टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतली तरुणाई

२४ सप्टेंबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


डॅनियल मेदवेदेव आणि एम्मा रॅडूकानू यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचं अजिंक्यपद मिळवताना बुजुर्ग आणि प्रस्थापित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला. त्यांच्या या कामगिरीमुळे ग्रँड स्लॅममधे खर्‍या अर्थाने युवाशक्तीचाच विजय झाला आहे. टेनिस क्षेत्रासाठी हा स्वागतार्ह बदल आहे.

टेनिस क्षेत्रामधे करिअर करणारे खेळाडू एक वेळ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेबद्दल फारसे गांभीर्याने लक्ष देणार नाहीत; पण ग्रँड स्लॅम स्पर्धा ही त्यांच्यासाठी सर्वोच्च महत्त्वाची स्पर्धा असते. प्रतिष्ठेच्या या स्पर्धांमधे विजेतेपदाची माळ आपल्या गळ्यात कधी येते हे स्वप्न तो पाहात असतो आणि त्यासाठी तो खूप मेहनत घेत असतो.

डॅनियल मेदवेदेव आणि एम्मा रॅडूकानू यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचं अजिंक्यपद मिळवताना बुजुर्ग आणि प्रस्थापित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला. त्यांच्या या कामगिरीमुळे ग्रँड स्लॅममधे खर्‍या अर्थाने युवाशक्तीचाच विजय झाला आहे. टेनिस क्षेत्रासाठी हा स्वागतार्ह बदल आहे.

ग्रँड स्लॅम स्पर्धेचं महत्व

टेनिसमधे ग्रँड स्लॅम स्पर्धांना अतिशय महत्त्व प्राप्त झालंय. व्यावसायिक टेनिस क्षेत्रात पदार्पण करणारा प्रत्येक खेळाडू या स्पर्धांमधे आपल्याला केव्हा आणि कशी संधी मिळेल याचीच वाट पाहत असतो. ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मोसमाला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेने सुरवात होते. त्यानंतर फ्रेंच, विम्बल्डन आणि सरतेशेवटी अमेरिकन खुली स्पर्धा हा क्रम आणि त्यांचा संभाव्य कालावधीही ठरलेला असतो.

या स्पर्धांच्या पात्रता फेरीत स्थान मिळवणं आव्हानात्मक असतं. तिथंही मानांकनं दिलेली असतात आणि मुख्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंमधे अहमहमिका दिसून येत असते. ग्रँडस्लॅम स्पर्धांमधे विजेतेपद मिळवणारा एखादा खेळाडू जर त्यानंतर वर्षभर एकही स्पर्धा खेळला नसेल तर त्याला पुन्हा ग्रँड स्लॅम स्पर्धांसाठी पात्रता फेरीतूनच यावं लागतं. सांगण्याचा मतितार्थ हाच की, या स्पर्धा प्रत्येक खेळाडूसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

दिग्गज खेळाडूंची माघार

माजी विजेते रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यासह अनेक मानांकित खेळाडूंनी यंदाच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली होती. साहजिकच विजेतेपदासाठी नोवाक जोकोविच याचं पारडं जड मानलं जात होतं. यंदा ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि विम्बल्डन या तिन्ही स्पर्धा जिंकणार्‍या जोकोवीच याला अमेरिकन स्पर्धा जिंकून ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी होती.

अंतिम फेरीत स्थान मिळवूनही त्याला या कामगिरीपासून वंचित राहावं लागलं. रशियन खेळाडू मेदवेदेव याने सरळ तीन सेटस्मधे त्याला गारद केलं आणि करिअरमधलं पहिलं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद पटकावलं. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात त्याला जोकोविचकडून तीन सेटस्मधे पराभूत व्हावं लागलं होतं. त्याची परतफेड त्याने तितक्याच जोमाने केली.

अनुभवी खेळाडूंचा पराभव

महिला गटात ब्रिटिश खेळाडू रॅडूकानू हिने विजेतेपद मिळवत सनसनाटी कामगिरी केली. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवत ग्रँडस्लॅम जिंकणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे. हा पराक्रम करताना तिने पात्रता फेरीतले तीन आणि मुख्य फेरीतल्या सात अशा सलग दहा मॅच जिंकताना एकही सेट गमावला नाही. यावरून तिच्या कामगिरीतलं सातत्य प्रकर्षाने दिसून आलं.

अंतिम फेरीत तिने कॅनडाची १९ वर्षीय डावखुरी खेळाडू लैला फर्नांडेझ हिला पराभूत केलं. या दोन्ही बिगर मानांकित खेळाडूंमधल्या अंतिम लढतीबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. या दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरीपर्यंत वाटचाल करताना अनेक मानांकित आणि अनुभवी खेळाडूंना पराभवाचा रस्ता दाखवला.

अनुभवापेक्षा युवाशक्ती अधिक सरस आहे हेच या दोन्ही खेळाडूंनी दाखवून दिलं होतं. या दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेत केलेला बहारदार खेळ चाहत्यांसाठी खेळाचा निखळ आनंद देणारा ठरला. क्रॉसकोर्ट फटके बेसलाईन व्हॉलीज, नेटजवळून प्लेसिंग, अचूक आणि बिनतोड सर्विस असा चतुरस्र खेळ या दोन्ही खेळाडूंनी केला. मात्र, अंतिम मॅचमधे रॅडूकानू हिने महत्त्वाच्या क्षणी खेळावर नियंत्रण मिळवलं होतं आणि त्याचाच फायदा तिला विजय मिळवण्यासाठी झाला.

हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

रॅडूकानूचं पुणेरी ‘कनेक्शन’

करिअरच्या सुरवातीला परदेशातल्या स्पर्धेत मिळवलेलं विजेतेपद भावी कारकिर्दीसाठी प्रेरणादायी असतं. रॅडूकानू हिने पुण्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं होतं. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या स्पर्धेत तिने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवलं. नंतर विजेतेपदावर आपली मोहोर नोंदवली होती. त्यावेळी तिने सलग सात मॅच जिंकताना सातत्यपूर्ण कौशल्याचा ठसा उमटवला होता.

महाराष्ट्रात आणि आपल्या देशातल्या इतर ठिकाणी आयोजित केल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे अनेक परदेशी खेळाडू विजेतेपद मिळवत दिमाखदार कारकिर्दीचा श्रीगणेशा करतात. स्टॅनिस्लास वॉवरिंका याने इंडियन ओपन स्पर्धेतलं विजेतेपद मिळविल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचंही विजेतेपद मिळवलं होतं.

परदेशी खेळाडू भारतामधील स्पर्धांचा अनुभव घेत ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारतीय खेळाडूंनी ग्रँड स्लॅममधल्या एकेरीत अजिंक्यपद मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

कोरोनाच्या नियमावलीची ऐशी-तैशी

जगामधे कोरोनाच्या महामारीचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही. अमेरिकाही त्याला अपवाद नाही; पण अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या वेळी कोरोनासंदर्भात केलेल्या नियमावलीची ऐशी-तैशीच झालेली पाहायला मिळाली. प्रेक्षकांच्या संख्येच्या कोणत्याही मर्यादा नव्हत्या, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचं फारसं पालन केलेलं नव्हतं.

बॉल बॉईज आणि साईड पंच क्वचितच मास्क घालून उभे राहिले होते. टोकियो इथं नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमधे कोरोनाच्या नियमावलीचं कटाक्षाने पालन करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर अमेरिकन खुल्या स्पर्धेतल्या या बेशिस्तपणाचा फटका भविष्यात संबंधित प्रेक्षक आणि तांत्रिक अधिकारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत फारशी चमक दाखवता आली नाही. सुमित नागल, रामकुमार रामनाथन आणि अंकिता रैना यांना एकेरीच्या पात्रता फेरीतच पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहन बोपण्णा याने पुरुषांच्या दुहेरीत इवान लोरिक याच्या साथीत भाग घेतला होता. मात्र, त्यांची वाटचाल तिसर्‍या फेरीतच संपुष्टात आली.

हेही वाचा: 

लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

हो, आमच्या प्रेमाचा रंग करडा आहे

नव्या पिढीचं प्रेम: स्माईलीच्या मागेही प्रेमाची भाषा

मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)