कोकूटनूरच्या यल्लम्मा यात्रेत आजही देवदासी सोडतात का?

०३ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरच्या कोकूटनूरमधे यल्लमाची यात्रा भरते. तीन दिवस ही यात्रा चालते. देवीला दररोजचा नैवेद्य दाखवावा लागतो. सरकारनं पशुहत्या बंद केली असली तरी बोकडाचा बळी दिला जातोच. देवाला जोगतिणी वाहिल्या जातात. आजही देवदासी सोडतात का या प्रश्नाचं उत्तर या यात्रेत मिळालं नाही. पण देवदासी प्रथेचे व्रण लोक उजळ माथ्यानं घेऊन फिरतात.

‘आजही देवदासी सोडतात का? लाखो लोकांच्या गर्दीत या प्रश्नाचं उत्तर शोधणं खरंच कठीण. पण त्याचा आजच्या काळातला शोध घ्यायला हवा.’ उत्तम कांबळे यांच्या 'देवदासी आणि नग्नपूजा' या पुस्तकातल्या या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी कोकूटनूरला जाण्याचा निर्णय घेतला. जो प्रश्न मनात घेऊन गेले होते त्याचं उत्तर सापडलं नाही. पण देवीच्या नावाने चालणारा 'दास्याचा' नजारा मी पाहू शकले.

मी जिथं गेले होते तो प्रदेश माझ्यासाठी एकदमच नवीन होता. तिथल्या लोकांमधेही देवदासींबद्दल फारशी माहिती नव्हती. ज्यांना होती त्यांनी ती रीतसर लपवली. कायद्याने देवदासी सोडायला बंदी आहे. त्यामुळं पोलिसांचा पहारा असताना उघडपणे कुणीही देवदासी सोडणार नाही. म्हणूनच कदाचित ‘आजही देवदासी सोडतात का?’ याचं उत्तर मिळत नाही.

हे उत्तर मिळालं नसलं तरी कोकूटनूरच्या यात्रेत देवदासीच्या अमानुष प्रथेचे व्रण लोकं धर्माच्या पदराखाली उजळ माथ्याने मिरवताना दिसतात. आपण त्यांना जोगतीण, बाळ जोगतीण, जोगप्पा, वाघ्या, मुरळी या नावाने ओळखतो.

बळी नाही, पण नैवेद्य मांसाहारी

मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशीपासून सुरू होणारी ही मुख्य यात्रा तीन दिवस असते. तिथून पुढे एक महिना जत्रा सुरू असते. पूर्वी यात्रेमधे बळी देण्याच्या परंपरेमुळे प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असे. हे थांबवण्यासाठी इथं बसणारा बोकडांचा बाजार थांबवण्यात आला. पण अजूनही मोठ्या बोकडांची कत्तल होतेच. रात्रीच्यावेळी बकरा, बोकडांची खरेदी विक्री चालू असते.

पहिल्या दिवशी यल्लम्मा देवीला 'खारी आंबिल' चा नैवेद्य दाखवावा लागतो. हा नैवेद्य म्हणजे मांसाहार. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा गोडा नैवेद्य दाखवला जातो. तिसऱ्या दिवशी देवीची पालखी गावातून देवळाजवळ येते. त्यानंतर यात्रा संपते. या पालखीवर लोक भंडारा, खोबरं आणि फुलं उधळतात.

देवळाचा पुजारी पेटलेल्या गोवऱ्यांवर चालतो आणि हातातल्या तलवारीने बकऱ्याचं मुंडकं उडवून बकऱ्याचा बळी देतो. घरात लग्न कार्य आहे, नवस बोललाय अशा कारणांसाठी बळी दिले जातात. हा बळी देताना कुणी बघायचं नसतं. कुणी बघितलंच तर पुढची तीन वर्ष सलग हा बळी पहायचा आणि तिसऱ्या वर्षी स्वतः 'खारी आंबिल' चा नैवेद्य दाखवावा लागतो. बोकडाचा बळी झाला की यात्रा फुटते म्हणजे संपते. त्यानंतर देवीचं तोंड झाकून ठेवलं जातं ते थेट पोर्णिमेलाच उघडलं जातं आणि त्यानंतर महिनाभर जत्रा भरते.

हेही वाचा: यल्लम्मा देवीची यात्रा अनुभवायलाच हवी अशी आहे

देवी जोगतिणींच्याच हातचा नैवेद्य स्वीकारते

देवीच्या पूजेसाठी देवीची मूर्ती एका टोपलीत ठेवली जाते. त्या टोपलीचा आकार कितीही मोठा असू शकतो. या टोपलीला जग म्हणतात. प्रत्येकाच्या सेवा करण्याच्या क्षमतेनुसार जगाचा आकार ठरतो. देवीच्या नैवेद्यासाठी घराघरातून छोटी परडी आलेली असते. परडीसोबत एक आणखी छोटा गोल म्हणजे द्रोणाच्या आकाराचा परशुरामही असतो.

गोडा नैवेद्याच्या वेळी प्रत्येक घराघरातून आलेल्या परडीची पूजा केली जाते. परडीत कांद्याची पात, अंबाड्याची भाजी, मेथीची भाजी, लिंबू, आंबट गोड बोरं अशा भाज्या आणि फळं ठेवली जातात. गोडा नैवेद्य तयार झाला की जोगत्यांच्या मदतीने वाद्य वाजवत पूजा होते. जोगतीण आणि वाद्यासह दाखवलेला नैवेद्यच देवी स्वीकारते, असा इथं समज आहे.

परडीची आरती करून पूजा झाली की लगेच प्रत्येक कुटुंब किंवा गाव, वाडीचा नैवेद्य दाखवण्यासाठी देवळाजवळ नेला जातो. देवीला नारळ वाढवण्यासाठीही कुटुंबातले पुरूष याचवेळी जातात. तो नैवेद्य दाखवून झाला की प्रसाद म्हणून पुरणपोळी सगळ्यांना वाढली जाते. प्रत्येक परडीतही देवीचा प्रसाद म्हणून पुरणपोळी दिली जाते. परडीसह घरी पोचल्यावर परडीतल्या भाज्यांचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. या पद्धतीला देवीची बोळवण करणं असं म्हणतात.

देवीच्या पालखीसमोर किन्नरही नाचतात

परडीसारखीच जगाचीही पूजा होते. जगामधे यल्लम्मा देवीची मूर्ती शृंगारासह सजवलेली असते. जगातल्या देवीच्या सेवेसाठी केसांची चौरी असते. चौरी म्हणजे देवीला वारा घालण्याचं एक साधन. हे जग देवीच्या दर्शनाला वाजत गाजत नेले जातात. अनेकदा देवीचा जग डोक्यावर घेणारी एका कुटूुंबातलीच माणसं असतात.

कधी पूजेत जोगतिणींना मान असतो. त्यांच्याशिवाय नैवेद्याची पूजा होत नाही की देवीचा जग फिरायला नेत नाहीत. त्याही मिळेल त्या पैशात देवीची आरती म्हणतात, गाणी गातात. देवीचा जग नाचवतात. एका कुटुंबाची आरती झाली की लगेच पुढच्या कुटुंबाची आरती म्हणायला त्या निघून जातात. एखाद्या घरात लग्न समारंभ असेल तर जोगतिणी पूजेसाठी सुपारी ठरवतात. संपूर्ण लग्नात नाच, गाणं, आरती अशा फूल पॅकेजची ही सुपारी असते.

देवीच्या देवळासमोर डोक्यावरुन आणलेला हा जग नाचवतात. तेव्हा त्याबरोबर किन्नर म्हणजे तृतीयपंथी नाच करतात. पाण्याने भरलेल्या तांब्याच्या हंड्यावर देवीचा मुखवटा बसवलेला असतो. हा हंडा डोक्यावर घेऊन त्याचा तोल सांभाळत किन्नरांचं नाचणं चालू असतं. गर्दीतले बघे त्यांना पैसे देतात. बहुतांश किन्नर हे देवीच्या पूजेमधे सहभागी होतात. काही किन्नर यात्रेतल्या दुकानात भीक मागताना दिसतात. तर काही रात्रीच्यावेळी वेश्या व्यवसायही करतात.

हेही वाचा: यल्लमाच्या भाविकांची ओढाताण सरकारला दिसत नाही का?

नग्नपूजेचे अवशेष आजही दिसतात

कोकूटनूर हे ठिकाण कर्नाटकात पण महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे यात्रेला महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लोक येतात. कर्नाटकातले लोक मोठ्या प्रमाणावर येतात. देवळाच्या परिसरात उघड्या माळरानावर लोक कुटुंबकबिल्यासह राहतात. काही जागा तर एखाद्या भागातून येणाऱ्या लोकांसाठी राखीव असतात. मुंबईच्या काही भागातून येणाऱ्या लोकांसाठीही एक जागा राखीव असते.

पूर्वी सरसरसकट सगळे एका तंबूत रहायचे. पण आता तशी सोय आढळत नाही. लोक तात्पुरतं छप्पर बांधतात आणि चुलीवर दोन वेळचं अन्न आणि नैवेद्य शिजवतात. मटणापासून, पुरणपोळ्यांपर्यंत सगळा साग्रसंगीत स्वयंपाक चुलीवर शिजतो.

या संपूर्ण यात्रेच्या लगबगीत स्त्रियांची संख्या मोठी फार मोठी असते. जास्त राबराब स्त्रियांनाच करावी लागते. दारू पिऊन पडलेले किंवी जत्रेत इथे तिथे मजा करत फिरणारे पुरुष सहज दिसतात. पण स्त्रिया त्यांच्या पूजेच्या, जेवणाच्याच तयारीत गुरफटलेल्या असतात.

देवाला वाहिलेल्या जोगतिणींचा पूजेपुरता का होईना स्वीकार होतो. त्यांची कमाई होते. पण देवाला वाहण्याची परंपरा बंद झालेली नाही. पूजेसाठी जोगतिणी लागतात. म्हणून जोगतिणींना देवाला वाहिलं जातं. नाहीतर नव्या जोगतिणी दिसल्याच नसत्या. सरकारने देवदासी सोडणं, नग्नपूजा, पशुहत्या बंद केली असली तरी त्याच्या खुणा इथे दिसतातच.

यात्रेत दुसऱ्या दिवशी डोक्यावर टोपी आणि खाली पंचा नेसलेली मुलं आणि काही पुरुष प्रदक्षिणा घालताना दिसले. बहुधा ते नग्नपुजेचा नवस पूर्ण करण्यासाठीच आले होते. पण नग्न होणं शक्य नसल्यामुळे ते पंचा नेसून प्रदक्षिणा घालत होते.  एकूणच परंपरा, चाली-रीती आणि जगण्याच्या नेमून दिलेल्या चौकटीचं हे दास्य आपल्याला दिसतं. उत्तम कांबळे यांच्या प्रश्नाचं उत्तर यात्रेला येऊन दोन-तीन दिवसात मिळणारं नाही. त्यासाठी बराच पाठपुरावा करावा लागणार आहे.

हेही वाचा: 

सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी

९०० वर्षांच्या दुष्काळाने संपवली सिंधू संस्कृती?

यल्लम्माची यात्रा हे जोगतिणींचं, तृतीयपंथीयांचं माहेरघरच

आपण वापरत असलेल्या कॅलेंडरला आहे हजारो वर्षांचा इतिहास

गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढण्याचं बळ कुठून मिळतं?