली घातला. मग त्यानं, ‘तू माझं पिकवाण सगळंच का चोरलंसम्हणत मला खाली घातला.

माझं दे मग तुझं देतोमी म्हणू लागलो.

मग मी बऱ्याच वेळानं त्याचं आंबं नेऊन घातलेला बांध उकरू लागलो. माती काढू लागलो. सैरभैर होऊ लागलो. हाललो. एक आंबा नाही. परत परत पिकवाणाची जागा आठवू लागलो. सगळा बांध चाळला. कुणी कारभार केला का काय? ह्याची काळजी लागली. अधाशागत सगळ्या शेताचं बांध चाळू लागलो. सरदाऱ्या नि कोणकोण डोक्यातनं उगवाय लागली. पिकलेलं आंबं खालती दिसू लागली. ज्ञानू माझ्याकडं आंबं मागू लागलेलाही दिसू लागला.

ज्ञानू माझ्याकडं बघत राहिलेला आणि माझं आंबं चोरलेलं सगळ्यांना सांगणार म्हणतेला, तो थांबला नव्हताच आणि सगळी मलाचोरटं बल्ल्याम्हणतेलं कानात घुमू लागलं. सरदाऱ्याला तर एवढंच कायम चिडवाय गावंल. काही झालं तरी तो, ‘बरपल्या चोरपरटंम्हणायचं सोडणार नाहीच. मला ज्ञानूचा राग आलेला. पण पिकवाणाचं काय झालं ते कळत नव्हतं. माझ्याशिवाय कोणालाच ही जागा ठावंच नव्हती? आणि मी ज्ञानूचं पिकवाण नेणार, हे फक्त शालूलाच ठावं होतं. पण तिला जागा ठावं नव्हतीच.

मी कारण नसताना आणखी बांध चाळू लागलो. ज्ञानूला घरात घ्यायचं नाही का आपण त्याच्या घरात जायाचं नाही, हे एकदम म्हंजे एकदम ठरवून टाकलं. आणखी एक, राजाच्या बाला ज्ञानूचं नाव सांगायचं म्हंजे सांगायचं, आंबं गावल्यावर. शालूसंगं बोलायचं बंद करून टाकायचं. शालूचा राग आला. तरी आंबं गावत नाहीत. ज्ञानू मला सोडत नाही. मी दमून गेलो आहे. तरीबल्ल्या चोरटं, चोरटं बल्ल्या.’ ‘चोरपरटं बरपल्ल्याहे ज्ञानूचं शब्द सगळ्या गावातल्या पोरांच्या तोडातनं बाहेर पडतेलं ऐकायला येतंलं वाढतच निगालं आहे. पिकवाणाचं आंबं पिकत निगाल्यागत तेच शब्द डोक्यात पिकत निगाले आहेत.

मी पळतच गावात गेलो. शालूच्या परड्याच्या दारानं तिच्या घरात गेलो. तर ज्ञानू

गल्लीच्या दारानं तिच्या घरात. शालूला मी एकदम, माझ्या संगं बोलायचं नाहीसम्हणून सांगून टाकलं. ती रडाय लागली एकदम. काहीच बोलली नाही. ज्ञानू हसाय लागला एकदम. मला काहीच कळंना.

शालूनं माळ्याला शिडी लावली. ती माळ्यावर गेली. तिच्या पाठोपाठ ज्ञानू गेला. शालू पिकल्यावर काढ आंबं, आता काढू नगोसम्हणू लागली.

मी शिडीवरनंच बघत होतो तर शालू माळ्यावर पिंजरात घातलेलं आंबं काढू लागलेली. ज्ञानूचं ती ऐकत नव्हती. तेच आंबं होतं. राजाच्या आंब्याचं ज्ञानूनं आणलेलं. मी नेलंलं.

ज्ञानूला ती म्हणाय लागली, ‘राजाच्या बाला आम्ही सांगितलं नाही तेचं तुला काहीच नाही. गेल्या वर्षी सरदाऱ्याला मारलेलं ठावं हाय का नाही.’ ज्ञानू आता म्हणू लागला, ‘हे सारं आंबं वाटून घेया, बल्या वर ये.’

मी मग माळ्यावर गेलो. परत ते आंबं पिंजरात घातले.

ती आमचं चालूच होतं. गवतात, पिंजरात, बांधात आंबे दडवायचे नि हुडकायचे. शिवारभर हुदडायचं.

या दडवा दडवीत नि हुडका हुडकीत पिकवाणं तशीच राहतात काही. पाऊस पडला की त्यातून कोंब वर आल्यावरच कळतं.

मी ज्ञानूला म्हणतो, ‘तुझं आंबं आमच्या बांधात उगवल्यात ते ने. जा नि खा. जा लय भारी लागतील बग.’

तो मग मला दाखवत, ‘उगावलेल्या आंब्याचं पिकवाण घाल जा तुझ्या बांधात म्हंजी पिकल्यालंच आंबं खाचील. पिकवाण घालायचं कामंच नाहीअसं म्हणतो.

आणि खरंच मला पिकलेल्या आंब्याची झाडंच उगवाय पाहिजेत, असं वाटाय लागलं, एकदम!