भाषिक वादापेक्षा भाषिक सौंदर्याची चव अमृताहुनही गोड

१७ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


नुकताच अमित शहा यांच्या निमित्ताने हिंदी विरुध्द तमिळ असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. तमिळनाडूच्या राजकीय नेत्यांसोबतच संगीतकार ए. आर. रेहमान यानेही एक ट्विट करत या वादात उडी घेतलीय. रेहमानचं हे ट्विट म्हणजे एक पोस्टर आहे. आपल्या भाषेचं सौंदर्य एखादा व्यक्ती किती नव्या पद्धतीने मांडू शकतो याचं हे एक उदाहरण आहे.

तमिळ थाई! हिच्या नावातच मराठीतला आई हा शब्द सामावलाय. अशी ही तमिळ भाषेची माता. हिचा ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रेहमान याने ‘तमिळा’ असा उल्लेख करत एक पोस्टर ट्विट केलं.

लालभडक रंगाचं हे पोस्टर, त्यात पांढऱ्या साडीत हल्ला करण्यासाठी उसळी घेतलेली स्त्री अन् तिच्या हातात त्रिशुलासारखं अस्त्र. तिचा रंगही सावळा, असं लक्ष वेधून घेणारं इलस्ट्रेशन केलेलं. त्या इलस्ट्रेशनच्या खाली वर म्हटल्याप्रमाणे तमिळा हे तमिळ भाषेत लिहिलेलं देवीचं नाव अन् तमिळ कवितेच्या दोन ओळी. या ओळींचा अर्थही सुरेख.

या ओळी म्हणतात, ‘तमिळ हे आपल्या अस्तित्वाचं मूळ आहे’. भारतीदासन यांनी लिहीलेल्या ‘तमिल्यक्कम’ या ग्रंथातल्या कवितेच्या या ओळी. ही कविता पुदुच्चेरीचं राज्य गीत आहे. तमिळ भाषेच्या अभिमानाने ओतप्रोत भरलेल्या या गीतातल्या या दोन ओळी तमिळ भाषिक आपल्या भाषेबद्दल किती अभिमानी व प्रेमळ आहेत याची जाणीव करुन देतात.

कशी दिसते तमिळ थाई

खरं तर, या पोस्टरमधे असलेली तमिळा म्हणजेच तमिळ थाई ही मुळात काही अशी दिसत नाही. या देवीचं मूळ मंदिर कराईकुडी इथं आहे. या देवीची मूर्ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घडवली गेलीय. थोर मंदिर वास्तुविशारद व्ही. स्थानपती म्हणजेच वैद्यनाथ गणपती स्थानपती यांनी या देवीची मूर्ती पृथ्वीवर बसलेली, एका हातात हस्तलिखित, दुसऱ्या हातात जपमाळ आणि तिसऱ्या हातात याझ हे तंतुवाद्य अशी साकारलीय. चौथा हात भक्तांना आशिर्वाद देतोय.

या देवीची मूर्ती हिंदू देवता सरस्वती देवीच्या मूर्तीसारखी दिसते. ए. आर रेहमान याने या देवीचं रुप जसं साकारलंय तशीच या देवीची वेगवेगळ्या प्रकारची रुपे पोस्टर, पुस्तके, वर्तमानपत्र या माध्यमांमधे आपल्याला पाहायला मिळतात.

पण काही ट्विटरकरांनी ए. आर. रेहमानच्या ट्विटला आक्षेप घेत, मूळ देवीची प्रतिमा ट्विट केली. तंजावरच्या तमिळ विद्यापीठचे भारतीय महासागर अभ्यास केंद्राचे समन्वयक तसंच सागरी इतिहास आणि सागरी पुरातत्व विषयातले तज्ञ व्ही. सेल्वाकुमार यांनी याबाबत एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय.

ते म्हणतात की, ‘तमिळ भाषा देवी किंवा तमिळ थाई या देवीचं व्यक्तीमत्व तात्कालीन पुरुषप्रधान संस्कृतीप्रमाणे घडवलं गेलंय. पारंपरिक पध्दतीची साडी नेसलेली स्त्री असं व्यक्तिमत्व या देवीच्या प्रतिमेतून प्रतीत होतं. सध्या तुम्ही जे पोस्टर पाहताय त्यात ही देवी स्वतंत्र आणि आधुनिक स्त्रीचं दर्शन घडवते. हे देवीचं रुप सर्व क्षेत्रात धडाडीने आपले कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रीचं प्रतीक आहे.”

तमिळनाडूच्या राज्यगीतामधे उल्लेख

या देवीचा उल्लेख तमिळनाडूच्या राज्यगीतामधे आहे. हे राज्यगीत मनोमनयम सुंदरम पिल्लई या तमिळ साहित्यिक आणि नाटककाराने १९व्या शतकाच्या उत्तरार्धामधे ‘मनोमनयम’ या नाटकासाठी लिहिलं.

या गाण्याला १९४० ते २०१५ असं जवळजवळ पाऊण शतक आपल्या संगीताने सिनेसृष्टी गाजवणाऱ्या मनयांगत सुब्रमण्यम विश्वनाथन यांनी संगीत दिलं. तमिळनाडू सरकारने १९७०ला या गीताला अधिकृतरित्या राज्यगीत म्हणून मान्यता दिली. हे गीत तमिळनाडूच्या शाळा, सामाजिक समारंभांमधे आजही गायलं जातं.

हेही वाचा: मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे

देवीच्या हातातलं अस्त्र

या पोस्टरमधे ही देवी जितकं आपलं लक्ष वेधून घेते, त्याहूनही कित्येकपटीने कुतुहलाचा विषय आहे तिच्या हातातलं अस्त्र. हे अस्त्र त्रिशूळासारखं दिसत असलं तरीही ते त्रिशूळ नाही. त्यावर आहे एक अक्षर. हे अक्षर तमिळ भाषेतलं सर्वात प्राचीन अक्षर असून या अक्षराला स्वत:चा विशिष्ट असा इतिहास आहे.

‘हे तमिळ भाषेतलं सर्वात प्राचीन अक्षर असून जगातल्या फारसीसारख्या जुन्या भाषांमधेही या अक्षराचा उल्लेख नाही’, असं तमिळनाडूतल्या कांचीपुरममधे राहणाऱ्या त्यागराजन कृष्णमूर्ती यांनी सांगितलं. इतकंच काय तर अगदी कोणत्याही द्राविडी भाषांमधेही हे अक्षर नाही, अस अन्नामलाई विद्यापीठातून भाषाशास्त्रात पीएचडी करणाऱ्या रिसर्च स्कॉलर निकिता गणेश यांनी सांगितलं.

निकिता यांच्या मते, द्रविडियन भाषांमधे तुमची जीभ कुठे स्पर्श करते आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही स्वर निर्मिती करता याला फार महत्व आहे. या अक्षराचा उच्चार काहीच तमिळ भाषिकांना नीट माहिती आहे कारण या शब्दाचा उच्चार वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामधे तुमची जीभ टाळू आणि पडजीभ  म्हणजेच जीभेच्या आतल्या मांसल भागाला अत्यंत हलकासा स्पर्श करते.

इंटरनॅशनल फोनेटिक अल्फाबेट डिक्शनरीत याचा समावेश आहे. त्यागराजन यांनीही याबाबत अधिक माहिती देताना हे अक्षर प्राचीन तमिळ साहित्यात जास्त वापरण्यात आलं असून, तमिळ साहित्यात या अक्षराला महत्त्वाचं स्थान असल्याचं सांगितलं. 

भाषेचं सौंदर्य जपायला हवं

या पोस्टरचा इतिहास खोदून काढताना एखादा ऐतिहासिक खजिना हाती लागल्याचं समाधान लाभलं. वर म्हटल्याप्रमाणे तमिळ की हिंदी या वादात पडण्याचं काही कारण नाही. पण अशावेळी थोर संत ज्ञानेश्वरांच्या ओळी आठवतात. मराठी भाषेचं कौतुक करताना ज्ञानेश्वर ‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।’ असं म्हणतात.

तमिळ भाषेतले कवी भारतीदासनही तुमचं मूळ हे तमिळ भाषेत आहे असं म्हणत तमिळ भाषिकांमधे भाषेविषयीच्या अभिमानाची बीजे पेरतात. भाषा कोणतीही मग ती मराठी, हिंदी किंवा तमिळ असो, तिचं सौंदर्य वृद्धिंगत करणं हे या थोर व्यक्तिमत्वांसारखं आपल्याला जमतंय का? निदान ते टिकवणं तरी जमतंय का? असा विचार करुन अंतर्मुख होणं हे भाषेवरुन वाद घालण्यापेक्षाही केव्हाही योग्यच.

हेही वाचा: 

मराठी भाषेच्या अभिजातपणाची कूळकथा

कुणा एकाच्याच मालकीची आहे का ही भाषिक संस्कृती?

महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ