जयंत पवार: माणूस, लेखक आणि सहकारी

२९ ऑगस्ट २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट.

पन्हाळगडावरची ती प्रसन्न सकाळ होती. नेहमीसारखा पाऊस सुरू झाला नव्हता पण रात्री थोडासा पडून गेला होता. त्यामुळं वाटा ओल्या झाल्या होत्या. पानांवर पावसाचे थेंब विसावलेले दिसत होते. रात्री उशिरापर्यंत गप्पा मारून झोपल्यानंतर जयंतला आणि मला सकाळी लवकर जाग आली. आम्ही बाहेर पडलो. एक पायवाट दिसली त्या पायवाटेनं चालत निघालो. दोन्ही बाजूंनी गच्च झाडी होती आणि त्या ओल्या वाटेवरून मी आणि जयंत चालत निघालो होतो.

मुंबई मटा, तिथली माणसं, त्यांच्या कार्यपद्धती हे माझ्यासाठी सगळं नवीन होतं. जयंतला त्याची जाणीव असावी. त्यामुळं एकूण कार्यालयीन प्रथा-परंपरांबद्दल तो सांगत होता. अगदी बारीक सारीक. म्हणजे कुठं कुणाशी थेट भिडायचं, कुठं सुरक्षित अंतरावर राहायचं. कुणाशी कसा व्यवहार ठेवायचा वगैरे. मोठ्या भावानं समजावून सांगावं तसं ते सांगणं होतं.

जयंतचं बोलणं अत्यंत हळू असायचं. चालत चालत त्याचं ते हळू बोलणंही स्पष्ट ऐकू यावं एवढी शांतता होती आजुबाजूला. त्या जंगलात त्यावेळी फक्त आमचा दोघांचाच आवाज येत असावा. त्यातही जयंतचा. बोलत बोलत खूप लांब आल्याचं लक्षात आल्यावर आम्ही परत फिरलो.

अगदीच धावती भेट

जून २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात आम्ही कार्यालयीन सहकाऱ्यांनी पन्हाळ्याला सहल काढली होती. जयंत, इब्राहिम अफगाण, श्रीकांत बोजेवार आणि मी. मला कोल्हापूरहून मुंबईला येऊन चारच महिने झाले होते. दरम्यानच्या काळात अशा पावसाळी सहलीचा बेत ठरल्यावर पन्हाळा निश्चित करून मोहिमेचं नेतृत्व आपसुकच माझ्याकडं आलं होतं. पन्हाळ्यावर वीज मंडळाच्या गेस्ट हाऊसवर आम्ही थांबलो होतो.

कराडला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पर्यायी `आपलं साहित्य संमेलन` घेण्याचं नियोजन मित्रवर्य प्रा. राजेंद्र कुंभार यांनी केलं होतं. त्या आयोजनात माझा सक्रीय सहभाग होता. त्यावेळी सुबोध मोरे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी जयंतला निमंत्रित करायला सांगितलं होतं. त्यावेळी जयंतशी पहिल्यांदा बोलणं झालेलं. तेही अगदी मोजकं.

२००३ ला मी सकाळमधे असताना अल्पकाळ मुंबईत आलेलो असताना मुंबई मराठी साहित्य संघातल्या एका कार्यक्रमाहून परतताना जयंतची चर्नी रोड स्टेशनवर धावती भेट झाली होती. पुढं `फिनिक्सच्या राखेतून उठला मोर` हा कथासंग्रह आला तेव्हा रंगनाथ पठारे सरांनी मुद्दाम फोन करून मला तो वाचायला सांगितला होता. त्यावेळी मी प्रहारमधे होतो. प्रहारच्या पुरवणीत त्या संग्रहावर मी लिहिलंही होतं.

हेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा

थेट संपर्क नसला तरी असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क होता आमचा. २०१२ मधे मटाच्या कोल्हापूर आवृत्तीकडे रुजू झाल्यावर जयंतचा संपर्क वाढला. आपली फार वर्षांची जुनी ओळख असल्यासारखं जयंतचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. रविवार पुरवणी, दिवाळी अंकांच्या निमित्तानं बोलणं व्हायचं.

पहिल्या वर्षी दिवाळी अंकाचं सगळं नियोजन झालं असल्यामुळं माझी कविता त्यानं आवर्जून मागवून घेतली. नंतर दिवाळी अंकासाठी पश्चिम घाटासंदर्भातला एक आणि दुसरा हत्तींसंदर्भातला लेख माझ्याकडून लिहून घेतला होता. कोमसापच्या महाड संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंतची निवड झाली होती. त्या संमेलनात एका परिसंवादाचं मला निमंत्रण होतं. परिसंवाद दुसऱ्या दिवशी होता.

जयंतचं भाषण ऐकायला मी कोल्हापूरहून मुद्दाम पहिल्या दिवशी गेलो होतो. अध्यक्ष असलेला जयंत संमेलनाला उपस्थित राहू शकला नव्हता. तेव्हा पहिल्यांदा त्याच्या आजारपणासंदर्भात कळलं.

अस्वस्थ करणाऱ्या कथा

मार्च २०१५ ला कोल्हापूरहून मुंबईच्या मटात दाखल झालो आणि आम्ही सहकारी बनलो. दोघांच्या क्युबिकलमधे फक्त एक प्लायवूड होतं त्यामुळं आमचा नियमित संवाद होऊ लागला. कार्यालयीन आणि त्याव्यतिरिक्तही. मराठी साहित्य आणि साहित्य चळवळी हा दोघांच्याही आस्थेचा विषय असल्यामुळं संवादात सातत्य होतं.

जयंतच्या 'फिनिक्स...' आणि 'वरणभात..' या दोन्ही कथासंग्रहानी मला ज्याम अस्वस्थ केलं. कथा लिहिणारं कुणीही भेटतं तेव्हा मी आवर्जून जयंतची आणि आसाराम लोमटेची कथा वाचायला सांगतो. जागतिक पातळीवर थोर ठरावी अशा दर्जाची ही मराठीतली कथा आहे. कथा लिहिणाऱ्यानं तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करायला हवा, असं मला नेहमी वाटतं.

हेही वाचा: सत्यशोधकीय नियतकालिकेः वाङ्मयेतिहासात मोलाची भर घालणारा संदर्भ ग्रंथ

बोलण्यालाही खोली असायची

जयंत उंच होता. शारीरिक उंची होती. माणूस म्हणूनही उंचच होता. म्हणूनच तो लेखक म्हणून मोठा होता. जयंत हा मितभाषी असल्याचं अनेकांना वाटतं. चष्म्यातून समोरच्या व्यक्तिकडं त्याचं पाहणं त्याच्या व्यक्तिमत्त्वाला एक गांभीर्य आणि खोली प्राप्त करून देणारं होतं.

समोरच्या माणसावर त्याचा आपसुकच दबाव यायचा. पण जयंत मितभाषी असल्याची अफवाच असल्याचं माझं मत होतं. मित्रमंडळींमधे जयंत खूप बोलायचा. त्या बोलण्यालाही खोली असायची. जवळच्या मित्रांसाठी खास गिरणगावातल्या शिव्या त्याच्या ओठावर कायम असायच्या.

शिवीतूनच त्याचं प्रेम व्यक्त व्हायचं. मी एकदा त्याला म्हटलंही, तुझं  आमच्याकडच्या चिले महाराजासारखं आहे. चिले महाराजांनी शिव्या दिल्या, की भक्त खूश व्हायचे. महाराजांनी आशीर्वाद दिला म्हणायचे. त्यावर त्यानं आणखी एक शिवी हासडली.

प्रकृतीशी संघर्ष

जयंत माणसं जपण्याबाबत हळवा होता. एकदा काहीतरी निमित्तानं एका वाह्यात सहकाऱ्यामुळं मी दुखावलो असल्याची जाणीव जयंतला झाली. जयंतचा थेट त्याच्याशी संबंध नव्हता पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यासाठी आपण जबाबदार आहोत असं जयंतला वाटत असावं. आम्ही दोघांनीही त्याचा कधी उच्चार केला नाही, पण माझ्या मनातनं ती गोष्ट काढून टाकण्यासाठी जयंतनं जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचं मला जाणवत होतं.

जयंतची ऑफिसातली पार्टीही जंगी असायची. सढळ हातांनी खर्च करायचा. प्रकृतीशी अनेक वर्ष त्याचा संघर्ष सुरू होता. प्रत्येक आजारपणानंतर नव्यानं उगवून आल्यासारखा समोर यायचा. पण स्वतःच्या वेदनेचा कधी गवगवा केला नाही.

हेही वाचा: एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

भाषा संचालकांच्या नोंदीचा किस्सा

एक भन्नाट किस्सा आहे. जयंतच्या चिकाटीचा. अग्रलेख, धावते जग, नोंद अशी सदरं आहेत. त्या त्या दिवशी संपादक निश्चित करतील त्या विषयावर लिहायचं असतं. भाषा संचालनालयाचे एक माजी संचालक वारल्याची बातमी कुठंतरी आली होती. एका सहकाऱ्यानं नोंद साठी त्यांचं नाव सुचवलं. त्यांच्यासंदर्भात कुणालाच माहिती नव्हती.

संपादकांनी तेच नाव अंतिम केलं. ज्या सहकाऱ्यानं नाव सुचवलं होतं तो नेमका त्यादिवशी रजेवर होता. ती नोंद लिहिण्याची जबाबदारी जयंतवर आली. ते भाषा संचालक होते यापलीकडं एका ओळीचीही माहिती कुठं उपलब्ध नव्हती. जयंतनं अनेकांना फोन केले. पण कुणालाच काही माहिती नव्हती. तीनशे शब्द लिहायचे होते, काहीच माहिती नसताना कसे लिहिणार हा प्रश्न होता.

जयंतची धडपड म्हणण्यापेक्षा गंमत आम्ही होतो. आणि हसत होतो. ते गृहस्थ साहित्य सहवासमधे राहात होते, असा एक आशादायक धागा मिळाल्यावर जयंत उत्तेजित झाला. त्यानं लगबगीनं विजया राजाध्यक्षांना फोन केला. निवृत्त भाषासंचालक, साहित्य सहवासमधे राहणारे म्हणजे विजयाबाईंकडे माहिती मिळणार याची त्याला खात्रीच होती. पण त्याला विजयाबाईंनी सांगितलं की, हो इथंच राहात होते ते. बाकावर बसलेले दिसायचे अधुनमधून. ते खूप मितभाषी होते. बस्स एवढंच.

जयंतनं हे सांगितलं तेव्हा आमची हसून पुरेवाट झाली. भाषासंचालक होते आणि मितभाषी होते एवढ्या संदर्भावर तीनशे शब्द लिहायचे होते. जयंतनं आणखी खटपट करून काही माहिती मिळवली आणि भाषा संचालकांची नोंद करून टाकली. तीनशे शब्दांसाठी अख्खा दिवस खर्च करावा लागला होता. भाषा संचालकांच्या नोंदीचा हा किस्सा पुन्हा पुन्हा आठवून आम्ही खूप हसून घ्यायचो.

व्यावसायिक नीतीमत्ता पाळणारा माणूस

जयंतचा सेवनिवृत्तीबद्दल ऑफिसमधे छोटासा समारंभ झाला तेव्हा मी म्हणालो होतो, `आपण काम करत असतो, पण आपण कुणासोबत काम करतो हे महत्त्वाचं असतं. आपण जयंत पवारसोबत काम करतो हे बाहेर सांगतानाही स्वतःला उन्नत केल्यासारखं होतं.`

आणखी एका गोष्टीचा मी उल्लेख केला होता. `जयंत एवढा मोठा नाटककार, कथाकार आहे; पण नोकरीच्या ठिकाणी त्या कशाचंही अवडंबर न माजवता त्यानं व्यावसायिक नीतीमत्ता कसोशीनं पाळली.`

काही गोष्टी आपल्या काळात असणं ही भाग्याची गोष्ट असते. जयंत पवारसारखा कथाकार ही त्यातलीच एक गोष्ट. जयंतचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे.

हेही वाचा: 

तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच! 

टेस्ट मॅचेस चार दिवसांच्या, पण यात नक्की फायदा कुणाचा?

मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे

संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो